भेदाभेदांच्या पलीकडचं स्वागत नव्या वर्षाचं

०१ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


धर्मवेडे काहीही सांगत असतील, तरी थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर हे आता एका धर्माचे उरलेले नाहीत. ते लोकोत्सव बनलेत. आपल्या गटारीसारखे. ते धर्माशी नसून कालगणनेशी संबंधित आहेत. गटारी हे श्रावण महिन्याच्या निग्रहाआधी इंद्रियांना दिलेलं रिलॅक्सेशन. तसंच पंचांग ते कॅलेंडर या स्थित्यंतरातलं एक सेलिब्रेशन आहे आपलं न्यू इयर.

वर्ष येतं जातं. भिंतीवरचं कॅलेंडर बदलतं. आपलं आयुष्य तसंच सुरू राहतं. आयुष्य तेच आहे अन् हाच पेच आहे. तरीही तो पेच न सोडवता अख्खं जग न्यू इयर साजरं करतं.

थर्टी फर्स्ट, न्यू इयर हे नव्या जगाचे उत्सव आहेत. जवळपास सगळ्या देशात ते साजरे होतात. सर्व धर्माचे लोक ते साजरे करतात. भाषा, रंग, कूळ, जात, प्रदेश असे सगळे माणसामाणसातले बांध एका कालगणनेने तोडलेत. या ओळखींपेक्षा, अस्मितांपेक्षाही प्रत्येकासाठी आपलं जगणं महत्त्वाचं असतं. आपण जगणं सोप्या करणाऱ्या गोष्टी स्वीकारत असतो. तेव्हा आपण अस्मिता बाजूला ठेवतो.

म्हणूनच बारा भानगडी असलेल्या आपापल्या जुन्या कॅलेंडरांना म्हणजेच पंचांगांना आपण असंच सोडून दिलं. त्याच्याशी आपल्या धर्माचे, संस्कृतीचे, परंपरांचे, रितीरिवाजांचे अनेक अभिमान जोडलेले होते. तरीही जुनी पंचांगं सोडून दिली. फक्त हिंदूंच नाही, सगळ्या धर्मांत तसं झालंय. कारण आपण आता वापरत असलेलं १ जानेवारीला सुरु होणारं ग्रॅगेरियन कॅलेंडर सोपं आहे.

खरं तर आपल्यासाठी हे इसवी सन. इसवी म्हणजे इसाचं. इसा म्हणजे येशू. येशू ख्रिस्त. आज जितकं वर्षं आहे, तितक्या वर्षांपूर्वीपासून ही कालगणना मोजली जाते. म्हणजे हे २०१९ वर्षं आहे, तर तितक्या वर्षांपूर्वी गोठ्यात जन्मलेलं येशूबाळ चार वर्षांचा असेल. या कालगणनेमुळे आता जगभर ख्रिस्तपूर्व आणि ख्रिस्तानंतर अशी काळाची विभागणीच झालीय. 

कसंबसं ३५ वर्षांचं आयुष्य मिळालेला हा गरिबांमधेच राहणारा दलित पीडितांचा मसिहा साधंसं आयुष्य जगला. त्याच्या अपरंपार करुणेने त्याला अद्भूततेचं वलय मिळालं. येशूने धर्म सोपा करून टाकला. येशूने गरीबांचं अवघडलेलं जगणंच सोपं करून टाकलं. त्यामुळे काळावर प्रभाव टाकणारा त्यांच्यासारखा दुसरा माणूस नाही झाला दुसरा. काळ त्याच्या नावाने ओळखला जाऊ लागला.

येशूने ना धर्म स्थापन केला. ना  कोणता वर्गलढा उभारला. ना जातीचं संघटन केलं. त्याने हे इसवी सनाचं कॅलेंडरही सुरू केलं नाही. संघटित धर्माची गरज म्हणून सोळाव्या शतकात कुठल्याशा पोपने ते सुरू केलं. खरंतर रोमन वगैरे काळापासून त्याच्या आधीच्या आवृत्त्या होत्याच. ते ख्रिस्ती धर्माने स्वीकारलं . हवं तसं साफसूफ केलं. पोपच्या धर्माला येशूचं नाव होतं. त्यामुळे  पोपचा धर्मही पसरत गेला. पोपच्या या कॅलेंडरलाही नाव येशूचं होतं. त्यामुळे ते अधिक पसरत गेलं.

येशूच्या नावाने साम्राज्य पसरवून युरोपातल्या देशांनी जगभर वसाहती केल्या. तेव्हा येशूच्या नावाचं कॅलेंडर अधिक पसरत गेलं. पोप धर्माच्या साम्राज्याचं प्रतीक बनला. पण येशू धर्माच्या भिंती ओलांडून माणसाच्या मनामनात पसरत होता. महात्मा फुलेंसाठी तो दुसरा बळीराजा ठरावा, इतका खोलवर पाझरत गेला.

१ जानेवारी हे खरं तर ख्रिश्चनांचं नवं वर्ष. ख्रिश्चन हा जगातला सगळ्यात मोठा धर्म. धर्म कोणताही असो. निराधाराला आधार देण्यासाठी त्याची निर्मिती झालीही असेल. पण आज सगळेच धर्म दुकानं झालेत. मोठमोठे शॉपिंग मॉल बनलेत. ख्रिश्चन धर्म तर जगभर पसरलेली सगळ्यात मोठी बाजारपेठ. त्याचा सगळ्यात मोठा सण नाताळाचा. 

