दिवाळी म्हणजे धम्माल, फटाके, नवे कपडे, गिफ्ट आणि फराळ. फराळ आपण कधीच विसरत नाही. वर्षभर दिवाळी फराळातले पदार्थ मिळत असले तरी आपण दिवाळीत हे पदार्थ खायला खूप उत्सुक असतो. आणि दिवाळीत आपसुकच एखाद-दुसरा लाडू किंवा चकली जास्त खाल्ली जाते. पण आता आपल्या फराळात केक, कुकी, चॉकलेटपासून बऱ्याच गोष्टी सामील झाल्यात.
बम्पर ऑफर, फेस्टिवल ऑफर, दिवाळी सेल असे शब्द आपल्या कानी पडत असतील किंवा येता जाता दुकानांवर पाट्या दिसत असतील. दिवाळी म्हणजे धंद्याचा काळ. दिवाळीत सगळ्यात जास्त पैशांची उलाढाल होते. त्यामुळे हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. पण दिवाळी इवेंटच्या पलिकडे आपली अशी एक खास दिवाळी असते. जिथे आपण आपल्या कुटुंबाबरोबर एकत्र येतो. आनंद साजरा करतो. आणि या आनंदात सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो फराळाचा.
फराळातले पदार्थ आता वर्षभर मिळतात. तरी दिवाळीत फराळाचा आनंद काही वेगळाच असतो. पारंपरिक फराळत कितीतरी बदल झालेत. फराळच कशाला आपल्या लहानपणीच्या दिवाळीत आताच्या दिवाळीत खूप बदल झालाय. नक्कीच पूर्वीची दिवाळी याहून वेगळी असेल. आपले आजी आजोबा आपल्याला दिवाळीची गोष्ट सांगायचे. पण मोठं झाल्यावर लक्षात आलं की सणामागच्या दोन गोष्टी आहेत. ज्या त्या त्या भागात वेगवेगळ्या सांगितल्या जातात. कुठे रामाची तर कुठे कृष्णाची.
आपल्या पद्म आणि स्कंद पुराणांमधे दिवाळीसारख्या सणाचा उल्लेख आहे. संस्कृत अभ्यासकांच्यामते ती त्या काळातली दिवाळीच आहे. तर उत्तर भारतातले राजा हर्षवर्धन यांनी आपल्या पुरुष्यवर्धन राज्यात दिवाळी सणाला प्रोत्साहन दिलं. म्हणूनच ६ व्या शतकात उत्तर भारतात दिवाळी सण मोठ्या प्रमाणात साजरा होत होता. आणि त्या राज्यात परदेशी व्यापारासाठी, धर्मप्रसारासाठी, शिक्षणासाठी येत. त्यातल्या ग्रीक, इटालियन व्यापाऱ्यांनी आणि इतर काहींनी त्यांच्या डायरीत भारतातल्या दिवाळी सणाचं वर्णन केलं.
हेही वाचा: शनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट
मुस्लिम राजवट आल्यानंतर दिवाळी सणावर बंदी आली. काही मुस्लिम राजांनी मात्र दिवाळी करण्याची मुभा दिली. आपल्याला राजा अकबर या सणात सामीलही व्हायचे ही गोष्ट तर माहितीय. गंमत म्हणजे भारतात उत्तरेत जे होतं ते दक्षिणेत होतच असं नाही. पण याला फक्त दिवाळीच अपवाद आहे. कारण दिवाळी संपूर्ण देशात साजरी होते.
मध्यप्रदेश, कर्नाटक, केरळ या ठिकाणी आर्कियोलॉजिकल साईटवर सापडलेल्या शीलालेखांवर दिवाळीचा उल्लेख आहे. दिपोत्सवम असा संस्कृत शब्द लिहिलाय ही सगळी माहिती बेकी लिटल यांनी लिहिली आहे. ही माहिती हिस्ट्री टीवीवर २०१७ मधे दाखवण्यात आली. ज्याचा काही लिखित भाग त्यांच्या वेबासईटवरही उपलब्ध आहे. बेकी लिटल या वॉशिंग्टन डीसी या अमेरिकेच्या वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करतात. तसंच त्या डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री या टीवी वाहिन्यांसाठी आणि नॅशनल रिपब्लिक रेडिओसाठी संशोधनपर लेखन करतात.
