सुएझ कालव्यातून जहाज सुटलं, पण महागाईतून आपली सुटका होणार का?

३१ मार्च २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


गेले सात दिवस इजिप्तजवळच्या सुएझ कालव्यात एवर गिवन नावाचं एक भलमोठं जहाज अकडून बसलं होतं. त्यामुळे कालव्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबली होती. अनेक देशांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या. त्यामुळेच येत्या काही महिन्यात सर्वसामान्य माणसांच्या खिशालाही याचा फटका बसणार आहे.

रस्त्यावरचं ट्रॅफिक जॅम आपल्याला काही नवीन नाही. आजकाल मोठ्या शहरात ऑफिसमधून येणारा प्रत्येक माणूस रोजच त्याचा अनुभव घेतो. एवढंच काय, विमानाच्या ट्रॅफिक जॅमबद्दलही आपण ऐकलेलं असतं. हे दोन्ही ट्रॅफिक जॅम नेहमीच होत असतात आणि फार तर तासा दोन तासात सुटतात.

पण इजिप्तमधल्या सुएझ कालव्यात एका भल्या मोठ्या जहाजामुळे झालेलं ट्रॅफिक जॅम सोडवण्यासाठी ७ ते ८ दिवस लागले. ४०० मीटर लांब बोट या २०० मीटर रूंद कालव्यात २३ मार्चपासून आडवी अडकून पडली होती. तिच्या मागे जवळपास ४०० जहाजं रस्ता मोकळा होण्याची वाट पाहत उभ्या राहिल्या होत्या. 

सोमवारी २९ मार्चला हे जहाज कालव्यातून निघालं. सोमवारी रात्री उशीरा सगळी वाहतूक  सुरळीत झाली. आता कालव्यातून नेहमीप्रमाणे वाहतूक होत असली तरी या ट्रॅफिक जॅमचे आंतरराष्ट्रीय बाजारावर, तेलाच्या किंमतीवर आणि परिणामी आपल्या खिशावरही परिणाम होणारेत.

जगाचा १५ टक्के व्यापार उचलणारा कालवा

जगभरात आजही समुद्रातून मोठा व्यापार चालतो. विमानं यायच्या आधी तर या समुद्रातल्या व्यापाराला फारच महत्त्व होतं. अनेक महिने, वर्षभर प्रवास करून लोक एका खंडातून दुसऱ्या खंडात जायचे. अशातच, आशियातून युरोपात जायचं असेल तर संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून जावं लागायचं. मग त्यावर उपाय म्हणून १८६९ मधे इजिप्तला लागून एक कालवा कृत्रिमरित्या खोदला गेला.

जागतिक समुद्र परिवहन परिषदेच्या माहितीनुसार या कालव्यामुळे आशियातून युरोपात जाताना ८,९०० किलोमीटरचा प्रवास कमी झाला. एवढा प्रवास करायला एखाद्या जहाजाला साधारण १० ते १५ दिवस लागत होते. ते कमी झाले. १९३ किलोमीटर लांब असणारा हा कालवा भूमध्य आणि लाल समुद्राला एकमेकांशी जोडतो. लाल समुद्रातून म्हणजे आशियाच्या बाजुने कालव्यात शिरताना इजिप्तमधलंच सुएझ नावाचं शहर लागतं. त्यावरूनच या कालव्याचं नाव सुएझ कालवा असं पडलं.

२०२० च्या आकडेवारीनुसार वर्षभरात जवळपास १८,५०० छोटी मोठी जहाजं या कालव्यातून प्रवास करतात. म्हणजे दिवसाला साधारण ५१ जहाजं. १२० कोटी टन वजनाचा माल दरवर्षी इथून नेला जातो. जगाचा १५ टक्के सागरी व्यापार या सुएझ कालव्यातून होतो. सुएझ कालवा प्राधिकरण या संस्थेकडे या कालव्याची मालकी आणि देखभालीची जबाबदारी आहे. ही संस्था इजिप्त सरकारने १९५६ मधे स्थापन केलीय.

हेही वाचा : ब्रिटनची युरोपियन संघातली 'ब्रेक्झिट' कुणाच्या फायद्याची?

वादळामुळे अडकलं जहाज

१९ व्या शतकात हा कालवा बनवण्यासाठी १० वर्ष आणि १५ लाख कामगार लागले होते. आणि हा कालवा बंद पडायला फक्त एक दिवस आणि एक मोठं जहाज पुरेसं झालं. एवर गिवन असं या जहाजाचं नाव होतं. एवरग्रीन या तैवानच्या जहाज वाहतूक संस्थेकडून या जहाजाचं व्यवस्थापन केलं जातं. २०१५ ला बांधण्यात आलेलं हे जहाज जगातल्या १३ सर्वात मोठ्या जहाजांपैकी एक आहे.

