विश्वधर्माची ग्वाही देणाऱ्या तिरंग्याची वाटचाल

१५ ऑगस्ट २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


१५ ऑगस्ट १९४७ला लाल किल्ल्यावर उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या शहनाईच्या सुरात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘राष्ट्रध्वज’ म्हणून सर्वप्रथम तिरंगा फडकवला होता. आपल्या तिरंग्याच्या निर्मितीचा आणि निश्चितीचा चिंतनप्रवास सुमारे ४१ वर्षांचा सांगता येतो. १९०६ ते १९४७ या कालखंडात भारताच्या राष्ट्रध्वजाची संकल्पना, निर्मिती आणि निश्चिती याविषयी चिंतन आणि प्रयत्न सुरू होते.

देशाचा राष्ट्रध्वज म्हणजे त्या देशाची उच्चतम मूल्यं, एकसंधत्वाची भावना, त्याच्या आशा-आकांक्षा यांचं प्रतीक असतं. एका अर्थाने, देशाचा राष्ट्रध्वज म्हणजे त्याच्या राष्ट्रधर्माचा आणि राष्ट्रचरित्राचा सार असतो. त्यामुळे त्याच्या निर्मितीत आणि निश्चितीत एक प्रदीर्घ चिंतनप्रक्रिया दडलेली असते. आपल्या तिरंग्याच्या निर्मितीचा आणि निश्चितीचा चिंतनप्रवास सुमारे ४१ वर्षांचा सांगता येतो. १९०६ ते १९४७ या कालखंडात भारताच्या राष्ट्रध्वजाची संकल्पना, निर्मिती आणि निश्चिती याविषयी चिंतन आणि प्रयत्न सुरू होते.

१८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झालेल्या प्रत्येक राजसत्तेचा ध्वज वेगवेगळा होता. काही इतिहासकारांच्या मते क्रांतिकारकांपैकी काहींनी मध्यभागी कमळ असलेला एक हिरव्या रंगाचा ध्वज बनवला होता. त्यानंतर १९०६ला भारताचा ध्वज तिरंगा झाला. कोलकात्याच्या पारसी बागान चौकात पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आला. मध्यभागी ‘वंदे मातरम्’ लिहिलेला आणि आठ कमळं असलेला हा तिरंगा हिरवा, पिवळा आणि लाल या तीन रंगांचा होता.

राष्ट्रध्वजाच्या संकल्पनेचे टप्पे

१९०७ला जर्मनीच्या स्टुटगार्टमधे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत मादाम भिकाजी कामा यांनी स्वतः बनवलेला एक तिरंगा सादर केला. पारसी बागान चौकात फडकवण्यात आलेल्या आणि जर्मनीमधे फडकवण्यात आलेल्या तिरंग्यात काही किरकोळ बदल होते. मादाम कामा यांच्या तिरंग्यात सर्वात वरच्या पट्टीत कमळाऐवजी तत्कालीन भारतात असलेल्या आठ प्रांतांचं प्रतीक असलेले आठ तारे आणि सर्वात खालच्या पट्टीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक सूर्य आणि चंद्र अंकित करण्यात आले होते.

१९३६ला मादाम कामांनी तिरंग्याचं आणखी एक स्वरूप बनवलं होतं. १९१७ला भारतीय स्वातंत्र्य संग्राम एका विशेष वळणावर येऊन पोचला होता. डॉ. अ‍ॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वात ‘होम रूल’ आंदोलन जोम धरू लागलं होतं. त्यावेळी तिसरा तिरंगा अवतरला. पाच लाल आणि चार हिरव्या पट्ट्यांसह युनियन जॅक असलेला हा तिरंगा होम रूलच्या उद्देशाला प्रकाशमान करत होता.

अजून संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं नसलं, तरी होम रूल म्हणजे स्वयंशासनाचा आम्हाला अधिकार आहे, हे सांगण्याचा इथं प्रयत्न करण्यात आलेला दिसतो. प्राचीन परंपरा दर्शवणारे सात तारे म्हणजे सप्तर्षी आणि एकतेचं प्रतीक सूर्य-चंद्र या ध्वजात होतं. हा राष्ट्रध्वज हातात घेतलेला टिळकांचा एक दुर्मीळ फोटोही उपलब्ध आहे.

रंगांच्या कल्पनेमागचा विचार

१९२० नंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्याची कमान महात्मा गांधींकडे आली होती. तत्पूर्वीच ‘यंग इंडिया’ पत्रिकेतल्या आपल्या एका लेखात गांधीजींनी राष्ट्रध्वजाचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी पिंगली व्यंकय्या यांना राष्ट्रध्वज तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती. १९२१च्या विजयवाड्याच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात हा राष्ट्रध्वज फडकवला जाणार होता; पण पिंगली व्यंकय्या हे काम वेळेत करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी लाल आणि हिरव्या रंगाचा राष्ट्रध्वज तयार केला. तो तिरंगा नव्हता.

व्यंकय्या यांच्या विलंबामुळे गांधीजींनाही राष्ट्रध्वजावर विचार करता आला. त्यांनी या ध्वजात काही बदल सुचवले. रंगांच्या समावेशावरून हिंदू आणि मुस्लिम यांना ध्वजात स्थान होतं; पण इतर धर्मियांना स्थान नव्हतं. त्यांच्यासाठी म्हणून गांधीजींनी त्यात पांढरी पट्टी वाढवायला सांगितली आणि आपला ध्वज पुन्हा तिरंगा झाला. त्याचबरोबर राष्ट्राच्या प्रगतीचं प्रतीक म्हणून लाला हंसराज यांनी सुचवल्याप्रमाणे फिरणार्‍या चरख्याचा समावेश करण्यात आला. तसंच स्वदेशी वस्त्रातच हा ध्वज बनवण्याचा दंडक घालून देण्यात आला.

१९२१च्या मे महिन्यात नागपूरमधे ब्रिटिश सत्तेविरोधात शांततामय मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्च्यांमधे सहभागी आंदोलकांनी पहिल्यांदा चरखाधारी तिरंगा हातात घेतला. १९२९ला लाहोर काँग्रेसमधे आपल्या भाषणात गांधीजींनी रंग आणि धर्म यांचा संबंध विच्छेद करत केसरी रंग बलिदान, पांढरा रंग पवित्रता आणि हिरवा रंग म्हणजे आशेचं-समृद्धीचं प्रतीक आहे, असं स्पष्ट केलं. तसंच १९३१ला काँग्रेस पक्षाने या ध्वजाला आपला ध्वज म्हणून मान्यता दिली.

फिरणार्‍या चरख्यातल्या चक्राची जागा पुढे सम्राट अशोकाच्या सारनाथ इथल्या स्तंभावरचं ‘धम्मचक्क’ घेणार होतं. दरम्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीत एक तिरंगा फडकवला होता. ज्यामधे सर्वात वर केशरी, मधे पांढरी आणि शेवटी हिरव्या रंगाची पट्टी होती. तसंच मधल्या पांढर्‍या पट्टीवर एक वाघ होता. आजच्या तिरंग्यात त्याच्या जागी अशोकचक्र आलं, एवढाच काय तो फरक सांगता येतो.

हेही वाचाः इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाईंना गुगलची डूडल सलामी

संविधान सभेत राष्ट्रध्वजावर चर्चा

भारतीय स्वातंत्र्याचं तांबडं फुटू लागलं आणि राष्ट्रध्वजाविषयी अधिक गांभीर्याने विचार होऊ लागला. १९४०ला ब्रिटिश सरकारने राष्ट्रध्वजावर विचार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, चकवर्ती राजगोपालाचारी, के. एम. पणिकर, फ्रँक अँथनी, उज्जल सिंह आणि एस. एन. गुप्ता यांची समिती बनवली.

या समितीची पहिली बैठक १० जुलै १९४७ला डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पं. जवाहरलाल नेहरू यांना या बैठकीला विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं. या बैठकीत राष्ट्रध्वजाच्या सर्व वैशिष्ट्यांचा विचार करून त्याचं स्वरूप निश्चित करण्यात आलं.

२२ जुलै १९४७ला झालेल्या संविधान सभेत अशोक चक्रासह तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि संविधान सभेने त्याला मान्यता दिली. तोवर भारताच्या राष्ट्रध्वजाविषयी व्यक्त करण्यात आलेल्या आशा-आकांक्षा जणू काही तिरंग्यात सामावल्या गेलेल्या दिसतात.

विश्वधर्माची ग्वाही देणारा तिरंगा

तिरंग्याच्या वरच्या भागातला केशरी रंग भारतीयांना देशासाठी त्याग, धैर्य आणि नि:स्वार्थीपणाचा संदेश देतो; तसंच राजकीय नेतृत्वाला वैयक्तिक लाभाचा त्याग करून देशासाठी समर्पण भावाने कार्य करण्याची आठवणही देतो. मध्यवर्ती पांढरा रंग राष्ट्राची शांतता, पवित्रता आणि प्रामणिकपणा याचं स्मरण देतो; तर हिरवा रंग समृद्धी, सुख आणि प्रगती दर्शवतो.

तिरंग्याच्या मध्यभागी असलेलं अशोकचक्र जगाला भगवान बुद्धांनी स्वतःच्या परिवर्तनातून जगात परिवर्तन करण्याचा आणि विश्वकल्याणकारी धर्माचं चक्र गतिमान करण्याचा जो संदेश दिला, त्याचं प्रतीक आहे. सम्राट अशोकाने सारनाथ इथल्या स्तभांवर हे चोवीस आर्‍या असलेलं चक्र बुद्धांचं तत्त्वज्ञान साररूपात व्यक्त करण्यासाठी कोरलं होतं. तसंच दिवसाचे चोवीस तास आम्ही या तत्त्वज्ञानावर चालत देशाला आणि जगाला शांतता आणि समृद्धी यांच्याकडे घेऊन जाऊ, हे यामधून व्यक्त होतं.

तिरंग्यात हे चक्र निळ्या रंगात दर्शवलेलं आहे. निळा रंग असीम आकाशाचा आणि महासागरांचा रंग आहे. आमच्या प्रगतीत आम्ही असीम आकाशाप्रमाणे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेतून अखिल विश्वाला व्यापणार आहोत, हेच हा निळा रंग सांगतो.

सारांश रूपात सांगायचं झाल्यास भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक, वांशिक, भाषिक अशा मानवनिर्मित भेदांना त्यागत सर्वोच्च मानवी मूल्यांच्या आधारे खर्‍या विश्वधर्माची ग्वाही तिरंगा देतो. तिरंग्याला ‘चक्रध्वज’ असं घटनात्मक नाव आहे, असं काही अभ्यासकांचं मत आहे. त्यासाठी ते वेळोवळी पुरावेही देत असतात. १५ ऑगस्ट १९४७ला लाल किल्ल्यावर उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या शहनाईच्या सुरात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘राष्ट्रध्वज’ म्हणून सर्वप्रथम तिरंगा फडकवला!

हेही वाचाः 

सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर

अफवांच्या बाजारात वाचा सुभाषबाबूंची खरी कहाणी

पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं?

जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