दिवाळीचं महत्त्व एवढं आहे की ते आपल्याला टीवीवरच्या मालिकांमधे, सिनेमांमधेही दिसतं. आणि दिवाळीत गाण्यांच्या वाहिन्यांवर दिवाळीची गाणी हमखास लागतात. आपल्याला काही गाणी आठवत असतील. आली माझ्या घरी ही दिवाळी, आली दिवाळी आली दिवाळी, सोनियाच्या ताटी, आली दिवाळी मंगलदायी, ओवाळिते भाऊराया अशी भरपूर दिवाळीवरची गाणी आहेत. आणि दिवाळीवरची गाणी प्रत्येक भाषेत बनली आहेत.
दिवाळीवरच्या कविता, गाणी हे काही गेल्या २०-२५ वर्षात बनलेली नाहीत. तर ७ व्या शतकात गुजरातमधले संस्कृत कवी नागानंदा यांनी दिवाळीवर कविता लिहिली. ९ व्या शतकारत राजसशेखरा या संस्कृत कवींनी दिपावली आणि दिपमालिका असे शब्द दिवाळीसाठी वापरून कविता रचल्या, अशी माहिती अमेरिकेतल्या डॉट डॅश कंपनीच्या लर्न रिलिजन या ईस्ट एशियन वेबसाईटवर लिहिलीय.
दिवाळीला आणखीही वेगवेगळी नावं असू शकतात. पण बऱ्याचशा शब्दांचा अर्थ दिव्यांची रांग असाच होतो. त्यामुळे दिवाळीत प्रकाशाला महत्त्व आहे. पण हा कोणताही सण, उत्सव, आनंद हा खाद्यपदार्थांशिवाय अपूर्णच. म्हणूनच आपल्याला फराळाची खूप उत्सुकता असते.
हेही वाचा: भारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय?
दिवाळीच्या १०-१५ दिवस आधीपासून फराळ करायला सुरवात होते. लाडू, चकली, चिवडा, करंजी हे बेसिक पदार्थ सगळीकडेच केले जातात. आपल्याला आपल्या आजी किंवा पणजीच्या काळातले दिवाळीतले पदार्थ तितकेसे काही माहिती नाही. पण त्यातल्या काही मागे पडलेल्या, आताच्या फराळ्याच्या ताटातून हरवलेल्या काही पदार्थांची माहिती इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वर्तमानपत्राने २०१५ च्या दिवाळी अंकात दिली होती. बोरं, ढेबऱ्या, कडबोळी, खापुऱ्या, सांजोऱ्या, चणपापडी, अनारसे, शेंगोळ्या इत्यादी.
बोरं हा कोकणातला पदार्थ. जो तांदळाचं पीठ आणि गुळापासून बनतो. अनारसे बाजारात सर्रास मिळतात. पण घरी बनवले जात नाहीत. हाही कोकणातला पण पश्चिम महाराष्ट्रातही फेमस झालेला पदार्थ. तर ढेबऱ्या हासुद्धा कोकणातला पदार्थ. ढेबऱ्यांना गोड पुऱ्या असंही म्हणता येईल. पण ढेबरं नावाचा आणखी कोकणाला पदार्थ म्हणजे ज्याला आपण भारतीय पारंपरिक केकही म्हणू शकतो. पण दिवाळीत पुऱ्याच बनवल्या जात होत्या.
खपुऱ्या हा पश्चिम महाराष्ट्रातला पदार्थ. जो बाजरी आणि गुळापासून बनतो. मराठवाड्यातला चणपापडी हा पदार्थ हा गोड पदार्थ नाही. हा चण्याच्या डाळीपासून पापडीसारखा पदार्थ बनवतात. कडबोळी हा पदार्थ बेगळावमधला. आपल्या भाजाणीच्या चकलीत तांदुळ मुख्य पदार्थ आणि मग इतर डाळी. तसं कडबोळीत नाचणी मुख्य पदार्थ आणि मग त्यात १८ वेगवेगळ्या डाळी घालून कडबोळी बनते.
कदाचित आणखी बरेचसे पदार्थ असतील जे आपल्याला माहिती नाहीत. हा सण तर अख्या देशात साजरा होतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणचे कितीतरी पदार्थ असतील. तमिळनाडूमधे मारुंथु बनतं. म्हणजे ड्रायफ्रुट, मध, गूळ, तीळ, खसखस यांचा एक चक्का असतो. तसंच थेंकुझल हासुद्धा पदार्थ तिथे बनतो. ही एका प्रकारची शेवच असते. तसंच तिथले चेट्टीनाड समाजातले लोक चणाडाळ आणि गुळापासून उक्काराई बनवत. तिपी गव्वाळु हा पदार्थ तेलंगणा, आंध्रप्रदेशमधे बनतो.
दिल्ली, आग्रा, अलिगड भागात खिल बत्ताशे बनत. जे तांदळापासून तयार होत. गुजरातमधे बेसनापासून बनवलेलं मोहनथाळ बनवत. तसंच चोलाफळी हा तिखट पदार्थही बनवत. मध्यप्रदेशात चारोळ्यांची बर्फी बनवत. गुलगुले हा पदार्थ उत्तर भारत, महाराष्ट्रात बनवला जातो. तसंच मुस्लिम समाजातही ईदला हा पदार्थ काही जणांच्या घरी बनतो. उत्तराखंडमधे रवा, केळ, दूध घालून सिंगल बनवत. ओरिसामधे रसबाली नावाचा रसमलाईसारखा पदार्थ बनवत, ही माहिती फूड डिझायनर मुग्धा पाठक यांनी कोलाजला दिली.
महाराष्ट्र आणि देशातल्या इतर भागातले हे दिवाळतले पदार्थ तसे पारंपरिक आहेत. आताच्या फास्ट लाईफमधे हे पदार्थ बनवायला वेळही नसतो. काही ठिकाणी बनवतात. नाहीतर विकतही मिळतात. पण एक मात्र नक्की की आपलं फराळाचं ताट खूप मोठ आहे.
हेही वाचा: तिची कविता, कवितेतली ती
आपल्या देशात खूपसे कॉमन पदार्थही बनवतात. मात्र त्यांना वेगवेगळी नावं आहेत. जसं की करंजीला कानोले, कानवले, गुजिया, शिंगोळे म्हणतात. आणि यातलं सारणही प्रदेशा प्रदेशानुसार बदलत जातं. कोण रवा, कोण सुकं खोबरं, ओलं खोबरं तर कुणी चण्याची डाळ, खवा घालतात. तसंच चिवडाही. तो वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवतात कुरमुरे, पोहे, डाळी इत्यादी. शंकरपाळ्यासुद्धा. शक्करपारे ज्या गोड आणि तिखट सगळीकडे बनतात.
लाडू हा असा पदार्थ आहे जो संपूर्ण देशातल्या प्रत्येक गावात बनतो. लाडू आणि खीरीला आपण आपलं राष्ट्रीय गोड पदार्थ म्हणू शकतो. लाडू हा प्राचीन काळापासून बनवला जातो. ज्याचा उल्लेख पुराण कथांपासून, आयुर्वेदातही आहे. ज्याचा वापर पूर्वी औषध म्हणून व्हायचा. १७१५ पासून तिरुपती मदिरात लाडू बनतोय. म्हणजे जवळपास ३०० वर्षांपासून. आणि गंम्मत म्हणजे फराळाची सुरवातही आपण लाडू बनवूनच करतो.
आपण आता कॉस्मो कल्चरमधे राहतो. त्यामुळे आपल्या फराळातले पदार्थही बदललेत. गेल्या २० वर्षात आपण नानकटाई, कुकीज, कप केक, मठरी, चपट्य़ा पुऱ्या किंवा पापडी, शेव, लवंग लतिका, चिरोटे वैगरे बनवू लागलो.
आता गेल्या चार, पाच वर्षात इतके बदल झालेत की घरात फराळ करणंच दुर्मिळ झालंय. एखाद दोन पदार्थ बनवून बाकीचा फराळ ऑर्डर केला जातो. किंवा तयार थेट विकत घेतला जातो. तसंच हल्ली फराळचं ताट किंवा डबा पाठवण्यापेक्षा आपण गिफ्ट पाठवतो. त्यामुळे फराळाची जागा आता नव्या गिफ्ट हॅम्पर पॅकने घेतलीय.
मिठायांचे बॉक्स. मग त्यात लाडू, सोनपापडी, माव्याच्या बर्फ्या, ड्रायफ्रूटच्या बर्फ्या, फ्रूट बर्फ्या इत्यादी. तसंच कॅन्ड रसगुल्ला, गुलाबजाम, फ्रूट्स, ज्युसेस इत्यादी. तसंच हल्ली बिस्कीटं, केक, ड्रायफ्रूटचे बॉक्सेस दिले जातात. आणि सगळ्यात जास्त ट्रेण्डींग चॉकलेट आहे. कॉर्पोरेट गिफ्टपासून नातेवाईकांना गिफ्ट म्हणून आणि भाऊबीजेच्या गिफ्टमधे. तसंच इतर सर्वच सणांमधे चॉकलेटने आपली जागा पक्की केलीय.
हेही वाचा:
हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव