पुरूषी वर्चस्व टिकवण्यासाठीच वापरलं जातं बायकांवरच्या विनोदाचं हत्यार 

०४ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


गेल्या कित्येक दिवसांपासून आपण घरात बंद आहोत. लॉकडाऊनपासून अनेकांना मोकळा वेळ मिळालाय. अशातच सोशल मीडियावर बायकांवरच्या विनोदांना उधाण आलं. हे जोक म्हणजे लॉकडाऊनमधल्या डिप्रेशनवरचा उपाय असल्याचं पुरूष मंडळी सांगतात. डिप्रेशन घालवण्यासाठी बायकांवरच्याच जोकची गरज का पडते? 

लॉकडाऊननंतर आता आपण सगळे या ‘न्यू नॉर्मल’ सोबत अॅडजस्ट करायला लागलो आहोत. अर्थात त्यासाठी प्रत्येकाची आपापली वेगळी पद्धत असणार. मी अनेकदा इंस्टाग्रामवर मांजरीचे वीडिओ पाहते, सिनेमे बघते, थोडं फार वाचते, आणि भरपूर झोपा काढते. सध्या वातावरणच असं उदास झालंय की फार प्रॉडक्टीव असावंसं वाटतच नाहीये. त्यात मीडियाचं भयंकर म्युझिकसोबत बातम्या देऊन घाबरवणं, नेत्यांचं घाणेरडं राजकारण, रस्त्यावरून चालत निघालेली कष्टकरी माणसं अशा गोष्टी पाहून अजूनच भयाण वाटतं!

त्यामुळे कित्येक लोक बराचवेळ सोशल मीडियावर पडीक असतात. कधी जुनेपुराणे फोटो पोस्ट करणं, रेसिपी शेअर करणं, मीम बनवणं किंवा वॉट्सऍपवर जोक फॉरवर्ड करणं असे उद्योग करून त्यातल्या त्यात सुख शोधत असतात. एकीकडे आपापलं वैयक्तिक आयुष्य सुखाचं करायचं प्रयत्न करत असताना त्याच कारणाने दुसऱ्याला त्रास होऊ नये अशी काळजी देखील घ्यायला पाहिजे. कारण आपल्याला सगळ्यांनाच अशा वेळी एकमेकांकडून सहानुभूती आणि सपोर्ट मिळण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने असा सपोर्ट सगळ्यांना मिळत नाहीये असं म्हणावं लागतंय!

घरी ‘अडकलेल्या’ जोडप्यांचं गाऱ्हाणं

कारण लॉकडाउनमधल्या डिप्रेशनवर उपाय म्हणून सोशल मीडियावर बायकांना टार्गेट करणारे जोक्स आणि मीम बनवायची चढाओढ सुरू आहे. इंटरनेटवर चक्क ‘हसबंड वेलफेअर असोसिएशन’ अशी कम्युनिटी तयार झाली आहे. या आणि अशाच इतर ग्रुप्सच्या फेसबुक पेजवर या अशा विनोदांचे भरभरून पीक निघत असते. बायकांच्या वागणुकीवर, अकलेवर, आवडीनिवडीवर विनोद करणं ही काही आजच नव्याने घडत असलेली घटना नाहीये. तरीही लॉकडाऊनमुळे बायकांचे शारीरिक-मानसिक कष्ट दुप्पट झालेले असताना आणि जगभरात कौटुंबिक हिंसाचार मोठ्या प्रमाणावर वाढलेला असतानाच बायकांना तुच्छ लेखणारे विनोद करणं मला जास्तच क्रूरपणाचं वाटतं.

एका वीडियोमधे एक सरदारजी आनंदाने धमाल नाचत सुटलाय आणि त्याचं कारण लिहिलंय की त्याच्या बायकोला क्वारंटाईन केलंय. दुसऱ्या एका विनोदात नवरा म्हणतो ' माझी बायको सध्या मेकप करत नसल्यामुळे मला ती ओळखू येत नाहीये!’ आणखी एका विनोदात तर नवरा देवाकडे प्रार्थना करतोय की –‘देवा माझ्या बायकोला लवकर तुझ्याकडे बोलवून घे.’

लॉकडाउनमधे घरी ‘अडकलेल्या’ जोडप्यांच्या विषयीचे भरपूर विनोद दिसून येत आहेत. यात नेहमीप्रमाणे बायकोला कंटाळलेला बिचारा नवरा आणि त्याचा छळ करणारी बायको अशी जोडी हमखास दिसते आहे. गेले दोन महिने नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय बायका घरून आठ तास ऑफिसचं काम करून शिवाय घरातली कामं करताहेत. नवऱ्यांना 'ब्रेक' मिळालाय, मुलांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे त्यांची फर्माईश पुरी करायची कामंसुद्धा या बायकाच करतायत. 

घरातल्या वृद्ध माणसांची जास्त काळजी घ्यावी लागते आहे. नोकरी न करणाऱ्या बायकांना नवरा, मुलं घरी नसताना जी काही थोडीफार प्रायव्हसी मिळायची ती पण हरवलेली आहे. भरीतभर घरात बसून चिडलेले नवरे त्यांना जास्त मारहाण करतायत. तरीसुद्धा विनोदांमधे मात्र नवराच बिचारा आणि बायको दुष्ट असते, याचं मला नवल वाटतं!

हेही वाचा : मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याच्या निर्णयाचं आपण स्वागत करायला हवं?

मार खाऊन जाड झालेली बायको

आणखी एक कार्टून तर फारच चीड आणणारं होतं.  त्यात एक जाड्या बाईचं चित्र होतं आणि एक बारीक बाईचं चित्र होतं. जाड्या बाईच्या चित्रावर लिहिलं होतं 'कामवाल्या बाया लॉकडाऊननंतर अशा दिसायला लागतील.' तर बारीक बाईच्या चित्रावर लिहिलं होतं 'बायको लॉकडाऊननंतर कधी नव्हे ती घरातली कामं केल्यामुळे अशी दिसायला लागेल' हे व्यंगचित्रं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. घरेलू कामगार बायका जरी कामावर जाऊ शकत नसल्या तरी त्यामुळे त्यांना ‘आराम’ मिळतोय हा फारच मोठा गैरसमज आहे. उलट त्यांची उपासमारच जास्त होतेय.

त्या ज्यांच्या घरी काम करत होत्या तिथे त्यांना थोडंतरी खायला मिळत असे. आता लहानसहान कामधंदा करणाऱ्या नवऱ्याची कमाई थांबलेली आहे, बाईला स्वत:लाही पगार नाही. अशा परिस्थितीत त्यांना चिडचिड करणाऱ्या नवऱ्याचा मारच जास्तवेळा खावा लागतोय. एकुणातच जगात बायकांचा शारीरिक आणि मानसिक त्रास वाढलेला आहे. नेमकं तेव्हाच बायकांना हिणवणाऱ्या ताज्या विनोदांचं भरभरून पीक आलं आहे.

स्वतःच्या घरात मदत कशी?

विनोदांत थोडी अतिशयोक्ति असावी लागते, असं म्हणतात. पण या विनोदांमधे वास्तवातल्या परिस्थितीला पूर्णच उलटं करून मांडलं आहे! अशा तथाकथित विनोदांवर लोकांना हसायला येतं याचं वाईट वाटतं आणि या जोक्सपेक्षाही ते शेअर करणाऱ्या लोकांची स्पष्टीकरणं जास्त भयानक वाटतात. बरेच पुरुष म्हणतात 'लॉकडाऊनमधे डिप्रेशन कमी करण्यासाठी थोडी गंमत केली तर काय बिघडलं?' पण यांची गमतीची कल्पना नेमकी बायकांच्या कामाची खिल्ली उडवण्यापुरतीच का आहे?

या प्रश्नावर बरेच लोक नव्याने घरकाम करू लागलेल्या पुरुषांचे फोटो दाखवतात. पुरुषही घरकामात मदत करतात त्याचा पुरावा म्हणून हे फोटो कौतुकाने दाखवले जातात. मुळात स्वतःच्या घरात काम करण्याला ‘मदत’ का म्हणावं? आणि अशी 'मदत' करून हे पुरुष काय घरावर उपकार करतात का? अशा पुरुषांना मी – ‘कुकी मॅन’ म्हणते. ‘बघाबघा मी बायकोला किती मदत करतोय,’ असं म्हणत हे कुकीमॅन स्वतःवरच फुलं उधळून घेतात. प्रत्येक छोट्याशा कामासाठी त्यांना शाब्बासकीची कुकी हवी असते. वर्षानुवर्षे असंख्य बायका निमूटपणाने अशी अनेक कामं करत आहेत आणि त्याबद्दल त्यांना पैसे तर नाहीच पण चार कौतुकाचे शब्दसुद्धा मिळालेले नाहीत.

खरंतर लॉकडाऊनच्या निमित्ताने घरातल्या घरातही किती काम करावं लागतं  ते अनेक पुरुषांना जवळून पाहायला मिळत आहे. किमान त्यामुळे तरी वर्षानुवर्ष रटाळ घरकाम करणाऱ्या बायांबद्दल त्यांना कृतज्ञता वाटायला पाहिजे. पण झालंय उलटंच! इतके वर्ष बायका घरात नुसत्या लोळत पडलेल्या असतात असं म्हणणारे पुरुष अजूनही दिवसभर घरकामाच्या चक्रात अडकलेल्या बायकोवरच विनोद करताहेत. जे पुरुष आवडीने किंवा कर्तव्य म्हणून घरकामात मदत करतायत त्यांनाही ‘बिचारे’ ठरवलं जातंय किंवा तेही विनोदाचाच विषय ठरत आहेत.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

हे कशामुळे शक्य होतं?

एका जोकमधे एक बॉस म्हणतो ‘मी तुला फोन केला तेव्हा तुझी बायको म्हणाली तू भांडी घासतोयस. मग भांडी घासून झाल्यावर मला कॉलबॅक का नाही केलास?’ तर त्याला उत्तर मिळतं ‘मी फोन केला होतं सर, पण तेव्हा मॅडम म्हणाल्या की तुम्ही पोळ्या करताय!’ पुरुषांनी घरकाम करणं हे अजूनही लोकांना ‘विनोदी’  का वाटतं?

बायका कितीही शिकल्या, कितीही पैसे मिळवले आणि कितीही प्रेमात पडून लग्न केलं तरी घरकाम मात्र बायकांनीच करायचं असं त्यांच्या डोक्यात पक्कं ठरून गेलंय. घरकामाला पैशाच्या रूपात मोजता येत नाही म्हणून ते कमी प्रतीचं आणि हास्यास्पद ठरतं. पण पुरुष तर ‘महान’ आहेत.  ते घरासाठी पैसे कमावण्याचं काम करतात.  त्यांनी जर बिनपैशाचं घरकाम केलं तर त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार!

भारतातल्या बायका तर पुरुषांपेक्षा जवळजवळ सातपट जास्त घरकाम करतात अशी ऑग्रनायझेशन फॉर इकॉनॉमिक को ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजेच ओईसीडीची माहिती आहे. पण त्याबद्दल कधी त्यांच्यासाठी कोणी थाळ्या वाजवून, मेणबत्त्या लावून कौतुक केलं का? उलट त्यांच्या कामाला कायम फालतू ठरवलं गेलं. एकीकडे बायकांना शिक्षण, नोकरी अशा हक्कापासून वंचित ठेवायचं - त्यांच्यावर घरकाम लादायचं आणि दुसरीकडे त्याचसाठी त्यांच्यावर विनोद करायचे. 

हे कशामुळे शक्य होतं?  कारण पुरुषांच्या हातात भरपूर आर्थिक सत्ता आहे. त्यामुळे काय महत्त्वाचं आणि काय बिनमहत्त्वाचं ते ठरवायचा सांस्कृतिक अधिकारसुद्धा त्यांचाच! विनोद करणारी व्यक्ती आणि जिच्यावर विनोद होतो अशी व्यक्ती या दोन्हीमधे सामाजिक सत्तेचा फरक असतो. मस्करी करण्याची सत्ता पुरुषांकडे असते आणि बाईकडे नसते. म्हणून तर बहुतेक वेळा पुरुषच बायकांवर जोक करताना दिसतात.

लैंगिकतेचा मसाला वापरतायत?

विनोद करणारे जरी त्याकडे डिप्रेशन कमी करण्याचं साधन म्हणून बघत असले तरी अशा स्त्रीद्वेषी विनोदांचे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्याही मनावर खूप खोल परिणाम होतात. 'बाईने मुकाट्याने घर सांभाळायचं आणि पुरुषाने रुबाबात पैसे मिळवायचे' असले विचार अजुन पक्के होत जातात. बायकांनी अशा विनोदांना विरोध केला की बायकांना विनोदबुद्धी नाही असं म्हणून आणखी काही विनोद केले जातात. पण बायकांनी पुरुषांच्या वागण्यातल्या विसंगतीवर विनोद केले तर ते मात्र पुरुषांना खिलाडूपणे ऐकून घेता येत नाहीत. एवढंच नाही तर विनोद करणाऱ्या बायकांच्या चारित्र्यावर, बुद्धीवर आणि इंटेग्रिटीवरही अनेक पुरुष एकत्र येऊन टीकेची झोड उठवतात.

फेसबुकवर मराठी मिम माँक्स नावाचं एक पेज आहे. तिथे विविध विषयांवर मीम बनवण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकदा खास मुलींसाठी घेतलेल्या ‘मिमर पोरी’ नावाच्या स्पर्धेत अनेक मुलींनी पुरुषप्रधानतेवर सणसणीत मीम बनवली. क्रिकेट, राजकारण, मासिक पाळी, सेक्स, व्हर्जिनिटी, ऑर्गझम, अशा अनेक पैलूंचा त्यात समाचार घेतला होता. खरं म्हणजे या विनोदांवर हसून ते सोडून देणं सहज शक्य होतं. पण पुरुषांच्या इगोला बाऊ झाला!

या मुली स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी लैंगिकतेचा मसाला वापरतायत अशी टीका पुरुष करायला लागले. खासकरून चड्डी धुण्याविषयीचं एक मीम काही पुरुषांच्या अगदी जिव्हारी लागलं. त्याचा साधारण आशय असा होता की ‘फेमिनिझम चा फ माहित नसलेला दादा जेव्हा त्यावर लेक्चर देऊ लागतो तेव्हा मी म्हणते - तू तुझ्या आई किंवा बायकोकडून चड्ड्या धुवून घेणं बंद कर.’ 

हेही वाचा : चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषीपणाचा वायरस मारून टाकूया

पुरूषांमधे असुरक्षितता जास्त

या मिमवरून प्रचंड गदारोळ उडाला. त्यात आक्षेपार्ह भाषा नव्हती की उघडीवघडी चित्र नव्हती. पण यातलं वस्तुस्थितीचं प्रतिबिंब पाहूनच अनेक पुरुषांच्या असा वर्मी घाव बसला की काय सांगावं! मग ते लगेच या मुलींना ट्रोल करायला लागले ‘तुमचा स्त्रीवाद फक्त चड्ड्या धुण्यापूरताच मर्यादित आहे! तुम्ही बायकांनी पुरुषांना चड्ड्या धुवायला का नाही शिकवलं? इथल्या स्त्रीवादी बायका मूर्ख आहेत, त्यांना प्रश्नांची प्राथमिकता समजत नाही’ अशा कॉमेंट्स करून त्यांनी या मिमर मुलींना भरपूर मनस्ताप दिला.

यात ‘लिंगाधारित श्रमविभाजन’ हा मुख्य मुद्दा दुर्लिक्षतच राहिला. शिवाय नेहमीप्रमाणे मुलींच्या चारित्र्यावर, जातीवर, पुरुषांशी असलेल्या नातेसंबंधावरही पोस्ट करण्यात आल्या. ही टीका मीम बनवणाऱ्या ठराविक मुलींच्या पुरतीच मर्यादित राहिली नाही. तर टीकेमधे ‘इथल्या स्त्रिया’ असे शब्द वारंवार येत राहिले. स्त्रीवादी चळवळीची आणि या मुलींच्या बाजूने उभं राहणाऱ्या स्त्रीवादी पुरुषांचीही खिल्ली उडवली गेली.

या घटनेतून माझ्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या आहेत. एक म्हणजे पुरुषांनाही विनोदबुद्धी कमीच असते! दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषी असुरक्षितता! मीम बनवणं हे नव्याने आकार घेणारं आणि भरपूर पोटेन्शियल असलेलं एक अगदी नवं करीयर आहे. जगभरात कितीतरी माणसं मीम बनवून आपलं पोट भरतात. पण बायका हेही काम करायला लागतील अशी शंका येऊन या पुरुषांना असुरक्षित वाटतंय. मला याबद्दल नवल नाही वाटत. पण मला जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे 'बायकांना त्यांचेच प्रश्न समजावून सांगायला लागतात.' असा पुरुषांचा तोरा!

बायकांना पुरुषांकडून काय त्रास होतात आणि त्यांनी आपल्या कुठल्या समस्येला कधी, किती महत्त्व द्यायचे हे पुरुष कसे काय ठरवू शकतात? हा तर सरळ सरळ स्त्रीवादी चळवळ हायजॅक करायचा प्रयत्न आहे. आपण बायकांच्या किती हक्कांवर पाय देऊन उभे आहोत हे पुरुषांच्या कधी लक्षात येणार? वर्षानुवर्षं पुरुषांनी विनोदाचं हत्यार वापरुन पितृसत्तेचा डोलारा टिकवून ठेवला होता. पण आता स्त्रियांनाही हे हत्यार वापरता यायला लागलं आहे आणि त्या पितृसत्ता उलथून टाकण्यासाठी हे हत्यार वापरायला कचरणार नाहीत!

हेही वाचा : 

कंदील बलुच : पाकिस्तानी महिलांची प्रेरणा

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?

क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका

पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कुळकथा

बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?

आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने

(लेखिका स्त्रीवाद रंगकर्मी आणि  फिल्ममेकर असून त्यांचा हा लेख पुन्हा स्त्री उवाचमधे प्रसिद्ध झाला आहे.)