थंडीच्या दिवसात कोरोनाला कसं ठेवायचं दूर?

०७ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


थंडी जवळ येतेय. थंडी वाजू नये म्हणून आपण घरं बंद करून घेतो आणि त्यामुळे हवा खेळती राहत नाही. अशा वेळी संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्याचबरोबर आता थेटर्स आणि शाळा सुरू करण्याची घोषणा झालीय. या पार्श्वभूमीवर घराबाहेर जाताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत मुलांना घरातच प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. सण, उत्सवांचा हंगामही थंडीबरोबरच येतोय. त्यावेळी आपण एकत्र आलो तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

कोरोना विमानातून आला आणि एसटीपर्यंत पोचला असं म्हटलं जातं. परदेशातून आलेले लोक आपापल्या घरात पोचले तेव्हा त्यांनी हा संसर्ग त्यांचे ड्रायव्हर आणि घरगुती नोकरांपर्यंत पोचवला. मग हे नोकर हा वायरस त्यांच्या त्यांच्या वस्तीत घेऊन गेले. 

बहुतांश नोकरचाकर झोपडपट्टीत राहणारे असतात. तिथे अत्यंत दाट लोकसंख्या असते. झोपडपट्टीत पोचल्यावर कोरोना रोखणं अत्यंत अवघड होऊन बसलं. खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधानांनी मार्च महिन्यातच लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, पुणे, कोलकत्ता या शहरांमधून निघालेल्या श्रमिकांच्या माध्यमातून संसर्ग देशाच्या कानाकोपर्यानत, ग्रामीण भागात पोचला. आता या विषाणूची दुसरी लाट येतेय. या पार्श्वभूमीवर आतापासूनच सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा : भारताच्या किनाऱ्यावर धडकेल का कोरोनाची दुसरी लाट?

आरोग्याच्या पाच समस्या

आपल्याकडे ग्रामीण भागात संसर्ग रोखणं जास्तच आव्हानात्मक आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांशी संबंधित पाच महत्त्वाच्या समस्या आहेत. पहिली समस्या म्हणजे, डॉक्टरांची संख्या गरजेच्या तुलनेत कितीतरी कमी आहे. देशातली दहा टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रे तर अशी आहेत, जिथं डॉक्टरच नाहीत. यातली बहुतांश केंद्रं उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमधेच असतील.

दुसरी समस्या म्हणजे, हॉस्पिटलमधल्या खाटांची संख्या कमी आहे. ग्रामीण भारतात १० हजार लोकसंख्येमागे साडेतीन खाटा उपलब्ध आहेत. वस्तुतः जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार ३०० लोकसंख्येमागे एक खाट असायला हवी. तिसरी समस्या अशी की, ग्रामीण भागात २० टक्के असे लोक आहेत, ज्यांना ‘डॉक्टर’ म्हटलं जातं. पण ते डॉक्टर नाहीत.

चौथी समस्या अंतर आणि परिवहन सुविधेच्या कमतरतेची आहे. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास हॉस्पिटलर्यंत पोचणं कठीण जातं. प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा हॉस्पिटलपर्यंत पेशंटला पोचवेपर्यंत उशीर झालेला असतो. पाचवी आणि महत्त्वाची समस्या म्हणजे जागरूकतेचा अभाव. आजार झाल्यावर काय करायचं, याची माहितीच ग्रामीण भागातल्या बर्या च लोकांना नसते.

चार ते पाच महिन्यांची सुरक्षा

आता ग्रामीण भागात संसर्ग वेगाने पसरत असून, तो नियंत्रित करणे अत्यंत निकडीचे आहे. स्थलांतरित श्रमिक घरी पोचल्यानंतर आणि अर्थव्यवस्था पुन्हा खुली होत असताना संसर्ग वाढल्याचं दिसून आले. अर्थव्यवस्था बराच काळ बंद ठेवता येत नाही. प्रत्येकाला आपली रोजीरोटी कमवायची आहे. परंतु तरीही बाहेर पडताना विशेष काळजी घ्यायचीच आहे, हे मात्र लक्षात ठेवायलाच हवं.

काही राज्यांमधे संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याच्या बातम्या आल्यात. परंतु त्या ठिकाणी चाचण्या किती आणि कोणत्या पद्धतीने केल्या जातायत, हेही पाहायला हवं. रोगप्रतिकार शक्तीबाबतही ठोसपणे काही सांगता येत नाही. काही देशांमधे यासंबंधी संशोधन झालंय. त्यात असं स्पष्ट झालंय की, संसर्गानंतर शरीरात ज्या अँटीबॉडीज तयार होतात, त्या चार ते पाच महिन्यांपर्यंत कायम राहतात. या अँटीबॉडीजमुळे किती सुरक्षितता मिळते हेही अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अर्थात, काही काळापर्यंत अँटीबॉडीजमुळे सुरक्षितता मिळत असणारच.

