फेसबुक असो वा ट्वीटर, गेल्या महिन्याभरात अनेकांच्या टाईमलाईनवर हिरव्या-पिवळ्या ठिपक्यांची रांगोळीवजा पोस्ट दिसून आली. या रांगोळीची निर्मिती करण्यामागे ‘वर्डल’ नावाच्या एका इंटरनेट गेमचा हात आहे. आपल्या साथीदारासाठी भेटवस्तू म्हणून एका इंजिनीयरने बनवलेला हा गेम आज जगभर आवडीने खेळला जातोय.
सध्या अगदी बोटांच्या टोकावर जगभरातल्या ताज्या घडामोडी कळत असतानाही फक्त शब्दकोड्यांसाठी वर्तमानपत्र घेणारा मोठा चाहतावर्ग आजही टिकून आहे. मोठा वाचकवर्ग असला तरीही शब्दकोडी न छापणारी वर्तमानपत्रं तशी दुर्मिळच. पण हे शब्दकोडं आता फक्त छापील स्वरूपापर्यंतच मर्यादित न राहता डिजिटल माध्यमावरही आपली वेगळी छाप पाडण्यात यशस्वी ठरलंय. सध्या जगभरात गाजत असलेलं ‘वर्डल’ हे त्याचंच एक आधुनिक रूप आहे.
‘वर्डल’ची निर्मिती जरी एका अमेरिकन इंजिनीयरने केली असली तरी त्याच्यावर खरा हक्क एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचा आहे. पलक शाह असं तिचं नाव. पलकला शब्दकोडी सोडवायची आवड होती. पण कोरोनाकाळात ती आणि तिचा साथीदार जॉश वॉर्डल रोजच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’मधे येणारी शब्दकोडी आणि ‘स्पेलिंग बी’ सोडवून अक्षरशः कंटाळले होते. त्यामुळे त्यांना अशा नव्या खेळाची गरज होती ज्यात त्यांच्या बुद्धीमतेचा कस लागेल.
व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या जॉशने पलकसाठी ‘वर्डल’ नावाचा गेम बनवला. हा गेम मात्र तिला प्रचंड आवडला. या गेमची रचना १९९५च्या ‘लिंगो’ या टीवी गेम शोसारखीच आहे. त्यामुळे २०२१च्या ऑक्टोबरमधे जेव्हा जॉशने हा गेम आपल्या नातेवाईकांसाठी खुला केला, तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या गेमला मिळालेलं नावही जॉशच्याच नातेवाईकांनी त्याला सुचवलंय.
‘वर्डल’ हा गेम ‘जिंकणं’ अवघड असलं तरी तो ‘खेळणं’ बरंच सोप्पं आहे. या खेळात खेळाडूला एक पाच अक्षरी इंग्लिश शब्द शोधायचा असतो. पण त्यासाठी तो फक्त सहावेळाच प्रयत्न करू शकतो. खेळाडूला स्क्रीनवर आडवे सहा आणि उभे पाच रिकामे ठोकळे आणि त्या ठोकळ्यांखाली कीबोर्डही दिसतो. खेळाडूने तो कीबोर्ड वापरून अंदाजे एक पाच अक्षरी शब्द बनवायचा असतो.
यात खेळाडूला निरर्थक शब्द टाळून उत्तराचा अंदाज लावायचा असतो. खेळाडूने त्याच्या अंदाजाने एखादा शब्द टाईप केल्यावर तो चूक आहे की बरोबर हे लगेच त्याला कळतं. जर शब्द चुकीचा असेल तर ठोकळ्यांचा रंग करडा होतो. त्याचबरोबर करड्या ठोकळ्यातली अक्षरं बाद ठरतात. पण जर टाईप केलेल्या शब्दातलं एखादं अक्षर उत्तराशी जुळत असेल तर मात्र ते अक्षर असलेल्या ठोकळ्याचा रंग बदलतो.
जर उत्तराशी जुळणारं अक्षर अंदाजे टाईप केलेल्या शब्दात योग्य स्थानावर असेल, तर ठोकळ्याचा रंग हिरवा होतो. जर स्थान चुकलं तर ठोकळ्याचा रंग पिवळा होतो. पुढचा अंदाज लावताना खेळाडूने हिरव्या ठोकळ्यातलं अक्षर त्याच ठिकाणी ठेवणं, पिवळ्या ठोकळ्यातल्या अक्षराची जागा बदलणं आणि करड्या ठोकळ्यातल्या अक्षरांकडे दुर्लक्ष करणं अपेक्षित असतं.
हेही वाचा: आयपॉड क्रांतीची सतरा वर्षं
हा गेम खरंतर एकट्या पलकसाठी भेटवस्तू म्हणून बनवला गेला होता. पण जॉशच्या नातेवाईक आणि मित्रांचा प्रतिसाद बघून जॉशने ‘वर्डल’ सगळ्यांसाठी खुलं करायचं ठरवलं. गेम इंटरनेटवर सगळ्यांसाठी उपलब्ध करून देणं काही अवघड काम नव्हतं, कारण जॉशने या गेमचा प्रोटोटाईप म्हणजेच मूळ नमुना २०१३मधेच बनवला होता पण तेव्हा तो फारसा कुणाला आवडला नव्हता.
जॉशने नव्याने गेम बनवताना शब्दकोडी सोडवण्यात पटाईत असलेल्या पलकसाठी बनवला असल्याने तो इतरांसाठी तसा अवघडच होता. पलकने हा गेम सोपी व्हावा यासाठी बरीच मेहनत घेतली. तिने १२००० इंग्रजी शब्दांमधून जवळपास रोजच्या वापरातले २३१५ शब्द वेगळे काढून या गेमसाठी शब्दकोश तयार केला. त्यानंतर जॉशने एक वेगळी वेबसाईट बनवून त्यावर हा गेम उपलब्ध करून दिला.
या वेबसाईटवर गेम सोडून दुसरं काहीच नव्हतं. खेळात व्यत्यय आणणाऱ्या अनावश्यक जाहिराती नव्हत्या. खेळाडूंची माहिती गोळा करणारं कसलंही छुपं किंवा खुलं तंत्रज्ञानही त्यात नव्हतं. कसलीही अनावश्यक सजावट, भडक रंगसंगती त्यात वापरली नव्हती. त्यामुळेच लोकांना ‘वर्डल’ भावलं. १ नोव्हेंबर २०२१ रोजी कशीबशी नव्वदी गाठलेल्या खेळाडूंच्या आकड्याने २ जानेवारी रोजी तीन लाखापर्यंत मजल मारली होती.
सध्या ‘वर्डल’चे अनेक वर्जन इंटरनेटवर उपलब्ध आहेत. इतकंच नव्हे तर इंग्रजी भाषेचं चांगलं ज्ञान असणाऱ्यांच्या तुलनेत इतरांना ‘वर्डल’ जास्त अवघड वाटल्यामुळे वेगवेगळ्या भाषांमधेही हा गेम आता बनवला जातोय. पण खरंतर हे एक आव्हानात्मक काम असल्याचं ‘वर्डल’च्या फसलेल्या फ्रेंच प्रयोगावरून लक्षात आलं. सध्या पोर्तुगीज, चीनी, उर्दू आणि मराठी भाषेतही ‘वर्डल’ उपलब्ध आहे.
नोव्हेंबरपासून पुढच्या दोन महिन्यात तब्बल तीन हजार पटीने वाढलेली ‘वर्डल’ खेळाडूंची संख्या या गेमचं व्यसनात रुपांतर होण्याचं लक्षण आहे. जॉशने २०१३मधे बनवलेला प्रोटोटाईप अमर्यादित स्वरूपाचा होता. त्यात खेळाडू कितीहीवेळा हा गेम खेळू शकत होता. पण नव्या ‘वर्डल’मधे एक खेळाडू दिवसाला एकदाच हा गेम खेळू शकतो. पुन्हा खेळण्यासाठी त्याला दुसऱ्या दिवसाची वाट बघावी लागते.
हा गेम खऱ्या अर्थाने तेव्हा वायरल झाला जेव्हा जॉशने गेमचा निकाल सोशल मीडियावर शेअर करण्याची सोय उपलब्ध करून दिली. हा निकाल पांढऱ्या, करड्या, हिरव्या आणि पिवळ्या ठोकळ्यांच्या इमोजी स्वरुपात शेयर केला जात होता. निम्मा डिसेंबर संपत आला, तसतशी कित्येकांची टाईमलाईन या सहा बाय पाच ठिपक्यांच्या रांगोळीने रंगू लागली आणि साहजिकच गेमचा प्रसार वाढत गेला.
फक्त सहा अंदाजांमधे एक शब्द शोधण्याचा हा खेळ खरोखरच अवघड आहे. ‘वर्डल’ खेळण्यासाठी सर्वोत्तम स्टार्टर म्हणजेच सुरवातीचा शब्द कोणता वापरायचा हे सांगणारे असंख्य वीडियो युट्यूबवर आहेत. पण प्रत्येक खेळाडूला दररोज नवा आणि इतरांपेक्षा वेगळा शब्द शोधावा लागत असल्याने हे वीडियो कुचकामी ठरतायत. इतरांच्या टाईमलाईनवरची रांगोळी बघून आपली रांगोळी अधिक आकर्षक बनवण्यासाठी होणारी चढाओढच या गेमला व्यसन बनवण्यासाठी जबाबदार आहे.
हा गेम खेळण्याबरोबरच त्याच्या शेयर केलेल्या रांगोळीतून एखादं चित्र बनवण्याचा प्रचंड आव्हानात्मक ध्यास बऱ्याच जणांनी घेतलाय. या गेमला मिळालेल्या अशा प्रतिसादामुळे जॉश आणि पलक भारावून गेलेत. विशेषतः जॉशसाठी हा प्रतिसाद आणखीनच महत्त्वाचा आहे. कारण इंटरनेटवरची वर्दळ आपल्या वेगवेगळ्या प्रयोगांमधे गुंतवून ठेवण्याचा त्याचा हा तिसरा प्रयत्न आहे आणि त्याला नेटकऱ्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिलाय.
हेही वाचा: तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ
‘वर्डल’ हा जॉशचा आत्तापर्यंतचा तिसरा इंटरनेट प्रयोग आहे. इंटरनेटवर एका क्षणात इकडून तिकडं पळणाऱ्या लोकांना खिळवून कसं ठेवायचं हे त्याला चांगलंच जमलंय. याआधी त्याने ‘रेडीट’ या वेबसाईटवर ‘द बटन’ आणि ‘प्लेस’ या गेम बनवल्या होत्या. त्यावेळी तो ‘रेडीट’च्या कम्युनिटी इंजिनियरींग टीममधे प्रोडक्ट मॅनेजर होता.
‘द बटन’ हा गेम १ एप्रिल २०१५ला सुरु झाला होता आणि ५ जून २०१५ला तो बंद करण्यात आला. या गेममधे स्क्रीनवर ६० सेकंदाचा काऊंटडाऊन टायमर आणि त्याबाजूला एक बटन दिलं होतं. बटन दाबल्यावर हा उलटा टायमर सगळ्यांसाठी परत साठाव्या सेकंदापासून चालू व्हायचा. हा गेम फक्त १ एप्रिल २०१५पूर्वी रेडीटवर नोंद झालेल्या अकाऊंटसाठी बनवला होता. यात एक अकाऊंट फक्त एकदाच बटन दाबू शकत होतं. ५ जूनला तो टायमर शून्यावर पोचला आणि गेम बंद झाला. तोवर तब्बल दहा लाखांहून जास्त वेळा ते बटन दाबलं गेलं होतं.
जॉशच्या पुढच्या ‘प्लेस’ या गेममधे एक पिक्सेल कॅनव्हास खेळाडूंसमोर होता, ज्यात प्रत्येकजण आपल्या आवडीचा रंग घेऊन एक पिक्सेल रंगवत होता. पुढचा पिक्सेल रंगवण्यासाठी त्याला काही मिनिटं वाट पहावी लागायची. अनेकांनी या गेममधे आपली आवडती पात्रं, झेंडे चितारण्याचा प्रयत्न केला होता. यात मोनालिसाच्या जगप्रसिद्ध पेंटिंगचाही समावेश होता. ‘प्लेस’ तर फक्त तीनच दिवस चालला पण तेवढ्या कालावधीतही दहा लाख खेळाडूंची नोंद झाली होती तर गेम बंद करताना ९०००० खेळाडू ऑनलाईन होते.
जॉशच्या ‘वर्डल’ची दखल जगभरातल्या आघाडीच्या वर्तमानपत्रांनी घेतलीय. ‘वर्डल’ची वाढती लोकप्रियता पाहता ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने तर डॉलरमधे सात आकडी रक्कम मोजून जॉशकडून ‘वर्डल’च विकत घेतलंय. ‘द न्यूयॉर्क टाईम्स’कडे आधीच स्पेलिंग बी आणि क्रॉसवर्डसारखी उत्तम शब्दकोडी आहेत. पण सर्वाधिक डिजीटल ग्राहक बनवण्याचा ध्यास घेतलेल्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’साठी ‘वर्डल’ खऱ्या अर्थाने एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या या खेळीने वर्तमानपत्रांना शब्दकोड्यांची गरज का पडते हा प्रश्न पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलाय. वर्तमानपत्रांमधल्या शब्दकोड्यांचा इतिहास तसा एक शतकभर जुना आहे. यात सुडोकूसारख्या जपानी गणिती कोड्याचाही समावेश आहे. कालानुरूप शब्दकोडी बदलत चाललीत पण ती बंद झालेली नाहीत. आजही लोक कधी फावल्या वेळात तर कधी खास वेळ काढून शब्दकोडी सोडवताना दिसतात.
अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या एका अहवालानुसार, शब्दकोडी सोडवल्याने स्मरणशक्तीसंबंधित आजारांचं प्रमाण कमी झालंय. नियमितपणे शब्दकोडी सोडवल्याने प्रामुख्याने उतारवयात जाणवणाऱ्या स्मृतीभ्रंशाच्या आजारापासून किमान दोन ते तीन वर्षं आणखी लांब राहता येत असल्याचं या संशोधकीय अहवालातून समोर आलंय. सुडोकू सोडवल्याने स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती तर वाढतेच, त्याचबरोबर एकाग्रताही वाढीस लागल्याचं निष्पन्न झालंय.
हेही वाचा:
श्यामकांत मोरे: कम्युनिटी किचनच्या जनकाची जन्मशताब्दी
ई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे?