जालियॉंवाला बाग हत्याकांड हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा टर्निंग पॉईंट 

१३ एप्रिल २०१९

वाचन वेळ : १८ मिनिटं


जगातील क्रूर आणि सूड बुद्धीने केलेल जालियॉंवाला बाग हत्याकांडाला १३ एप्रिल २०१९ ला १०० वर्षं झाली. हे हत्याकांड भारतातल्या ब्रिटिश राज्याच्या शेवटाला सुरुवात झाली. अमृतसरमधे प्रत्यक्ष जाऊन, पाहून, अभ्यासकांशी बोलून १०० वर्षांपूर्वीच्या घटनेची उलगडलेली ही कहाणी.

एअर इंडियाची दिल्ली-अमृतसर फ्लाईट. एप्रिल महिन्यातली संध्याकाळची सहाच्या आसपासची वेळ. खिडकीतून बघितलं तर धुरकट होतं. या धुरकट, मळकट, फिकट थराखाली कुठं तरी अमृतसर लपलेलं होतं. हळूहळू धुसरपणा कमी होऊन दिसू लागलं. शेतं, झाडी, डोंगर, अधूनमधून लागलेले दिवे. सरळ गेलेल्या रस्त्याची फिकट रेघ. तो रस्ता कदाचित अमृतसरकडे जात असेल. 
या धुसर दृश्यात एक धुसर भूतकाळ लपलाय. 99 वर्षांपूर्वीचं अमृतसर, त्यावेळी सुद्धा एप्रिल महिन्यातली संध्याकाळच होती.

गोळ्या झाडण्याचे आदेश दिले

आकाश ढगाळ-मळकट होतं. एक ब्रिटिश फौजी अधिकारी ब्रिगेडियर जनरल रेगिनाल्ड डायर हा त्याच्य़ा तुकडीसह जालियाँवाला बागेच्या चिंचोळ्या प्रवेशद्वारातून आत शिरला. समोरच्या मैदानाला समांतर दोन्ही बाजूंना सैनिकांना सज्ज करून मधल्या नैसर्गिक उंचवट्यावर उभं राहत त्याने आदेश सोडला,
“फायरऽऽ”
आणि मैदानात हाहाकार उडाला. तिथं सभा सुरू होती. सभेसाठी हजारो माणसं जमली होती. ती निःशस्त्र होती, निरपराध होती. त्यांच्यावर गोळ्या बरसल्या. शेकडो धराशायी झाले. अनेकांना कायमच अपंगत्व आल. जगाच्या इतिहासातलं एक सूड घेऊ हत्याकांड जालियाँवाला बागेत घडलेल. तो दिवस होता १३ एप्रिल १९१९.

ब्रिटिशांना भीती होती

अफगाणींसोबतच्या एका लढाईत ब्रिटिशांच्या फौजेत २१ शीख सैनिक शामील होते आणि त्यांनी १० हजार अफगाण्यांचा सामना केलेला. सर्व सैनिक शहीद झाले मात्र त्यांनी समोरच्या तुकडीतल्या ६०० जणांचा खातमा केलेला. या पराक्रमाच्या स्मरणार्थ अमृतसरमधे एक गुरुद्वारा बांधला, जो आजही सारागढ़ी गुरुद्वारा म्हणून प्रसिद्ध आहे.

पंजाबला ‘भारताची तळपती तलवार’ म्हटल जात. महायुद्धाच्या काळात त्यांची जबरदस्ती सैन्यात भरती केलेली. सातत्यान चार वर्षं असच घडत होत. त्यामुळे याचा राग सैनिकांच्या मनात खदखदत होता. त्या रागात बगावत करणार अशी भिती ब्रिटिशांना होती.

हेही वाचाः जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ

त्या हत्याकांडादिवशी काय घडलेलं?

‘जंग-ए-आझादी’ हे जालंधरजवळ कर्तारपूर गावात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात पंजाबच्या योगदानाचा इतिहास सांगणारे म्युझियम उभं केलंय. 

जालियाँवाला बाग घटनेच्या साधारण आठवडाभर आधीच्या घडामोडींवर ते प्रकाश टाकत होत. ९ एप्रिल १९१९ला रामनवमी होती. परंपरेनुसार रामरथ निघाला होता. मात्र या वेळची मिरवणूक विशेष होती. 

हिंदू, मुस्लिम आणि शीख भेद विसरून मिरवणुकीत सामील झालेले. अरुंद रस्ते माणसांनी खच्चून भरले होते. हिंदू मुसलमानांच्या हातून पाणी पीत होते. हिंदूंनी दिलेला प्रसाद मुसलमान घेत होते. मिरवणुकीत फलक झळकत होते- ‘हिंदू-मुसलमान एकता की जय हो’-  नारे दिले जात होते- ‘गांधी की जय’, ‘हिंदू-मुसलमान एकता की जयऽऽ’

मिरवणूक कतरा अहलुवालिया भागात आली, तेव्हा हिंदू-मुसलमानांची ही एकी पाहून अलाहाबाद बँकेच्या सज्जावर उभा असलेला माइल्स आयर्विंग हादरला. हे धोकादायक असल्याच त्याला वाटणं स्वाभाविक होतं. ब्रिटिशांना हिंदू-मुसलमान एकीचं भय होतंच अन् त्या एकीत लढवय्या शीख समाजाचा तिसरा कोनही सामील होता. या तिन्ही समाजांचं ऐक्य पंजाबचा प्रशासक ओ’डवायरला तातडीने कळवल गेल. 

ब्रिटिशांचा क्लॉक टॉवर उद्धवस्त केला

अमृतसर हे १९१९मधे पंजाबातील दुसर्‍या क्रमांकाचं शहर होतं. एक लाख ६० हजारांच्या आसपास त्याची लोकसंख्या होती. मुसलमान जवळपास ५२ टक्के, तसंच हिंदू आणि शीख यांचं प्रमाण जवळपास ४८ टक्के होतं.

सुवर्णमंदिराच्या परिसरात ब्रिटिशांनी बांधलेला क्लॉक टॉवर आता अस्तित्वात नाही. तो आता फक्त जुन्या छायाचित्रांत किंवा रेखाटनांमधे दिसतो. सुवर्णमंदिराच्या तळ्याकाठीच इंग्रजांनी १८७४मधे जुन्या गॉथिक शैलीत क्लॉक टॉवर उभारला होता. १४५ फूट उंचीचा हा टॉवर अमृतसरमधे कोठूनही दिसत असे. 

मात्र हे शिखांना त्रास देणारं होतं. शिखांना कमी लेखण्यासाठीच इंग्रजांनी दरबारसाहिबपेक्षा उंच असं हे बांधकाम त्याच परिसरात केल्याची या समाजाची भावना होती. त्यामुळे दरबारसाहिब परिसराचं नियंत्रण गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या हाती येताच १९४५मधे हा टॉवर उद्ध्वस्त करण्यात आला. तेव्हा देशात ब्रिटिशांचीच सत्ता होती, हे विशेष. 

आता सुवर्णमंदिराच्या उंच, भव्य, विशाल संगमरवरी प्रवेशद्वारावरील घड्याळ हेच क्लॉक टॉवर म्हणून ओळखलं जातं. 

हेही वाचाः तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

रामनवमीआधी पंजाबमधे शांतता पसरलेली

“रामनवमी के तीन दिन पहले- छह एप्रिल को पूरे पंजाब में हडताल मनाया गया था; शायद पूरे देश में। गांधी का नाम
अब पूरे देश में उभर रहा था, नेता के रूप में। सत्याग्रह का यह उनका पहला पॅन इंडिया कॉल था, रौलेट कानून के खिलाफ। अमृतसर सौ प्रतिशत बंद रहा उस दिन। दुकाने नहीं खुली। स्कूले बंद रही। कचहरियाँ खाली रही। सडके सुनसान पडी रही।

‘पुरी शांति थी उस दिन। कोई वारदात नहीं हुई। सिर्फ क्लॉक टॉवरपर एक पोस्टर लगा था- ‘जब तक रौलेट कानून का नाम हिंदुस्तान से मिट नहीं जायेगा, तब तक हिंदू और मुसलमान चूप नहीं बैठेगा।  यह शायद किसीने जोश में आकर लिखा होगा। गांधी के कॉल में हिंसा की कोई बात नहीं थी। वह मरने को कहते, मारने को कभी नहीं। अहिंसा ही उनके सत्याग्रह की बुनियाद थी।‘ हरीश शर्मा इतिहास उलगडत होते. 

रौलेट कायदा लागू केला

पहिलं महायुद्ध संपलं होतं. या महायुद्धात हुकमतीच्या जोरावर ब्रिटिशांनी भारताची संपत्ती व मनुष्यबळ वापरलं होतं. आता भारताला ब्रिटिशांकडून मर्यादित स्वातंत्र्य अपेक्षित होतं. या मागणीनं राजकीय वातावरण तापलं होतं. या पार्श्वभूमीवर ब्रिटिश पंतप्रधान लॉईड जॉर्ज यांच्या मंत्रिमंडळातील भारतमंत्री ई. एस. मॉन्टेग्यू आणि भारताचे व्हाईसराय चेम्सफोर्ड यांनी सत्तेत भारतीयांचा सहभाग वाढवण्याची व भारताला टप्प्याटप्प्यानं ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. 

या घोषणेची शाई वाळण्याआधीच भारतातील ब्रिटिश सरकारने न्या. सर सिडनी रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित राजद्रोह समितीने सुचवलेल्या शिफारशींना अनुसरून दोन विधेयकं विधी मंडळात मांडण्यात आली. अराजकता माजवण्याचे प्रयत्न आणि बंडखोर कारवाया रोखण्यासाठी नव विधेयक होत. भारतीयांना वेठीस धरणार विधेयक मार्च १९१९ला मंजूर होऊन त्यांचं कायद्यात रूपांतरही करण्यात आलं. 

त्यानुसार अशा कृत्यांमधे सहभागी असल्याच्या निव्वळ संशयावरून कोणालाही विनाचौकशी, विनाखटला तुरुंगात डांबण्याचा अधिकार यंत्रणेला मिळालेला. याला जरी ‘अराजक माजवण्याचे प्रयत्न आणि बंडखोर कारवायांना प्रतिबंध कायदा’ असं नाव देण्यात आलं होतं, तरी तो रौलेट कायदा म्हणूनच प्रसिद्ध झाला. 

रौलेट कायद्याविरोधात अहिंसक चळवळ

एकीकडं भारतीयांना स्वातंत्र्याची आशा दाखवणार्‍या मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा आणि दुसरीकडं भारतीयांच्या स्वातंत्र्याचा संकोच करणारा रौलेट कायदा अशा ब्रिटिशांच्या दुटप्पी धोरणाला महात्मा गांधींनी सत्याग्रहाच्या मार्गाने विरोधाचा एल्गार केला. गांधींच्या राष्ट्रीय नेतृत्वाची ही सुरुवात होती. अहिंसा आणि असहकार ही या चळवळीची मुख्य तत्त्वं होती. 

रौलेट कायद्याच्या विरोधात गांधींनी प्रथम ३० मार्च रोजी देशव्यापी हरताळाची घोषणा केली होती, परंतु अल्पकाळात तिचा देशभरात प्रसार होऊ न शकल्याने ६ एप्रिल ही नवी तारीख त्यांनी निश्चित केली होती. गांधींच्या घोषणेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुरळक अपवाद वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

६ एप्रिल रोजी अमृतसरमधे कडकडीत हरताळ पाळला गेला. त्याआधी ३० मार्चलाही हरताळ यशस्वी झाला होता. अमृतसरमधे या हरताळाचं नेतृत्व करणार्‍यांमधे डॉ. सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दीन किचलू ही नावं ठळकपणे समोर आली. 

ब्रिटिशांची कटकारस्थानं

सत्यपाल हे वैद्यकीय व्यावसायिक होते, तर किचलू हे वकील होते. दोघेही सत्याग्रही होते. गांधींचे अनुयायी होते. दोघेही लोकप्रिय होते आणि हिंदू-मुस्लिम-शीख ऐक्य घडवून आणण्यात ते यशस्वी झाले होते. हरताळ शंभर टक्के यशस्वी होण्यामागील त्यांची ताकद व प्रभाव पाहून आयर्विंग चकित आणि आतंकितही झाला होता.  मात्र ९ एप्रिलला अमृतसरमधून सत्यपाल आणि किचलू यांच्या हद्दपारीचा तो आदेश निघाला.

इंग्रजी साहित्याचे अभ्यासक परमिंदरजींचा पंजाबी म्हणाले, ‘१९१९ में पुरा अमृतसर शहर उस पार था और इस पार ब्रिटिश सिव्हिल और मिलिटरी अफसरोंके बंगलोज तथा अंग्रेजोंकी कॉलनी थी।‘ अमृतसर कँटोन्मेंट भागात अजूनही जुन्या सरकारी इमारती, वसाहती, रस्ते आहेत. त्यावरून जुन्या सिव्हिल लाइन्सची कल्पना करता येऊ शकते.

९ एप्रिलच्या रात्री डेप्युटी कमिशनर माइल्स आयर्विंगच्या बंगल्यात ब्रिटिश अधिकार्‍यांची बैठक झाली. डॉ. सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दीन किचलू यांच्या अटकेनंतरच्या संभाव्य परिस्थितीची व तिच्या हाताळणीची चर्चा करून त्यांनी योजना आखली. 

बैठकीतल्या योजनेनुसार डॉ. सत्यपाल व डॉ. किचलू यांना निरोप गेले. दहा एप्रिलला  सकाळी दहा वाजता दोघेही डेप्युटी कमिशनरच्या बंगल्यावर आले. त्यांनाही तिथं कशासाठी बोलावलं याची कल्पना असावी. त्यांच्या बरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी कोणत्याही परिस्थितीत शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. आयर्विंगने ओ’डवायरचा आदेश दोघांना दाखवल्यावर ते मोटारींमधे शांतपणे बसले. त्यांना घेऊन मोटारी सिमल्याजवळील धरमशालाकडे रवाना झाल्या. 

हेही वाचाः आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?

आमचे नेते कुठे आहेत?

हे सुरू असताना रेल्वे स्टेशनकडे येणारा पूर्वेकडील रेगो ब्रिज, पश्चिमेकडील सिव्हिल हॉस्पिटलजवळील रेल्वे क्रॉसिंग, हाल गेटकडून सिव्हिल लाइन्स मार्गावरचा रेल्वे ब्रिज अशा सर्व ठिकाणी बंदोबस्तासाठी शिपाई तैनात केलेले. सत्यपाल व किचलू यांच्या अटकेची बातमी सकाळी अकराच्या सुमारास शहरात पसरली. त्याच वेळी पलवल येथील गांधींच्या अटकेची बातमीही लोकांना समजली. 

दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे दुकानं बंद केली. शहरातले सर्व व्यवहार ठप्प झाले. शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर लोक गोळा होऊ लागले. पन्नास हजारांचा जमाव कतरा जैमलसिंग भाग, हाल बाजार पार करून हाल गेटकडून सिव्हिल लाइन्समधील डेप्युटी कमिशनरच्या बंगल्याकडे निघाला. 

आमचे नेते कोठे आहेत, हा एकच प्रश्न त्यांना आयर्विंगला विचारायचा होता. या जमावाला रेल्वे पुलावर रोखण्यात आलं. दुसर्‍या बाजूने बग्गा आणि रत्तो या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून निघालेला मोर्चा रेगो पुलावर अडवण्यात आला. दोन्हीकडील जमाव अस्वस्थ, तरीही शांत होता. मोठ्या संख्येने असलेल्या या जमावाकडून कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. 

पुलांवर बंदोबस्तासाठी घोड्यांवर स्वार असलेल्या शिपायांकडे रायफली व बंदुका होत्या. हाल गेटकडील रेल्वे पुलावर तैनात असलेला असिस्टंट कमिशनर आर. बी. बेकेट ओरडून जमावाला मागे फिरण्यास सांगत होता. जमाव पुलावरच बैठक मारून छात्या पिटत सरकारी कारवाईचा निषेध करू लागला. ‘गांधी की जय’, ‘डॉ. सत्यपाल की जय’, ‘डॉ. किचलू की जय’ अशा घोषणा देऊ लागला. 

जमावातल्या एकाने बेकेटला सवाल केला, “डॉ. सत्यपाल कोठे आहेत?” दुसर्‍याने विचारले, “डॉ. किचलू कोठे आहेत?” बेकेटने ‘मला माहीत नाही’ अशा अर्थाने मान हलवली. जमावातली अस्वस्थता हळूहळू वाढत होती. 

आणि ब्रिटिशांनी गोळीबार सुरु केला

जमाव पुढे सरकू पाहत होता. घोड्यावर स्वार असलेल्या शिपायांनी जमावाच्या दिशेने गोळीबार केला. तीन-चार जण जागेवरच गतप्राण झाले. अनेक जण जखमी झाले. आतापर्यंत शांत असलेला जमाव आता बिथरला. संतापाची लाट उसळली. जमावाने शिपायांवर दगडफेक सुरू केली. बेकाबू झालेल्या जमावाला रोखण्यासाठी एक्स्ट्रा-असिस्टंट कमिशनर एफ. ए. कॉनॉर याने शिपायांना आणखी गोळीबाराचा आदेश दिला. 

त्यात अनेक जण ठार झाले. वकील गुरुदियालसिंग सलारिया आणि मकबूल महमूद एकीकडं जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, दुसरीकडं अधिकार्‍यांना गोळीबार थांबवण्याची निष्फळ विनंती करत होते.

जमावातल्या लोकांचा राग अनावर झाला आणि आता हाल गेटच नामकरण आता गांधी गेट केलय. पण तरी आजही इंग्रजांची याद राखत हाल गेट हेच नाव प्रचलित आहे. ९९ वर्षांपूर्वी याच पुलावर ब्रिटिशांच्या आदेशाने झालेल्या गोळीबारात २५ ते ३० जीव गेले होते. तेव्हा जखमींना हातगाड्या आणि चारपायांवर जखमींना नेताना डॉ. धनपाल राय आणि इतरांना मोठी शिकस्त करावी लागली असणार.

जमावात तरुण, वृद्ध सारेच होते. शिपायांचे कडे तोडून अनेकांनी रेल्वेचा मालधक्का व तार कचेरीवर हल्ला चढवला. छोट्या-छोट्या समूहांत जमाव विभागला आणि त्यांनी शहरातील ब्रिटिश आस्थापनांकडे मोर्चा वळवला. दुपारी दीडच्या सुमारास हाल बाजारातील नॅशनल बँकेत घुसून जमावाने बँकेचं गोडावून लुटलं, बँकेच्या इमारतीला आग लावली.

जमावाने केलेल्या मारहाणीत बँकेचा मॅनेजर स्टीवर्ट आणि त्याचा सहायक स्कॉट मारले गेले. फव्वारा चौकात म्हणजे तेव्हाच्या राणी व्हिक्टोरिया चौकात अलायन्स बँकेवर हल्ला झाला. बँकेचा मॅनेजर जी. एम. थॉमसन याला जमावाने बाल्कनीतून खाली फेकलं व जाळलं. नॅशनल बँकेच्या शेजारी असलेली चार्टर्ड बँकही जमावाच्या क्रोधातून सुटली नाही. जमावाने बँक लुटली. 

जमावाने केलेल्या मारहाणीत रेल्वे मालधक्क्याचा सुरक्षारक्षक रॉबिन्सन ठार झाला. चर्च ऑफ इंग्लंडचं मिशनरी काम करणारी व सिटी मिशन स्कूलची व्यवस्थापक मार्सेला शेरवूड एका अरुंद गल्लीतून सायकलवरून जात असताना जमावाने तिचा पाठलाग करून तिला जबरी मारहाण केली. 

लुटालूट, जाळपोळीच्या घटना तुरळक प्रमाणात पण दिवसभर घडत होत्या. सरकारी कचेर्‍या, टपाल कचेर्‍या, बँका हेच जमावाचं लक्ष्य होतं. हा दंगा पूर्वनियोजित नव्हता. डेप्युटी कमिशनर आयर्विंगची कमकुवत मानसिकता आणि लेफ्टनंट गव्हर्नर ओ’डवायरचा आततायीपणा या दंग्याला कारणीभूत ठरला. 

हाल गेटमधून आत प्रवेश केल्यावर आपण हाल बाजारात येतो. ९९ वर्षांपूर्वी याच रस्त्यावर घडलेलं रणक्रंदन त्यांना आठवण्याचं काहीच कारण नव्हतं. आज या रस्त्यावर असलेल्या कोणाचाही त्या वेळी जन्मही झालेला नव्हता. देविंदर म्हणाले, ‘हर किसीने इसके बारे में अपने दादा-परदादा से सुना होगा, लेकिन हर एक की अपनी अपनी ज़िंदगी है, लड़ाई है, समय तो चलता रहता है।”

हेही वाचाः पाकिस्तानने महाराजा रणजित सिंहांचा पूर्णाकृती पुतळा का उभारला?

डायरने पंजाबचा चार्ज घेतला

१२ एप्रिलला १९९९ला डायरने शहराचा चार्ज घेतला. त्या दिवशी शहरात फिरून त्याने शहराची पाहणी केली. दंग्याचा ज्वर उतरला होता. तणावपूर्ण शांतता होती. 

त्यांनी आदेश जारी केला- ‘अमृतसरच्या रहिवाशांना सावधान करण्यात येत आहे की, जर अमृतसर परिसरात कोणी कोणत्याही मालमत्तेच नुकसान केलं किंवा हिंसात्मक कृत्य केलं,  तर लष्करी कायद्यानुसार शिक्षा केली जाईल. 

या आदेशाद्वारे लोकांना एकत्र येऊन जमाव करण्यास, सभा-बैठका घेण्यास मनाई करण्यात आली आहे आणि तिचा भंग झाल्यास लष्करी कायद्यानुसार कारवाई केली जाईल.’ या आदेशावर कॅप्टन ब्रिग्जची सही होती.

डायरचा जाच वाढत होता

१३ एप्रिलला बैसाखीचा सण होता. पंजाबी नववर्षाचा हा पहिला दिवस. या दिवशी सुवर्णमंदिरातील तळ्यात स्नान करून गुरू ग्रंथसाहिबचं दर्शन आजही घेतल जातं. 

त्या काळात या दिवशी अमृतसरमधे गोविन्दगड किल्ल्याजवळ गुरांचा बाजारही भरत असे. या दोन्ही गोष्टींसाठी आसपासच्या गावांतून लोक मोठ्या प्रमाणात येत असत. त्या दिवशी डायरने दवंडी पिटली की, शहरातील कोणाही व्यक्तीला पास असल्याशिवाय स्वतःच्या अथवा भाड्याच्या गाडीने किंवा पायी शहरातून बाहेर जाण्यास मनाई करण्यात येत आहे. पास जारी करणार्‍या अधिकार्‍यांची नावं आणि हुद्देदवंडीत जाहीर करण्यात आलेले. 

रात्री ८ नंतर कोणाही व्यक्तीला घराबाहेर पडण्यास मनाई आहे. आठनंतर कोणी व्यक्ती रस्त्यावर आढळ्यास तिला गोळी घालण्यात येईल.

‘डायरने यह ऐलान शहर में मार्च निकालकर किया. राम बाग से निकला हुआ वह मार्च हाल ब्रिज, हाल गेट, हाल बझारसे गुजरते हुए आगे निकला था।‘ देविंदर वर्णन करत होते.

सर्वांत पुढे घोड्यावर स्वार पोलिस इन्स्पेक्टर अश्रफ खान आणि सब इन्स्पेक्टर ओबेदुल्ला, त्यामागे एका मोटारीत डायर, आयर्विंग आणि दुसर्‍या मोटारीत रेहिल व प्लॉमर अन् त्यामागे लष्करी शिपायांचा ताफा. 

वाजवत असलेल्या ढोलांमुळे लोक गोळा झालेले, त्यांच्या चेहर्‍यावर भय आणि उत्सुकतेचं मिश्रण. घोषणा वाचून दाखवण्यात येतेय. दोन-तीन वेळा उर्दूतून, दोन-तीन वेळा पंजाबीतून. घोषणेची हॅन्डबिलं लोकांमधे वाटली जाताहेत.

डायरचा ताफा मजीठ मंडी चौक, बाग जंडासिंग चौक, कतरा करमसिंग चौक, भगतान गेट, खजाना गेट, लाहोरी गेट, लोहगड गेट- असं मार्गक्रमण करत हाथी गेटला पोहोचला. वाटेत १९ ठिकाणी थांबून त्याने दवंडी पिटली. दुपारी दोन वाजता उनामुळे थकलेला, कंटाळलेला, घामाने त्रस्त झालेला आणि तहानेने व्याकूळ झालेला ताफा माघारी फिरवणं डायरला भाग पडलं.

कर्फ्यू दवंडी आणि सभेची दवंडी

डायर जमावबंदीची, कफ्यू र्ची दवंडी पिटत असताना दुसर्‍या बाजूने गुरन दत्ता आणि बालो हे कार्यकर्ते रिकामे डबे वाजवत

जालियाँवाला बागेतील सभेची घोषणा करत फिरत होते. ही सभा लाला कन्हैयालाल या ज्येष्ठ सत्याग्रही कार्यकर्त्याच्या अध्यक्षतेखाली दुपारी साडेचार वाजता होणार होती.  १२ एप्रिलच्या रात्री कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत ही सभा घेण्याचं ठरलं होतं.

जालियाँवाला बाग ही जागा कधी काळी भाई हमीतसिंग जल्लावाला यांच्या मालकीची होती. ते रणजीतसिंग यांच्या दरबारात नाभा संस्थानचे वकील म्हणून काम पाहायचे. 

हेही वाचाः सुभाषचंद्र बोस, भगतसिंग हे हिंदुत्ववादी होते का?

जालियॉंवाला बाग मैदान कसं होतं?

एक पडीक, खडबडीत मोकळं मैदान होतं. मैदानात प्रवेशाचा मार्ग एका वेळी दोन माणसं जेमतेम कशीबशी आत जाऊ शकतील, इतका अरुंद होता. मैदानाला आसपासच्या घरांच्या पाठीच्या भिंती चिकटलेल्या होत्या. त्यामुळे हे मैदान आपसूक आयताकार बनलं होतं. 
या भिंतींमधून दोन-चार ठिकाणी अत्यंत अरुंद अशा वाटा होत्या, जिथून बाहेर पडणं अतिशय मुश्किल होतं. मैदानाच्या दोन बाजूंना मातीच्या साधारण उंच भिंती होत्या. मैदानात एक खोल विहीर, एक मोडकळीस आलेलं छोटेखानी समाधी मंदिर आणि एक-दोन झाडं होती. 

शहरातले कष्टकरी, थकले-भागले जीव किंवा आसपासच्या गावांतून आलेले भाविक इथे घटका-दोन घटका विश्रांती घेत. ही जागा पवित्र सुवर्णमंदिरापासून हाकेच्या अंतरावर होती आणि टाऊन हॉल, हाल बाजार, राणी व्हिक्टोरिया चौक या गजबजलेल्या भागापासून फार दूर नव्हती. पण तरीही, ही काही सभा-मेळाव्यांची रूढ जागा नव्हती. सत्याग्रहाच्या चळवळीने जोर धरल्यानंतर दोन-चार सभा इथे झाल्या असतील.

जालियॉंवाला बाग हत्याकांड घडलं

संध्याकाळी डायरचा ताफा पुन्हा शहरात शिरला. देविंदरसिंग सांगत होते. आता आम्ही टाऊन हॉलच्या प्रशस्त व्हरांड्यात होतो. ‘दोपहर चार बजे डायर को जालियाँवाला बाग में मीटिंग की डेफिनेट खबर पुलिस सुपरिंटेंडेंट जे. एफ. रेहिल से मिली थी. डायर को लगा की यह उसकी अधिकारिता को चुनौती है. और उसने इस चुनौती देनेवालों को सबक सिखाने की योजना बनायी.’

डायर साधारण साडेचारच्या सुमारास ९० सशस्त्र शिपायांची फौज घेऊन राम बागेतून निघाला. त्यात गुरखा, बलुची आणि शीख बटालियनचे सैनिक होते. वाटेत ठिकठिकाणी सुरक्षेसाठी चाळीस जणांना तैनात केले. 

उर्वरित पन्नास शिपायांसह सूर्यास्ताला पाच मिनिटं कमी असताना त्याने जालियाँवाला बागेच्या चिंचोळ्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला. त्याच्याबरोबर दोन सशस्त्र लष्करी वाहने होती, ज्यात मशिनगन्स होत्या. परंतु अरुंद प्रवेशद्वारातून ही वाहनं आत नेणं शक्य झालं नाही. 

कॅप्टन ब्रिग्जसह स्वतः डायर त्याच्या मोटारीत होता. पोलिस सुपरिंटेंडेंट रेहिल आणि डेप्युटी पोलिस सुपरिंटेंडेंट प्लॉमर दुसर्‍या मोटारीत होते. 

डायरने सैनिकांसह बागेत प्रवेश केला, तेव्हा मैदानात तात्पुरत्या उभ्या केलेल्या मंचावर ‘वक्त’ या वर्तमानपत्राचे संपादक दुर्गादास बोलत होते. त्यांच्या आधी अब्दुल अझीझ, डॉ. गुरुबक्ष राय, राय रामसिंग यांची भाषणं झाली होती. मैदानात साधारण १५ ते २० हजार लोकांची गर्दी होती. 

कॅप्टन ब्रिग्जच्या अंदाजानुसार सभेला २५ हजार लोक होते. लोक वक्त्यांची भाषणं शांतपणे ऐकत होते. गर्दीतील किती तरी जण तर आसपासच्या गावांतून बैसाखीसाठी अमृतसरला आलेले आणि मैदानात विश्रांती घेत होते. आधारासाठी वृद्धांच्या हातातल्या काठ्या सोडल्या, तर कोणाकडेही अगदी साधेसुद्धा शस्त्र नव्हते. मैदानाच्या पुढच्या बाजूला सैनिक तैनात झाल्याची जाणीव मैदानातील वक्त्यांना आणि श्रोत्यांना झाली होती. 

आकाशात एक विमान मैदानाला फेरी मारून गेल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे जमावात थोडी चलबिचल झाली होती. पण प्रशासन, पोलिस, लष्कर तडकाफडकी काही करेल, असं मैदानातील कोणालाच वाटलं नव्हतं.

डायरने जमावाला कोणतीच सूचना दिली नाही. सभा बेकायदा असल्याचं जाहीर केलं नाही. लोकांना शांतपणे निघून जाण्याची संधी दिली नाही. त्याने शिपायांना थेट गोळीबाराचाच आदेश दिला आणि लष्करी कौशल्याने रायफली धडधडू लागल्या. तरीही मंचावरच्या वक्त्यांना आणि कार्यकर्त्यांना हा केवळ लोकांना घाबरवण्याचा प्रकार वाटला. ते श्रोत्यांना ‘घाबरू नका, बसून राहा’ असं सांगत होते. पण लवकरच लोक जागेवर कोसळताना दिसू लागले. 

सभेत घबराट उडाली. लोक सैरावैरा धावू लागले. पण जाणार कोठे? भिंतीवर चढून जाण्याचा प्रयत्न लोकांनी केला, पण गोळ्यांनी त्यांचा वेध घेतला. मैदानालगत असलेल्या भिंतींमधल्या दोन-चार निमुळत्या जागांमधून वाट काढण्याच्या प्रयत्नात अनेकांचा चेंगरून, गुदमरून मृत्यू झाला. कित्येक जण तुडवले गेले. पुढच्या चिंचोळ्या प्रवेशद्वाराकडे लोक धावले, पण त्यांना थेट समोरून येणार्‍या गोळ्यांनी गाठलं. लोकांनी मैदानातील समाधी मंदिराच्या मागे आश्रय घेण्याचा प्रयत्न केला, पण गोळीबाराच्या फैर्‍यांपुढे त्यांचं काही चाललं नाही. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी विहिरीत उड्या मारल्या, पण त्यात अनेकांचा अंत झाला. 

सतत दहा मिनिटं गोळीबार सुरू होता. गोळ्यांचा साठा संपला, तेव्हाच गोळीबार थांबला. डायरची फौज जशी थंडपणे आली. आणि मागे मृतांचे ढीग रचून तशीच थंडपणे निघून गेली.

हेही वाचाः प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

डायरने हे का केलं?

प्रा. ज्योतींशी म्हणाले, ‘आम तौर पर गोलियाँ चलानेसे पहले लोगोंको सावधान किया जाता है, शांति से लौटने के लिये मौका दिया जाता है, हवा में या जमींपर गोलियाँ चलाते है. शायद डायर के दिमाग में बदला था, पाँच अंग्रेजों की मौत का बदला. उसने उस दिन ३८१ जाने ली. यह ऑफिशिअल फिगर है, सच में कितनी जानें गयी, पता नहीं. लेकिन यह कभी साबित न हो पाया, न आगे कभी होगा.’

डायरचं कोर्ट मार्शल झालं नाही, पण हंटर आयोगाच्या चौकशीत डायरने आपल्या कृत्याचं समर्थन केलं. प्रश्न केवळ लोकांना पांगवण्याचा नव्हता, तर लष्करीदृष्ट्या नैतिक धाक निर्माण करण्याचा होता आणि तोही केवळ तिथे जमलेल्या लोकांपुरता नाही, तर संपूर्ण पंजाबमधे वचक निर्माण करण्यासाठी ते आवश्यक होते, असं त्याने म्हटलं.

लोक शोकसागरात बुडाले

डायरची फौज निघून गेली, तेव्हा जालियाँवाला बाग स्मशानभूमी बनली होती. जखमींच्या असह्य किंकाळ्या वातावरणाला भेदून जात होत्या. मृत आणि जखमींच्या ढिगार्‍यात लोक आपली माणसं शोधत होते. 

रात्री आठ वाजता कर्फ्यू सुरू झाल्यानंतर जालियाँवाला बाग एकाकी पडली. बागेत आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून राहिलेल्या रतनदेवीने पुढे काँग्रेसच्या चौकशी समितीपुढे सांगितलेली हकिगत थरकाप उडवणारी आहे. 

तिला गिधाडांचा आणि मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागला. बागेबाहेरच्या अरुंद गल्ल्यांमधेसुद्धा मृतदेहांचा खच पडला होता. त्या सार्‍या परिसरावर मृतकळा पसरली होती. ‘वहाँ गलियाँ बहुत पतली थी. गुड गली, आटा गली ऐसे नाम थे. आज भी यह गलियाँ है. थोडी बड़ी हो गयी है।” साहित्याच्या अभ्यासक आणि कवी अरतिंदर संधू सांगत होत्या. 

'लहानपणापासून त्या अरुंद गल्ल्या पाहतेय. एका वेळी जास्तीत जास्त दोन माणसं चालू शकतील इतका अरुंद रस्ता होता. एखादी घोडागाडी आली तर विचारायलाच नको. तेव्हा आजच्यासारखी स्वयंचलित वाहनं संख्येने कमी होती. जालियाँवाला बाग घटनेचा काळ तर त्या आधी पन्नास वर्षांपूर्वीचा. क्या भगदड़ मची होगी, कल्पना करना मुश्कील है!’

जालियाँवाला बाग का घडलं? 

‘मायकेल ओ’डवायर, ब्रिगेडियर जनरल एडवर्ड रेगिनाल्ड डायर हे अनुभवी मुलकीलष्करी अधिकारी होते. ते परिस्थितीचं नेमकं स्वरूप ओळखू शकले नव्हते? हा खरोखरच पाच इंग्लिश लोकांच्या हत्येचा सूड होता, की आणखी काही?’ गुरुदेव नानक विद्यापीठात इतिहास विभागाचे प्रमुख अमनदीपजींशी चर्चा करत होतो. जालियाँवाला बाग घटनेवर शोधलेख लिहिणारे परमिंदरजी सोबत होते.
 
ते म्हणाले ‘उन दिनों पंजाब में फैली अशांती की इन्क्वायरी के लिये हंटर कमिशन का गठन किया गया था। काँग्रेस कमेटीने अलग से पूछताछ की थी। इसमे जालियाँवाला बाग कांड तो सेन्ट्रल इश्यू था। पूछताछ में रिव्हेंज का पहलू कभी उभरकर नहीं आया। लेकिन लोग अगर ऐसा सोचते है, तो उसका कारण है। इस घटना के बाद तुरंत मार्शल लॉ का अमल जारी किया गया। इस दौरान बहुत ज्यादतियाँ हुई। यहाँ तक की जिस गली में मार्सेला शेरवूडपर हमला हुआ था, उस गली से गुजरनेवालोंको रेंगते हुये जाने पर मजबूर किया गया। एक तरह से यह पनिशमेंट थी अंग्रेजोंको डिसरिस्पेक्ट करने की।

‘वस्तुतः रौलट आंदोलन एक राजकीय आंदोलन होतं, पण पंजाबमधील ब्रिटिश प्रशासनाने त्याकडे आपल्या सत्तेविरोधातील बंड म्हणून पाहिलं. एक तर त्यांची तशी खात्री झाली होती किंवा त्यांनी तशी समजूत करून घेतली होती. अमृतसरचा तत्कालीन डेप्युटी कमिशनर माइल्स आयर्विंगला तर १८५७च्या बंडानंतरचं ब्रिटिश सत्तेसमोरील हे
सर्वांत मोठं आव्हान वाटलं होतं. पंजाबचा प्रशासक लेफ्टनंट गव्हर्नर ओ’डवायरचा एकहाती कारभारावर विश्वास होता आणि कोणताही विरोध त्याच्या आरंभाशीच मोडून काढला पाहिजे, अशी त्याची धारणा होती. 

एक साधी डहाळी प्रवाहाला उगमापाशी रोखू शकते, पण प्रवाहाला मोकळं सोडलं तर हत्तीलासुद्धा वाहून नेण्याची ताकद त्यात तयार होते हे त्याचं तत्त्वं होतं. ब्रिगे. जनरल डायरची मानसिकता पक्की लष्करी होती. हंटर कमिशनपुढे साक्ष देताना तो म्हणाला होता की, बंडखोरांचं नीतिधैर्य खच्ची करणं आणि संपूर्ण पंजाबवर वचक निर्माण करणं, हे लष्करीदृष्ट्या योग्य होतं.
त्याने केलेली कृती दयाळूच होती, पण त्याचबरोबर ती निष्ठुरही होती, ज्यामुळे त्यांचं उद्दिष्ट बरंचसं साध्य झालं, असं त्याचं प्रतिपादन होतं.’ अमनदीपजी सांगत होत्या.  

‘आंदोलन आणि बंड यातला फरक तत्कालीन पंजाबच्या प्रशासनाला समजला नसेल, हे कोणालाही पटणार नाही. त्यांच्या दृष्टीने पंजाब हा सर्वाधिक संवेदनशील प्रांत होता. कारण अफगाण सीमा जवळ होती आणि प्रांताचा स्वभाव लढवय्या होता. नुकताच क्रांतिकारी गदर चळवळीचा सामना ओ’डवायरच्या प्रशासनाला करावा लागला होता. 

गदर चळवळीचा बीमोड करण्यात ओ’डवायरला जरी यश मिळालं होतं, तरी ते आव्हान पुन्हा उसळून येईल, याची भीती होती.

ओ’डवायरने केलेल्या जबरदस्तीमुळे नैर्ऋत्येकडील शेतकरी अशांत होते, त्यांची भीती होती. शिवाय ब्रिटिश फौजेत पंजाबमधून सर्वाधिक भरती करण्यात आली होती. युद्धावरून परतलेल्या या सैनिकांमधे असंतोष होता. परमिंदरजींच्या मते, “सब मिलाके अंग्रेजोंके डर के कई कारण थे और कृती में आक्रमक जल्दबाजी ओ’डवायर की खासियत थी.”
‘किती लोकांना रौलट कायदा म्हणजे काय, हे माहीत होतं? किती लोकांनी त्याबद्दल वाचलं होतं? किती लोकांना सत्याग्रह म्हणजे काय, हे समजलं होतं?’ पंजाबात या आंदोलनाला उत्स्फूर्तपणे मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाची कारणमीमांसा अमनदीपजी करत होत्या. त्यांच्या मते, पंजाबमधे तेव्हा साक्षरतेचं प्रमाण केवळ दहा टक्क्यांच्या आसपास होतं. त्यातही ग्रामीण भागात ते नगण्य होतं. गांधींचा भारताच्या राजकारणात नुकताच प्रवेश झाला होता.

पंजाबमधे त्यांच्याविषयी फारशी माहिती असण्याची शक्यता कमी होती. ‘हरताळ’ म्हणजे एखादा धार्मिक उपचार असाच समज असण्याची शक्यता होती. काही थोड्या सुशिक्षितांनी काँग्रेसची चळवळ पंजाबमधे चालवली होती. डॉ. सत्यपाल, किचलू आणि अन्य काही नेत्यांच्या पुढाकारातून १९१९ च्या डिसेंबर महिन्यात काँग्रेसचं अखिल भारतीय अधिवेशन अमृतसरमधे भरणार होतं. 

वस्तुस्थिती ही आहे की, पंजाबी माणसाला रोजचं जगणं कठीण झालं होतं आणि त्याला त्याची नाराजी व्यक्त करायला रौलट आंदोलनातून वाट मिळाली होती. ‘लोग प्रशासन की ज्यादती से परेशान थे. फौज में जबरन भरती के मामले थे। वर्ल्ड वॉर के कारण बहुत परेशानियाँ थी। पिछले साल मान्सून खराब रहा था। रोजमर्रा की चीजोंके के दाम बढे थे। युद्ध से वापस लौटे फौजी को फौज से निकाल दिया गया था। वेतन नहीं, पेन्शन नहीं। इन सब के कारण परेशान लोगोंने सत्याग्रह में हिस्सा लिया। लोग नाराज थे, लेकिन बगावत का खौफ बेबुनियाद था।”

हेही वाचाः आणि यशवंतरावांनी पाकिस्तानवर हल्ल्याचा आदेश दिला

ब्रिटिशांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु

“जालियाँवाला बाग कांडाने भारत आणि ब्रिटनच्या नात्यावर तीव्र घाव घातला. तोपर्यंत ब्रिटन सरकार ज्यांना आपला मित्र म्हणून पाहत होते, त्याच गांधींनी ब्रिटिशांपासून भारताच्या मुक्तीचा ध्यास घेतला. या हत्याकांडाने ब्रिटिशांचा दमनकारी चेहरा समोर आला. डायरचं कृत्य निर्दयी वसाहतवादी व्यवस्थेचं प्रतीक बनलं. 

देशभरातील लक्षावधी लोकांना या व्यवस्थेच्या विरोधात शांततापूर्ण मार्गाने उभे राहण्याची प्रेरणा या घटनेने दिली. देशभरातील लाखो लोक उत्स्फूर्तपणे चळवळीत सामील झाले, ती देशव्यापी बनली. भारतातील ब्रिटिश राजच्या अखेरीची ही सुरुवात ठरली. या दृष्टीने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा हा ट्रिगर पॉइंट ठरला.

शर्मा म्हणाले, ‘हा ट्रिगर पॉइंटच. कारण या घटनेने पूर्ण स्वातंत्र्याच्या विचाराला जन्म दिला. तोपर्यंत काँग्रेसमधील मवाळ आणि जहाल दोन्ही गट ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत स्वराज्याची मागणी करत होते. ब्रिटिश मंत्रिमंडळातील भारतमंत्री ई. एस. मॉन्टेग्यू यांनी भारताला यथावकाश डोमिनियन स्टेटचा दर्जा देण्याचं दिलेलं आश्वासन हा या मागणीला प्रतिसाद होता.

सात साल बाद काँग्रेस के १९२७के कन्वेन्शन में पहली बार पूर्ण स्वराज का रिजोल्यूशन पास किया गया। यह रिजोल्यूशन जवाहरलाल नेहरूने लाया था। तब भी काँग्रेस के वरिष्ठ नेता, यहाँ तक गांधी भी इस प्रस्ताव से नाराज थे। अभी वह समय नहीं आया ऐसा वह मानते थे। और यह सही भी था. एक राष्ट्र के रूप में उभर आने की क्षमता अभी बननी थी। अपने स्वतंत्रता संग्राम का सेंटर पॉइंट १९३० के बाद ही आना था। उसकी दिशा तय करने का काम जालियाँवाला बाग की घटनाने किया। 

आजचं जालियॉंवाला बाग

आज शंभर वर्षांनी हे पडीक खडबडीत मैदान होतं, आता तिथे खरोखरच बाग आहे. या जागेचं सुशोभीकरण करून १९६१मधे स्मारकात रूपांतर करण्यात आलं. बागेचं प्रवेशद्वार आजही चिंचोळं आहे. ‘डायर आणि त्याच्या फौजेने इथून आत प्रवेश केला’ असा फलक तिथे भिंतीवर आहे. आत उजव्या हाताला हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अखंड ज्योती तेवत आहे- ‘अमर ज्योती.’ बागेच्या मध्यभागी स्मारक स्तंभ आहे. त्याच्या सभोवती दीपाच्या आकाराचे चार छोटे स्तंभ आहेत.

तिथून थोड्या अंतरावर जुन्या पडक्या समाधी मंदिराचं नव्याने बांधकाम केलेलं आहे. डाव्या भागात भिंतीलगत ऐतिहासिक विहिरीभोवती कमानीसह सुबक बांधकाम करण्यात आलं आहे. ‘शहीदी कुआँ’ असं नाव या विहिरीला देण्यात आलं आहे. काचेच्या खिडक्यांमधून आत विहिरीत डोकावून पाहता येतं. भोवतीच्या भिंतींवरील गोळीबाराच्या खुणा आजही स्पष्ट आहेत. गोळीबार जिथून करण्यात आला, ती जागाही अधोरेखित करण्यात आलीय. जालियाँवाला बागेच्या दर्शनी इमारतीत छोटेखानी संग्रहालय आहे. त्यात छायाचित्रे, ओ’डवायर आणि डायर यांच्या आदेशांच्या छायाप्रती, काही वस्तू इत्यादींद्वारे या घटनेच्या स्मृती जपल्यात.

जालियाँवाला बागेच्या प्रवेशद्वाराला नवा चेहरा मिळाला आहे. बागेसमोरचं संगमरवरातलं, रात्री डिजिटली प्रज्वलित होणारं हुतात्म्यांचं ज्योतिरूप स्मारक आणि प्रवेशद्वाराच्या आवारातला क्रांतिकारक उधमसिंग यांचा पुतळा ही बागेची नवी आकर्षणे आहेत.

अमृतसरला हेरिटेज सिटी बनवण्याच्या संकल्पात गेल्या अवघ्या २-३ वर्षांत सुवर्णमंदिराच्या भोवतीच्या टाऊन हॉलपासून जालियाँवाला बागेच्या परिसराचा पूर्ण कायापालट केला गेला आहे. आजपासून याच आजपासून शताब्दी सुरू होत आहे.

हेही वाचाः 

अफवांच्या बाजारात वाचा सुभाषबाबूंची खरी कहाणी

रामायण, महाभारताचं स्वागत करायला काय हरकत?

भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्न केला का?

देशभक्त सुभाषबाबूंच्या मातृप्रेमाची ही स्टोरी आपल्याला माहीत आहे का?

शेतकऱ्याच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार?

जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी