महाराष्ट्र हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाही. महाराष्ट्र हा फक्त नकाशाचा आकार नाही. महाराष्ट्र हा एक विचार आहे. महाराष्ट्र हा एक मूल्यसंचय आहे. महाराष्ट्र हे एक तत्त्व आहे. पण आज साठाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त ते नव्याने शोधायला हवंय. त्यासाठी कोलाज `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या मालिकेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना लिहितं करतंय.
चकाकली संगीन अन्यायाची। फौज उठली बिनिवाराची। कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची। उठला मराठी देश। आला मैदानी त्वेष। वैरी करण्या नामशेष। गोळी डमडमची छातीवर साहिली। माझ्या जिवाची होतिया काहिली।…
अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची। परळच्या प्रलयाची। लालबागच्या लढाईची। फाऊंटनच्या चढाईची। झालं फौंटनला जंग। तिथे बांधुनी चंग। आला मर्दानी रंग। धार रक्ताची मर्दानी वाहिली। माझ्या जिवाची होतिया काहिली।
कुणाला ही साधीसरळ धड्यातली वाक्य वाटू शकतील. पण `माझी मैना गावाकडं राहिली` ऐकलं असेल, तर त्यात आपोआप सूर घुमू लागेल. ऐकलं नसेल तर सर्च मारून एकदा ऐकाच. हेच निर्जीव वाटणारे शब्द आग ओकू लागतील. मुठी आपोआप वळतील. मराठी ऊर अभिमानाने भरून येईल.
हेही वाचाः शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही
आज कोरोनामुळे ओस पडलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर साठ वर्षांपूर्वी साधीसाधी माणसं एक लढाई जिवाच्या आकांताने लढत होती. सर्वशक्तिमान सरकारांच्या विरोधात एल्गार उसळवत होती. त्या साध्याच माणसांनी आपलं हक्काचं राज्य जिंकून घेतलं. महाराष्ट्र त्याचं नाव. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या छक्कडमधे त्याच साध्या माणसाच्या विजयाचं आणि त्यागाचं वर्णन केलंय.
सांगायचा मुद्दा हा की आपला महाराष्ट्र तुमच्या माझ्यासारख्या साध्या माणसांनी कमावलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा काही जमिनीचा तुकडा नाही. नकाशातला आकार नाही. हा एक विचार आहे. हजारो वर्षं महाराष्ट्राची माती नांगरणारा सुपीक विचार. या प्रदेशाला जन्म देणारा मूल्यविचार.
हेही वाचाः संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?
सुमारे आठशे वर्षांपूर्वी गुजरातमधून आलेल्या चक्रधर स्वामींच्या महान कर्तृत्वाचं वर्णन करणारं लीळाचरित्र तितकंच जुनं. महाराष्ट्र घडवण्यात ज्ञानेश्वरीइतकंच मोलाचं. त्यात `साठी लक्ष देश महाराष्ट्र` असं म्हणत महाराष्ट्राच्या भूगोलाचं तपशीलवार वर्णन येतं. ते जवळपास आजच्या महाराष्ट्राला लागू पडतं. पण या भूगोलाला इतिहासाने बांधून ठेवलेलं नाही. इतिहास फार जुना तरीही.
परशुरामाच्या कथेच्या लाखो वर्षं आधी कोकणभूमीतल्या बांद्याजवळच्या कातळशिल्पांपासून विदर्भातल्या चांद्याजवळच्या गुहाचित्रांपर्यंत आदिमानवाने आपल्या पाऊलखुणा इथे स्पष्ट नोंदवून ठेवल्यात. सातवाहनांपासून देवगिरीच्या यादवांपर्यंत मोठमोठी साम्राज्य इथे होती. पण ती दक्षिणभर अवाढव्य पसरलेली होती. महाराष्ट्र ही ओळख त्यांनी दिलेली नाही.
पुढे चांदबिबी, मलिक अंबरासारख्या महान शासकांनी कर्तृत्व गाजवलं. पण त्यांचा पसारा महाराष्ट्रासमोर छोटाच. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र घडवला हे खरंच. पण महाराष्ट्राने शिवरायांना घडवलं, हे कदाचित त्यापेक्षाही खरं. या दैवताचं नाव घेतलं की बोलणंच खुंटतं. तरीही आवर्जून सांगावं लागतंच, महाराष्ट्र ही ओळख घडत गेलीय. ती कुणा एकाने दिलेली नाही. ती तुमच्या माझ्यासारख्या साध्या साध्या माणसांनीच तयार केलीय.
हेही वाचाः 'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?
प्रदेश घडतो म्हणजे काय होतं? त्या भागातली सगळी माणसं आपली एक ओळख सांगतात. कुणी राजा, कोणतं साम्राज्य नसताना हजारो वर्षं आपले लाखो पूर्वज आपली एक ओळख सांगत राहिले, महाराष्ट्र. वंश, कूळ, गोत्र, धर्म, जात या सगळ्याला ओलांडून जाणारी ही महान ओळख होती एका महान राष्ट्राची.
अर्थात या जमिनीला जोडणारा भाषेचा दुवा होताच. महाराष्ट्री प्राकृत ही आपल्या मराठीची मूळ भाषा बहुतेक संस्कृतपेक्षाही जुनी. कदाचित नसेलही, पण नंतरची नक्कीच नाही. बोली तर आदिमच म्हणायला हव्यात. इतिहासभर विखुरलेलं मराठीच्या बोलींचं वैविध्य इतकं पराकोटीचं आहे, की त्या सगळ्यांना मराठी म्हणायचं, तर त्यालाही बांधून ठेवणारा एक धागा शोधावाच लागतो.
तो धागा शोधताना विचारांकडे जावं लागतं. महाराष्ट्र हा काय थॉट आहे, हे शोधावं लागतं. महाराष्ट्र हा नेमका काय विचार आहे, याचा शोध घ्यावा लागतो. मग महाराष्ट्र हीच एक संकल्पना ठरते. आयडिया. महाराष्ट्राची आयडिया. हजारो वर्षं ही कोणती मूल्यं आहेत, ज्यांनी महाराष्ट्र ही संकल्पना मरू दिलेली नाही. काल महाराष्ट्र तुकड्या तुकड्यात चार राज्यांत विखुरला होता, तेव्हाही ही आयडिया होतीच. आज बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी साठ वर्षं झगडतंय, तिथेही ही आहे. उद्या कदाचित विदर्भ वेगळं राज्य बनलं, तरीही ही संपणारी नाही.
आजच्या महाराष्ट्र राज्याला साठ वर्षं पूर्ण झालीत. हे एक छोटं वळण. प्रत्येक वळण हे महत्त्वाचं असतं, कारण तिथे मागे न्याहाळता येतं. पुढचा प्रवास आखता येतो. आपण स्वतः नेमके कुठे उभे आहोत, याचा अंदाज घेता येतो. महाराष्ट्राच्या साठीच्या या वळणावर आपल्याला असाच स्वतःचा शोध घेता येईल. आयडिया ऑफ महाराष्ट्र शोधता येईल.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
आजवर प्रत्येकाला महाराष्ट्र वेगवेगळा सापडलाय. महात्मा गांधींनी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचं मोहोळ म्हटलंय. ही आयडिया समर्पण आणि सेवेचं महत्त्व सांगणारी आहे. महाकवी सावरकरांनी महाराष्ट्राला भारतमातेचा खड्गहस्त म्हटलंय. म्हणजे तलवार परडलेला हात. या आयडियात पराक्रम, शौर्य, त्याग याला महत्त्व आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने महाराष्ट्राला कष्टकरी, शेतकऱ्यांचं राज्य ठरवलं. हुतात्मा चौकातला पुतळा त्याची साक्ष देतो.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांचं महाराष्ट्र मॉडेल हे सर्वसमावेशक विकासाचं होतं. तेव्हाच अर्थतज्ञ महाराष्ट्राचा देशातला सर्वाधिक जीडीपीच्या आधारावर मोजत होते. दुसरीकडे महाराष्ट्र ही संतांची भूमी अशीही एक आयडिया आहे. तिचं मोल तर खूपच आहे. पण संतांची म्हणजे ज्ञानोबा-तुकोबांची की समर्थ रामदासांची, हा पेच आहेच. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी तर आहेच आहे. युरोपियन इथे आले, तेव्हा ते महाराष्ट्रातल्या लोकांना शिवाजी लोक म्हणत, इतकी ही घट्ट रुजलेली आयडिया आहे.
महाराष्ट्र म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर हा विचार आहे. दुसरीकडे काही जणांच्या मते तो टिळक, सावरकर, हेडगेवार असाही आहे. कॉम्रेड शरद पाटलांनी माफुआ म्हणजे मार्क्स, फुले, आंबेडकर ही त्रयी एकत्र जोडलीय. मग या सगळ्यांत न्यायमूर्ती रानडेंचं काय करायचं? विठ्ठल रामजी शिंदेंचं काय करायचं? सयाजीराव गायकवाडांचं काय करायचं? प्रबोधनकार ठाकरेंचं काय करायचं? त्यांचा विचारही तितकाच मोलाचा आहे.
हेही वाचाः प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत
कदाचित हा सगळा भूतकाळ माळ्यावर टाकून आपल्याला नवा महाराष्ट्र शोधावा लागणार आहे. ग्लोबलायझेशनने आपण आधीच बदलतोय. टेक्नॉलॉजीने सगळं जग बदलवलंय. आता त्यात कोरोना आलाय. लोक म्हणताहेत, जे बदल घडायला काही दशकं गेली असती, ते कोरोनामुळे महिन्यांत होणार आहेत. यात ठामपणे उभं रहायचं, तर नवी `आयडिया ऑफ महाराष्ट्र` शोधावी लागेल.
हे एकट्यादुकट्याचं काम नाही. कारण जमीन आपण सगळे मिळून घडवत असतो. ती डोळे उघडे ठेवून घडवायची, तर आपला शोध घ्यावा लागेल. त्यासाठी `कोलाज` या लेखमालिकाचा खटाटोप करतंय. इथे जुन्या नव्या जाणकारांनी मिळून `आयडिया ऑफ महाराष्ट्र` शोधणार आहेत. वेगवेगळ्या विचारधारांचे, पक्षांचे, मतांचे, छटांचे मान्यवर इथे आपली आयडिया ठेवणार आहेत. `कोलाज डॉट इन`वर १ मेपासून शक्यतो रोज एक लेख देणार आहोत. किती दिवस देऊ शकू, माहीत नाही. ठरवलंही नाही.
या मान्यवरांचं म्हणणं आपण समजून घेऊ. जमल्यास पूर्वग्रह बाजूला ठेवून. न जमल्यास सोबत ठेवून. पण विचार तर करू. त्यावर आपण बोलू. वाद घालू. खोलात जाऊ. आपला शोध घेऊ. महाराष्ट्र जास्तीत जास्त समजून घेऊ. लॉकडाऊनमधे महाराष्ट्राचा हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला यापेक्षा आणखी वेगळं काय हवं?
पहिला लेख- आयडिया ऑफ महाराष्ट्र सांगतायत शरद पवारः लोकशाही, समता, सर्वसमावेशकता
(उद्या वाचा: भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डाॅ. विनय सहस्रबुद्धे यांची आयडिया ऑफ महाराष्ट्र.)
हेही वाचाः
शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश
शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?
महिला धोरणाने २५ वर्षांत दाखवली प्रगतीची नवी वाट
श्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर
चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया
गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कूळकथा
शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!
महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही
राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही