गुढीपाडव्याला साजरा करुया महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन

०६ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


गुढी पाडवा हा महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन आहे. इसवीसनाच्या ७८व्या वर्षी गौतमीपूत्र सातकर्णी या सातवाहन घराण्यातल्या राजाने परकीय शकांचा सरदार नहपान याचा पराभव केला. त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झालं आणि महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सवही.

महाराष्ट्र आणि इतर आजूबाजूच्या प्रदेशावर एक मोठा काळ राज्य करणारं सातवाहन हे इतिहासातलं एकमेव साम्राज्य आहे. आजच्या महाराष्ट्राच्या भाषा, संस्कृतीचा पाया घालणारा, महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा हा राजवंश आहे. 

महाराष्ट्राला ओळख देणारे सातवाहन

इ.स.पूर्व २३० मधे या घराण्याचा उदय झाला. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती नंतर पैठणला गेली. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र  आणि मध्य भारतावर आपली सत्ता काबीज केली. त्याही पूर्वी सातवाहन घराण्यातील लोक अशोकाचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रावर सत्ता गाजवत असावेत असा अंदाज अनेक संशोधकांनी मांडलाय. स्वतंत्र राज्य स्थापन केल्यानंततर ते साडेचारशे वर्ष टिकली. 

हेही वाचाः गुढीपाडवा FAQs: आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची साधीसरळ उत्तरं

पुराणांत मात्र सातवाहनांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र म्हणजेच अवैदिक वर्णाचे होते, असाही उल्लेख पुराणांत सापडतो. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण आणि महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा मूळचा पशुपालक समाज. महाराष्ट्र प्राचीन काळापासुन अपवाद वगळता निमपावसाळी प्रदेश असल्याने येथे मेंढपाळी हाच मुख्य व्यवसाय होता. त्यामुळे त्याच समाजातून राजे निर्माण होणं स्वाभाविक होतं. आत्ताची ऒडिशा, आंध्र ही नावे औंड्रांवरुनच पडलेली आहेत.

महाराष्ट्राला समृद्ध करणारे सातवाहन

पुर्वी हा प्रदेश अनेक जनपदांमध्ये विभागला गेला होता. त्याला प्राकृत मध्ये रट्ठ म्टटलं जात होतं ज्याचा पुढे राष्ट्र असा शब्द बनला. या रट्ठसमुहाला एकाच एक राजकीय पटलाखाली आणले. सातवाहन काळात व्यापार इजिप्त, रोम, अरबस्तान इत्यादी देशांसोबत करण्यात येत. भडोच, कल्याण, चेऊल अर्थात चौल या पश्चिम किनारपट्टी लगतच्या बंदरांतून मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट  आणि  त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदीर्घ शिलालेख आणि  सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत.  

त्याच काळात महाराष्ट्रात रायरी म्हणजेच रायगड, राजमाची सारख्या अनेक गिरीदुर्ग, प्राकृतातील शिलालेख  आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली. बौद्ध लेण्यांना उदार राजाश्रय दिला. तसेच अनेक यज्ञही करवून घेत वैदिकांनाही दानदक्षिणा दिल्या. सर्वस्वी सत्ता गाजवणाऱ्या या घराण्याने दक्खनेत उत्तरेकडील राज्यकर्त्यांना कधीच पाय रोवू दिले नाही. 

हेही वाचाः युधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास

हा साहित्य संस्कृतीच्या वैभवाचा काळ होता. हालाच्या ‘गाथा सप्तशती’, ‘कथासरित्सागर’, वररुचीच्या ‘प्राकृतप्रकाश’ माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण लिहिलं. अनेक स्त्रियांच्या काव्यरचना या गाथा सप्तशती काव्यग्रंथात सामाविष्ट केलेल्या आहेत. सातवाहन घराण्यात महिलांचं स्थान किती उच्च होते हे नागणिका, बलश्री सारख्या किर्तीवंत राजनिपूण महिलांवरुनही दिसून येते.

आणि गुढीपाडवा सुरू झाला

राज्य चालवतांना चढउताराचेही प्रसंगही येणं स्वाभाविक होतं. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मधे नहपान सत्तेवर आला. त्याने वारंवार हल्ले करून बहुतेक प्रदेश जिंकला. कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचं शोषण सुरु झालं.

गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्यावेळी कऱ्हाड भाग त्याच्या अधिपत्याखाली होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणं केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. यात त्याने गिरीदुर्गांचाही उपयोग केला. 

हेही वाचाः गुढीपाडव्याला गुढीपाडवाच राहू दे, त्याला हिंदू नववर्ष कशाला बनवताय?

डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केलं  आणि त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही. शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला आणि त्याला ठार मारले. नाशिकमधल्या लेणीत एका शिलालेखावर ‘खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस’ असा  उल्लेख आहे.

गुढी पाडवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वातंत्र्यदिन

नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो चैत्र शुद्ध प्रतिपदा दिवस. इ.स. ७८ मधे ही घटना घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणं स्वाभाविक होतं. तोच दिवस बनला गुढीपाडवा. 

अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने सालाहन म्हणजे शालिवाहन नाही तर शक. यानंतर या बलाढ्य साम्राज्याला 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' असं म्हणू लागले.

हेही वाचाः गुढीपाडवाः शिवपार्वती विवाहाचा वारसा सांगणारा हजारो वर्षं जुना उत्सव

शालिवाहन शक असा मुळात शब्दच नाही. या नावाचा कोणताही राजा नसून प्राकृतातील 'सालाहन' असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात सुरू झाला. शिलालेखांमधेही ‘सालाहन’ अशी नोंद आहे. 

आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करतो. गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा  आणि  आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष सत्ता गाजवणारे सातवाहन हे एकमेव घराणे झालं. 

धार्मिकोत्सव नाही तर विजयोत्सव 

गुढीपाडव्याला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मपुराणात  आणि व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो. पण इसवी सन ७८ पासूनच शालिवाहन शकाचे पहिले वर्ष का गणलं जातं यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन ७८ मधेच झाला याबाबत इतिहासकारांनाही शंका नाही. 

प्राचीन काळी अगदी एखाद्या घरातील आनंदवार्ताही घोषित करण्यासाठी गुढ्या उभारल्या जात. हा तर एक जनतेचा स्वातंत्र्योत्सव होता त्यामुळे सर्वांनीच गुढ्या उभारणे स्वाभाविक होते  आणि  तीच पुढे परंपरा कायम झाली. हा धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा करणं आहे. परंतु पुराणकारांनी इतिहास बाजूला ठेवून धार्मिक स्तोम तेवढं वाढवलंय.  

हेही वाचाः

गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?

गुढीपाडव्याला वाचुयाचः राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत

(लेखक हे साहित्यिक आणि इतिहास संशोधक आहेत.)