ख्रिस्तजयंतीपासून बारा दिवस चालणारा. त्यात थर्टी फर्स्टही आलं आणि न्यू इयरही. त्याचा बाजार होणार होताच. बाजारात सण विकायचा होता. बाजाराने या सणाला जगभर विकलं. त्यामुळे हा सण आता कुणाचाच उरला नाही. ना येशूचा उरला, ना येशूच्या अनुयायांचा. पोपच्या साम्राज्याच्या हातूनही तो निसटून गेलाय कधीचाच. 

येशूला न मानणारेही नाताळ साजरा करतात. देवाला न मानणारेही हा सण साजरा करतात. कारण प्रतीकांत अडकवून या सणाला सोपं केलंय. येशूला ख्रिश्चन बनवण्यात पोपच्या धर्माला यश मिळालेलं असलं तरीही सांताक्लॉज धर्माच्या तावडीतून सटकलाय. जगातल्या सगळ्या धर्माच्या पोरांटोरांनी त्याला कधीचाच सेक्युलर बनवलाय. भटक्या विमुक्तांची पोरं मुंबईच्या सिग्नलवर सांताक्लॉजच्या टोप्या विकत फिरतात. त्या टोप्या घालून टिनपाट हॉटेलांतली झारखंड आणि ओरिसाहून आलेले वेटरही चायनीज वाढतात.

थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर हे लोकोत्सव तर त्याआधीच सगळ्या धर्मांचे झालेत. ते मुळात आहेतच तसे. आपल्या गटारीसारखे. कारण गटारीही कालगणनेशी संबंधित. श्रावण महिन्याच्या निग्रहाआधी इंद्रियांना दिलेलं रिलॅक्सेशन. तसंच पंचांग सोडून कॅलेंडरपर्यंत येताना थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर आपलं बोट धरून आपसूक आलेत.

गेल्या चारपाचशे वर्षात थर्टी फर्स्ट देणारं ग्रॅगेरियन कॅलेंडर बदलत गेलंय. नवनव्या प्रदेशांना स्वीकारताना त्यातली गुंतागुंत गळून गेलीय. त्याचे जुने संदर्भ बदलत गेलेत. ते व्यापक झालं म्हणून सोपं झालं की सोपं झालं म्हणून व्यापक झालं. बहुधा दोन्ही होत गेलं. 

आपलं जगणं सोपं करतं, ते आपण स्वीकारतो. आता आपण नवनवी टेक्नॉलॉजी स्वीकारतोय. त्यासोबत येणारे बदलही. त्याच्याही मुळाशी सोपेपणाच आहे. माणसाला सोप्याची ओढ आहे. जगाचं शोषण करणारे दुकानदार आपापल्या सोयीनुसार जगाला अवघड बनवतात. मग कुणीतरी वेडे पुन्हा ते सोपं बनवण्याचे रस्ते शोधून काढतात. दुकानदार त्या वेड्यांच्या रस्त्यांना अवघड करून त्याचीही नवी दुकानं बनवतात. पुन्हा ते सोपं करण्याचे लढे उभारले जातात. सोप्या अवघडाच्या संघर्षात आपला प्रवास अधिक समृद्ध म्हणजेच सोपा होत जातो. आपल्या सगळ्यांचं जगणंही असाच संघर्ष असतो.

आपल्या सगळ्यांचंही जगणं मुळात सोपंच आहे. दुकानदारांनी ते कठीण करायचा चंगच बांधलाय. जातधर्माची दुकानं मांडलीत. जातधर्मामुळे आपलं जगणं सोपं झाल्याचं आपल्याला त्यांनी पटवून दिलंय. आपल्यालाही ते खरं वाटतंय. पण तसं नाहीय. खरं सोपं जगणं त्या भेदांच्या पलीकडचं आहे. जगातली सगळी तत्त्वज्ञानं हीच सोपी गोष्ट सांगत आहेत. हजारो वर्षं सांगत आहेत. 

बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धांना मिळालेल्या ज्ञानाची दीक्षाही तीच आहे. दोन्ही बाहू वर करून व्यासही तेच ओरडून सांगत आहेत. क्रूसावर अडकवलेले येशूही तेच सांगत आहेत. प्रेषित मोहंमदांना झालेला साक्षात्कारही तेच सांगतो आहे. पतंजली, थिरुवल्लुवर, बसवेश्वर, नामदेव, ज्ञानेश्वर, कबीर, नानक, मीरा, तुकाराम सारे सारे हेच सांगत आहेत.

वघडाचं आवरण नाही, तर त्यातून सोप्याकडे झेपावण्याची माणसाची ओढ खरी आहे. पण अवघडलेपणाचा आणि तुटलेपणाचा पिंजरा सोन्याचा आहे. तो पिंजरा मोडून सोप्याच्या दिशेने जाण्याची ताकद आपल्याला आपल्या सगळ्यांच्या पंखांमध्ये भरता येवो, याच नव्या वर्षांच्या शुभेच्छा. कारण प्रकाशाकडे झेपावणारा हा एकादुकट्याचा प्रवास नाही. तो पाखरांच्या थव्यांचा प्रवास आहे. आपल्या सगळ्यांना त्या थव्यातूनच उडायचं आहे. चला नव्या वर्षात प्रकाशाकडे जाऊया.