आता वीडियो भेटही प्रभावीपणे व्हायला हवी!

०९ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


लॉकडाऊनपासून आपण वीडियो कॉन्फरन्सवर एकमेकांना भेटतो आहोत. कसंतरी वेळ मारत आपण हे तंत्रज्ञान हाताळलं. पण आता आपलं पुढचं सगळं भवितव्यच या तंत्रज्ञानावर आधारलंय. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्यासोबत आपली वीडियो भेट प्रभावी होण्यासाठी  लागणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायल्याच लागतील. त्यासाठी काही खास टिप्स.

कोविड १९ या आजाराची साथ आल्यापासून वर्च्युअल भेटींना चांगले दिवस आलेत. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते कट्ट्यावर टाईमपास करत बसणाऱ्या तरूणांपर्यंत सगळेच आता वर्च्युअली भेटतायत. या वीडियो कॉन्फरन्स कॉलवर एकावेळी अनेकजण एकमेकांना भेटू शकतायत. तेही कोरोना पसरण्याची कोणतीही भीती न बाळगता. म्हणून तर लॉकडाऊन चालू झाल्यापासून या वीडियो कॉन्फरन्सवर ऑफिसच्या मिटिंग्स झाल्या, मोठ्या मोठ्या लोकांची व्याख्यानं झाली, दिवसभर चालणारी लांबलचक सेमिनार्स वेबिनार म्हणून पार पडली, शाळा कॉलेजचे तास झाले. इतकंच काय, तर रात्री उशीरा रंगणाऱ्या कवितांच्या बैठकी, लोकांचे वाढदिवस, बायकांच्या भिशीची पार्टी असं सगळं त्याच उत्साहात साजरं झालं. गुगल मीट, झूम, वेबएक्स अशा अनेक ऍप्सने आपल्याला आधार दिला.

नाही म्हटलं तरी ही वर्च्युअल भेट आपल्या सगळ्यांसाठी नवी होती. सगळं शिकण्याच्या नादात अनेकदा भेटी दरम्यान बाळगायचं तारतम्य राहून गेलं. वीडियो कॉलिंग चालू असताना मागून उघडं पोट टाकून शर्ट घालत बाहेर येणारे बाबा काहींनी पाहिले तर चक्क महत्त्वाची मिटींग चालू असताना मधेच कुणाची तरी आई भांडी घासली नाही म्हणून ओरडणाऱ्या आईचा आवाज किंवा मिटिंगच्या मधे डोकावणारी लहान मुलं असे अनेक अनुभव आपण घेतले. कसंतरी चुकत पडत आपण वेळ मारून नेली.

पण आता वेळ मारून नेऊन चालणार नाही. लॉकडाऊन संपला असला तरी निदान पुढचं एक वर्ष आपल्याला असंच ऑनलाईन भेटायचं आहे. अजूनही ऑफिस मिटिंग, सेमिनार, व्याख्यानं, कार्यशाळा वगैरे गोष्टी ऑनलाईन पद्धतीनेच पार पडणारेत. इतकंच काय, नव्या नोकरीचे इंटरव्यू, नव्या भेटी सगळं या वीडियो कॉन्फरन्सवरच होणार आहे. त्यामुळे आता या वीडियोला घाबरायचं नाही. तर हे तंत्रज्ञान आणि ते प्रभावीपणे वापरण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी शिकून घ्यायच्या. त्यासाठी काही सोप्या टिप्स उपयोगी पडतील.

नटुया मिटिंगसाठी!

आपण कुणाला प्रत्यक्ष भेटायला जाणार असू तर थोडे चांगले कपडे घालतो, केस सावरतो आणि मगच घराबाहेर पडतो. तेच वर्च्युअल भेटीसाठीही करावं लागतं. ऑफिसची मिटिंग असेल तर व्यवस्थित इस्त्री वगैरे शर्ट किंवा कुर्ता असं घालून मस्त फ्रेश माणसं कॅमेरात दिसत असतील तर फारच मस्त वाटेल. अनेक लोक असं करतातही. पण गंमत म्हणजे, आपल्याला कोण पाहणारे या विचाराने अनेक जण शर्टच्या खाली शॉर्ट घालतात. पण कॅमेरा चालू असताना आपल्याला कधी उठावं लागेल आणि अचानक काय होईल हे कधीही सांगता येत नाही. त्यामुळेच ऑनलाईन बसताना व्यवस्थित कपडे घालून बसायला हवं.

हेही वाचा : ज्ञानदा कदमः वायरल होणारी मराठी न्यूज अँकर

डोळे खूप बोलतात

कुठल्याही गोष्टीचं सादरीकरण करताना आपल्याला नेहमी एक मोलाचा सल्ला दिला जातो. समोर असलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणं गरजेचं असतं. कुणी दुसरं बोलत असेल तेव्हाही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची आपल्याला सवय असते.  वीडियो कॉन्फरन्समधेही तेच लागू होतं. 

पण गंमत अशी की स्क्रीनवर दिसणाऱ्या लोकांच्या डोळ्यात डोळे घालून किंवा स्क्रीनच्या मध्यभागी बधून आपण बोलू लागतो. तेव्हा समोरच्याला आपण खाली बघतो आहोत असं वाटत असतं. यामुळे ऑनलाईन कॉन्फरन्समधे डोळ्यात डोळे घालून बघायचं म्हणजे खरंतर कॅमेराकडे बघायचं असतं. असं कॅमेराकडे बघून बोलताना पहिल्यांदा आपल्याला अवघडल्यासारखं वाटतं. पण थोडी सवय झाली की हेही अगदी सहजपणे आपण करू शकू. 

फ्रेममधे कसे दिसाल ते पहा

प्रत्यक्ष वीडियो कॉन्फरन्सवर जाण्याआधी पहिले आपण कोणत्या डिवाईसवरून जाणार आहोत, हे ठरवून घ्यायला हवं. समोरच्याला दिसणाऱ्या फ्रेमवर त्याचा परिणाम होत असतो. आपण लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून कॉन्फरन्स करत असू तर फ्रेम आडवी होते. आपला चेहरा त्या चौकटीत व्यवस्थित बसतो. पण लॅपटॉपसाठी भरपूर इंटरनेट लागतं. आपल्या घरी वायफाय वगैरे असेल तरच लॅपटॉपचा पर्याय परवडतो. नाहीतर मोबाईलवरून जॉईन होणं जास्त सोयीस्कर असेल.

पण मोबाईलवरून कॉन्फरन्सला जाताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जॉईन होऊन आपण मोबाईल सरळ धरला तर समोरच्याला आपली फ्रेम उभी आणि लांब दिसते. त्याऐवजी मोबाईलचं ऑटो रोटेट ऑन करून मोबाईल आडवा धरला की आपण व्यवस्थित फ्रेममधे दिसतो. आपण टॅबवरून जॉईन होणार असू तर त्यालाही लॅपटॉपसारखं भरपूर इंटरनेट लागतं. पण त्याची फ्रेम मोबाईलसारखी करून घ्यावी लागते. 

आवाजाचा खेळ सांभाळायला हवा

मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉप डिवाईस कोणतंही असो ते वापरताना त्यासोबत हेडफोन्स वापरणं नेहमीच सोयीस्कर ठरेल. हेडफोन्समुळे सगळ्या खोलीभर आवाज पसरत नाही. शिवाय, आपल्या वीडियो कॉन्फरन्सचा त्रास घरातल्या किंवा बाहेरच्या इतर माणसांनाही होत नाही.

हेडफोन्स वापरल्याने कॉन्फरन्समधे आपण बोलत असू तर आपला आवाजही व्यवस्थित जातो. पण त्यासाठी जरा चांगल्या दर्जाचे हेडफोन्स घ्यावे लागतील. हे हेडफोन्स महाग असेल तरी ते नीट ठेवले तर अनेक वर्ष व्यवस्थित चालतात. त्यामुळे त्यात गुंतवणूक करणं फायद्याचंच ठरतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

स्क्रीन किती लांब ठेवावी?

टॅब, लॅपटॉप किंवा मोबाईल कुठूनही जॉईन होताना काळजी घ्यायची आणखी एक गोष्ट म्हणजे तुमच्या स्क्रीनची उंची. अनेकजण मोबाईल टॅब किंवा अगदी लॅपटॉपही हातात घेऊन बोलतात. आपला हात खूप वेळ एकाच अवस्थेत राहू शकत नाही. आपला हात हलला की स्क्रीनही हालते. त्याऐवजी आपला डिवाईस स्टॅंडवर ठेवायला हवा. असे स्टॅंड बाजारात विकत मिळतात. ते विकत घेणं शक्य नसेल तर घरातले डबे, स्टुल, पुस्तकं असं सामान जमा करून त्याचं स्टँड बनवता येऊ शकतं.

या स्टॅंडवर आपलं डिवाईस ठेवलं की त्याची उंची फार वर किंवा फार खाली नाहीय ना हेही पहायला हवं. पुस्तकांचा जुगाड करून स्क्रीनची उंची आपल्या डोळ्यांच्या पातळीवर ठेवायला हवी. त्याने फ्रेमही व्यवस्थित दिसते आणि सारखं खाली किंवा वर स्क्रीनकडे बघुन आपली मान आणि पाठही दुखत नाही.

यासोबतच आपलं स्टॅंड आणि डिवाईस आपल्यापासून किती लांब किंवा जवळ ठेवायचा याचा अंदाज घ्यायला हवा. अनेकदा हातात मोबाईल घेऊन बोलणाऱ्यांचा फक्त एक डोळाच फ्रेममधे दिसतो. किंवा जवळ आल्याने नाक मोठं दिसतं. तसं न करता आपले हेडफोन्स व्यवस्थित कानापर्यंत पोचतील आणि फ्रेममधे आपलं डोकं आणि छातीपर्यंतचा भाग येईल इतक्या अंतरावर स्क्रीन असायला हवी. आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लाईट येईल हे पहायला हवं. अंधाऱ्या खोलीत किंवा लाईटकडे पाठ करून अजिबात बसू नये.

आजूबाजूला पहा

यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फ्रेममधे काय काय गोष्टी दिसणार आहेत, हे पहायला हवं. शक्यतो मोकळ्या आणि फिकट रंगाच्या भिंतीला टेकून बसून कुठलीही कॉन्फरन्स करायला हवी. फिकट रंगाची भिंत असल्याने आपण कोणताही ड्रेस घालता तर उठून दिसेल. पण टेबल खुर्चीवर वर बसून कॉन्फरन्स सोपी जाणार असेल तर आपल्या मागे कुणी घरातली व्यक्ती येऊ नये याची काळजी घ्यायची. याशिवाय, आपल्या मागे एखादं विचित्र पेंटिंग, पोस्टर किंवा चित्रं नाही ना, आपल्या खिडकीचे पडदे उडून वर खाली होत नाहीत ना, काही शोपीस वाजत किंवा हालत नाही ना या सगळ्या गोष्टी चेक करायला हव्यात. असं होत असेल तर आपण बोलत असताना लोकांचं लक्ष विचलित होऊ शकतं.

हेही वाचा : अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प आले, पण आपले 'खास रे' ट्रम्प तात्या कुठं गेले?

ध्वनी प्रदुषण नको

यासोबतच आपल्या फोन किंवा लॅपटॉपमधून सतत आवाज येतायत, मेसेजच्या, ईमेलच्या नोटीफिकेशन्स वाजतायत किंवा घरातली लहान मुलं, आपले पाळीव प्राणी जोरजोरात ओरडतायत असे आवाज वाईट दिसतात. हे ध्वनी प्रदुषण बंद करायला हवं.

त्यामुळेच आपण बोलत नसू तेव्हा आपला माईक बंद करून टाकायला हवा. काही हेडफोन्सला तशी सोय दिलेली असते. तर काही ऍप्समधेच आवाज म्युट करायचा पर्याय दिलेला असतो. आपण संपूर्ण घरात एकटे असलो तरीही हा माईक बंद करणं गरजेचं असतं.

स्क्रीन शेअर करताय?

स्क्रीन शेअर करायची असेल तर आपल्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर नेमकं काय दिसणार आहे, याची काळजी घ्यायला हवी. अनेकदा स्क्रीन शेअर केल्यावर आपण पाहत असलेली एखादी खासगी गोष्ट, वीडियो किंवा लेख दिसू लागतात. फोटो, वीडियो दाखवताना अनेकदा वरती मेसेज नोटीफिकेशन येत राहतात आणि त्यातले सगळे मेसेज दिसतात. असं होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कोणती गोष्ट दाखवायची आहे ती सहज हाताशी लागेल अशी ठेवायला हवी. ही सगली तयारी कॉन्फरन्स चालू होण्याच्या आधीच करून ठेवायला आली.

हेही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?

फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट

सोशल मीडियाला आचारसंहिता लागू झालीय, म्हणजे काय झालंय?

भाजप नेत्यांना ट्रोल करून महाआघाडी चकमकी जिंकेल, युद्ध नाही

आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं