अमेरिकेला हादरवून टाकणारा हवाईमधला वणवा

२० ऑगस्ट २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


अमेरिकेतल्या हवाईमधे प्रचंड मोठा वणवा लागलाय. ८ ऑगस्टला लागलेल्या या वणव्यामुळे २२०० हून अधिक इमारती जळून गेल्यात. माऊई हे अमेरिकेच्या हवाई राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचं बेट आहे. तिथला पर्यटनाचा व्यवसाय पूर्णपणे नेस्तनाबूत झालाय. गेल्या शंभर वर्षांत इतका भयंकर वणवा अमेरिकेनं कधीही बघितला नव्हता. हवाईच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात विध्वंसक आपत्ती आहे.

(फोटोविषयी नोंद: या लेखासाठी वापरलेला फोटो हा माउईच्या लहाईना येथील फ्रंट स्ट्रीटवरील विध्वंसाचा आहे. या महाभयंकर आगीत तिथलं एकच लाल छताचं घर आश्चर्यकारकरित्या वाचलं. हा फोटो हवाईच्या वणव्याचा सर्वाधिक व्हायरल झालेला फोटो ठरलाय. हे एकच घर का वाचलं, याबदद्ल सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. काहींच्या मते काही या घराच्या अग्निरोधक बांधकामामुळे ते वाचलं असावं.)

……………………………

‘हवा हवाई’ या श्रीदेवीच्या गाण्यामुळे भारतीयांना हवाई माहीत झाले. सध्या हे हवाई जगातील पहिल्या काही पर्यटनस्थळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो पर्यटक इथे भेट देतात. बेटांनी बनलेल्या आणि चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेल्या या राज्याला आगीने लपेटलं. हवाई राज्यातील सुप्रसिद्ध माउई या बेटावर आठ ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीने वणव्याचे स्वरूप धारण करून लहाईना हे ऐतिहासिक ठिकाण आणि परिसर पूर्णपणे भस्मसात झालंय.

सुसज्ज अशा बचाव यंत्रणेमुळे कमी काळात इथल्या इमारतीमधून माणसांना हलविण्यात आले. तरीही या आगीत ११४ लोक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अजूनही हा आकडा वाढत जाण्याची शक्यता आहे. शेकडो लोक बेपत्ता आहेत. या आगीने हजारो लोकांना बेघर करून होत्याचे नव्हते केले.सर्वस्व हिरावलेले लोक शेल्टर होम्स, हॉटेल्स, मित्र, नातेवाईक यांच्याकडे जाऊन राहिले आहेत. ही आग अनेक अर्थानं भविष्याचा विचार करायला लावणारी आहे.

१३७ बेटांचे राज्य हवाई

हवाई हे अमेरिकेचे ५० वे राज्य म्हणून १२ ऑगस्ट १९५९ रोजी महासत्तेत समाविष्ट झाले. त्याआधी साठ वर्षे तिथे राजेशाही होती. पन्नास वर्षाच्या प्रयत्नानंतर हवाई अमेरिकेचा घटक बनली. त्याआधी अमेरिकेने आपल्या नौदलाचा तळ हवाई मधील पर्ल हार्बर इथे बनवला होता. अमेरिकेचे हे एकमेव द्विपसमूह असेलेले राज्य असून उत्तर अमेरिकेच्या मुख्य भूमीपासून ३२१८ किमी दूर पॅसिफिक महासागरात वसलेले आहे. 

एकूण लहानमोठ्या अशा १३७ बेटांनी हे राज्य बनले आहे.पर्यटन हा इथला प्रमुख व्यवसाय असून तो जोमात चालतो. हवाईच्या पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट २०२२ मधे जवळपास आठ लाख ३०  हजार पर्यटकांनी इथे भेट दिली होती. १.७ अब्ज डॉलर्स पर्यटकांनी त्यावेळी खर्च केले होते. या राज्यात १७ व्या शतकात वसलेल्या माऊई या गावाची ओळख ऐतिहासिक ठिकाण म्हणून होती. 

तेरा हजार लोकवस्ती असलेल्या माऊईमधीलजवळपास सर्व घरे, दुकानं, हॉटेल्स, बोटी जळून खाक झालंय. माउई बेटाचे प्रमुख आकर्षण असलेल्या या सुंदरशा गावावर अवकळा पसरली. खाली पायात राख आणि आसमंतात धुराचे लोटच्या लोटस असं तिथलं विदारक दृश्य आहे.  या आगीत आतापर्यंत साडेपाच अब्ज डॉलर्सहून मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जातंय. 

हवाईमधली आजवरची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती, असं या आगीचं वर्णन केलं जातंय. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे पुढील आठवड्यात माउईला भेट देणार आहेत. वेगवेगळ्या मार्गानं संपूर्ण अमेरिकेतून तिथपर्यंत मदत पोहचवली जात आहे. माउईमधेही पर्यटनाचा मोठा व्यवसाय होता. पण या वणव्याने सर्व नेस्तनाबूत केलंय. पर्यटन उद्योगाला जबरदस्त फटका बसल्याने बेटाच्या अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीचे मोठे आव्हान इथल्या नागरिक आणि राज्य सरकारसमोर आहे.

आग लागण्यामागची कारणे  

या आगीचे ठोस आणि अधिकृत कारण अजून तरी पुढे आलेलं नाही. त्याबाबत अधिक तपास सुरु आहे. पण प्राथमिकदृष्ट्या विजेचा खांब पडून आग लागली असावी, असं एक तत्कालिक कारण दिलं जातंय. पण या तत्कलिक कारणापलिकडेही, अनेक घटक या आगीला कारणीभूत आहेत. या सगळ्या घटकांमुळे ही आग पसरली, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हवाई हा बेटांचा समूह असल्यामुळे साहजिकच त्याला चक्रीवादळाला सामोरे जावे लागतं. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हवाईच्या दक्षिणेकडून शंभर मैलावरून जाणार्‍या डोरा या वर्ग चारच्या चक्रीवादळामुळे वार्‍याचा वेग ताशी ६५-८० मैल होता. या वार्‍यामुळे झाडे विजेच्या खांबावर पडल्यामुळे ते खांब खाली वाळलेल्या गवतावर पडले. विजेच्या तारातून ठिणग्या उडून गवताने पेट घेतला. 

वार्‍याचा वेग जास्त असल्यामुळे आगीने हा हा म्हणत रुद्र रूप धारण केले. हवाईमधील वाढलेले तापमान, कमी झालेली आर्द्रता, त्यामुळे शुष्क झालेली वनस्पती यांनी आगीचे वणव्यात रूपांतर होण्यास हातभार लावला. काही कळायच्या आत आगीने घरं, माणसं आपल्या कवेत घेतली. मैलभर लांब असलेली आग मिनिट भरात येऊन पोहचत होती.

निसर्गाप्रमाणे माणसाचाही मोठा दोष

या आगीनंतर घाबरलेल्या बर्‍याच लोकांनी घाबरून थेट समुद्रात उड्या घेतल्या. त्यातील अनेकांचे मृतदेह अद्यापही किनाऱ्यावर सापडत आहेत. हवाईमध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित धोक्याची सूचना देण्यासाठी ठिकठिकाणी सायरन बसविले आहेत. पण तेही यावेळी वाजले नाहीत. त्यामुळे लोकांमधे अनागोंदी माजली आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढणं अवघड झालं.

हवाईमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘गुईनी’ प्रकारचे गवत जनावरांना चरण्यासाठी आणि सुशोभिकरणासाठी लावलेले आहे. हे गवत नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. मुख्य म्हणजे ते अत्यंत ज्वलनशील असते, त्यामुळे माउई मध्ये या गवतावर पडलेल्या ठिणगीने हाहाकार माजविला. नैसर्गिकरित्या ज्या मातीत, वातावरणात जे उगवते ते सोडून निसर्गाच्या नियमाविरुद्ध अनैसर्गिक पद्धतीने वनस्पती, झाडे लावली तर परिणाम हा असा विदारक होतो.

हवामान खात्याने चक्रीवादळामुळे येणार्‍या वार्‍याचा इशारा देऊनसुद्धा माउईला वीजपुरवठा करणार्‍या हवाई वीज कंपनीने वीज पुरवठा खंडित केला नाही, म्हणून ही आग लागली असा आरोप या कंपनीवर करण्यात आला आहे. अमेरिकेमध्ये सर्वात जास्त वणवे कॅलिफोर्निया मध्ये लागतात. तिथे वादळामुळे वाऱ्याचा वेग वाढला की वीजपुरवठा खंडित केला जातो. 

तशी व्यवस्था हवाई मध्ये असती तर अनर्थ टळला असता, असं म्हणून कंपनीला दोषी ठरविण्यात आले आहे. या कंपनीने ‘आपण जर अचानक वीज घालवली तर अतिदक्षता असणार्‍या तसेच इतर आजरांसाठी वैद्यकीय उपकरणे वापरणार्‍या लोकांचे अवघड झाले असते. याशिवाय वीज नसेल तर लोकांना फोन, इंटरनेट वापरता येणार नाही म्हणून वीज पुरवठा खंडित केला नाही’ अशी कारणे पुढे केली आहेत.

