बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत मराठी पेपरात छापून येते तेव्हा,

१४ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोना न्यूजपेक्षा आपण फेक न्यूजबद्दलच जास्त चर्चा करतो. अशा फेक न्यूज पसरवणाऱ्या मीडिया चॅनल्स, वृत्तपत्रांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. पण हा काही नव्यानं जन्माला आलेला धंदा नाही.काही टीआरपीबाज पत्रकारांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जगणं मुश्कील करून टाकलं होतं. एकानं तर साधी गाठभेठही झालेली नसताना आंबेडकरांची मुलाखत छापली होती. त्यावरचा बाबासाहेबांचा खुलासा पत्रकारितेच्या धंदाचं गुपित सांगतो.

चॅनेलचा टीआरपी वाढावा, किंवा आपल्यावर वरदहस्त ठेवणाऱ्या कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या नेत्याला खूश ठेवावं यासाठी अनेक खोट्या नाट्या बातम्या सांगितल्या जातात. नव्हत्याचं होतं करून फेक न्यूज खरी आहे हे कसं दाखवायचं याचं कसब अनेक पत्रकारांनी चांगलंच आत्मसात केलंय. सोशल मीडियाच्या वापरामुळे तर अशा फेक न्यूज पसरवण्याचं कामंही झपाट्याने करता येतं. आतापर्यंत निव्वळ पत्रकारांनाच असणारी ही संधी सोशल मीडियानं सर्वसामान्यांनाही मिळवून दिलीय.

या फेक न्यूजला आळा घालणं  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या मातब्बर कायदेतज्ञालाही जमलं नव्हतं. आजच्या रखं तेव्हा सोशल मीडिया नव्हतं म्हणून ही फेक न्यूज फार लोकांपर्यंत पोचली नाही ते बरं. पण त्याचं उत्तर देता देता बाबासाहेबांना नाकी नऊ आले होते. विचारवंत य. दि. फडके यांचं 'आजकालचे राजकारणी' नावाचं २००० साली आलेलं पुस्तक आहे. या पुस्तकातल्या ‘अरे जे जालेचि नाही’ या लेखात बाबासाहेबांबाबतीतला फेक न्यूजचा प्रसंग सांगितलाय. 

हेही वाचा : खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?

खोट्या गोष्टी रचायला ज्ञान लागत नाही

वार्ताहर किंवा खास प्रतिनिधीही सत्यवादी हरिश्चंद्राचे अवतार नसतात. पोटापाण्याचा धंदा म्हणून पत्रकारिता करणारे खळबळ उडवून देणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करून बाजारात पेपरचा खप वाढवण्याचा सारखा उद्योग करत असतात.

महापंडित डॉ. सॅम्युअल जॉन्सन याने बातमीदारचं वर्णन करताना म्हटलंय, ‘बातमीचं लेखन करणारा माणूस सद्गुणी नसतो. तो स्वतःच्या फायद्यासाठी घरी बसून धादान्त खोटं लिहीत असतो. बनावट गोष्टी रचण्यासाठी अव्वल दर्जाच्या प्रतिभेची तसंच ज्ञानाची गरज नसते. दीर्घोद्योगाचीही आवश्यकता नसते. त्यासाठी अत्यावश्यक असते ती सत्याबाबतची उदासीनता आणि निर्लज्जपणा.’

डॉ. जॉन्सनची ही अतिरेकी टीका वार्ताहरांना आणि वृत्तपत्र व्यवसाय करणाऱ्यांना निश्चिती आवडत नाही. पण वार्ताहरांनी छापलेल्या खोट्यानाट्या बातम्यांकडे एरवी दुर्लक्ष करणाऱ्या महान नेत्यांचीही सहनशीलता कधी कधी संपते. १९४१च्या जानेवारीत लोकमान्य टिळकांचे ज्येष्ठ चिरंजीव रामभाऊ यांनी केसरीच्या विश्वस्तांनी केसरी काँग्रेसच्या हातात द्यावा म्हणून प्राणांतिक उपोषण सुरू केलं होतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

