इंटरनेटवर ‘चॅटजीपीटी’ या नव्या एआय रोबोटची जोरात चर्चा होताना दिसतेय. एखादा इमेल लिहणं असो किंवा कविता रचणं असो, हा पठ्ठ्या काही क्षणांत आपल्याला हवं ते बनवून देतोय. सध्या प्रायोगिक तत्त्वावर नेटकऱ्यांसाठी उपलब्ध असलेला हा रोबोट लवकरच सुधारित स्वरुपात बाजारात येईल. त्याचं हे स्वरूप मात्र गुगलसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
तुमच्या रुसलेल्या मैत्रिणीसाठी कविता बनवून हवीय? जुजबी माहितीवर लेख बनवून हवाय? एखाद्या आजारावरची माहिती हवीय? कुठलंही काम असो, गुगलबाबाला विचारलं की तो आपल्याला हव्या असलेल्या वेबसाईटची यादीच आपल्यासमोर सादर करतो. हे असं आयतं हातात मिळालं की आनंद होतोच, पण तो टिकतो किती?
कारण गुगलने एक काम सोपं करायच्या नादात दुसरं काम वाढवून ठेवलेलं असतं. ते म्हणजे एवढ्या लांबलचक यादीमधून आपल्याला हवी असलेली वेबसाईट शोधणं. मग त्यातही काम मनासारखं झालं नाही, तर पुन्हा ती यादी उकरत बसावी लागते, ते वेगळंच! पण या सगळ्या कटकटीतून वाचवणारा ‘चॅटजीपीटी’ नावाचा नवा एआय रोबोट सध्या इंटरनेटवर आलाय.
हेही वाचा: सोशल मीडियाच्या फोडणीसाठी अॅक्सिडेंटलचा मसाला
नुकताच ट्विटरचा सीईओ बनलेल्या इलॉन मस्कने २०१५मधे सॅम आल्टमन या आपल्या प्रोग्रामर मित्रासोबत मिळून ‘ओपनएआय’ या कंपनीची स्थापना केली. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवीन संशोधन करणं, उपयुक्त साधनांची निर्मिती करणं, ती साधने सर्वसामान्यांना संशोधन आणि पेटंट स्वरुपात उपलब्ध करून देणं हा या कंपनीच्या निर्मितीमागचा उद्देश होता.
फेब्रुवारी २०१८मधे इलॉन मस्कने तात्विक मतभेदाचं कारण देत ही कंपनी सोडली. त्यानंतर अवघ्या चारच महिन्यांमधे ओपनएआयने जनरेटीव प्रि-ट्रेण्ड ट्रान्सफॉर्मर म्हणजेच ‘जीपीटी’ हे तंत्रज्ञान सर्वांसमोर मांडलं. वापरकर्त्यांकडून मिळालेल्या मजकूर स्वरूपातल्या माहितीनुसार त्यांना मजकूर स्वरूपातली सेवा पुरवण्याचं प्रशिक्षण ‘जीपीटी’ रोबोटला दिलं जातं. आजवर या ‘जीपीटी’च्या तीन आवृत्त्या आल्या आहेत.
‘चॅटजीपीटी’ ही त्यातली सुधारित आवृत्ती मानली जाते. ओपनएआयमधल्या संशोधकांनी बनवलेला हा ‘जीपीटी’ ३० नोव्हेंबर २०२२ला रिलीज केला गेला. ‘चॅटजीपीटी’ हा एक चॅटबॉट आहे. चॅटबॉटचा अर्थ होतो आपल्याशी चॅट करणारा म्हणजेच गप्पा मारणारा रोबोट. या गप्पा बहुतांशी प्रश्नोत्तर स्वरूपाच्या असतात. यात आपण पुरवलेल्या माहितीच्या आधारे ‘चॅटजीपीटी’ आपल्याला प्रतिसाद देतो.
या आगळ्यावेगळ्या रोबोटशी बोलण्याआधी तुम्हाला आधी एक ओपनएआय अकाऊंट बनवावं लागेल. तुमचं नाव, मोबाईल नंबर अशी जुजबी माहिती दिल्यावर तुमच्यासमोर रोबोटचं वेबपेज येईल. त्याचक्षणी स्क्रीनवर उमटणारी सूचना तुम्हाला ‘चॅटजीपीटी’च्या कार्यपद्धतीबद्दल सांगते. त्यानुसार ‘चॅटजीपीटी’ एक भावनाविरहीत रोबोट असून, त्याने दिलेल्या उत्तरांचा वैयक्तिक आयुष्याशी संबंध जोडू नये, अशी सूचना प्रश्नकर्त्याला केली जाते.
‘चॅटजीपीटी’ला बाजारात आणण्यापूर्वी ओपनएआयने ‘इंस्ट्रक्टजीपीटी’ हा एक चॅटबॉट नेटकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला होता. याचंही काम ‘चॅटजीपीटी’सारखंच होतं. पण तो न चालण्यामागचं कारण होतं त्याची विश्वासार्हता. आपण इंस्ट्रक्टजीपीटीला ‘कोलंबस २०१५मधे अमेरिकेत आला’ असं सांगितलं तर त्याला ते खरंच वाटायचं! तो त्यावर आधारित माहिती प्रश्नकर्त्याला पुरवायचा. ‘चॅटजीपीटी’ मात्र याबद्दल सारासार विचार करून उत्तर देतो.
अर्थात ‘चॅटजीपीटी’ने दिलेली सगळी उत्तरे बरोबरच असतील असं नाही, पण त्या उत्तरांची विश्वासार्हता आधीच्या चॅटबॉटपेक्षा अधिक असल्याने नेटकऱ्यांनी ‘चॅटजीपीटी’च्या परड्यात झुकतं माप टाकलंय. तो तुम्हाला एखादा विनोद सांगू शकतो, कविता करून देऊ शकतो, मेल लिहून देऊ शकतो, भेटवस्तूंसाठी आयडिया सुचवू शकतो आणि अगदी फ्लर्ट कसं करावं याचेही धडे देऊ शकतो!
हेही वाचा: आयट्यून बंद झालं, आता आपल्याला हे ३ पर्याय मिळणार
रजनीकांतच्या ‘एन्दीरन्’ म्हणजेच ‘रोबोट’ सिनेमात चिट्टी नावाचा एक रोबोट असतो. सिनेमाच्या सुरवातीला त्या रोबोटला वेगवेगळ्या विषयांशी संबंधित हार्ड डिस्कमधून माहिती पुरवली जाते, असा एक प्रसंग आहे. हा रोबोट सांगितलेली सगळी कामे करतो. पण तो भावनाशून्य असल्याने त्याला काही मर्यादा असतात. ‘चॅटजीपीटी’चंही प्रकरण काहीसं असंच आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारल्यावर ‘चॅटजीपीटी’ एक यंत्र असल्याची असल्याची पूर्वसूचना आपल्याला मिळते. तरीही तो आपल्याला आपल्या प्रश्नानुसार काही उत्तरं पुरवतोच. आपण आधी काय विचारलंय, हे त्याच्या लक्षात असतं आणि त्यानुसार त्याच्या उत्तरात बदल होतो. त्यामुळे भविष्यात ‘चॅटजीपीटी’ हा एखाद्या वैयक्तिक थेरपिस्टसारखं काम करू शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे.
पण ही भविष्यातली शक्यता आहे. सध्याचा ‘चॅटजीपीटी’ आपल्याला बरोबर, निःपक्षपाती माहिती पुरवेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे त्याने दिलेली सगळी उत्तरं ही वैद्यकीय सल्ल्याच्या दृष्टीकोनातून पाहणे योग्य ठरत नाही. सध्या फुकट असल्यामुळे ‘चॅटजीपीटी’चा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय, पण भविष्यात त्याचं सुधारित स्वरूप नेटकऱ्यांना विकत घेऊन वापरता येईल, असं आश्वासन ओपनएआयने दिलंय.
जे प्रश्न आपण गुगलला विचारतोय, तेच प्रश्न आपण ‘चॅटजीपीटी’ला विचारू शकतो. अर्थात एखाद्या समुदायाचा अपमान होईल असा संवाद घडू नये, यासाठी ओपनएआयने अनेक चाळण्या लावलेल्या आहेत, तशा गुगलने लावलेल्या नाहीत. त्यामुळे माहिती मिळवण्याच्या दृष्टीने गुगल उत्तम पर्याय वाटत असला; तरी माहितीची देवाणघेवाण अधिक संवेदनशील असावी, यादृष्टीने ‘चॅटजीपीटी’ आणि ओपनएआयने उचललेलं हे पाऊल अधिक महत्त्वाचं ठरतं.
खरंतर, गुगलकडेही स्वतःचा ‘लॅम्डा’ नावाचा एक चॅटबॉट आहे. तो तांत्रिकदृष्ट्या ‘चॅटजीपीटी’पेक्षा वरचढ असल्याचंही बोललं जातं. पण हे चॅटबॉट चुकीची उत्तरेही मोठ्या गर्वाने देतात आणि त्यामुळे प्रश्नकर्त्यांचं नुकसान होऊ शकतं, असं गुगलचं म्हणणं आहे. परिणामी गुगलच्याही विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं जाऊ शकतं आणि ते कंपनीसाठी व्यावसायिक दृष्टीने धोक्याचं आहे.
त्यामुळेच ‘लॅम्डा’ची तांत्रिक गुणवत्ता ‘चॅटजीपीटी’पेक्षा चांगली असूनही, ‘हाजीर तो वजीर’ या न्यायाने ‘चॅटजीपीटी’ भाव खातंय. मुळात ‘चॅटजीपीटी’ला होत असलेला बहुतांश माहितीचा पुरवठा इंटरनेट आणि पर्यायाने गुगलकडूनच होतोय, पण गुगलच्या कचखाऊ वृत्तीचा फायदा ‘चॅटजीपीटी’ने उचललाय हे खरं! ‘चॅटजीपीटी’च्या वाढत्या प्रभावाला गुगल आव्हान समजून कच खाणार की संधी समजून ‘लॅम्डा’ला बाजारात आणणार, याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागून राहील.
हेही वाचा: