ऑक्सिमीटरचं सुरक्षा कवच आपल्याभोवती गुंडाळून घ्यायला हवं

१४ जुलै २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


दिल्लीत घरी आयसोलेशनमधे राहणाऱ्या पेशंटचा मृत्यूदर कमी करण्यात ऑक्सिमीटर या मशीनने सुरक्षा कवचासारखं काम केलं असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. हे ऑक्सिमीटर म्हणजे रक्तातलं ऑक्सीजनचं प्रमाण मोजणारं एक यंत्र आहे. चीनवरून आयात केल्या जाणाऱ्या या यंत्राची मागणी कोरोनाच्या काळात भलतीच वाढल्याचं समोर आलंय.

१३ जुलैला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या कोरोना वायरसच्या पेशंटचा मृत्यूदर कमी करण्यासाठी सुरक्षा कवचाने मदत केली असल्याचं जाहीर केलं. कुणी म्हणेल मुख्यमंत्री असून सुरक्षा कवचाच्या वगैरे अंधश्रद्धा बाळगतायत की काय? पण खरंतर त्यांचं हे सुरक्षा कवच म्हणजे कुठला धागा, ताईत किंवा अंगठी नाहीय. कोरोना वायरसच्या पेशंटना मृत्यूच्या दाढेतून ओढून आणणारं हे अतिशय महत्त्वाचं मशीन आहे. या मशीचं नाव आहे ऑक्सिमीटर.

कोरोना वायरसचा सामना करण्यासाठी प्रत्येक राज्य स्वतःचा वेगळा पॅटर्न राबवतंय. काही खास औषधं, वेगवेगळ्या उपचारपद्धतींचा वापर करून कोरोनाची लागण झालेल्या पेशंट बरा व्हावा यासाठी प्रयत्न केले जातायत. अशातच दिल्ली सरकारने कोरोना वायरसची लागण झालेल्या पण घरीच आयसोलेशनमधे राहून उपचार घेणाऱ्या पेशंटना ऑक्सिमीटरचा वापर करायला सांगितला. दिल्लीत जवळपास ११ हजार पेशंटना सरकारकडून ऑक्सिमीटर या मशीनचं वाटप केलं गेलं. या सगळ्यांना ऑक्सिमीटर कधी, कसं वापरायचं याचं प्रशिक्षण दिलं आणि त्याचा परिणाम म्हणून पेशंटना होणारा संभाव्य त्रास डॉक्टरांना ओळखता आला.

हेही वाचा : कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

ऑक्सीमीटर कसं काम करतं?

रक्तातली ऑक्सीजनची पातळी मोजण्याचं काम पल्स ऑक्सिमीटर हे मशीन करतं.   आपल्या शरीरातल्या पेशींना काम करण्यासाठी ऑक्सीजनची गरज पडते. आपल्या एका श्वासातून जी हवा बाहेर जाते त्यात जवळपास २१ टक्के ऑक्सीजन असतो. फुफ्फुसातून हा ऑक्सीजन आत गेला की तिथून रक्तवाहिन्यांकडे सोडला जातो. आणि रक्तवाहिन्यांकडून कार्बनडाय ऑक्साईड परत घेतला जातो.

रक्तातल्या हिमोग्लोबिन या घटकात हा ऑक्सीजन जातो. कोरोना वायरसची लागण झालेली असेल तर फुफ्फुसांना सूज येते. सूज आल्यामुळे ऑक्सीजन रक्तवाहिन्यांपर्यंत पोचवण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो. याला हायपोक्झेमीया असं म्हणतात. रक्तवाहिनीतच ऑक्सीजन पोचत नाही तर तिथून पुढे मेंदू, किडनी, जठर अशा कोणत्याही अवयवाकडे जाणार नाही. परिणामी ते अवयव निकामी होतील आणि मृत्यू ओढावेल.

अचानक होणारा त्रास टळला

साधारणपणे रक्तात ९५ टक्के ऑक्सीजन असतो. पण कोविड १९ या आजारात किंवा श्वसनाच्या आजारात ऑक्सीजन यापेक्षा कमी होण्याची शक्यता असते. भारतातल्या बहुतांश कोविड १९ झालेल्या पेशंटमधे हॅपी किंवा सायलेंट हायपोक्झेमीया दिसून येतो. म्हणजे, त्यांच्या रक्तातली ऑक्सीजनची पातळी कमी होते पण त्याचा कोणताही परिणाम शरीरावर दिसून येत नाही. ऑक्सीजनची पातळी खूपच कमी झाल्यावर हे परिणाम दिसू लागतात. एकदम श्वास अडकू लागतो आणि धावत पळत हॉस्पिटल गाठावं लागतं. कधी कधी हॉस्पिटलला पोचेपर्यंत उशीरही झालेला असतो.

