हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होईल का?

१८ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेला संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना विचार करायला लावणारी आहे. त्याचा संपादित भाग.

पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेला `संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का?’ हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना विचार करायला लावणारी आहे. त्याचा संपादित भाग. 

हिंदूंचा देश आणि हिंदूराष्ट्र या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. इंग्लंड हा प्रोटेस्टंटबहुल देश आहे. पण ते प्रोटेस्टंट राष्ट्र नाही. अमेरिकेबाबत, जर्मनी आणि फ्रान्सबाबतही ते खरं आहे. इटली आणि स्पेन हे कॅथलिकबहुल देश आहे. पण कॅथलिक राष्ट्रे नाहीत. हे सारे देश स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे आहेत. त्यातील कायदे, धर्माच्या आदेशांचं ओझं घेत नाहीत आणि माणसांवर धर्मश्रद्धेची सक्ती करीत नाहीत. जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रातील धर्मांचं चित्र असं आहे. रशिया आणि चीन हे देश कम्युनिस्ट विचाराच्या प्रभावाखाली असताना धर्मविरोधी होते. धर्म ही अफूची गोळी आहे, या मार्क्सच्या शिकवणीनुसार त्यांनी तेथील धर्मस्थानांना कुलुपंही लावली होती. सार्वजनिकरित्या धर्माचरण आणि पूजा करणं, हा तिथे अपराध होता. ते देशही स्वत:ला धर्मराज्य न म्हणवता सेक्युलर राष्ट्र म्हणतात. सेक्युलॅरिझम हे प्रगत मूल्य आहे आणि तेच जगातील सगळ्या आधुनिक राष्ट्रांनी स्वीकारलं आहे. 

जॉन एफ केनेडी हे अमेरिकेच्या अध्यक्षपदी आलेले पहिले रोमन कॅथलिक होते. क्लिंटन हे दुसरे. सर्व कॅथलिकांना रोमचं धर्मवर्चस्व आणि पोपची आज्ञा ही सर्वोच्च आज्ञा मानण्याची सक्ती होती. त्यामुळे घटनेचा कायदा आणि पोपचा आदेश यात विसंगती आल्यास केनेडी काय करतील हा प्रश्न त्यांना निवडणुकीत अनेकवार विचारला गेला. त्याला उत्तर द्यायला केनेडींनी दोन तासांची एक स्वतंत्र मुलाखत दूरचित्रवाणीवर दिली. त्या मुलाखतीत ‘कोणत्याही परिस्थितीत मी घटनेच्या बाजूने राहीन. त्यासाठी पोपच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करेन’, असे आश्वासनच त्यांनी अमेरिकेच्या जनतेला दिले. पुढल्या काळात त्यांनी ते काटेकोरपणे पाळलंही. 

धर्माच्या अतिरिक्त आहारी गेलेले देश आणि संघटनाच धर्माच्या आज्ञा शिरसावंद्य मानतात. त्या कालातीत आणि सनातन असल्याचं सांगून त्यातला बदल ते मान्य करत नाहीत. शीख सम्राट महाराजा रणजितसिंग यांचे उदाहरण राज्यशास्त्रात सांगितलं जातं. ‘मला कोणतीही राजाज्ञा काढण्याची गरज नाही, त्या साऱ्या गुरूग्रंथसाहिबात आल्या आहेत’, असं ते म्हणत. आरंभीची ज्यूंची, रोमनांची आणि इस्लामची राज्यं अशीच होती. त्यातल्या काहींचे अवशेष अजून कायम आहेत. हिंदू धर्मात सुधारणेची एक भव्य परंपरा आहे. वेदांपाठोपाठ ब्राह्मणग्रंथ, नंतर उपनिषदं, पुढे पुराणग्रंथ, बुद्ध, महावीर, चार्वाकादिकांच्या परंपरा इत्यादी. अन्य धर्मांच्या वाट्याला ते फारसे आले नाहीत. ख्रिश्चनांमध्ये पहिली प्रोटेस्टंट परंपरा त्या धर्माच्या उदयानंतर पंधराशे वर्षांनी मिळाली. इस्लाममध्ये तर पहिले सुधारक झाले मौलाना अबुल कलाम आझाद. मात्र त्यांचं कुराणभाष्य परंपरेने कधी विचारात घेतलं नाही. नरहर कुरुंदकरांसारखा विचारवंत गंमतीने म्हणायचा, आपले धर्मग्रंथ आपल्याला कमालीचे आदरणीय वाटतात याचे एक महत्त्वाचे कारण आपण ते वाचत नाहीत हे आहे. 

धर्म आणि त्यांची शिकवण ही कोणत्याही एका वर्गासाठी नसते. ती साऱ्या जगासाठी असते. पैगंबरांवर उतरलेले पवित्र कुराण केवळ कुरेश या त्याच्या जमातीच्या उद्धारासाठीच आले नसते, ते मानवजातीच्या कल्याणसाठी आले असते. वेदातले ब्रह्म केवळ हिंदूंसाठीच वा ब्राह्मणांसाठी नसते, ते साऱ्यांनी आत्मसात करावे यासाठी असते. ज्ञानेश्वर ‘दूरितांचे तिमीर जावो’ असे म्हणतो, ‘हिंदूंचे तिमीर जावो’ असे म्हणत नाहीत. धर्मांचं हे सार्वत्रिक स्वरूप समजून घेतलं की त्यांना संघटित करणारे आणि इतरांना त्यापासून दूर ठेवणारे लोकच त्यांना बंदिस्त करतात, हे लक्षात येते. धर्मांना संघटित करणारे त्याला आक्रमक स्वरूप देतात. मुळात धर्म आक्रमक नसतो. त्याचे संघटित अनुयायी आक्रमक असतात. 

हिंदूधर्म आक्रमक नाही, मात्र हिंदुराष्ट्र म्हणविणाऱ्यांची संघटना आक्रमक आहे. मुळात कुराण शांतता सांगते, इस्लामी राज्याचे समर्थक मात्र त्याला जिहादी धर्म बनवून आक्रमक होतात. येशू हा तर शांतता आणि सद्भावच सांगत आला. ख्रिश्चनिटीचं संघटन मात्र सारं जग त्याच्या विचाराच्या विळख्यात अडकवायला निघालं. धर्म संघटित झाले, राज्यकर्ते झाले आणि त्यासाठी युद्धात उतरले, ते आक्रमकच नव्हे तर हिंस्र होतात. मुळात हिंदूधर्म भारतात जन्माला आला, येथेच रुजला आणि वाढला. तो त्याच्या सीमेपलिकडे फारसा कुठे गेला नाही. त्याचे जे अंश बाहेर गेले ते तिकडे फारसे टिकलेही नाहीत. त्याची प्रचिती कुठे थायलंड, बाली वा अन्य पौर्वात्य देशांत राहिली, मात्र धर्माचं मूळ स्वरूप भारताच्या सीमेतच राहिलं. या धर्माचं स्वरूप समंजस, इतरांशी जुळवून घेणारं आणि बरेचसं चिवट राहिलं. त्यातली जातीव्यवस्था आणि तिच्यातून आलेली धर्माची बंधनं त्याचं ते स्वरूप टिकवत राहिले. 

वेदांपासून उपनिषदांपर्यंत, पुढे पुराणांच्या काळातही हा धर्म आक्रमक झाला नाही. राजकीयदृष्ट्या तो कधी संघटितही झाला नाही. या देशात जन्मलेले बुद्ध आणि जैन हे धर्मप्रसाराच्या मार्गाने विदेशात गेले. पण हिंदू धर्माने तेही केलं नाही. कारण या धर्मात आत्मशुद्धी आणि आत्मशोध यावर भर असायचा. मोक्षप्राप्ती हे त्याचं ध्येय आहे. त्याचा इतरांशी संबंध नव्हे. तो स्वत:कडून स्वत:कडे जाण्याचा उपदेश आहे. शत्रू, मित्र, स्नेही, आप्त इत्यादींपासून दूर होऊन जेवढे आपल्या आत वळता येतं तेवढं ते मोक्षाच्या जवळ जाणारं आहे. जग त्याज्य, जीवन त्याज्य, जगणं ही अडगळ आणि त्यापासून दूर होणं ही मुक्ती असं म्हणणारा धर्म माणसाला एकाकी आणि एककेंद्री बनवतो. त्याला संघटित करणे हाच मुळी धर्मविरोधी विचार होतो.

या पार्श्वभूमीवर माझे तरुण स्नेही अविनाश दुधे यांनी त्यांच्या ‘मीडिया वॉच’ या वार्षिकांकात प्रकाशित केलेला परिसंवाद वाचनीय आहे. ते या पुस्तकात संकलित केले आहेत. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखा धर्म आणि राजकारण यांचा संयुक्त प्रचार करणाऱ्यांचा एक वर्ग आहे. तर काही वैज्ञानिक आणि सेक्युलर वृत्तीचे विचारवंत सहभागी झाले आहेत. त्यांच्या भूमिका टोकाच्या परस्परविरोधी असणं स्वाभाविक आहे. भारत हे हिंदू राष्ट्र आहेच, त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही, ही त्यातल्या एका वर्गाची भूमिका. जो समाज ज्या देशात संख्येने मोठा असतो त्याच्या संस्कृती आणि परंपरांचं वर्चस्व त्या देशावर असते. परिणामी त्याला हिंदू राष्ट्र म्हटलं काय, न म्हटलं काय, भारत हे हिंदू राष्ट्र आहेच अशी काहीशी ही भूमिका आहे. परंतु अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाज, स्पेन हे देश ख्रिश्चनबहुल आहेत. मात्र ते सेक्युलर आहेत. ते सारे स्वतःला ख्रिस्ती राष्ट्र म्हणवीत नाहीत. 