मलेशियातल्या तांजुंग पेलेपस या बंदरावरून ते नेदरलँडकडे निघालं होतं. २३ मार्चला भारतीय वेळेनुसार मध्यरात्री हे जहाज सुएझ कालव्यात मन्शिएत रुगोला या गावाजवळ अकडून पडलं. एका बाजुने ते अक्षरशः कालव्याच्या गाळात जाऊन रूतलं होतं. तर दुसरा भाग कालव्याच्या दुसऱ्या बाजुला काठाच्या अगदी जवळ येऊन थांबला होता.

वादळी वारे आणि वाळूच्या वादळामुळे जहाजावरचा कंट्रोल सुटला आणि ते अशापद्धतीने येऊन धडकलं असं सुएझ कालवा प्राधिकरणाचे प्रमुख ऍडमिरल राबी यांनी सांगितलंय. या जहाजावर दोन लाख टन एवढ्या वजनाचा माल भरला होता. एवढ्या वजनाच्या जहाजाला सहज हलवू शकणारे वारे किती वेगाचे असतील याचा अंदाज आपल्याला लावता येईल.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या

जहाज असं आडवं रूतून बसल्याने या छोट्या कालव्यातून इतर कोणत्याही बोटींना ये जा करता येत नव्हती. राबी यांनी जहाज निघेपर्यंत सुएझ कालव्यातली वाहतूक बंद राहणार असल्याचं सांगितलं. पण बोटींना सुएझ कालव्याशिवाय मार्ग नव्हता. दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जाण्याइतका इंधनाचा, अन्नधान्याचा साठा, माल टिकवण्याची क्षमताही इतर जहाजांकडे नसावी. म्हणून अनेक जहाजं हे एवर गिवन जहाज सुटण्याची वाट पाहू लागली. काहींनी आपल्या वाटा बदलल्या आणि आफ्रिकेला वळसा घालून जाण्याची तयारी सुरू केली.

वाट पाहणाऱ्या जहाजांमधे कच्च्या तेलाची ने आण करणारीही काही जहाजं होती. जहाज कधी निघणार याचा काहीही नेम नसल्याने नुसत्या भीतीपोटी कच्च्या तेलाच्या किमती सहा पट्टींनी वाढल्या. या ट्रॅफिक जॅममुळे अनेक देशांचे अनेक माल अडकून पडले. जगात एकूणच महागाई वाढणार, असं दिसू लागलं. यामुळेच जहाज सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जाऊ लागले.

हेही वाचा : डॉ. स्वाती मोहन : मंगळावर रोवर लँड करणारी भारताची लेक

ड्रेजरने उपसली वाळू

जहाजाला सोडवण्यासाठी पहिल्यांदा डझनभर लहान बोटी पुढे आल्या. या बोटींना टगबोटी असं म्हणतात. सहा बोटी जहाजाला दक्षिणेकडे ढकलत होत्या. तर ४ बोटींकडून दक्षिण बाजूला जहाज ओढण्याचं काम सुरू होतं. त्यात समुद्राला येणाऱ्या भरती आणि आहोटी यांच्या वेळा सांभाळायच्या होत्या.  भरतीच्या वेळी हा धक्का दिला तर जहाज सरळ होईल असं वाटत होतं. पण त्यात यश आलं नाही. 

शेवटी जहाज रूतलं होतं तिथला गाळ आणि पाणी काढण्याचं काम सुरू केलं. हा गाळ काढण्यासाठी ड्रेजर्स मशीनही आणली होती. अशी मशीन आपण नदीपात्रात किंवा डोंगरावरची वाळू उपसताना पाहत असतो. 

ती पुरेशी पडेतान म्हणून एक विशिष्ट प्रकारचा सक्शन ड्रेजरही आणला गेला. ताशी २ हजार क्युबिक मीटर गाळ या ड्रेजरद्वारे गाळ उपसणं चालू झालं. जहाजाच्या पुढच्या भागाजवळ जवळपास १८ मीटर खोल खणलं आणि २७ हजार क्युबिक मीटर वाळू उपसली, असं सुएझ कालवा प्राधिकरणाच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं. 

आणि कालवा पुन्हा सुरू झाला

गाळ काढूनही उपयोग होणार नाही अशीही चिन्ह मधे मधे दिसू लागली होती. जहाज हलवायचं असेल तर जहाजावरचा माल कमी करून त्याचं वजन थोडं कमी केलं पाहिजे, असं मत पडलं. जहाजावर २० फूट लांबीचे साधारण २० हजार कण्टेनर होते. ते उतरवण्याची तयारीही सुरू होती. त्यासाठी विशिष्ट क्रेन्स लागणार होत्या. पण तसं करताना जहाज मोडून त्याचे दोन तुकडे होण्याची शक्यता होती.

शेवटी २९ मार्चला जहाज बाहेर आलं. भारतीय वेळेप्रमाणे सकाळी ९ वाजून १२ मिनिटांनी जहाज सरळ झालं. पण त्याचा पुढचा भाग अडकलेलाच होता. त्यानंतर संध्याकाळी साधारण साडेसहा वाजता जहाज पूर्णपणे बाहेर आलं आणि पुन्हा पाण्यावर तरंगू लागलं. जहाज तर पूर्णपणे सुरक्षित होतंच. पण कालव्याचं काही नुकसान झालं नाहीय ना याची तपासणी करून भारतीय वेळेप्रमाणे रात्री १०:३० वाजता कालव्यातली वाहतूक पुन्हा सुरू झाल्याची घोषणा सुएझ कालवा प्राधिकरणाकडून करण्यात आली.

हेही वाचा : सैन्य मागे घेऊन भारत आणि चीनने काय कमावलं, काय गमावलं?

५,४०० कोटी डॉलरचं नुकसान

आता कालव्यातली सागरी वाहतूक सुरळीत झाली आहे खरी. पण जहाजाची सुटका झाली तेव्हा त्याच्यामागे कालव्यातून जाण्यासाठी सुमारे ४०० जहाजं, ऑईल टँकर, गॅस टँकर वाट पाहत होते. गेले सात ते आठ दिवस ते एकाच जागी अडकून पडले होते. त्यामुळे त्यांचं तर मोठं नुकसान झालंच. याचा ग्राहकांसाठी, आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठीचा अर्थ काय? एकच, पुढच्या काही महिन्यांत महागाईत वाढ होऊ शकते. 

लॉयड्स लिस्ट या जर्नलच्या हवाल्यानुसार, सुएझ कालव्यातून दररोज ९०० कोटी डॉलरचा व्यापार होतो. म्हणजे तासाला ४० कोटी डॉलर आणि मिनिटाला ६७ लाखा डॉलरचा. एवर गिवन या जहाजानं जवळपास सहा सात दिवस हा रस्ता बंद करून ठेवला होता. म्हणजे, जवळपास ५,४०० कोटी डॉलरचं नुकसान झालं असल्याची शक्यता आहे.

महत्त्वाचं म्हणजे, जहाजांमधे किती माल होता एवढंच या नुकसानीच्या किमतीत मोजलंय. अनेक देशांना सोसावं लागलेली खरी किंमत, त्यातही तेलाच्या आणि गॅसच्या किमती वाढल्याने भरावा लागलेला अतिरिक्त पैसा यांची किंमत आणखी जास्त असेल.

बंदरावर झाली गर्दी

सुएझ कालवा बंद झाल्यामुळे अनेक माल भरलेली जहाजं, कोर्गो शीप रस्ता मोकळा व्हायची वाट पाहत होत्या. आता या सुएझ कालवा सुरू झालाय म्हटल्यावर ही सगळी जहाजं आणि वाट बदलून गेलेलीही सगळी जहाजं साधारण एकाच वेळी युरोपातल्या बंदरावर पोचतील. त्या बंदरात भरपूर गर्दी होईल. याला पोर्ट कन्जंक्शन असं म्हणतात, असं सी इंटेलिजन्स तज्ञ लार्स जेन्सेन यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलंय.

कोणत्या जहाजातला माल मोकळा करायचा, तो पुढे कसा पाठवायचा याची व्यवस्था लावता लावता पुन्हा त्या जहाजात कोणता माल भरायचा हे ठरवताना कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येतील. याचा थेट परिणाम बाजारावर पडेल. बाजारात एकाच वेळी खूप माल आल्यामुळे मालाचा पुरवठा आणि किमतीवर परिणाम होईल.

हेही वाचा : आरसेप व्यापारी कराराला विरोध करणं भारतासाठी धोक्याचं ठरेल? 

पेट्रोल, डिझेल पुन्हा महागणार?

वोर्टेक्सा या आईल आणि गॅसच्या कार्गो जहाजांचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीकडून प्रसिद्ध झालेल्या डेटानुसार सुएझ कालव्यातून सगळ्यात जास्त कच्चं तेल आणि इतर उत्पादनांची आयात भारत करतो. चीन, साऊथ कोरिया, सिंगापूर या आशियाई देशांपेक्षाही जास्त आयात भारताची असते. हा कालवा सात दिवस बंद होता त्याचा परिणाम पुन्हा कच्च्या तेलाच्या आयातीवर आणि परिणामी पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसच्या किमतीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

थोडक्यात, आपल्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागण्याचा सगळा बंदोबस्त या एवर गिवन जहाजाने केलेलाय. सुएझ कालव्यातून हे जहाज तर सुटलं. पण महागाईच्या समुद्रातून तुमची आमची नाव तरणार की नाही हे आता बघायचं आहे.

हेही वाचा : 

कोरोनाकाळात टाळायच्या सहा आर्थिक चुका

चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज

ट्रम्प समर्थकांचा निषेध करणाऱ्या मोदींचे भक्त आपला पराभव स्वीकारतील?