कोरोनाची लागण झालेल्या लहान मुलांची काळजी कशी घ्यावी?

०८ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. आता मोठ्या माणसांसारखं लहानांना कोरोना झाला तरी त्यांना एकटं क्वारंटाइन करता येत नाही. आजारी असताना स्वतःची काळजी कशी घ्यायची याची समजही मुलांना नसते. अशात स्वतःला संसर्ग होऊ न देता कोरोना झालेल्या मुलांची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यायला हवं.

कोरोना वायरसची दुसरी लाट आपल्या दारात येऊन धडकलीय. कोरोनाचं डबल म्युटेशन झालंय आणि या नव्या कोरोनाची लागण आधीपेक्षा जास्त वेगाने होतेय. दररोज पेशंटची संख्या वाढतेय. एका दिवसात जवळपास ५० हजार पेक्षा जास्त नव्या पेशंटचं निदान होतंय. सोमवार ५ एप्रिलला पहिल्यांदाच देशात १ लाख नवे पेशंट सापडले. महत्त्वाचं म्हणजे, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना लागण होण्याचं प्रमाण वाढल्याचं आकडेवारीवरून दिसतंय.

‘कोविडच्या दुसरी लाटेमधे पहिल्याच्या तुलनेत लहान मुलांना जास्त संसर्ग होतोय. सोबतच, उलटा ट्रेण्डही दिसतोय. मुलांना लक्षणं पहिले दिसतायत आणि त्यांच्याकडून मोठ्या माणसांना लागण होतेय. पहिल्या लाटेत बहुतांश लहान मुलं असिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षणं न दिसणारी होती. पण दुसऱ्या लाटेत मुलांना ताप, सर्दी, कोरडा खोकला, जुलाब, उलट्या, अन्नावरची इच्छा उडणं, या नेहमीच्या लक्षणांसोबतच श्वास घ्यायला त्रास होणं, रॅश येणं अशीही लक्षणं दिसतायत,’ असं नवी मुंबईतल्या रिलायन्स हॉस्पिटलमधे काम करणारे बालरोगतज्ञ सुभाष राव यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका प्रतिक्रियेत सांगितलं.

कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब क्वारंटाईन करून डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्याची कोरोनाची टेस्ट करून घ्यावी लागते. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव आला मग तर १५ दिवस आयसोलेशनमधे रहावं लागतं. एखाद्या मोठ्या माणसाला हे शक्य होतं. ताप आलेला असतानाही एकटं राहून स्वतःची काळजी घेता येते. 

पण लहान मुलांचं काय? कोरोनाची लागण झाली तरी ही लहान मुलं स्वतःची काळजी घेण्याइतकी जबाबदार थोडीच होतात? त्यांची देखभाल मोठ्या माणसांनाच करावी लागणार. म्हणूनच देखभाल करणाऱ्या माणसाला संसर्ग होऊ न देता लहान मुलांची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यायला हवं.

पहिल्यांदा कोरोनाची टेस्ट

ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणं ही कोरोनाची लक्षणं अनेकदा साध्या फ्लूसारखीच वाटतात. त्यामुळे सर्दी झाली किंवा खोकला आला म्हणजे मुलांना लगेच कोरोना झाला, असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळेच लहान मुलांना कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसली तर पहिल्यांदा आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरोनाची टेस्ट करायला हवी. 

कोरोनाची टेस्ट करताना नाकामधे कापसाचा बोळा घालून सॅम्पल गोळा केलं जातं, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहितीय. अनेकदा ही प्रक्रिया मोठ्या माणसांनाही भीतीदायक किंवा किळसवाणी वाटते. मुलांच्या मनावर या टेस्टचा जास्त परिणाम होऊ शकतो. पीपीई कीट घातलेली माणसं पाहूनही त्यांना भीती वाटू शकते. म्हणूनच टेस्टला जाण्याआधीच त्यांना टेस्टिंगसाठी तयार करायला हवं.

सॅम्पल घेण्याच्या प्रक्रियेत दुखणार नाही, त्यात घाण काही नाही याची शाश्वती मुलांना द्यायला हवी. स्वॅब घेण्यासाठी मुलांनी शांत, एका जागी बसणं गरजेचं असतं. त्यासाठी त्यांना मनातल्या मनात आकडे मोजायला लावणं, गाणं म्हणायला लावणं किंवा त्यांची आवडती गोष्ट, बाहुली त्यांच्यासोबत नेणं अशा काही गोष्टी मदत करतील. ४ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना टेस्टिंग तयारी कशी करावी यावरचे वीडियोही युट्यूबवर दाखवता येतील.

हेही वाचा : कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

क्वारंटाईन करा पण एकटं सोडू नका

टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव आला तरच मुलांना कोरोना झालाय, असं म्हणता येईल. पण लक्षणं दिसू लागल्यापासून लगेचच ते रिपोर्ट येईपर्यंत आणि नंतरही रिपोर्ट पॉझिटिव आला तर मुलांना क्वारंटाइन करणं गरजेचं आहे. घरातल्या सगळ्या सदस्यांपासून, विशेषतः आजी आजोबा आणि पाळीव प्राण्यांपासूनही मुलांनी लांब रहायला हवं.

अर्थात, मोठ्या माणसांसारखं त्यांना एकट्याला एका खोलीत ठेवून चालणार नाही. त्यामुळेच मुलांसोबत निदान एका पालकाने तरी थांबायला हवं. अनेकदा घर मोठं असेल तर दोन्ही पालकांना मुलांसोबत राहता येतं. पण त्याही वेळी फक्त एकाच पालकाने मुलासोबत रहावं, असा सल्ला ‘टुडे’ वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या एका लेखात अमेरिकेतल्या हेलेन डिवोरो या लहान मुलांच्या हॉस्पिटलमधे काम करणारे डॉ. ऑलिवरो देतात. यामुळे दुसऱ्या पालकाला घरातल्या इतर मुलांची, सदस्यांची काळजी घेणं, आजारी मुलाला आणि त्यासोबतच्या पालकाला हवं नको ते पाहणं शक्य होईल.

मास्क घालायलाच हवा

समजा, मुलासोबत दोन्ही पालकही आजारी पडले तर मुलाची काळजी घेण्यासाठी एखाद्या दुसऱ्या माणसाला बोलवावं लागेल. पण, कोरोना वायरसचा धोका म्हाताऱ्या लोकांना जास्त असल्याने मुलांच्या आजीला किंवा आजोबांना बोलावून चालणार नाही.

हा काळजी घेणारा माणूस कुणीही असू दे, बाहेरचा असू देत किंवा मुलाच्या आईवडीलांपैकी कुणीतरी एक असू देत, त्यानं सतत मास्कचा वापर करणं फार गरजेचं आहे. आजारी पडलेलं मूलही २ वर्षांपेक्षा जास्त वयाचं असेल तर त्यालाही मास्कचा वापर करावा लागेल असं सेंटर फॉर डिसिज कंट्रोल या अमेरिकन संस्थेकडून सांगण्यात आलंय.

एन९५ किंवा युज अँड थ्रोच्या मास्कऐवजी कापडाचा तीन लेअरचा मास्क सगळ्यात चांगलाय, असंही सीडीसीकडून सांगण्यात आलंय. पण हा मास्क वेळोवेळी धुवून कडक उन्हात वाळवायला हवा.

हेही वाचा : कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

केअरिंग हवं, पण शेअरिंग नको

मास्कसोबतच दोन महत्त्वाच्या गोष्टी, हात धुणं आणि शारीरिक अंतर पाळणं हेही महत्त्वाचं आहे. मुलांची काळजी घेणाऱ्याने सतत सॅनिटायझरचा वापर करणं, हात धुणं फार गरजेचं आहे. आजारी मूल जिथं जिथं हात लावेल ती जागाही स्वच्छ करायला हवी. मूल ज्या रूममधे आहे ती रूम रोजच्या रोज फिनेलने पुसायला हवी. मुलांचे, काळजी घेणाऱ्या माणसांचे कपडे गरम पाण्यात लगेचच धुवायला हवेत. मुलांनी शिंकण्यासाठी, खोकण्यासाठी वापरलेले रुमाल, टिश्यू पेपर लगेच फेकून द्यायला हवेत.

शिवाय, मुलासोबत शक्य तितकं शारीरिक अंतरही काळजी घेणाऱ्या माणसाला पाळावं लागेल. त्यांच्याच ताटातून खाणं, त्यांचं पाणी पिणं टाळावं लागेल. त्यांच्यासोबतीनं काहीही वापरता येणार नाही. शक्य असेल तर दोघांनी दोन वेगळी बाथरूमही वापरायला हवीत. पण शक्य नसेल तर बाथरूम स्वच्छ ठेवणं आणि बाथरूमला जाताना मास्क घालून जाणं गरजेचं आहे. मुलांची काळजी घ्यायचीय, केअर करायचीय. पण त्यांच्यासोबत ताट, कपडे, रूमाल, पाणी, अंथरूण असं काहीही शेअर करायचं नाहीय.

आजारी असताना मुलांना आपली आई किंवा वडील जवळ असावेत, असं वाटत असतं. त्यांनी आपली काळजी घ्यावी, आपल्याला प्रेम करावं, कुरवाळावं असंही वाटत असतं. इतर फ्लूच्या वेळी ठीक आहे. पण कोविडच्या काळात ते का शक्य होणार नाही याची माहितीही आपण मुलांना सांगू शकतो. घरातल्यांपासून लांब राहिलो असलो तरी वीडियो कॉल, इंटरनेटच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी बोलू शकतो हे मुलांना समजेल अशा भाषेत सांगता येईल.

औषधोपचार चालूच राहू दे

क्वारंटाईन व्हायचं म्हणजे रूमची सगळी दारं खिडक्या बंद करून बसायचं, असा अनेकांचा समज असतो. याउलट, क्वारंटाईन असाल तर खोलीमधे हवा खेळती राहू द्या, असा सल्ला डॉक्टर वारंवार देत असतात. हेच मुलांच्याबाबतीतही लागू होतं. मस्त हवेशीर, चांगल्या वासाची खोली असेल तर मुलांनाही सकारात्मक वाटत राहील.

कोरोनासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं तर मुलांना वेळोवेळी द्यायचीच आहेत. पण त्यासोबतच आपण ताप, सर्दी कमी करण्यासाठी घरच्या घरी जे उपाय आपण नेहमी करतो, ते करायलाही हरकत नाही असा सल्ला ‘नारायणा हेल्थ केअर’च्या वेबसाईटवर तिथल्याच डॉक्टर उर्वशी राणा यांनी दिलाय. भारतात स्वस्त दरात दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणारी ‘नारायणा हेल्थ’ही खासगी हॉस्पिटल्सची चेन आहे.

महत्त्वाचं म्हणजे, भरपूर पाणी किंवा पातळ पदार्थ मुलं पितायत की नाही हे पाहणं फार महत्त्वाचंय असंही या लेखात म्हटलंय. पाणी, सरबत किंवा गरम सूप अशा पदार्थांनी हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. तोंडाची चव गेल्यानं मुलं नीट खात पीत नसतील तरी काळजी करण्याचं कारण नाही. मुलांनी भरपूर पाणी पिणं जास्त महत्त्वाचंय.

हेही वाचा : क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती का खावी वाटते?

मुलांना बिझी कसं ठेवणार?

या सगळ्यातला आव्हानात्मक भाग म्हणजे मुलांना कशात तरी गुंतवून ठेवणं. जरासं बरं वाटायला लागलं तर मुलं लगेचच मित्रांच्यात खेळायला जायचा किंवा बाहेर जायचा हट्ट करतील. तेव्हा त्यांना त्यांना खोलीत बसून कंटाळा येऊ नये यासाठी काही करायला हवं.

मुलांना बरं वाटत असेल तर दिवसातून थोडा वेळ थोडा अभ्यास करायला हरकत नाही. शक्य असेल तर शाळेच्या ऑनलाईन क्लासलाही बसता येईल. याशिवाय, पझल सोडवणं, वाचणं, एखादा खेळ खेळणं यानेही मुलांचा वेळ जाईल. दिवसभर टीवी बघत बसणं योग्य नाहीच. पण एखादा सिनेमा, कार्यक्रम पाहता येईल.

तुमच्या आरोग्यावरही लक्ष ठेवा

मुलांची काळजी घेताना त्यांना काही मोठी लक्षणं दिसत नाहीत ना तेही पहायला हवं. खूप जास्त ताप येत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा जुलाब, उलट्यांचा जास्त त्रास होत असेल तर लगेचच दवाखान्यात जाणं किंवा डॉक्टरांशी बोलणं योग्य ठरेल. पण यासोबतच काळजी घेणाऱ्याने स्वतःलाही काही त्रास होत नाही ना याकडे लक्षं द्यायला पाहिजे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुलांना जास्त संसर्ग होतोय हे जरी खरं असलं तरी या संसर्गानं कोणत्याही मुलाला फार मोठा त्रास झाल्याचं अजून तरी समोर आलेलं नाही. साध्या सर्दी खोकल्यासारखाच हा आजार मुलांना होतोय. फक्त अस्थमा, स्थूलता किंवा इतर मोठा आजार असेल तर मुलांना जास्त त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळेच काळजी करायची गरज नाही. मुलांसोबतच हा क्वारंटाईनचा वेळ मस्त एन्जॉय करता येईल.

हेही वाचा : 

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

आपण सारखं चेहऱ्याला हात का लावतो? ही सवय कशी मोडायची?

ताप मोजणाऱ्या बंदुकीनं कोरोना वायरसवर अचूक निशाणा साधता येईल?