एखाद्या ठिकाणी चाचण्या कमी होत असतील तर संसर्गग्रस्तांचा आकडाही आपोआपच कमी होईल. किती चाचण्या केल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्ण आढळतो, हे आपण पाहणं गरजेचं आहे. शिवाय, उचित पद्धतीने चाचण्या होत आहेत की नाहीत, हे केवळ आकडेवारीवरून सांगता येत नाही. जास्तीत जास्त चाचण्या होणं आणि त्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असणं, ही चांगली परिस्थिती म्हणता येईल.

हेही वाचा : कोरोना वायरससाठी शेतीच्या औद्योगिकीकरणाला जबाबदार धरायला हवं : रॉब वॅलेस

तापमान कमी, कोरोना जास्त

चाचणीसाठी आरटीपीसीआर पद्धती वापरली जाते की रॅपिड अँटिजन टेस्ट केली जाते, हेही महत्त्वाचंय. अँटीजन टेस्टमधून चुकीचा निष्कर्ष निघण्याची शक्यता अधिक असते. आरटीपीसीआर ही तुलनेने महागडी आणि जटील चाचणी प्रक्रिया आहे. त्यासाठी तज्ञांची आणि विशिष्ट साधनांची गरज असते. 

बहुतेक वेळा लोक रॅपिड अँटीजन टेस्ट करत आहेत. यामुळे संसर्गाचे वस्तुनिष्ठ आकलन करता येत नाही. चाचण्या झालेल्या व्यक्तींच्या संख्येला पॉझिटिव पेशंटच्या संख्येने भागल्यास आपल्याला किती चाचण्यांमागे एक पॉझिटिव व्यक्ती सापडतो, याचा अंदाज येईल.

आता लवकरच थंडी सुरू होतेय. या काळात आपल्याला प्रथमच अशा संसर्गाचा सामना करायचाय. अन्य देशांतल्या उदाहरणं पाहिल्यास असं दिसतं, की जिथे तापमान कमी आहे तिथे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढलीय. परंतु अशा ठिकाणी गंभीर रुग्णांची संख्या अधिक नव्हती आणि मार्च-एप्रिलच्या तुलनेत मृत्यूंची संख्याही कमी राहिली.

परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे ती अशी की, जेव्हा आपण सर्व दारे खिडक्या बंद करून घरात बसतो, तेव्हा घरात हवा खेळती राहत नाही. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असतो. विशेषत्वाने उत्तर भारतात थंडीच्या दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतेय. 

मास्कची अदलाबदल टाळा

अनेक देशांमधून झालेल्या संशोधनातून असं पुढं आलंय. हर्ड इम्युनिटीचा प्रयोग यशस्वी होऊ शकत नाही. ३ टक्के, ५ टक्के किंवा १० टक्के इतकाच रुग्णांचा म्हणजे तेवढाच अँटीबॉडीज तयार होण्याचा दर आहे. हर्ड इम्युनिटीसाठी हा आकडा ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत पोचणं गरजेचं असते. एवढ्या अधिक संख्येने संसर्ग कुठल्याच देशात पसरला नाही.

आपल्याला सर्वत्र मास्क परिधान करून वावरण्याची आणि हात स्वच्छ ठेवण्याची सवय लावून घ्यावीच लागेल. मास्क चांगल्या दर्जाचा आणि कमीत कमी तीन पदरी असायला हवा. मास्क योग्य पद्धतीनेच वापरायला हवा. मास्कने नाक आणि तोंड पूर्णपणे झाकलं जायला हवं. शारीरिक अंतर कायम राखणं आणि कोणत्याही वस्तूला स्पर्श न करणं ही पथ्यं पाळणं आव्हानात्मक असते.

आजारी पडल्यास किंवा ताप येऊ लागल्यास घराबाहेर पडता कामा नये. थंडीबरोबरच सणांचा, उत्सवांचा हंगामही येत आहे. या काळात जर आपण सावधगिरी बाळगली नाही तर संसर्ग वाढू शकतो. शाळा आणि थेटर सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलाय. मुलांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आणि त्यांनी सावधगिरी बाळगावी यासाठी पालकांनी सावध असले पाहिजे. 

मुले आपापसात मास्कची अदलाबदल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निरोगी मुलालाही संसर्ग होण्याचा धोका आहे. घराबाहेर कसं वागायचं याबाबत पालकांनी मुलांचं घरातच प्रबोधन करायला हवं. आपल्यासमोर जी परिस्थिती आहे, तिच्या अनुसार आपल्यालाच बदलायला हवं आणि प्रत्येक क्षणी सावध राहायला हवं.

हेही वाचा : 

कोविडनंतर जग कसं विभागलं गेलंय?

अर्णब घाबरू नकोस, जेएनयू तुझ्या सोबत आहे!

कोविड १९ च्या टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत करायच्या तीन गोष्टी

कॉण्टॅक्ट ट्रेसिंगने लॉकडाऊनसोबतच कोरोनाची दुसरी लाटही रोखता येईल!

बायडन आघाडीवर असतानाही ट्रम्प जिंकू शकतील का अमेरिकेची निवडणूक?