अशा परिस्थितीत हे ऑक्सिमीटर खरोखर सुरक्षा कवचसारखं काम करतंय. कोविड १९ झालेल्या पेशंटला श्वास घ्यायला त्रास होत नसेल तरीही त्याच्या तब्येतीत नेमका काय बिघाड होतोय हे या मशीनमुळे कळतंय. त्यामुळेच ऑक्सिमीटरचा वापर करून पेशंटच्या रक्तातली ऑक्सीजनची पातळी तपासण्यावर दिल्लीमधे भर दिला गेला. घरी आयसोलेशनमधे असणाऱ्या या पेशंटना ऑक्सीजन लेवल ९० पेक्षा कमी झाली की लगेचच ऍडमिट होण्यास सांगितलं होतं. त्यामुळे घरी आयोसेलेशनमधे राहणाऱ्या अनेक लोकांचे जीव वाचले. ऑक्सिमीटरच्या सुरक्षा कवचाने कोरोनापासून त्यांचा बचाव केला, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

काम चालू बस ६ सेकंडमे

कागद एकत्र बांधून ठेवायला आपण स्टेपलरने पीन मारतो. त्या स्टेपलरसारखंच हे ऑक्सिमीटर मशीन दिसतं. त्याच्या दोन पात्यांमधे आपलं हाताचं एक बोट किंवा कानाच्या पाळीचा भाग किंवा पायाचं बोट बसवलं की त्यातून एक लाईट बाहेर पडते. ही लाईट शरीराच्या आत रक्तवाहिन्यांमधे जाते आणि रक्ताच्या पातळीचं मोजमापन करते.

पल्स ऑक्सिमीटर वापरणंही अगदी सोपं असतं. फक्त त्याचा वापर करताना आपला हात स्वच्छ आणि कोरडा आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागते. आपल्या बोटावर ते मशीन नीट बसलं असेल तरच ऑक्सीजनची टक्केवारी अचूक येते.  खूप घट्ट बसत असेल तर रक्तवाहिनीवर अतिरिक्त दबाव पडल्याने आणि खूप सैल बसत असेल तर लाईट नीट पास न झाल्यामुळे चुकीचा निकाल दिसू शकतो. बोटावर ठेवल्यानंतर फक्त ६ ते १२ सेकंदात हे मशीन आपल्या ऑक्सीजनची लेवल मोजतं. इनोच्या जहिरातीत सांगितल्यासारखं हे मशीन फक्त सहा सेकंदात काम पूर्ण करतं.

मशीन लावायचंय त्या बोटाला नेलपॉलिश लावलं नाहीय ना किंवा त्यावर मेंदी काढली नाहीय ना याचीही काळजी घ्यावी लागते. खूप सुर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी हे मशीन नीट काम करत नाही. तसंच, संपूर्ण अंधार असलेल्या ठिकाणीही करत नाही. माणूस थरथरत असेल किंवा धावत पळत येऊन दम खात असेल तरी हे मशीन योग्य रिडिंग दाखवणार नाही. शांत, स्थिर आणि आरामदायक अवस्थेत असलेल्या माणसाचंच रिडिंग बरोबर येईल.

कानाच्या पाळीचाही वापर होऊ शकतो.

फक्त कोरोनाच्या पेशंटसाठीच नाही तर फुफुसाचा कॅन्सर, अस्थमा, ऍनिमिया, न्युमोनिया, हार्ट ऍटॅक अशा अनेक आजारांमधे हे मशीन उपयोगी पडतं. मात्र कोविड १९ या साथरोगाच्या काळात याचा वापर वाढला आहे. हॉस्पिटलसोबतच घरोघरी हे मशीन वापरलं जातंय, नव्याने विकत घेतलं जातंय. गेल्या ३ महिन्यात ऑक्सिमीटरच्या मागणीतही वाढ झाल्याचं लक्षात आलंय. भारतातल्या अनेक कंपन्या चीनकडून हे मशीन आयात करतात. आता अचानक आलेल्या साथरोगामुळे मागणी आणि पुरवठा यांचा मेळ बसवताना या कंपन्यांना नाकीनऊ येतायत.

रक्तातल्या हिमोगलोबिनमधे ऑक्सीजन असतो याचा शोध १८६४ मधे जिओरी स्ट्रोक्स यांनी लावला. त्यानंतर या ऑक्सीजनची पातळी मोजण्यासाठी ऑक्सिमीटर हे मशीन १९३५ साली कार्ल माटथेस या जर्मन डॉक्टरने तयार केलं. १९४०मधे दुसऱ्या महायुद्धात जखमी झालेल्यांना वाचवण्यासाठी या मशीनची नितांत गरज निर्माण झाली. त्या गरजेतून १९४० मधे ग्लेन आलेन मिलीकन या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी ऑक्सीमीटरचं नवं मॉडेल जगासमोर आणलं. मात्र आधीच्या मॉडेलप्रमाणेच हे मशीन खूप महाग, आकाराने मोठं आणि वेळखाऊ होतं. शिवाय, हाताच्या बोटाऐवजी कानाच्या पाळीवरून हे मशीन ऑक्सीजनची लेवल मोजत असे.

कानाची पाळी अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे या प्रयत्नात कधी कधी पेशंटच्या कानाला इजाही होत असे. म्हणूनच १९७२ मघे टोकुओ आयागी या जपानी इंजिनियरने ऑक्सीमीटरचं नवं, सोपं, अतिशय कमी वेळ घेणारं आणि सुरक्षित मॉडेल तयार केलं. या नव्या मॉडेलला पल्स ऑक्सिमीटर म्हटलं जातं. यात ऑक्सीजन लेवलसोबतच पल्स म्हणजेच नाडीचे ठोकेही मोजले जातात. मेमधेच या जपानी इंजिनियरचं वयाच्या ८४ व्या निधन झालं. त्यांनी बनवलेलं ऑक्सिमीटर आज जगभरात वापरलं जातंय.

हेही वाचा : 

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?