सेक्युलर असणं याचा अर्थ देशात होणाऱ्या कायद्यांवर आणि प्रशासकीय आदेशांवर धर्माचं वर्चस्व असू नये, हा आहे. जे मानवीय व्यवहारासाठी आवश्यक आहे आणि असावेत अशा मनुष्यकेंद्री व्यवहाराचा तो धर्म आहे. राज्य आणि धर्म या दोन स्वतंत्र व्यवस्था आहेत आणि त्यांच्यातील अंतर राखणं हे आधुनिक लोकशाहीचं खरं लक्षण आहे. धर्मांध शक्तींना सेक्युलर व्यवस्थेचं नेमकं हेच स्वरूप मान्य नाही. त्याचमुळे त्या अतिरेकी होतात. तालिबान, खिलाफत, इसिस किंवा सनातन धर्म यासारख्या कमालीच्या कर्मठ आणि प्रसंगी हिंस्र होणाऱ्या संस्था त्यातून जन्म घेतात. त्यांना धर्माचं राज्यावरील वर्चस्व हवं असतं. 

धर्म ही आजच्या, कालच्या आणि उद्याच्याही जीवनावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे. तिला तिच्या नियंत्रणातून जीवनाचा कोणताही भाग वगळणं मान्य नाही. जीवनाचं धार्मिक आणि सेक्युलर हे विभाजनच ती अमान्य करतात. उलट सेक्युलर व्यवस्था राज्य ही वर्तमानातील मानवी जीवनाला वळण देणारी, प्रसंगी त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मानते. विचार आणि संघटना यांना वाहून घेतलेली माणसं वेगळा विचार मान्य करीत नाहीत. किंबहुना त्याच्यासाठी वेगळेपण अयोग्यच असतं. ही एकारलेली माणसं प्रचारक आणि झेंडेकरी झालेली असतात. आपल्या श्रद्धेय भूमिकांहून वेगळं बोलणं त्यांना अमान्य तर असतंच, शिवाय त्यांना ते पापही वाटत असतं. त्यामुळे या बांधील माणसांच्या संघटित विचारांबाबतच्या भूमिका न वाचताही सांगता येतात. त्यांच्या सांगण्यात रंगादिकाचा थोडासा फरक असला तरी त्यांची दिशा एक असते आणि प्रतिपादनही बहुदा सारखेच असते. इतरांच्या भूमिकांत काही बरे असू शकेल असं त्यांना मुळातच वाटत नाही. 

भारत हा मुळात बहुधर्मी, बहुभाषी आणि सांस्कृतिकदृष्ट्या बहुआयामी म्हणावा असा देश आहे. यात भाषा, संस्कृतीच नव्हे तर धर्माविषयीचा उपासना पद्धतीही प्रदेशपरत्वे बदलणाऱ्या आहेत. त्याला एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केवळ अवघडच नाही तर अशक्य कोटीतला आहे. येथे ८० टक्क्यांएवढे हिंदू राहत असले तरी त्यात १७ कोटी मुसलमान, दोन कोटी ख्रिश्चन, तेवढेच शीख, ४० लाख बुद्ध, तेवढेच जैन राहतात. एक कोटीहून कमी लोकसंख्या असलेले शंभर देश जगात आहेत हे लक्षात घेतले की, भारतात एका धर्माचं संघटन अवघड आहे हेही लक्षात येते. त्यातून भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मुसलमान देश आहे आणि धर्माच्या नावावर त्याचे शकले याआधीही झाली आहेत. 

मूळात हिंदू हा धर्मही शेकडो जातीपातीत विभागला गेला आहे. चातुर्वर्ण्य ही कविता आहे, हे वास्तव नाही. प्रत्यक्षात हिंदू धर्मातच एकात्मता आणणं अवघड आहे. परधर्माचा द्वेष हा अशा ऐक्याचा काहीसा सोपा मार्ग आहे मात्र तो चिरस्थायी होण्याची शक्यता फारशी नाही. झालेच तर हा देश प्रकृतीनेच मध्यममार्गी आहे. तो बुद्ध आणि गांधींच्या मार्गाने जाणारा आहे. प्रसंगविशेषी तो उजवा किंवा डावा कल घेतो. पण तो प्रसंग मिटला की त्याला पुन्हा आपल्या नेहमीच्या मार्गावर यावंसं वाटतं. सारे संघटित कडवे असावे लागतात. त्यांना टोकाच्या भूमिका गरजेच्या असतात. मध्यममार्ग हीच त्यांची खरी अडचण असते. भारताबाबतची ही भीती त्यावर चारशे वर्ष राज्य केलेल्या मुस्लिम आणि दीडशे राज्य केलेल्या ख्रिस्ती राज्यकर्त्यांना वाटत आली. आता तर देश मुक्तच आहे.

एकेकाळी ख्रिस्ती धर्म एकारला होता. तो टोकाचा ज्यू आणि इस्लामविरोधी होता. मुसलमान धर्माचेही असे एकारलेपण जगजाहीर आहे. त्या एकारलेपणाचा इतिहासही मोठा आहे. ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन धर्मात झालेलं युद्ध सातशे वर्षं चाललं आणि त्यातून त्यांचे कडवेपण वाढत गेलं. ज्यूंचा कर्मठपणा प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षांचे अत्याचार सहन करूनही तो शिल्लक राहिला आहे. हिंदू, बौद्ध वा जैन या भारतीय धर्मांचं स्वरूप वेगळं आहे. ते मूळातच कडवे नाहीत, शस्त्रधारी नाहीत आणि आक्रमकही नाहीत. शिवाय त्यात धर्मचर्चांची आणि सुधारणांची परंपरा आहे. त्याचमुळे त्यात बदल घडत आले आहेत. अशा धर्मांना आक्रमक बनविण्याचा प्रयत्न करणं हाच इतिहासाचे दिवस उलट्या दिशेने नेण्याचा प्रकार आहे. संघाला भारत हे हिंदूराष्ट्र बनवायचं आहे. ती महत्त्वाकांक्षा त्याने नेहमीच उघड राखली आहे. तरीही या धर्मातला एक मोठा वर्ग धर्मांतर करून बौद्ध झाला. त्याचमुळे इतरही अनेकजण वेगवेगळ्या धर्मात गेले. हिंदूंमधील जातीयतेवर संतापलेले अनेक वर्ग तशी भाषा अजून बोलत आहेत. 

हिंदू धर्मातील जातीची अन्याय्य जाचकता कमी होणं, त्यातली विषमता घालवणं, त्यात समतेची पेरणी करणं आणि त्यातील स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे सन्मानाधिकार प्राप्त करून देणं ही आताची खरी गरज आहे. दिवसेंदिवस व्यक्ती आणि समाज यांच्या विकासाची दिशा बदलत चाललेली आहे. ही आता डावी वा उजवी राहिली नाही. ती उर्ध्वगामी झालेली आहे. ही दिशा मान्य करणे आणि तिच्यावरील प्रवास गतीमान करणे ही काळाची मागणी आहे. त्यासाठी व्यक्ती जीवनावरून जाती आणि धर्माची बंधनं घालवणं, त्या जागी लोकशाही स्वातंत्र्य, समता, बंधुता, नीती, सर्वसमावेशकता यासारख्या आधुनिक मानवतावादी मूल्यांची पेरणी करणे आवश्यक आहे. धर्मनिष्ठेकडून विज्ञाननिष्ठेकडे जाण्याची दिशा जगाने आणि काळाने स्वीकारली आहे. संघाला त्याच्या प्रयत्नात एखादेवेळी यश जवळ आल्यासारखे दिसेलही, पण कायमस्वरूपी असणार नाही. आजचा माणूस बाह्य बंधनं झुगारणारा आणि स्वयं बंधनं मान्य करणारा आहे. तशीच त्याची वाटचाल आहे. जग सेक्युलर होत असताना भारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार नुसता प्रतिगामीच नाही तर उथळही आहे. तो नव्या जाणिवांच्या आणि काळाच्या मानसिकतेचा विरुद्ध जाणारा आहे. विषमता हा अन्याय आहे आणि तो धर्मांनी माणसांवर लादला आहे. त्याला नवी नावं देण्यात अर्थ नाही. परंपरांच्या नावाने त्याचे गोडवे गाणं हे तर तद्दन मागासलेपण आहे. 

जग आणि समाज स्वयंपूर्ण माणुसकीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्याला जन्मदत्त बंधनांच्या बेड्यांपासून मोकळे करणं ही आधुनिकता आहे. ती वर्तमानाची आणि भविष्याची मागणी आहे. नव्या पिढ्या आणि नवी स्वप्ने यांना अडवून धरण्याची क्षमता जुन्या वठलेल्या परंपरांमधे नाही. त्यांचा यथाकाळ पराभव निश्चित आहे. तो जेवढा लवकर होईल तेवढा माणूस मुक्त आणि समाज संपन्न होईल.

संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल? 
संपादकः अविनाश दुधे 
पानं ११७, किंमत १५० रुपये 
मीडिया वॉच प्रकाशन, अमरावती (संपर्क ९८६०८३१७७६)

(पत्रकार, लेखक)