साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!

२८ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज मासिक पाळी स्वच्छता दिवस. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला महिन्यातून एकदा पाळी येते. आता कोरोना वायरस आल्यापासून मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय. लॉकडाऊनमुळे सॅनिटरी पॅडचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. शाळांमधून मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं थांबलंय. मग पीपीई किट घालून सहासहा तास रूग्ण सेवा करणाऱ्या नर्स मासिक पाळीच्या स्वच्छतेचं काय करत असतील?

लॉकडाऊन चालू झाल्यापासून आपण घरी बसून काम करू लागलो, ऑनलाईन भेटू लागलो, कार्यक्रम घेऊ लागलो, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तूही ऑनलाईन मागवू लागलो. कोविड १९ हा साथरोग आला म्हणून आपलं सामाजिक आयुष्य बदललं. पण आपल्याल्या नैसर्गिक गरजा बदलल्या नाहीत. साथरोग आला म्हणून आपल्याला भूक लागणं, तहान लागणं, झोप येणं बंद झालं नाही.

तसंच, साथरोग आला म्हणून बायकांना मासिक पाळी येणंही बंद झालं नाही. उलट, या साथरोगाच्या काळात बायकांचा मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय हे आपल्या लक्षातही आलं नाही. आज २८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीविषयीच्या अंधश्रद्धांना फाटा देऊन त्या दिवसांत पाळायच्या स्वच्छतेचं महत्त्व जास्तीत जास्त लोकांना कळावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

हेही वाचा : चला, आज तरी मासिक पाळीवर चर्चा करूया

मासिक पाळी फक्त बायकांनाच येत नाही

जगभरातल्या निम्म्या लोकसंख्येला दर महिन्याला मासिक पाळी येते. यात फक्त आपल्या आया बहिणींचा किंवा फक्त लहान मुली आणि बायकांचाच समावेश होत नाही. तर ट्रान्सजेंडर, नॉनबायनरी,  इंटरसेक्शुअल आणि अजेंडर अशी वेगवेगळी लैंगिक ओळख असणाऱ्या व्यक्तींनाही मासिक पाळी येते.

जगभरातल्या लाखो, कोट्यवधी लोकांना दर महिन्याला मासिक पाळी येते आणि त्यातला प्रत्येक जण हा काळ त्यामागची घृणास्पद भावना टाळून स्वच्छतेत आणि आरामात जगावं, यासाठी प्रयत्न करत असतो. साथरोग असो वा नसो मासिक पाळी येणाऱ्या जगभरातल्या बायकांना आणि इतर माणसांना या काळातही स्वच्छ बाथरूम आणि पुरेसं पाणी मिळत नाही. इतकंच काय, तर मासिक पाळीतून येणारं रक्त टिपून घेण्यासाठी पॅड, टॅम्पोन्स किंवा कापडासारखी पुरेशी साधनंही उपलब्ध नसतात.

शिवाय, मासिक पाळीविषयीच्या अनेक अंधश्रद्धांमुळे ही सगळी प्रक्रिया आणखीनंच त्रासदायक होते. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा त्या महिलांच्या आरोग्यावर होत असतो. मासिक पाळीतल्या अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारचे इन्फेक्शन्स तयार होतात. अनेकदा अगदी सर्विकल कॅन्सरपर्यंत गोष्टी जाऊ शकतात.

कोरोना रक्तातून पसरतो का?

कोरोना वायरससारखं एखादं संकट आल्यावर तर मासिक पाळीमधल्या अडचणी जास्तच वाढतात. मागे सांगली आणि कोल्हापूरला आलेल्या पुरावेळीही मासिक पाळीच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. कोविड १९ च्या काळात तर याहून गंभीर स्थिती भारतात आणि संपूर्ण जगात तयार झालीय.

मानवी आरोग्यावर कोरोना वायरसचे मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेत. त्यातले काही थेटपणे आणि लगोलग झालेले दिसतात. तर काही अप्रत्यक्ष परिणाम होतात. साथरोगामुळे पसरलेल्या भीतीचा अप्रत्यक्ष परिणाम लोकसंख्येवर होतोच. पण साथरोग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा परिणाम त्या त्या देशातल्या नागरिकांवर होत असतो. कोरोना वायरसचा असाच अप्रत्यक्ष परिणाम जगभरातल्या महिलांच्या मासिक पाळीवर होताना दिसतोय, असं युनायडेट नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफच्या एका अहवालातून स्पष्ट होतं.