मी तर दोनच प्रश्न विचारले

लोकमान्य टिळकांचे दोन्ही पुत्र रामभाऊ आणि श्रीधरपंत यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्नेहबंध होते. टिळकपुत्रांची सर्व मतं बाबासाहेबांना मान्य होती, असा त्याचा अर्थ नव्हे. काही कामानिमित्त बाबासाहेब पुण्याला गेले असताना उपोषण करीत असलेल्या रामभाऊ टिळकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले आणि प्रकृतीबाबत दोन प्रश्न मित्राच्या नात्यानं रामभाऊंना विचारून परतले. केसरीच्या विश्वस्तांविषयी बाबासाहेबांचं मत जसं प्रतिकूल होतं तसंच ते पत्र काँग्रेसच्या हाती सोपवावं हे रामभाऊ टिळकांचं म्हणणंही त्यांना मुळीच पटण्यासारखं नव्हतं.

मुंबईत तेव्हा ‘नागरिक’ नावाचे वृत्तपत्र प्रसिद्ध होत असे. त्याचा बातमीदार राईचा पर्वत करण्यात पारंगत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रामभाऊ टिळकांना भेटले ऐवढे पुरेसे होते. त्याने आपण डॉ. बाबासाहेबांची घेतलेली मुलाखत म्हणून काल्पनिक मजकूर छापला. त्याचा इन्कार करणारे पत्रक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९४१ ला प्रसिद्ध केलं.

त्यात बाबासाहेबांनी म्हटले आहे, ‘नागरिक वाचून मी थक्क झालो. प्रसिद्ध झालेल्या मजकुरातील एक वाक्यदेखील माझं नाही. नागरिकच्या खास प्रतिनिधीनं माझी कधी मुलाखतही घेतलेली नाही. रामभाऊ टिळकांच्या आणि माझ्य मुलाखतीत दोनच प्रश्न मी त्यांना विचारले.’

हेही वाचा : युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

म्हणजे शुद्ध तमासगीरांचा धंदा झालाय

बाबासाहेब लिहितात, ‘मराठी वृत्तपत्रकारांचा धंदा म्हणजे शुद्ध तमासगिरांचा धंदा झाला आहे. लावणी रंगवण्याकरता जसा अर्थाचा अनर्थ करण्यात लाजलज्जा वाटत नाही, तसंच मराठी वृत्तपत्रकारांना आपल्या अंकाची सजावट करण्यासाठी वाटेल ते खोटेनाटे लिहिण्यात काही पाप वाटत नाही. अंक खपविण्यापलीकडे दुसरा हेतू नाही. दरेक वर्तमानपत्राच्या खोट्या बातम्यांचा इन्कार करू लागलो तर आयुष्यात दुसरं काहीच करता येणार नाही. माझा आरोप सर्व मराठी वृत्तपत्रांवर आहे. उडदामाजी काळे गोरे काय निवडावे अशी गत आहे.’

बाबासाहेब आंबेडकरांनी ५५ वर्षांपूर्वी सर्व मराठी वृत्तपत्रांबाबत दिलेला अभिप्राय त्या काळातल्या मराठी पत्रकारांना अतिशयोक्तीचा नमुना वाटला तरी या टीकेबद्दल बाबासाहेबांना धारेवर धरण्याचं धाडस त्यांनी दाखवलेले आढळले नाही. सार्वजनिक जीवनात जी माणसं सतत प्रकाशझोतात वावरत असतात, विशेषतः ज्यांच्या हाती राजकीय सत्ता असते, त्या सर्वांच्या वाट्याला असे अनुभव आजही येत असतात. 

सत्ताधीशांच्या राजकारणात जे सहभागी होत नाहीत त्या कुटुंबीयांनाही पत्रकारांच्या टीकेची झळ सोसावी लागते. आपल्या घरातला कोणी कर्तृत्ववान व्यक्ति अधिकारपद भूषवीत असेल किंवा अधिकाररूढ व्यक्तींना वाकावयास लावीत असेल तर त्याचा लाभ जसा कुटुंबीयांना उठवता येतो. तसंच त्यांच्या बऱ्यावाईट कृर्त्यांमुळे होणारी हानीही पत्करावी लागते.

हेही वाचा : 

किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?

तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच?

प्रा. यशवंत सुमंत: कृतिशील समन्वयी विचारवंत

नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

रोहित, आज आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे! एका कार्यकर्त्याचं पत्र

बाबासाहेबांनी पहिला मोर्चा दलितांसाठी नाही तर शेतकर्‍यांसाठी काढला