पासपोर्ट हा कोणत्याही देशाची ताकद ठरवणारा एकक म्हणून नावारूपाला येतोय. काही दिवसांपूर्वीच एका संस्थेनं जगभरातील देशांची पासपोर्टनुसार रँकींग जाहीर केली. यात काही लाख लोकसंख्येचा मालदीव भारताच्या पुढं असल्याचं दिसून आलं. ही बाब भारतासाठी चिंतेची आहे. पण मग पासपोर्टवरून एखादा देश कमजोर किंवा शक्तीशाली कसा ठरतो?
काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती, की आशियातल्या सगळ्यात लहान देशाहूनही भारताचा पासपोर्ट कमजोर आहे. यात भारत ८१ व्या क्रमांकावर तर काहीएक लाख लोकसंख्येचा मालदीव ५६ व्या क्रमांकावर आहे. पासपोर्टकडे आता नव्या जगातलं सामर्थ्याचं प्रतिक म्हणून बघितलं जातंय. एवढे दिवस एखाद्या देशाची ताकद मोजायची असंल, तर वेगवेगळ्या निकषांची गरज पडायची. आता सामर्थ्य, ताकद मोजण्याचा पासपोर्ट हा साधासोप्पा निकष आहे.
नव्वदच्या दशकापूर्वी जग दोन गटांमध्ये विभागलेलं होतं. एक गट होता अमेरिकेचा, तर दुसरा रशियाच्या नेतृत्वात कार्यरत होता. नव्वदीतच सोविएत रशियाचे तुकडे झाले. जागतिकीकरणाचं लोण सर्वदूर पसरलं. दोन तंबूत एकवटलेली सत्ता अनेकांच्या हातात आली. त्यातून शक्तीशाली कोण, हे सिद्ध करण्यासाठी गळेकापू स्पर्धा सुरू झाली. लोक एकमेकांकडून शस्त्रास्त्रं खरेदी करून सत्तेचं प्रदर्शन भरवू लागली. आता मात्र, एखादा देश किती शक्तीशाली आहे हे ओळखायचंय, तर यासाठीचा सर्वांत सोपा फॉर्म्यूला ठरतोय आपला पासपोर्ट. पण पासपोर्टसारख्या एका कागदावरून अख्ख्या देशाची ताकद मोजायची कशी?
एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी लागणारे ओळखपत्र म्हणजे पासपोर्ट. हे पासपोर्टच सध्याच्या जगरहाटीत एखाद्या देशाची शक्ती जोखण्याचा सर्वांत सोप्पा फॉर्म्यूला बनलाय. पासपोर्टला जोडून येणारी गोष्ट म्हणजे व्हिसा. ज्या देशात जायचंय, त्या देशाच्या प्रतिनिधीची स्वाक्षरी वा शिक्का पासपोर्टवर घ्यावा लागतो. त्यालाच व्हिसा म्हणजे प्रवेशपत्र म्हणतात. व्हिसा काढताना संबंधित देशात कशासाठी जायचंय, किती दिवस, कुठं राहणार यासारखी माहिती विचारली जाते.
संबंधित पासपोर्टधारक आपल्या मायदेशी परत गेला पाहिजे यासाठीची खातरजमा म्हणजे व्हिसा. अनेकदा आपल्याकडं नायजेरिया, बांगलादेश, पाकिस्तान यासारख्या देशातले नागरिक व्हिसाची मूदत संपल्यावरही भारतातचं राहत असल्याच्या बातम्या येतात. ही सगळी माहिती सरकारकडे असते.
एखाद्या देशात प्रवास करण्यासाठीचे व्हिसा फ्री, व्हिसा ऑन अरायवल आणि व्हिसा इसेंशियल हे तीन मार्ग आहेत. व्हिसा फ्री असणं म्हणजे दुसऱ्या देशातील नागरिकांना आपल्या देशात प्रवास करण्यासाठी परवानग्यांच्या कटकटीतून सुटका करणं होय. उदा. भूताननं भारताला व्हिसा फ्री देश म्हणून मान्यता दिली आहे.
दुसरं, व्हिसा ऑन अरायवलमध्ये आपल्याला संबंधित देशात गेल्यानंतर परवानगी काढावी लागते. ही प्रक्रिया खूप सोपीय. तिसरं, आपल्याला व्हिसाशिवाय म्हणजे कटकटीचं चक्र भेदून त्या देशात जाताच येत नाही. त्या देशातील नागरिकांची सुरक्षितता आणि आर्थिक निकष, त्याचप्रमाणे देशाच्या क्रयशक्तीवरून प्रवासाची ही विभागणी करण्यात येते.
एक मजेशीर गोष्ट म्हणजे, २०१७ मध्ये `अल जझीरा` ही वृत्तवाहिनी बंद करण्याच्या मागणीसाठी आखाती देशांनी कतारवर निर्बंध लादले. त्यानंतर कतारने अनेक देशांना व्हिसा फ्री, व्हिसा ऑन अरायवलची सुविधा खिरापत वाटल्यासारखी वाटून टाकली. हवाई वाहतूक आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशाला दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं कतार सरकारनं सांगितलं होतं.