हवाईला वणवे नवीन नाहीत, पण…

हवाईला वणवे नवीन नाहीत. पण ते तेवढे दाहक नसतात. हवाई वाइल्डफायर मॅनेजमेंटनुसार दरवर्षी ०.५ % जमीन आगीत भस्मसात होते.  दरवर्षी या वणव्यात वाढ होते आहे. बहुतांश आग ही मानवी चुकांमुळे लागते, त्यामुळे ती नियंत्रणात आणता येते. पण हा वणवा मानवी आवाक्याच्या बाहेरचा होता. 

२०२२ मधे हवाई आणीबाणी योजनेमध्ये असे वणवे कमी वा मध्यम स्वरूपाचे असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे हवाई सरकार आणि लोकही अशा प्रकारच्या मोठ्या संकटासाठी तयार नव्हते. अमेरिकन राष्ट्रीय उद्यान अहवालानुसार अमेरिकेत ८५% वणवे मानवी चुकांमुळे लागतात. कॅम्प फायर तशीच सुरु ठेवणे, कचरा जाळणे, सिगारेट पूर्ण न विझवणे अशा चुकांमुळे दुर्घटना घडतात. 

वीज पडून आणि ज्वालामुखी उद्रेकामुळे लागणार्‍या आगी या नैसर्गिक असतात. त्यातल्या त्यात वीज पडून आग लागण्याचे प्रमाण जास्त असते. काही विशिष्ट प्रकारचे हवामान आग वाढण्यास कारणीभूत ठरते. जसे की कमी आर्द्रता, अस्थिर वातावरणीय परिस्थिती आणि पडणार्‍या वीजा.  

हवामान बदल आणि हवाईमधील वणवा

तज्ज्ञांच्या मते हवामानातील बदल हे माउई मधील वणव्यामागचे प्रमुख कारण नाही. पण अप्रत्यक्षरीत्या ते कारणीभूत असू शकतात, हेही नाकारता येत नाही. जागतिक तापमान वाढीचा परिणाम हा नक्कीच आहे, पण त्यामुळे आग लागणार नाही. पण आग वाढणार्‍या घटकांपैकी तो एक निश्चितच महत्त्वाचा घटक असू शकतो. 

जागतिक तापमान वाढल्यामुळे झाडे, वनस्पती शुष्क होत आहेत. त्यांच्यातील आर्द्रता कमी होत आहे. गरम हवा पाण्याचे बाष्पीभवन लवकर करते तसेच जमिनीतील हवा आणि आर्द्रता शोषत असल्याने आगीचे धोके वाढत आहेत. दीर्घकाळ राहणारी उष्णता मोठा दुष्काळ आणि वणव्यास कारणीभूत ठरत आहे.

मानवनिर्मित हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये वाढ झाल्यामुळे जागतिक तापमानात सतत वाढ होतेय. हरितगृह वायूंमध्ये प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड, मिथेन, निट्रोअस ऑक्साईड यांचा समावेश होतो. मागील आणि सध्याचे या हरितगृह वायूंचे उत्सर्जन बघता पुढील दोन दशके आणखी नैसर्गिक संकटे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिका, चीन आणि भारत हे देश सर्वात जास्त हरितगृह वायू उत्सर्जित करतात.

निसर्गानुरुप जगणं बदलणं, हाच उपाय

हवाई राज्याच्या हवामान खात्याच्या माहितीनुसार १९५० सालापासून आतापर्यंत हवाईमधील तापमान दोन डिग्रीने वाढले आहे. तर अमेरिका दुष्काळ संशोधनानुसार १४ % हवाई हे गंभीर दुष्काळसदृश्य परिस्थितीला तोंड देते आहे. ८०% राज्य हे कोरडे म्हणून वर्गीकृत केले आहे. २००८ पासून तिथले हवामान कोरडे झाले आहे. मागील शंभर वर्षापेक्षा पर्जन्यमान कमी झाले आहे. 

हवामान बदलामुळे उत्तर अमेरिकेच्या आग्नेय भागात ज्या अति उष्णतेच्या लाटा आल्या त्या हवाईकडे सरकत गेल्या. त्याचा परिणाम वादळे आणि जास्त शुष्क वातावरण तयार होण्यावर झाला. हवाईमध्ये दरवर्षी वणव्यामुळे जळत असलेले क्षेत्र अलिकडच्या दशकांमध्ये चौपट झाले आहे. हे सगळं अमेरिकेला विकास म्हणजे नक्की काय, याबद्दल विचार करायला भाग पाडणारं आहे.

जगभरातील कुठला ना कुठला देश, प्रांत, राज्य या हवामान बदलामुळे महापूर, दुष्काळ, वणवा, वादळे, उष्णतेच्या लाटा अशा नवनवीन संकटाला तोंड देत आहे. जे आधी कधी अनुभवले नाही ते येत्या भावी काळात बघायला अन भोगायला लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी निसर्ग जपणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.

लेखिका अमेरिकेतील मायामी (फ्लोरिडा)  येथील अभ्यासक आहेत.