सेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो

१५ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रयागराज इथल्या अर्धकुंभाला आज पहिल्या शाही स्नानने सुरवात झाली. भल्या पहाटे हाडं गोठवणाऱ्या थंडीत शाही स्नानासाठी त्रिवेणी संगमावर बुवाबाबा, भाविकांची गर्दी झालीय. २०१९ च्या निवडणुकीआधी होणाऱ्या अर्धकुंभाच्या भव्यदिव्य आयोजनात कुठलीही कमतरता राहू नये म्हणून योगी सरकारने खूप तयारी केलीय. या सगळ्यांचा हा लाईव रिपोर्ट.

‘जानकीदेवी आप जहांभी हो, खोया पाया केंद्रमें आजाये, आपके पती मिठाईलाल आपका यहां इंतजार कर रहे है.'

'यहां एक बच्चा मिला है. उमर छे साल होगी. रंग सांवला. कुडता पेंट पहने है. नाम बता रहा है किशोर. जिसकाभी हो, पहचान कराके ले जाये.'

खोयापाया केंद्राच्या माईकवर अखंड घोषणा सुरू असतात. लोक हरवतात, सापडतात पुन्हा हरवतात पण येणाऱ्यांचा ओघ मात्र अखंड सुरूच असतो.

प्रयागराज अर्थात इलाहाबादमध्ये आज १४ जानेवारीपासून सुरू झालेल्या अर्धकुंभात शाही स्नानाची घडी गाठण्यासाठी आदल्या दिवशीपासूनच लोक यायला सुरू झालेत. हाडं गोठवणाऱ्या थंडीतही हे येणं थांबत नाहीच. कारण पहाटे आखाड्यांचं शाहीस्नान झालं की हरेकाला त्रिवेणी संगमात स्नान करण्याची दुर्मिळ संधी साधायची असते. आज १५ जानेवारी म्हणजे २०१९ च्या अर्धकुंभातली शाही स्नानाची पहिली तारीख. गंगा, यमुना आणी लुप्त झालेल्या सरस्वतीचा त्रिवेणी संगम प्रयागराज इथं होत असल्यानं इथल्या कुंभपर्वाला विशेष महत्त्व आहे.

'कुंभमेला प्राधिकरण'नं जाहीर केलेल्या आकड्यांनुसार आतापर्यंत एकूण ५३ लाख लोकांनी गंगेत डुबकी मारलीय. येत्या चार मार्चच्या महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या या मेळ्यात जगभरातून १२ कोटी लोक येतील असा उत्तर प्रदेश प्रशासनाचा दावा आहे. १० लाख परदेशी नागरिकही येणार आहेत. हा अर्धकुंभ असला तरी 'भव्य कुंभ दिव्य कुंभ' अशा टॅगलाईन सकट कमालीची भव्यता या ३२०० हेक्टरच्या आवारात पसरलेल्या कुंभाच्या आयोजनात पाहायला मिळतेय.

मोदी-योगी सरकारच्या विविध योजना आणि कामांचं व्यवस्थित ब्रॅण्डिंग सगळ्या मेळ्यात बघायला मिळतं. शासनानं लोककल्याणासाठी काय काय केलं ते सांगणारे दृक्श्राव्य माहितीपट, होर्डिंग्ज असं सगळं शहरातही लावलेलं आहे. कुंभमधे येणाऱ्यासाठी एक खास टेंट सिटी उभारण्यात आलीय.

पहाटे पाचला सुरू झालेली पहिल्या शाहीस्नानाची पर्वणी आज सायंकाळी चारपर्यंत सुरू राहील. यंदा पहिल्यांदाच शाही स्नानाचा मान मिळवलेल्या किन्नर आखाड्याला धरून एकूण १४ आखाडे आहेत. त्यांना संन्यासी, बैरागी आणि उदासीन अशा गटांमध्ये विभागलं गेलंय. त्यांचं स्नानही त्याच क्रमानुसार सुरू आहे.

हत्तीघोडे यांच्यावर स्वार झालेले, रथापालख्यांत बसलेले सालंकृत साधूसंत, डोक्यावर छत्रचामर, चवऱ्या, मागेपुढे भक्तगणांचा ताफा, दिमतीला पोलिसांचा फौजफाटा, भगवे झेंडे, पताका, दर्शनासाठी भक्तांची उसळलेली गर्दी आणि जयघोष. पहाटे पाचपासून सात-आठपर्यंत शाही स्नानाचा पहिला मान मिळवणाऱ्या आखाड्यांचा श्रीमंती तामझाम कुणाही सामान्याचे डोळे दिपवणारा होता.

किन्नर आखाडा प्रमुख लक्ष्मी त्रिपाठी यांच्या आखाड्याचा जुना आखाड्यासोबत मेळ झालाय. त्या निक्षुन सांगतात, 'आमचा त्यांच्यासोबत मेळ झालाय. आम्ही त्यांच्यात विलीन नाही झालोय. आमच्या अटींनुसार आम्ही त्यांच्यासोबत असणारोत.' शाही स्नान करायला मिळाल्याचा, राजमान्यतेच्या लढाईतला एक मोठा टप्पा जिंकल्याचा आनंद पहाटे लक्ष्मी आणि त्यांच्या शिष्यगणांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

'मोक्ष मिळाला तर ठीकच. नसता त्या वाटंवर चालण्याचं पुण्यपन मोठंच नाही काय?' विदर्भातल्या वाशीमहून आलेले संताजी मला म्हणाले. त्यांच्या एकत्र कुटुंबातल्या १४ जणांना घेऊन ते दुसऱ्यांदा कुंभमेळ्याला आलेत. सहा वर्षांपूर्वी त्यांनी नाशिकचा कुंभही अनुभवाला होता. संताजींच्या म्हणण्यानुसार मीही संगमापर्यंत जाताना दिसलेले नजारे बघत, माणसांशी बोलत वाटेची मजा घेत राहिले.

जर्मनीहून आलेले जेम्स आणि क्रिस्टीन वाटेत भेटले. क्रिस्टीन म्हणते, 'दिस इज सच अ ब्युटीफुल फेअर!' तिला ही जत्रा वाटते. जेम्सच्या मते, 'इतकी सगळी माणसं उत्सफूर्तपणे एका ठिकाणी येणं, आपापलं काम करून शिस्तीत परत जाणं हे भारतातच घडू शकतं.' इलाहाबाद युनिवर्सिटीत बीए करणारा शुभम या दोघांसोबत होता. तो सांगतो, 'आम्ही विद्यार्थी कुंभ सेवक मित्र म्हणून दोन महिने काम करतो. देशपरदेशातून येणाऱ्या लोकांना जमेल तशी मदत करणं, पत्ते सांगणं असं सगळं करताना खूप शिकायला मिळतं. युनिवर्सिटीतून किमान पाचसहा हजार मुलंमुली सेवक मित्र बनतात.'

'काले घोडेके नालकी अंगुठी लेलो, केवल १० रुपये, बाबाका तोहफा. शनी प्रकोप हट जायेगा.' अशी खास चिरक्या आवाजात जाहिरात करत एक किडकिडीत पोरगा बाजूलाच उभा होता. त्याच्याच बाजूला पुस्तकांचं दुकान जमिनीवर मांडलेलं होतं. त्यात अकबर बिरबल कथा, शनीचालिसा, माँ शीतला व्रतपासून रावण संहिता, शनी यंत्र, प्राचीन लाल किताब, चमत्कारी शाबर मंत्र शास्त्र अशी प्रचंड वरायटी होती.

इस्कॉन हरे कृष्ण मंदिरवाले गीता फ्रीमध्ये वाटत होते. घ्यायला झुंबड उडालेली. त्याच्याच बाजूला गंगाचरणदास गांजाच्या चिलमी विकत होते. मी म्हणालं, 'महाराजजी, चिलम तो हैं, पर गांजा कहां मिलेगा?’ त्यावर ते म्हणाले, 'वो तो साधूसंतोके पास होगा!'

महेंद्र पांडे नेपाळच्या चाकरचौडा गावाहून आलेत. सोबत त्यांची बायको, मुलगा आणि शेजाऱ्यांचं कुटुंब आहे. महेंद्र म्हणतात, 'हम रहनेवाले नेपालके है. वहांभी काठमांडूजैसे हिंदू धर्मस्थल है. कुंभतो पूरी दुनियामें सिर्फ भारतमें होता है. यहां आकार योगी-मोदीका काम देखते हैं तो ख़ुशी होती हैं के कोई हिंदूओंका इतना खयाल कर रहा है. हमारी श्रद्धा हैं मोदीजीपर. राममंदिरभी वही बनायेंगे. इसी साल बनायेंगे!' पांडेजींची बायको मीना कुमारी सांगते, 'यहां आकर पाप धुलते हैं.'

ठिकठिकाणी गंगाजलासाठी रिकामे डबे, गंगेत सोडण्याचे दिवे, जनेऊ, प्लास्टिकची खेळणी, खोटे दागिने, प्रसाद विकणारे, चहा-भजीवाले चढाओढीनं माल विकत होते. मुंडन करून देणारे न्हावी, आणि पूजा करणारे पंडे यांच्यासमोरची रांग हटत नव्हती.

संगमावर आता स्नान करण्यासाठी सर्वसामान्यांची प्रचंड गर्दी झालीय. गर्दीत फिरताना हिंदी, तेलुगू, पंजाबी, बंगाली, गुजराती अशा भाषा आलटून पालटून कानावर पडत राहतात. आता पहाटेचा हलका उजेड अंधार हटून लख्ख उजाडलंय.

संगमात पाचशेतरी नावा हेलकावे घेताना दिसतात. पाण्यावर उडणारे, लाटांवर तरंगणारे शुभ्र सैबेरियन पक्ष्यांचं नाव नाविकांनी 'रामप्यारी' ठेवलंय. 'रामप्यारीका दाना लेलो..' म्हणत छोटी पोरं शेवेची पाकिटं घेऊन नावेत बसणाऱ्यांच्या मागम लागतात. पंछीको खिलानेसे पुन्य लगेगा अशी स्मार्ट पुस्तीपण त्यांच्याकडं तयार असते जोडायला!

युपी पोलिस दलाचे अर्जुन कुमार सिंग सांगतात, 'गर्दी नियंत्रणात राहावी म्हणून हरेकाला डुबकी मारण्यासाठी केवळ ४१ सेकंड देण्यात आलेत. त्याचं पालन होतंय ना हे आम्ही बघतोय.' अपघात टाळण्यासाठी जल पोलीस, रॅपिड ऍक्शन फोर्स यांचा मोठा ताफा पाण्यात तैनात करण्यात आलाय. किनाऱ्यावर महिलांना कपडे बदलण्यासाठी खास लहान-लहान कंपार्टमेंट्स बनवण्यात आलीत.

अनिल श्रीवास्तव, शैलू यादव, रविकांत सिन्हा युपीच्या सतनाहून आलेत. तिघं बी.एस्सी करतात. एरवी ५० रुपयात संगमावर स्नान करून आणणारे निसाद-मल्लाह लोक आज एका माणसासाठी दोनशे-तीनशे रुपये घेत असल्याची त्यांची तक्रार आहे. पण जास्त पैसे द्यावे लागले तरी त्यांना इथे किनाऱ्यावर स्नान न करता संगमालाच जायचंय. तिघं सांगतात, 'आज तिथं स्नान केल्याने मेल्यावर स्वर्ग मिळणार असल्याची धार्मिक मान्यता आहे.' तितक्यात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सुरू होते. 'अरे फोटवा लेले' रवी ओरडायला लागतो.

किनाऱ्यापासून तीनशे मीटरवरच मोबाईल टॉयलेट आहेत. मैला उचलणारे, पाण्यात जाळ्या लावून निर्माल्य हटवणारे आणि परिसराची स्वच्छता करणारे सफाई कामगार तिथं बाजूला बसलेत. त्यांना बाराबारा तासांच्या ड्युट्या आहेत. खाण्यापिण्याच्या वेळा ठरलेल्या नाहीत. धुन्नू म्हणतो, 'हम यहां काम कर रहे हैं तो हमकोभी पुण्य मिलेगा. ये पवित्र जगह है.' बाजूच्या ताईला मी विचारते, 'लोग यहां स्वर्गप्राप्तीके लिये आते है. पर यहां ये काम करना नरक जैसा नही हैं?' ती काहीच बोलत नाही. बाजूचा एकजण म्हणतो, 'है तो! पर यहां स्नान कर लेंगे तो अगले जनममें ये नरक ना मिलेगा.'

आता सकाळचे अकरा वाजलेत, जाणाऱ्यांची गर्दी जितकीय त्याहून खूप जास्त येणाऱ्यांचा ओघ आहे. हवेत खूप सारी धूळ उडतं आहे. स्वर्ग, नरक मोक्ष, पुण्य, पाप असे सगळे शब्द तिच्यात भरून उरलेत.

मला गालिब आठवतो, 'हमको मालूम हैं जन्नतकी हकीकत लेकिन, दिलके खुश रखनेको गालिब ये खयाल अच्छा है!'
 

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)