अमेरिकेतली हेन्ले अँड पार्टनर्स ही पासपोर्ट इंडेक्स ठरवणारी संस्था आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडील माहितीचा अभ्यास करून ही संस्था पासपोर्ट इंडेक्स सर्वे करते. यामधे कोणत्या देशाच्या पासपोर्टवर किती देशांमधे मोफत आणि सहज व्हिसा दिला जातो, हे पाहून रँकींग ठरवली जाते. २००६ पासून ही रँकींग केली जातेय. २०१८मध्ये १९९ देशांच्या पासपोर्टचा संस्थेने अभ्यास केला. तसेच २२७ वेगवेगळ्या टूरिस्ट पॉईंटचाही यात विचार करण्यात आला. व्हिसाशिवाय तुम्हाला किती देशांत फिरण्याची परवानगी आहे, त्यावर आपल्या देशाच्या पासपोर्टची ताकद कळते, थोडक्यात देशाची पत पासपोर्टवर ओळखता येते.
पासपोर्ट इंडेक्समध्ये आशिया खंडातल्या जपानने अव्वल क्रमांक मिळवलाय. तुमच्याकडे जपानचा पासपोर्ट असेल तर तब्बल १९० देशांत तुम्हाला कोणत्याही परवानगीशिवाय जाता येतं. दुसऱ्या क्रमांकावरील सिंगापूरच्या नागरिकांना १८९ देशांत प्रवेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी, फ्रान्स आणि दक्षिण कोरिया (१८८) आहे. चौथा क्रमांक डेन्मार्क, इटली, स्वीडन, स्पेन (१८७) यांचा आहे. पाचव्या क्रमांकावर नॉर्वे, युके, ऑस्ट्रिया, लक्झेमबर्ग, नेदरलँड, पोर्तूगाल आणि अमेरिका आहे. या सर्व देशांच्या पासपोर्टवर १७३ देशांत व्हिसा ऑन अरायवलची सुविधा मिळते.
(अधिक माहितीसाठी www.henleypassportindex.com)
पासपोर्ट इंडेक्स क्रमवारीत भारत ८१ व्या रँकवर आहे. भारतीय नागरिकाला ६० देशांत व्हिसाच्या कटकटीशिवाय प्रवास करण्याची मुभा आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात व्हिसा फ्री देशांची ही संख्या ५० वरून ६० वर गेलीय.
१०४ रँक असलेल्या पाकिस्तानी पासपोर्टधारकाला ३३ देशांत व्हिसा फ्री आहे. १०१ व्या क्रमांकावरील नेपाळला ४० देशांत, १०० क्रमांकावरील बांगलादेश ४१, ९९ क्रमांकावरील श्रीलंका ४२, ५८ क्रमांकावरील भूतान ८७, ७१ व्या क्रमांकावरील चीनला ७४ देशात व्हिसाची गरज नाही. अफगाणिस्तान, इराक, सिरीया आणि सोमालिया यांच्यानंतर पाकिस्तानी पासपोर्टची पत खालून तिसऱ्या क्रमांकावर आहे. येमेन आणि सुदान यासारख्या गृहयुद्धात अडकेल्या देशांची पतही पाकिस्तानहून चांगलीय.
जवळपास सर्व देशांत संबंधित परराष्ट्र मंत्रालयाकडे पासपोर्ट देण्याची अथॉरिटी आहे. याला अपवाद फक्त युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटनचा. ब्रिटनचा पासपोर्ट हा राणीच्या नावे दिला जातो. त्यामुळे राणीला परदेश प्रवासासाठी पासपोर्ट लागत नाही. मात्र, राजघराण्यातील इतरांना पासपोर्ट लागतो. पोपलाही परदेश प्रवासासाठी पासपोर्ट लागतो.
साधारणपणे पासपोर्टचा रंग लाल, निळा, हिरवा आणि काळा असतो. पासपोर्टच्या रंगानुसारही देशांची विभागणी करता येते. साम्यवादी शासनव्यवस्था असलेल्या देशांनी पासपोर्टसाठी लाल रंगाला पसंती दिलीय. रशिया, चीन, व्हेनेझुएला, रोमानिया, पोलंड, जॉर्जिया, सर्बियाच्या नागरिकांकडे लाल रंगाचा पासपोर्ट असतो. याशिवाय क्रोशिया वगळता युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या पासपोर्टमध्येही लाल रंगाची शेड असते.
अमेरिकाच्या पासपोर्टचा रंग निळा आहे. मुस्लीम लोकसंख्या अधिक असलेल्या सौदी अरेबिया, पाकिस्तान, मोरक्को यांच्या पासपोर्टचा रंग हिरवा आहे. बोत्सवाना, झांबिया, बुरुंडी, काँगो यासारख्या आफ्रिकी देशांत पासपोर्टला काळा रंग आहे. न्यूझीलंडचा राष्ट्रीय रंग काळा असल्याने पासपोर्टही त्याच रंगाचा आहे.