पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण नेमकं आहे कसं?

०८ जुलै २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात.

गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या भारत चीन यांच्यामधल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर ३ जुलैला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग लडाखचा दौरा करणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हा दौरा रद्द झाल्याच्या बातम्या आल्या. इतका महत्त्वाचा दौरा अचानक रद्द कसा केला, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. पण ३ जुलैला राजनाथ सिंग यांच्याऐवजी प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीच सैनिकांची भेट घेण्यासाठी लेहच्या निमू या भागात पोचल्यावर याचं उत्तर सगळ्यांनाच मिळालं.

चीनसोबत झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर अनेक जवान जखमी अवस्थेत हॉस्पिटलमधे उपचार घेत होते. या जवानांच्या शौर्याचं कौतूक करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी नरेंद्र मोदी लडाखमधे गेले. यावेळी पंतप्रधानांसोबत मुख्य संरक्षण सचिव बिपीन रावत आणि लष्करप्रमुख मुकूंद नरवणेही होते.

निमूमधेच पंतप्रधानांनी देशाला आणि जवानांना संबोधून धडाकेबाज भाषण केलं. हे युग विस्तारवादाचं नसून विकासवादाचं आहे, असं म्हणत आडवाटेनं चीनला इशाराही दिला. मोदींच्या या भाषणाची आणि हे ऐतिहासिक भाषण दिलं त्या निमू या ठिकाणाची बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगली. पंतप्रधानांनी निमू हे ठिकाणच का निवडलं याविषयीही बोललं जाऊ लागलं.

हेही वाचा : जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

कारगिल युद्धातली महत्त्वाची जागा

भारतीय इतिहासाचा अविभाज्य भाग असलेल्या सिंधू नदीच्या काठावर हे निमू गाव वसलेलं आहे. इथून काही किलोमीटरवरच सिंधू नदीला दोन फाटे फुटतात. त्यातला एक वायव्येला पाकिस्तानच्या दिशेने जातो. तर दुसरा फाटा म्हणजेच झंस्कार ही सिंधूची उपनदी खालच्या बाजुने पश्चिमेकडे सरकते. निमू परिसरात भारतीय लष्कराच्या ब्रिगेड हेडक्वार्टरसोबतच १४ कोर्प्स, लदाख स्काउट्स अशा काही सैन्य रेजिमेंटचे बटालियन हेडक्वार्टरही आहेत.

लडाख या केंद्रशासित प्रदेशाची लेह ही राजधानी. हे राजधानीचं शहर म्हणजे लडाखमधलं सगळ्यात मोठं शहर. या लेह जिल्ह्यातल्या लिकिर तालुक्यात निमू आहे. लेह शहरापासून फक्त ३५ किलोमीटर लांब. अक्साई चीन आणि पाकव्याप्त काश्मीर इथून सारख्या अंतरावर असल्याने या जागेला युद्धाच्या दृष्टीने महत्त्व आहे. लेहकडून कारगिलला जाताना रस्त्यातच हे ठिकाण लागतं. या जागेवरून कारगिलच्या रस्त्यावर कडक पाळत ठेवता येते. त्यामुळेच १९९९ च्या कारगिल युद्धातही निमूमधून खूप मदत पुरवली गेली होती. अचानक झालेल्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी निमूमधल्या हेडक्वार्टरमधूनच शस्त्रास्त्रं, सैनिक आणि इतर सामान पोचवण्यात आली होती. चीनसोबत १९६२चं युद्ध लढलं गेलं होतं त्या पेंगॉग लेक आणि चुशुल या दोन ठिकाणांवरही इथून व्यवस्थित लक्ष ठेवता येतं.

निमूच्या एका बाजुला नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी (लाईन ऑफ कंट्रोल) आहे. तर दुसऱ्या बाजुला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच एलएसी (लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) आहे. एलओसी म्हणजे भारत पाकिस्तान यांच्यात करारानंतर घातलेली रेषा तर एलएसी म्हणजे भारत आणि चीन यांच्यातल्या करारानंतर ठरलेली रेषा. निमूपासून गलवान खोऱ्यामधून जाणारी एलएसी तब्बल २५० किलोमीटर अंतरावर आहे. तर कारगीलमधून जाणारी एलओसी या ठिकाणावरून १८२ किलोमीटर लांब आहे. याचाच अर्थ असा की भारताच्या सीमांपासून तर निमू फारच लांब आहे. यामुळे पंतप्रधानांनी सीमेवर जाऊन जवानांची भेट घेतली हे वर्णन अतिशयोक्त मानायला हवं. इथं एक लक्षात घ्यायला हवं की एलओसी आणि एलएसी म्हणजे भारताच्या सीमा नाहीत. तर भारताच्या सीमेच्या आतमधे चीन आणि पाकिस्तानने काबीज केलेले भाग आहेत.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

चहा सामोस्याचा आनंद

समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंच असलेलं निमू खरंतर एक सुरक्षित पर्यटन स्थळ आहे. निमू जवळच असणारं बाझ्गो, लिकिर इट इल्ची हा बौद्ध मठ, इथल्या फळबागा आणि सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम पहायला अनेक पर्यटक येतात. तसंच, सिंधू आणि झंस्कार नदीमधे राफ्टिंग म्हणजे खळाळत्या नदीमधे बोटींची शर्यतही लागते. हा तिथला प्रसिद्ध क्रीडाप्रकार आहे. इथं अशी एक वार्षिक शर्यतही भरते. 

निमूमधे चहा सामोसा आणि छोले पुरी हे दोन पदार्थ खूप छान मिळतात. उन्हाळ्यात या जागेचं तापमान ४० डिग्रीपर्यंत असतं. तर थंडीत अगदी -२९ डिग्रीपर्यंतही जातं. मात्र, जून ते सप्टेंबर या महिन्यात इथलं वातावरण सगळ्यात छान असतं. या निमूपासून ८ किलोमीटर दूर मॅग्नेटिक डोंगर पाहण्यासाठीही अनेकदा पर्यटक येतात.

हेही वाचा : छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?

सिंधू दर्शन पुजेची गर्दी

लेहमधेच दरवर्षी गुरूपोर्णिमेला सिंधू दर्शन महोत्सवही साजरा केला जातो. लालकृष्ण आडवाणी यांनीच १९९७मधे हा महोत्सव सुरू केला होता. या महोत्सवाची उत्सुकता भारतीय पर्यटकांसोबत परदेशी पर्यटकांमधेही असते. हा महोत्सव तीन दिवस चालतो. भारताच्या वेगवेगळ्या भागातून या महोत्सवासाठी येणारे पर्यटक त्यांच्या जवळच्या नदीच्या पाण्याने एक कलश भरून आणतात आणि सिंधू नदीला अर्पण करतात. ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम, हिंदू अशा सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन हा महोत्सव साजरा करतात.

या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे हा महोत्सव साजरा केला गेला नाही. मात्र, पंतप्रधानांनी निमू भेटीत सिंधू दर्शन पूजा पार पाडली. नदीला नारळ आणि कलश वाहून त्यांनी धार्मिक मंत्र पुटपुटत सिंधू नदीची प्रार्थनाही केली. सिंधू नदी आणि त्याआसपासचा सगळा परिसर ही भारताची भूमी आहे, भारताला हिंदूस्थान किंवा इंडिया हे नावच सिंधू नदीवरून पडलंय हे जणू मोदींना या पूजेच्या माध्यमातून दाखवून द्यायचं होतं.

खरंतर, निमूमधे मोदी यापूर्वीही एकदा गेले आहेत. इथल्या आलची गावात सिंधू नदीवर बांधण्यात आलेल्या निमू बाजगो जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन २०१४ मधे पंतप्रधान मोदींच्या हस्तेच करण्यात आलं होतं. त्यावेळी स्थानिकांचा पारंपरिक पेहराव करून मोदींनी देशाला संबोधून भाषणही दिलं होतं. मोदींनी भारतीय सैनिकांना धीर देण्यासाठी निमूला भेट दिल्यामुळे सोशल मीडियावर मोदींच्या आणि निमूच्या या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.

हेही वाचा : 

चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे

वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?

ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?

लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज