असा जन्माला आला ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ ग्रंथ

०९ जुलै २०२२

वाचन वेळ : ७ मिनिटं


शंकराचार्यापासून उभ्या महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवरांचे लेख ‘ज्ञानेश्वर दर्शन’ ग्रंथात आहेत. रा. चिं. ढेरे, व. दि. कुलकर्णी यांच्यासारख्या अभ्यासकांनी यासारखा दुसरा ग्रंथ नाही, असं नमूद केलंय. मात्र, काळाच्या ओघात ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ हा ग्रंथ दुर्मिळ झाला. सध्याच्या अनेक मंडळींना तर असा काही ग्रंथ आहे, हेही माहिती नाही. या दुर्मिळ ग्रंथाची माहिती करून देणारी भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट.

सुमारे ८८ वर्षांपूर्वी, सन १९३४ मधे अमृतवाहिनी प्रवरेकाठच्या ज्ञानेश्वर मंदिरात म्हणजेच जुन्या करविरेश्वर मंदिरात ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांची मांदियाळी जमली होती. ज्या खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी आपल्या रसाळ वाणीत प्रवचनं करत श्रीमद् भगवतगीतेतला आशय सोपा करून सांगत सर्वसामान्यांसाठी ज्ञानाचं एक महादालन खुलं करून दिलं, त्याच ‘पैस’च्या साक्षीनं एका ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. 

त्या ग्रंथाचं नाव ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’. तब्बल १७०० पानांचा हा बृहतग्रंथ साकारण्यासाठी नगर जिल्ह्यातल्या इतिहास संशोधक सरदार नानासाहेब मिरीकर आणि वाड़मयोपासक मंडळानं पुढाकार घेतला होता. विशेष म्हणजे हा इतका मोठा ग्रंथ तेव्हा नगरमधल्या मोहन मुद्रा मंदिरानं अतिशय कमी वेळात छापून दिला. छपाईसाठी सेनापती दादा चौधरी, रा. ब. हिरे आणि बापूसाहेब चिंचोरकर यांची मोठी मदत झाली.

ज्ञानेश्वरांवरून वाद

‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ हा ग्रंथ निर्माण व्हायला, त्याआधी गाजलेला एक वाद कारणीभूत ठरला असावा. ‘ज्ञानेश्वर – एक की दोन’ असा हा वाद उपस्थित केला होता नगर जिल्ह्यातले शेवगावचे रहिवासी आणि नगरच्या सोसायटी हायस्कूलमधे शिक्षक असलेले शिवरामपंत एकनाथ भारदे यांनी. ‘सुधारक’मधे ‘भारद्वाज’ या टोपणनावानं ते हे लेख लिहायचे. त्यांच्या ‘आळंदीचा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीचा कर्ता नव्हे’ या लेखमालेनं महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती.

त्याला उत्तर देणारे लेख ‘केसरी’त भिंगारकरबुवा लिहायचे. या वादाला वेगळं वळण लागत असल्याचं पाहून तो थांबवण्यासाठी अखेर लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेत लिहिणार्‍या दोघांना बोलवून चर्चा घडवून आणली. वाद थांबला, पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. ती शोधण्याचा प्रयत्न नंतर सुरुच राहिला. अनेकजण वेगवेगळ्या अंगानं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू लागले.

सरदार नानासाहेब मिरीकर

पाथर्डी तालुक्यातल्या मिरीचे सरदार नानासाहेब मिरीकर हे नाथ संप्रदाय आणि संत साहित्याचे मोठे अभ्यासक. नगर शहराच्या कोर्टगल्लीतला ‘मिरीकर वाडा’ म्हणजे साहित्य, संस्कृती, संगीत आणि अध्यात्माच्या क्षेत्रातल्या मंडळींची एकत्र येण्याची, चर्चेची हक्काची जागा. इथं जसं गहन विषयांवर विचारमंथन चालायचं, तसंच गाण्याच्या मैफिलीही रंगायच्या.

नानासाहेब मिरीहून नगरला राहायला आल्यानंतर त्यांना समानधर्मी मित्र परिवार लाभला. ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास करणारे दादासाहेब धनेश्वर, संक्षिप्त ‘लघुज्ञानेश्वरी’ प्रकाशित करणारे अमृत बापूजी रसाळ, तसंच पत्रकारिता करताना अध्यात्माची आवड जोपासणारे दादा देशपांडे यांना बरोबर घेऊन नानासाहेबांनी ‘ज्ञानेश्वरी चर्चा मंडळ’ स्थापन केलं.

दररोज ही मंडळी भेटायची. अधूनमधून कुणाची भर पडायची. दररोज दीड तास ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा, अर्थ लावायचा, पाठनिश्चिती करायची आणि टीपा लिहून ठेवायच्या. नानासाहेब उत्तम वक्तेही होते. ज्ञानेश्वरी आणि नाथपंथावर ते व्याख्यानं द्यायचे. गणेशोत्सवात त्यांच्या व्याख्यानमाला असायच्या.

हेही वाचा: संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

मराठी भाषेच्या शुद्धिकरणाची चळवळ

नाथसंप्रदायाचा हा अभ्यास सुरु असतानाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कार्यक्रम नगरमधे ठरला. मराठी भाषेच्या शुद्धिकरणाची चळवळ त्यांनी तेव्हा सुरु केली होती. नानासाहेब मिरीकर यांच्या मताप्रमाणे मूळ मराठी भाषेवर संत ज्ञानेश्वरांनी जो साज चढवला, तीच नागरी मराठी. ज्ञानेश्वरपूर्वकालीन नाथपंथियांनी जी मराठीची सेवा केली, तिलाही नानासाहेब मान देत होते.

संत ज्ञानेश्वरांच्या वेळी आणि त्या अगोदर नाथांच्या काळात इस्लामी भाषेतले शब्द मराठीत घुसले नव्हते, म्हणून नानासाहेबांच्या मते नागरी मराठी हीच शुद्ध मराठी भाषा होती. मिरीकर वाड्यातल्या माडीवर सावरकर आणि नानासाहेबांची चर्चा झाली. इस्लामी आक्रमणाअगोदरची ज्ञानेश्वरकालीन मराठी भाषा निर्दोष होती, यावर दोघांचं एकमत झालं.

पण तत्कालीन भाषेतले काही शब्द आज वापरात नाहीत. ते शब्द वेगळे वाटतात, म्हणून सर्वसामान्य माणूस ज्ञानेश्वरी वाचत नाही. सावरकरांच्या भाषाशुद्धीकार्यात प्रतिशब्द पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरांच्या काळातल्या ग्रंथांत किंवा समकालीन महानुभवीय साहित्यात ते मिळतील, असं मत नानासाहेबांनी यावेळी व्यक्त केलं.

‘ज्ञानेश्वर दर्शन’ची निर्मिती

दरम्यान, नगरमधल्या साहित्यप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन वाड़मयोपासक मंडळाची स्थापना केली. काव्य, शास्त्र, विनोद, नाट्य अशा सर्व क्षेत्रांशी संबंधित साहित्याला एक मंच त्यामुळे उपलब्ध झाला. नाशिक जिल्ह्याचा बराचसा भाग तेव्हा नगर जिल्ह्यातच समाविष्ट होता. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतल्या साहित्यिकांनी एकत्र येत दरवर्षी साहित्य संमेलन आयोजित करायला सुरवात केली.

१९३३च्या संमेलनात या मंडळानं ८०० पानांचा ‘ज्ञानेश्वर दर्शन’ नावाचा ग्रंथराज प्रकाशित करण्याची योजना जाहीर केली. असा ग्रंथ काढण्याची कल्पना १९३१मधे कवी केशव टेंभुर्णीकर यांनी मांडली होती. त्यामुळे या कामी त्यांचीच चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. ‘केसरी’मधे तशी बातमीही प्रसिद्ध झाली.

या ग्रंथासाठी नानासाहेबांना संन्यस्त ज्ञानेश्वर माऊलींचंच चित्र हवं होतं. त्या काळातली स्थिती, पोषाख, चेहर्‍यावरचं दिव्यत्व अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून नानासाहेबांनी प्राथमिक शाळेतले शिक्षक रघुनाथ हरी आफळे यांच्याकडून हे चित्र काढून घेतलं. पुढं सिनेमा आणि टीवी सिरीयलमधे ज्ञानेश्वर याच पोषाखात दिसू लागले.

हेही वाचा: सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?

ग्रंथ छपाईचं दिव्य

एवढा मोठा ग्रंथ कुठे छापावा, असा प्रश्न तेव्हा उभा राहिला. सेनापती दादा चौधरी यांनी धाडस दाखवत नगरच्याच मोहन मुद्रा मंदिरात छपाई करण्याची जबाबदारी स्वीकारली. दादांचं आजोळ नेवाशाचं. त्यामुळे संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी हा त्यांच्या श्रद्धेचा विषय होता. बाहेरगावच्या छापखान्यांपेक्षाही देखणा ग्रंथ आम्ही छापून देऊ, असं सांगत रामभाऊ हिरेही दादांच्या मदतीला आले.

या ग्रंथाची प्रूफं तपासणं हे अतिशय किचकट आणि जबाबदारीचं काम होतं. छोटी चूक झाली, तरी अर्थाचा अनर्थ! पण दादा चौधरींनी हे काम उत्तम केलं. शिवाय मूळ लेखातल्या चुकाही त्यांनी दुरूस्त केल्या. दादासाहेब धनेश्वरांना त्याचं आश्चर्य वाटलं. एकदा ते स्वतः प्रेसमधे आले. प्रत्येक अवतरण दादा पोथी आणि संबंधित ग्रंथांत पाहून खात्री करत असल्याचं त्यांना दिसलं.

ते थक्क झाले. दादांचा ज्ञानेश्वरीचा व्यासंगही दांडगा. शेवटचे काही आठवडे तर दादा १८-१८ तास काम करत होते. त्यामुळं ग्रंथ वेळेवर तयार झाला. ज्या दिवशी शेवटचं प्रूफ तपासून पूर्ण झालं, त्या दिवशी दादा चौधरी यांनी समाधानाची झोप घेतली. सलग ४८ तास ते झोपले!

ग्रंथ प्रकाशित झाला

मार्च १९३४ मधे, शके १८५६च्या चैत्र वद्य द्वितीयेला नेवाशात भरलेल्या नगर-नाशिक वाड़मयोपासक मंडळाच्या संमेलनात दोन खंडांचा ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ ग्रंथ मोठ्या थाटात प्रकाशित झाला. ज्ञानेश्वर स्तंभापुढे म्हणजे पैस इथं रा. ब. अप्पासाहेब देशमुख यांनी हा ग्रंथ भक्तिपूर्वक अर्पण केला. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी हभप लक्ष्मणराव पांगारकर होते, तर स्वागताध्यक्ष सरदार नानासाहेब मिरीकर होते.

याप्रसंगी प्रा. दांडेकर, प्रा. चाफेकर, प्रा. दत्तोपंत पोतदार, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील, आमदार नवले उपस्थित होते. ‘ज्ञानदेव विद्यापीठ’ नेवाशात स्थापन व्हावं, असा ठराव याच संमेलनात मांडला गेला होता. दुर्दैवाने २३ सप्टेंबर १९४१ला नानासाहेबांचं निधन झाल्यानं ज्ञानदेव विद्यापीठाचं काम अधुरं राहिलं. ज्ञानेश्वरीची शुद्ध नवी आवृत्ती प्रकाशित करण्याचा त्यांचा संकल्पही पूर्णत्वास गेला नाही. 

प्रस्तावनेत म्हटलंय, ‘श्री ज्ञानेश्वरांचे स्मरण अखंड रहावे, त्यांचे कार्य नित्य डोळ्यापुढे दिसावे, त्यांनी घालून दिलेला मार्ग पुन्हा जिकडे तिकडे उज्ज्वल स्वरूपात प्रकट व्हावा, अंतःकरणातील भक्ती जनताजनार्दनाच्या सेवेच्या रूपानं श्री ज्ञानराजांच्या चरणी अखंड लागावी,’ या हेतूने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला.

हेही वाचा: संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

दुर्मिळ झालेला ग्रंथ

शंकराचार्यापासून उभ्या महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवरांचे लेख ‘ज्ञानेश्वर दर्शन’ ग्रंथात आहेत. या ग्रंथात सरदार नानासाहेब मिरीकर यांचे दोन लेख आहेत. त्यातला एक लेख ‘शांताराम’ या टोपणनावाने लिहिलाय. हे दोन्ही लेख गाजले. ‘ज्ञानेश्वरांचा नाथपंथ’ हा लेख नंतर नागपूर विद्यापीठानं अभ्यासक्रमासाठी निवडला.

तेव्हाच्या सगळ्या वृत्तपत्रांनी एकमुखानं गौरवल्यानं ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’च्या प्रती हातोहात संपल्या. रा. चिं. ढेरे, व. दि. कुलकर्णी यांच्यासारख्या अभ्यासकांनी यासारखा दुसरा ग्रंथ नाही, असं नमूद केलंय. मात्र, काळाच्या ओघात ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ हा ग्रंथ दुर्मिळ झाला. सध्याच्या अनेक मंडळींना तर असा काही ग्रंथ आहे, हेही माहिती नाही. 

सरदार नानासाहेब मिरीकर यांचे पुतणे आणि सरदार बाबासाहेब मिरीकर यांचे चिरंजीव ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर यांनी काही वर्षांपूर्वी ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यासाठी संपूर्ण बाडासह साहित्य संस्कृती मंडळाकडे प्रस्ताव दिला, मात्र त्याचं महत्त्व तेव्हाच्या मंडळींना उमगलं नाही.

पुन्हा नव्याने ग्रंथनिर्मिती

त्यानंतर नगर जिल्ह्यात भेंडे इथले इतिहासाचे अभ्यासक, पण मराठी विषय शिकवणारे प्रा. डॉ. शिरीष लांडगे यांना नेवाशाच्या इतिहासाचा अभ्यास करताना ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ ग्रंथाचे संदर्भ मिळाले. उत्सुकतेनं ते या ग्रंथाचा शोध घेऊ लागले. पीएच. डी. करणार्‍या त्यांच्या एका विद्यार्थ्याकडून अकलूजच्या नेमीचंद वाचनालयात हा ग्रंथ असल्याचं समजलं. तिथं एकच खंड मिळाला. त्याची झेरॉक्स करून घेतली.

दुसरा खंड पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधे मिळाला, पण एकावेळी पाच पानांचीच झेरॉक्स काढण्याची तिथं अट आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर प्रा. डॉ. लांडगे यांना त्याचं लौकिक आणि अलौकिक महत्त्व लक्षात आलं. या ग्रंथात ज्ञानदेवांची कुंडली, ज्ञानेश्वरीतलं वास्तुशास्त्र, रसायनशास्त्र अशा विविध विषयांवर ७० ते ७५ लेख आहेत. आधुनिक पद्धतीनं विचार करत, सामूहिक प्रयत्नांनी सिद्ध झालेला हा ग्रंथ पुनःप्रकाशित झालाच पाहिजे, असं त्यांना मनोमन वाटलं.

त्यांनी तेव्हाचे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ती मान्य करत संपादन आणि नव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेची जबाबादारी प्रा. डॉ. लांडगे यांच्यावरच सोपवली. सध्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनीही या प्रकल्पाला चालना दिली. मूळचे १७०० अधिक १०० पानांची प्रस्तावना अशा एकूण १८०० पानांच्या या ग्रंथाची छपाई सध्या पुण्यात सुरु आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत हा ग्रंथ वाचकांना उपलब्ध होईल.

नव्या आवृत्तीचं प्रकाशन १९३४ सारखं नेवाशाला पैस खांबाच्या साक्षीनंच व्हावं, अशी प्रा. डॉ. लांडगे यांची इच्छा आहे. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचा जन्म नगरमधलाच, त्यांच्या प्राध्यापकीचा प्रारंभ इथेच झाला. त्यामुळे ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ची नवी आवृत्ती नगरच्या मातीत, नेवाशाच्या ज्ञानेश्वर मंदिरात ‘पैस’ला अर्पण करणं त्यांनाही आवडेल.

संदर्भ:
१) सेवाव्रती सरदार नानासाहेब मिरीकर - लेखक सरदार बाबासाहेब मिरीकर, संपादक डॉ. प्र. ल. गावडे.
२) सेनापती दादा चौधरी - देशभक्त कर्मयोगी, लेखक रा. प. पटवर्धन.
३) स्नेहालयाच्या रेडिओ नगर ९०.४ FMवर झालेली प्रा. डॉ. शिरीष लांडगे यांची मुलाखत
आभार - ज्येष्ठ पत्रकार श्री. श्रीपाद मिरीकर आणि परिवार.

हेही वाचा: 

ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू 

वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे

संत नामदेवांच्या अभंगवाणीत भारतीय संविधानातल्या मूल्यांचा जागर

गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला