असा होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा

०६ जून २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज शिवराज्याभिषेक दिन. छत्रपती शिवाजी महाराज मध्ययुगीन काळात होऊन गेले असले तरी त्यांनी लोकशाहीतल्या अनेक मूल्यांचं पालन केल्याचं दिसून येतं. त्यांच्या राज्याभिषेकानं संपूर्ण भारतात यावनी सत्तेला आव्हान देणारी सार्वभौम मराठी सत्ता निर्माण झाली. सिंहासन निष्ठेमुळे नंतर मराठ्यांनी अटकेपार जरीपटका फडकावला. अंधश्रद्धा नष्ट करून वैज्ञानिक दृष्टी भारताला दिली.

समाजाला चांगल्या कामाची प्रेरणा देण्यासाठी आपण उत्सव साजरे करतो. नैतिक आदर्शाची प्रेरणा देण्यासाठी आपण रामनवमी साजरी करतो. व्यावहारिक चतुरता आणि निष्काम कार्याची प्रेरणा देण्यासाठी आपण गोकुळ अष्टमी साजरी करतो. स्वातंत्र्याची प्रेरणा म्हणून आपण शिवराज्याभिषेक साजरा करतो. आज शिवराज्याभिषेक दिन आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मध्ययुगीन काळात होऊन गेले असले तरी त्यांनी लोकशाहीतल्या अनेक मूल्यांचं पालन केल्याचं दिसून येते. शिवाजी महाराज एक व्यक्ती नसून तो एक राष्ट्रीय विचार आहे. मध्ययुगाप्रमाणे आज लोकशाहीत ही स्वातंत्र्याची प्रेरणा आवश्यक आहे. भारतीय स्वातंत्र्ययुद्धात लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, बिपीनचंद्र पाल, रवींद्रनाथ टागोर इत्यादी नेत्यांना शिवचरित्राने प्रेरणा दिली.

शिवपूर्वकालीन सामाजिक स्थिती

इतिहासकार सर जदुनाथ सरकार लिहितात, ‘शिवाजी महाराजांचं राजकीय आदर्श असं होतं की, त्यामधे कोणताही बदल न करता आजही स्वीकार करू शकतो.’ म्हणून लोकशाहीतही राष्ट्रीय चरित्र घडवण्यासाठी शिवराज्याभिषेक साजरा करणं आवश्यक आहे.

एकेकाळी भारत संपन्न होता. ते स्वर्णयुग होतं. नालंदा, तक्षशिला आपली विद्यापीठं होती. कालांतराने मनुवादी विचारांनी भारताची प्रगती रोखली. त्यांनी अनेक चुका केल्या. त्यांनी समुद्रपार करणं निषिद्ध केलं. त्यामुळे व्यापार बुडाला. लोकमान्य टिळकांनाही समुद्रपार केल्यामुळे प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं. पण आपण हे विसरलो होतो की, रामायणात हनुमान समुद्र पार करून लंकेत पोचला होता.

परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली असं सांगितलं गेलं. त्यामुळे संरक्षण कमी झालं आणि परकीय आक्रमणं वाढली. पण आपण हे विसरलो की, एक वेळा निःक्षत्रिय केल्यावर पुन्हा क्षत्रिय कुठून आले? जबरदस्तीने ज्याचं धर्मांतर केलंय, त्यांना परत हिंदूधर्मात घेण्यास मनाई करणारा शुद्धीबंदी नियम केला. त्यामुळे परकीयांची संख्या वाढू लागली.

या सगळ्या अंधश्रद्धा शिवरायांनी नष्ट केल्या. त्यांनी आपले नौदल उभारले आणि स्वतः ‘बसनूर’वर जलमार्ग आक्रमण केलं. नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकर यांना जबरदस्तीने मुसलमान केलं होतं. त्यांना त्यांनी परत हिंदू धर्मात घेतलं आणि आपले नातेसंबंध जोडले. स्वतःचा सार्वभौम राज्याभिषेक करून त्यांनी क्षत्रिय नष्ट झालेले नाहीत तर आजही आहेत हे सिद्ध केलं. त्यामुळे लोकशाहीतही लोक त्यांचा राज्याभिषेक आनंदाने साजरा करतात.

हेही वाचा : राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

राज्याभिषेकाचा एकूण खर्च

शिवकालीन बखरकार कृष्णाजी अनंत सभासद लिहितात, ‘या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशहा, मराठा पादशहा येव्हढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.’ काही शतकं हा राज्याभिषेक समारंभ लुप्त झाला होता. राजपूत राजांचा मंचकारोहण समारंभ होई. सार्वभौम सत्ता प्राप्त करण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. धार्मिक दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी राज्याभिषेक होणं आवश्यक होतं.

राज्याभिषेकानंतर राजाला अनेक अधिकार प्राप्त होतात. अपराधी ब्राह्मणालाही हा राजा शासन करू शकतो. त्यामुळे ब्राह्मणांनी राजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. शिवाजी महाराजांनी अत्यंत चतुराईने हा विरोध मोडून काढला. मेवाडचे राजपूत क्षत्रिय सिसोदिया यांचे वंशज असल्याचं सिद्ध झाल्यावर गागा भट्ट यांनी मोठी दक्षिणा घेऊन हा राज्याभिषेक ६ जून १६७४ ला संपन्न केला.

या समारंभाला १ कोटी ४२ लाख होन खर्च झाले. एक होन म्हणजे आजचे ४ रुपये हा हिशोब बघितला तर एकूण खर्च लक्षात येईल. ब्राह्मणांची मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी २४ सप्टेंबर १९७४ ला शाक्तपंथीय विश्चलपुरीकडूनही तांत्रिक राज्यभिषेक करून घेतला.

राज्याभिषेकाचं ऐतिहासिक महत्त्व

शिवाजी महाराजांच्या सत्तेला धार्मिक आणि राजकीय मान्यता मिळाल्यानं अन्य सत्तांबरोबर समानतेचं नातं निर्माण झालं. त्यामुळे दक्षिण दिग्विजयास जाताना गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने बरोबरीच्या नात्याने त्यांचं स्वागत केलं.

राज्याभिषेकामुळे त्यांनी मराठ्यांमधे ‘सिंहायन निष्ठा’ निर्माण केली. या निष्ठेमुळेच मराठ्यांनी २७ वर्ष मोगलांशी संघर्ष केला आणि मोगल साम्राज्य आणि औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात खुल्दाबाद इथं बांधली. सेनापती हंबीरराव मोहिते यांनी अष्टप्रधानांचा कट उधळून लावला आणि आपले भाचे राजाराम यांना दूर करून युवराज संभाजीराजे यांना छत्रपती केलं.

संपूर्ण भारतात यावनी सत्तेला आव्हान देणारी सार्वभौम मराठी सत्ता निर्माण झाली. याच सिंहासन निष्ठेमुळे नंतर मराठ्यांनी अटकेपार जरीपटका फडकावला. अंधश्रद्धा नष्ट करून वैज्ञानिक दृष्टी भारताला दिली.

हेही वाचा : शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश

असा संपन्न झाला राज्याभिषेक समारंभ 

१६ मे ला महाराज भवानी देवीच्या दर्शनासाठी प्रतापगडावर गेले आणि सव्वा मण सोन्याची छत्री भवानीस अर्पण केली. २९ मेला गागा भट्टांनी महाराजांचे मौजी बंधन केलं. तुलादान विधी आणि प्रायश्चित विधी पार पाडले. हयात राण्यांशी पुन्हा वैदिक पद्धतीने विवाह केले. ६ जून १६७४ इ. ज्येष्ठ शुद्ध 13 शनिवार या दिवशी राज्याभिषेक समारंभ संपन्न झाला. 

३२ मण सोन्याचे हिरे माणके जडविलेल्या सिंहासनावर महाराज आरूढ झाले. मागे तराजू, मासा आणि घोड्याची शेपूट या वस्तू प्रतीकरूपाने लावलेल्या होत्या. तराजू म्हणजे न्यायीराजा, मासा म्हणजे सागरावर सत्ता गाजवणारा राजा आणि घोड्याची शेपूट म्हणजे घोडदळाचा शक्तिशाली राजा, आठ दिशांना आठ प्रधान, पट्टराणी सोयरा, युवराज संभाजी आणि राजमाता पायरीवर विराजमान होते.

सगळ्या गडावर तोफा गरजल्या आणि मराठ्यांचा राजा छत्रपती झाल्याची घोषणा केली. शस्त्रपूजा करून अश्वारूढ आणि हत्तीवर बसून गडावरच्या देवतांचं दर्शन केलं. हत्तीवर माहूत म्हणून सेनापती हंबीरराव मोहिते होते आणि अंबारीमधे मोर्चेल धरून मोरोपंत बसले होते. त्या काळी गडावर हत्ती कसे नेले हे एक कोडे आहे.

शिवराज्याभिषेकाचा लोकोत्सव

हा समारंभ तिथीनुसार केल्यास दरवर्षी तारीख बदलते. संपूर्ण भारतातही एकाच वेळी समारंभ होऊ शकत नाही. कारण नर्मदा नदीच्या दक्षिणेस आमचा मराठी महिना अमावास्येनंतर सुरू होतो आणि नर्मदेच्या उत्तरेस पौर्णिमेनंतर भारतीय महिना सुरू होतो. यामुळे तारखेनुसार ६ जूनला समारंभ केल्यास सगळ्या भारतभर आणि जगभर एकाच दिवशी समारंभ होईल. 

कोल्हापूरचे शिवप्रेमी तारखेनुसार समारंभ करत असताना तिथीवाद्यांनी त्यांना मारहाण केली. दुसऱ्या वर्षी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुलांना मोफत जेवण आणि अल्पदरात प्रवास या सोयी दिल्या. हजारो कोल्हापुरी पैलवान रायगडावर दाखल झाले. तिथीवाल्यांशी संघर्ष झाला आणि तिथीवाले पळून गेले. त्यानंतर ते अडथळा करत नाहीत. 

देशभरातून लाखो शिवप्रेमी रायगडावर या समारंभासाठी येतात. आता हा लोकोत्सव केलाय. देशातीत, कालातीत आणि धर्मातीत प्रेरणा देणारे हे चरित्र आहे. यांचे विस्मरण झाल्यास संकट ओढवेल. उज्ज्वल भवितव्यासाठी हा उत्सव होणं आवश्यक आहे.

हेही वाचा : 

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?