आत्तापर्यंत हा वायरस एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला खोकल्याने किंवा शिंकल्यामुळे होतो, असं सिद्ध झालंय. हा वायरस विष्ठेतून किंवा रक्तातून पसरल्याचे कोणतेही पुरावे अजून मिळालेले नाहीत. त्यामुळेच मासिक पाळीतून जाणाऱ्या रक्तातही हा वायरस नसतो. कोरोना वायरस मासिक पाळीवर थेट परिणाम करतो असं म्हणता येणार नाही.

मात्र, कोरोनामुळे समाजात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाचा परिणाम मासिक पाळीवर होतोय, असं युनिसेफच्या अहवालात सांगण्यात आलंय. एरवीही अतिकाळजी, चिंता यामुळे मासिक पाळी येण्याची तारीख पुढे मागे होते, हे तर आता जवळपास सगळ्यांनाच माहीत झालंय. पण आता कोरोनाकाळात हीच गोष्ट घडतेय.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

अवघड जागंचं दुखणं

पण ही गोष्ट इथंवरच थांबत नाही. तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या बायकांवर कोरोना काळात मासिक पाळीच्या वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय. जागतिक आकडेवारीनुसार, आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधे ७० टक्के महिला असतात. नर्स, सुईणी आणि आशा, अंगणवाडी सेविका यांच्यासारख्या आरोग्य कर्मचारी या महिलाच असतात. कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर गेली ५ महिने या सगळ्या महिला स्वतःला झोकून देत कोरोनाला रोखण्यासाठी काम करतायत.

या सगळ्या महिलांमधे मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या अडचणींमधे कोरोनामुळे वाढच झाल्याचं दिसतं. कोरोनामुळे त्यांच्या रोजच्या कामात वाढ झालीय. त्यात वायरसमुळे घ्याव्या लागणाऱ्या सुरक्षेसाठी त्यांना वेगळी मेहनत करावी लागते. याचा सगळ्यात मोठा फटका बसतो ते पीपीई किट घालून कोरोना वायरसची लागण झालेल्या पेशंटची सेवा करणाऱ्या नर्सना. हे किट एकदा का अंगावर चढवलं की ना पाणी पिता येतं ना लघवीला जाता येतं. आणि किट अंगावर चढवलं की ते सहासहा तास अंगावर ठेवून पेशंटच्या सेवेत तैनात राहावं लागतं.

मासिक पाळी चालू असणाऱ्या नर्सेसना पीपीई किट घालून काम करणं अगदी अशक्य होतं. पीपीई किट युज आणि थ्रो म्हणजे एकदा वापरा आणि फेकून द्या अशा पद्धतीचा असतो. हे किट एकदा घातलं की कामाचे तास संपेपर्यंत तो काढता येत नाही. अशावेळी नर्सेसना मासिक पाळी म्हणजे शब्दशः अवघड जागेचं दुखणं वाटू लागलंय.

पीपीई किट घालायचा की सॅनिटरी पॅड?

पीपीई किट काढून साधं बाथरूमला जाणंही या नर्सना शक्य होत नाही. तर, मासिक पाळी चालू असताना लागणारी विशेष काळजी त्या कुठून घेणार? अनेक नर्स पीपीई किट घातल्यानंतर बाथरूमला जाणं टाळण्यासाठी डायपरचा वापर करतात. मासिक पाळीच्या काळात लघवी आणि मासिक पाळीचं रक्त एकत्र या डायपरमधे जमा होतं. कामाचे तास संपेपर्यंत म्हणजे कमीतकमी आठ ते नऊ तास ते तसंच ठेवावं लागतं.

मासिक पाळीचं रक्त मुळात अस्वच्छ नसतं. पण शरीरातून बाहेर आल्यावर हवेतले रोगजंतू त्यावर बसून इन्फेक्शन होण्याची भीती असते. पीपीई किटमधे फक्त हवेतले जंतुच नाहीत तर मानवी लघवीमधे असलेले जंतुही त्यावर बसण्याचा धोका संभवतोय.

हॉस्पिटलमधे कोरोना वायरसच्या पेशंटची सेवा करणाऱ्या नर्समधे मासिक पाळीचा हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महत्त्वाचं म्हणजे, प्रत्यक्ष सेवा देण्यासाठी महिला असल्या तरी आरोग्य व्यवस्थेमधे अधिकारी पदावर बहुतांश पुरूष असतात. ते पुरूष महिलांची ही अडचण समजून घ्यायला कमी पडतात. त्यामुळेच हॉस्पिटल, आरोग्य विभाग अशा ठिकाणी मासिक पाळीसाठी लागणाऱ्या साधनांची कमतरता जाणवते.

अशाच प्रकारचा त्रास घरापासून लांब जागेत क्वारंटाइन झालेल्या बायकांच्या वाटेलाही येत असणार. मासिक पाळीच्या साधनांची कमतरता आणि स्वच्छ हवेशीर आणि प्रकाश असणारं बाथरूम, साबण, पाणी याचीही कमतरता त्यांना भासत असणार. हा त्रास टाळण्यासाठी अनेक नर्स आणि महिला पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेताना दिसतायत. या गोळ्यांचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात.

हेही वाचा : मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?

सॅनिटरी पॅडचा तुटवडा

कोरोनामुळे अनेक देशांना लॉकडाऊन जाहीर करावा लागला. अजूनही काही देश लॉकडाऊनमधे आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक कारखाने, वाहतुक बंद पडली. याचा फटका मासिक पाळीच्या साधनांनाही बसलाय. जगभरात टॅम्पोन्स, मेन्सट्रुअल कप, सॅनिटरी पॅड यासारख्या साधनांचा तुटवडा जाणवतोय. एप्रिल महिन्याच्या मध्यात भारतातही पॅडचा तुटवडा जाणवला होता.

‘पॅड बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळतोय का याची खात्री केली जावी आणि पॅडचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत करण्यात यावा,’ अशी मागणी भारताचे पॅडमॅन म्हणून ओळखले जाणारे अरुणाचलम मुरुगनाथम यांनी सरकारला केली होती. याविषयी द हिंदू मधे बातमी आली होती.

मात्र, भारतातल्या बहुतांश मुलींना आणि महिलांना दुकानातले हे पॅड घेणं परवडतही नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे, हाताला काम नसल्याने खायला पैसे नाहीत. अशा कुटुंबाना मासिक पाळीच्या पॅडची ही चैन कशी परवडणार? मग पर्याय म्हणून मुली पुन्हा जुन्या अस्वच्छ साधनांचा उपयोग करत आहेत, असं मुरुगनाथन सांगतात.

पॅड परवडणार कसं?

अनेक मुलींना सरकारी शाळेतून नाहीतर अंगणवाडीमधून अतिशय स्वस्त दरात किंवा फुकट पॅड वाटले जातात. बीबीसी इंग्लिशशी बोलताना दिल्लीजवळच्या एका खेड्यात राहणारी प्रिया शेवटचं पॅकेट फेब्रुवारी महिन्यात मिळाल्याचं सांगत होती. त्यानंतर पॅड उपलब्ध न झाल्यामुळे बाहेरून जास्त पैसे देऊन पॅड विकत घ्यावं लागल्याचं तिने सांगितलं.

बाहेर सात पॅडचं एक पॅकेट साधारण ३० रूपयांना मिळतं. हे पॅड अत्यंत अनैसर्गिक पद्धतीने बनवले असतात. त्यामुळे एक पॅड ६ तासांपेक्षा जास्त काळ ठेवलं तर त्यातून इन्फेक्शन होण्याची भीती असते. तरीही, पैसे नाहीत म्हणून एकच पॅड मुली २४ तास वापरतात.

३० रूपयेही खर्च करण्याची ऐपत नसलेल्या मुलींकडे लॉकडाऊनच्या काळात कापड वापरण्याचा पर्याय शिल्लक राहतो. मात्र, लॉकडाऊनमधे सगळे पुरूष घरातच असल्याने ते कापड स्वच्छ धुवून कडक उन्हात वाळवताना या मुलींना लाज वाटते. त्या ओलसर पॅडच पुन्हा पुन्हा वापरतात. त्यातून जंतुसंसर्ग होतो.

रस्त्यावरून चालत जाणाऱ्या मजूर महिला, त्यांच्या मुली मासिक पाळी कशी सांभाळत असतील, असाही प्रश्न आहे. या सगळ्या त्रासाला कंटाळलेल्या मुली मासिक पाळीला ‘अडचण’ असं म्हणतात. पण मासिक पाळी ही अडचण नाही. या नैसर्गिक प्रक्रियेकडे नीट लक्ष न दिल्याने अनेक मानवनिर्मित अडचणी निर्माण होतात. साथरोग आला तरी मासिक पाळी थांबत नाही आणि त्यामागून येणाऱ्या अडचणीही सुटत नाहीत. इतकंच नाही, तर साथरोग संपल्यावर तरी या बायकांचा मासिक पाळीचा हा प्रश्न सुटेल का याचं उत्तरं मिळतंच नाही.

हेही वाचा : 

बरं झालं, आमच्या देवाला मासिक पाळीचं वावडं नव्हतं

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

मासिक पाळीविषयी आपल्या मुलामुलींशी कसं बोलायचं?

खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष

माझा कोरोना पॉझिटिव काळातला अनुभव सांगतो, घाबरायचं काम नाही

वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?

राधिका सुभेदार सांगत्येय, मासिक पाळीविषयी गुप्तता नको स्वच्छता बाळगा