छत्रपती शिवराय. यशवंतराव चव्हाणांच्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्राचा परमेश्वर. या परमेश्वराच्या जयंतीला २७ एप्रिल १९६०ला नव्या राज्याचा आनंदोत्सव सुरू झाला. यशवंतरावांनी शिवनेरीवर जाऊन नवं राज्य घडवण्याचा विडा उचलला. महाराष्ट्र हे शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य असेल, म्हणजे नेमकं काय, याचा उहापोह करणारं एक भाषणही तिथे दिलं. आजही साठ वर्षांनंतरही हे भाषण आपल्याला दिशा दाखवतं.
लोकहो, आज मी माझें परमभाग्य समजतों कीं,महाराष्ट्राच्या परमेश्वराला प्रणाम करण्यासाठीं येथे येण्याची मला संधि मिळाली. आजच्या या सुवर्णदिनीं आपणां सर्वांच्या तर्फे नव्या महाराष्ट्र राज्यास श्रीशिवप्रभूंचे शुभाशीर्वाद मागण्यासाठीं मी येथें आलों आहे. ज्या या पवित्र क्षेत्रीं शिवप्रभु अवतरले तेथें येऊन महाराष्ट्राच्या या पुण्यश्लोक दैवताला मुजरा करणें हें माझें प्रथम कर्तव्य आहे.
आजच सकाळी मुंबईस मी प्रमुख अशा निरनिराळ्या धर्मगुरूंचा आशीर्वाद घेऊन येथें आलों. मघां मी या गडावर बालशिवाजी आणि मातोश्री जिजाबाईंच्या प्रतिमेचें उद्घाटन केलें आणि आतां श्रीशिवछत्रपतींना मुजरा करून मी नव्या महाराष्ट्र राज्याची घोषण करीत आहें. हा अपूर्व सोहळा पाहण्यासाठीं तुम्ही निरनिराळ्या भागांतील माझे मराठी बांधव प्रचंड संख्येनें येथें एकत्र जमलां आहांत. या पवित्र आणि अपूर्व प्रसंगानें आज माझें मन अनेक विचारांनी आणि भावनांनीं भरून आले आहे.
हेही वाचा : तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?
युगायुगांतून येणारा आजचा हा दिवस आहे. तीनशे वर्षांपूर्वी तो एकदा आला, आणि या शिवनेरींत शिवाजी महाराजांचा जन्म झाला. केवळ एका व्यक्तीचा, एका बालकाचा तो जन्म नव्हता, तर त्या बालकाच्या रूपानें महाराष्ट्राचा नवा इतिहास जन्माला येत होता. शिवजन्माने आमचा हा इतिहास त्या वेळीं या गडावर सुरू झाला. त्याच या पवित्र ठिकाणीं, विसाव्या शतकांतील नव्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासास सुरुवात व्हावी हा अपूर्व योगायोग आहे.
शिवाजी महाराज एकदांच जन्मले, तसाच विसाव्या शतकांतील हा महाराष्ट्र आतां जन्मास येत आहे. प्रतिभावंत लेखक आणि कवि यांच्या लेखण्या ज्या क्षणाचें वर्णन करण्यास पुढें सरसावतात तो हा क्षण आहे. महाराष्ट्राच्या जीवनांतला हा मोलाचा क्षण आहे. आज आपलें अनेक वर्षांचे स्वप्न साकार झालें आहे. महाराष्ट्र राज्याच्या रूपानें आज एक नवें कर्तृत्व जन्माला येत आहे. मानव मनांत कांही आशा बाळगतो, स्वप्नें पाहतो, त्यासाठीं रात्रंदिवस धडपड करून असीम त्याग करतो, खडतर तपश्चर्या करीत असतो.
परमेश्वर असा एक क्षण निर्माण करतो कीं, त्यामुळें मानवाची ती आशा सफल होते. तो तृप्त होतो. अशा तृप्तीचा क्षण आज छत्रपतींच्या पुण्याईनें आपल्या जीवनांत निर्माण झाला आहे. त्याचा आनंद आपण या क्षणीं उपभोगूं या, आणि या आनंदामागोमाग येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीं आपण सिद्ध होऊं या. एक किल्ला जिंकला, आतां दुसरा किल्ला जिंकण्यासाठी विकासाची घोडदौड सुरू करूं या. कारण या विकासांतूनच महाराष्ट्राचें भवितव्य आकारास येणार आहे.
भारताचें राज्य जें निर्माण झालें त्यामागें अनेकांच्या भावनांचा संगम झालेला आहे. स्वतंत्र्य भारताचें राज्य एक - दोन शतकांकरितां निर्माण झालेलें नाहीं. पूर्वीच्या काळीं राजे आले आणि गेले, पातशाह्या आल्या आणि गेल्या, परकीय सत्ता आली आणि गेली, पण भारताचें राज्य तसेंच जाण्यासाठीं जन्माला आलेलें नाहीं. आज भारतांत चाळीस कोटि लोकांचे जें राज्य निर्माण झालेलें आहे, ते भारतीयांच्या मनांत स्वातंत्र्याचा अभिमान जोंपर्यंत जागृत आहे तोंपर्यंत टिकणार आहे आणि म्हणून मी म्हणतों कीं हें स्वतंत्र भारताचें राज्य यावच्चंद्रदिवाकरौ टिकणारें आहे.
जसा भारत एकदांच आणि कायमचा निर्माण झाला तसा महाराष्ट्रहि एकदांच निर्माण होत आहे. आजपासून पुढें अनंत काळापर्यंत भारताशीं समरस होऊन सांगणार आहे की, आमच्या मराठी जीवनांत जें जें कांहीं चांगलें आहे, मंगल आहे, तें तें भारताच्या सुखसमृद्धीसाठीं, संरक्षणासाठीं सेवेसाठीं आम्ही देणार आहोंत. जी अपूर्णता, जे दोष असतील ते आम्ही आमच्यापाशीं ठेवणार आहोंत. आम्ही प्रथम भारतीय आणि नंतर महाराष्ट्रीय आहोंत.
असा हा नवमहाराष्ट्र आतां निर्माण होत आहे. पूर्वी देवगिरीच्या यादवांच्या काळी जो मुलूख मराठी होता तो आतां एकत्र येत आहे. महानुभावी महीन्द्र व्यासानें आपल्या कांहीं ओव्यांत महाराष्ट्राच्या ज्या सीमा वर्णन केल्या आहेत, त्या सीमा आजच्या या समारंभाच्या दिवसापासून आतां अस्तित्वांत येत आहेत. हा मुलूख पूर्वी एकत्र होता, परंतु अधूनमधून तो इतिहासांत तुटला, सुटला होता. पण आतां पुन्हा तो एकत्र येत असून पिढ्यान पिढ्या मनांत बाळगलेली आपली आकांक्षा आज पूर्ण होत आहे.
हेही वाचा : जागतिक पुस्तक दिनः शिवाजी महाराजांचं वस्तुनिष्ठ चरित्र सांगणारं पुस्तक
गेल्या चारपांच वर्षांत महाराष्ट्रांतील जनतेनें महाराष्ट्राच्या निर्मितीसाठीं अनेक प्रकारांनी व मार्गांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी त्या प्रयत्नांचे दोन कालखंड मानतों.
प्रतापगडावर पंडित नेहरू यांच्या हस्तें शिवप्रभूंच्या पुतळ्याचें अनावरण होण्यापूर्वीचा एक आणि प्रतापगडापासून शिवनेरीपर्यंतचा दुसरा. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलालजी ज्या दिवशीं शिवछत्रपतींना प्रणाम करण्यासाठी प्रतापगडावर आले तेव्हांपासून माझ्या मतानें या निरगांठीनें बांधलेल्या प्रश्नाचे धागे उकलत गेले. एक एक गोष्ट घडत गेली आणि प्रकाश दिसूं लागला. शेवटीं साडेतीन कोटींचा महाराष्ट्र आज एकत्र येत आहे. आज नव्या कर्तृत्वाचें हें नवें दालन निर्माण होत आहे. बुद्धिवंत व कर्तबगार स्त्रीपुरुषांना आव्हान देणारें हें नवें क्षेत्र आहे. याची वाटचाल आतां सुरू करावयाची आहे.
या नवराज्याचा विचार करतांना शिवछत्रपतींच्या कारभारावर प्रकाश टाकणाऱ्या नव्या नव्या शोधसाहित्याची मला आठवण येते. महाराजांच्या आज्ञापत्रांचा नुसता अभ्यास केला तरी उद्यांचा प्रवास आपणांला बिनधोक करतां येईल.
महाराजांनीं त्या काळीं एका आज्ञापत्रांत सैनिकांना उद्देशून लिहिलें आहे, 'सैनिकांनो, शेतांत झोंपाल तेव्हां दिवे बंद करून झोंपा. उंदीर वात नेईल,पेटत्या दिव्यानें शेत पेटेल. शेतक-यांची गंज पेटली तर ते म्हणतील, राज्य स्वकीयांचे कसलें,तुर्कीचेंच आहे.' सैन्याचे अधिकारी शेतकऱ्यांना छळतात, दुःख देतात, असें होतां कामा नये, ही महाराजांची चिंता होती. आज तशीच लोककल्याणाची चिंता आपणांला वाहवयाची आहे.
हें राज्य आज निर्माण होत आहे असें आपण म्हणतों. पण तसें पाहिलें तर आपण कांही नवीन असें उत्पन्न करीत नाहीं, तर मोठ्या परंपरेचा जो वारसा या महाराष्ट्रांत चालत आला आहे तोच आपण पुढें नेत आहोंत. या आपल्या महाराष्ट्राच्या जीवनाचा मी विचार करतो तेव्हां मला चार तऱ्हेच्या परंपरा आठवतात. त्या निरनिराळ्या प्रवृत्ति आहेत.
प्रथम मला आठवते ती आमच्या मराठी साधुसंतांची परंपरा. मुक्तेश्वर-ज्ञानेश्वरांपासून ते आज विनोबांपर्यंत संतांची परंपरा समतेचा, न्यायाचा व बंधुभावाचा संदेश देत असतांना मला दिसते आहे. विनोबांचे, गाडगे महाराजांचे बोल आपण ऐकले. संत तुकडोजी महाराज नागपूर भागांत तोच संदेश देण्याचें काम करीत आहेत.
दुसरी प्रवृत्ति वीर, पराक्रमी, राजकारणी पुरुषांची आहे. तिचें प्रतीक छत्रपति शिवाजी महाराज आहेत. अन्यायाविरुद्ध दलितांचा कैवार घेऊन लढण्याची महाराष्ट्राची तिसरी परंपरा आणि प्रवृत्ति महात्मा फुल्यांनी आपणांला दिली आहे. आणि शेवटीं विद्वानांच्या बुद्धिमत्तेचा वापर देशासाठी करून त्या मार्गानें वाटेल तो त्याग हसतमुखानें सहन करण्याची राजकारणी प्रवृत्ति लोकमान्य टिळकांनीं या महाराष्ट्राला दिली आहे.
आपला हा जो वारसा आहे त्याची आपणांला जाणीव ठेवावयाची आहे. जेव्हां मी या नव्या महाराष्ट्र राज्याच्या खजिन्याचा विचार करतों तेव्हां बदोबंस्तांत असलेल्या त्या तिजोरींत नाणें किती आहे याचा विचार माझ्या मनांत येत नाहीं. तर आमच्या खजिन्यांत जमेच्या बाजूला हा जो मोठा वारसा नोंदलेला आहे त्याचाच विचार माझ्या मनासमोर उभा राहतो. हा वारसा जतन करणें मोठें कठीण काम आहे. पैशाचा खजिना खर्चून टाकून मोकळा करता येतो. पण हा वारसा खर्च करतां येत नाहीं. तो बरोबर घेऊन आपणांला सदैव पुढें जावें लागतें, पुढच्या जबाबदारीची जाणीव ठेवून पुढें जावें लागते.
आज सकाळी मुंबईस धर्मगुरूंच्या प्रार्थनेचे आशीर्वाद घेऊन येथें येण्याकरितां मी निघालों तेव्हां शिवनेरींनें माझें मन भरून गेलें. महाराष्ट्राच्या तीन कोटि जनतेच्या मनांत आज शिवनेरी आहे. तिची आठवण झाली नाहीं असें जागतें मराठी मन आज महाराष्ट्रांत सांपडणार नाहीं. त्या सर्वांना या नव्या महाराष्ट्र राज्याचा गाडा चालवावयाचा आहे. या आनंदोत्सवांत आपण धुंद असतांना कोणाच्या मनांत काय तक्रारी आहेत त्या मला माहीत आहेत. मंजूर आहेत त्या तक्रारी, पण त्याच त्या कुरकुरी करीत राहून भागणार नाहीं. नव महाराष्ट्राच्या निर्मितीकरितां आपण आतां प्रतिज्ञाबद्ध आहोंत. या आनंदोत्सवाची स्मृति म्हणून या राज्याची जी मुद्रा आम्हीं निश्चित केली आहे, तिच्यावर
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
महाराष्ट्रस्य राज्यस्य मुद्रा भद्राय राजते
हीं शिवाजी महाराजांनीं निवडलेलीं वाक्यें आम्हीं घेतलीं आहेत. याचा अर्थच हा कीं ही राजसत्ता लोककल्याणाकरतां राबणार आहे.
आपणांला आतां सामान्य जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करावयाच्या आहेत. त्यांना शिक्षणाची भूक आहे. दोन वेळां त्यांना सुखानें, मानानें घास खावयाचे आहेत. आणि ही गरज पूर्ण करावयाची जिम्मेदारी आपण घेतली आहे. जनतेच्या या आशाआकांक्षांच्या पूर्तीचा क्षण आपणांला जवळ आणावयाचा आहे. हा प्रवास सोपा नाहीं. पण प्रवास चालू झाला आहे. दमल्यासारखें वाटलें आणि मैलाचा दगड पाहून उशी करून झोपलांत तर कायमचे झोपाल. तसें होतां कामा नये. या महाराष्ट्राला आतां महत्त्वाचीं कामें करावयाचीं आहेत.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
महाराष्ट्रांत आज असलेल्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहांचा परिणाम महाराष्ट्राच्या भवितव्यावर होणार आहे. आज महाराष्ट्रांत अनेक पक्षोपपक्ष आहेत. ते पक्ष राहिले पाहिजेत. ते पक्ष राहूं नयेत असें मी म्हणणार नाहीं. लोकशाहीचें राजकारण चालविण्यासाठीं अनेक पक्ष असावे लागतात. पण फार पक्ष असणें हें देखील हितावह नाहीं.
मी तर असें म्हणेन कीं, पुढचीं अनेक वर्षे, निदान तिसरी पंचवार्षिक योजना पूर्ण होईपर्यंत तरी, पक्षोपपक्षांच्या राजकारणाचा गोंधळ येथें माजूं नये. प्रत्येक पक्षास स्वतःचें असें खास राजकारण असतें. परंतु येत्या कांहीं वर्षात तीन कोटींच्या महाराष्ट्रापुढें फक्त एकच राजकारण आहे आणि तें म्हणजे सर्वांगीण विकास साधण्याचें राजकारण. महाराष्ट्रनिर्मितीसाठीं शिवशक्ति निर्माण झाली आहे तर ती कायम टिकविली पाहिजे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनींच पुढें सरसावलें पाहिजे. कोणीहि मागें राहतां उपयोगी नाहीं. विकासकार्याच्या मोहिमेवर निघालेले आपण सिंहगड चढून आलों आहोंत. या गडावरून पळून जाण्याचा कोणी प्रयत्न करीत असतील तर त्यांना सांगावेंसें वाटतें कीं, कोंडाण्यावर जसे सूर्याजीनें मागचे दोर कापले होते तसेच आता येथून पळून जाण्याचे दोर केव्हांच कापून,तोडून टाकण्यांत आले आहेत. आतां परिस्थितीचें आव्हान घेऊन पुढेच गेलें पाहिजे. लढूं किंवा मरूं या ईर्षेनेंच आतां आपल्याला पुढें जावयाचे आहे. तोच मार्ग आतां आपल्यापुढें शिल्लक उरला आहे. आतां आपल्याला परत फिरतां येणार नाहीं.
आपल्या कर्तृत्वाला, आपल्या शहाणपणाला हें आव्हान आहे. तें आपण स्वीकारलेंच पहिजे. आजपर्यंत आपण अनेक सबबी सांगून वेळ मारून नेत होतों. पूर्वी आपण म्हणत असूं कीं, परकीय सत्ता आहे, हात बांधलेले आहेत. नंतर म्हणूं लागलों कीं, सर्व मराठी भाषिक एकत्र नाहींत,गुजरातशीं हात जखडलेले आहेत,त्यामुळें आमची कुचंबणा होते. आतां तेहि हात मोकळे झाले आहेत. आतां महाराष्ट्राच्या कल्याणाचा सिंहगड तुम्हांला स्वतःच्या कर्तृत्वावर जिंकावयाचा आहे. संकटें असतील पण त्यांना समोर जाऊन झेलल्याशिवाय तीं संपत नाहींत. त्यांना पाठ दाखविली कीं तीं अधिकच पाठीशीं लागतात. म्हणून या संकटांवर आपण आतां मात केली पाहिजे.
महाराष्ट्रापुढें आज अनेक समस्या आहेत. पण माझा असा अनुभव आहे की, महाराष्ट्रातील माणसाला प्रश्नाची तीव्रता समजावून दिली तर तो उत्साहाने उठतो. पण कर्तव्याची जाणीव दिली नाही तर तो पुन्हा झोपतो. म्हणून त्याला आतां सांगितलें पाहिजे कीं, 'तू आतां राजा आहेस.'दुःखांत असलेल्या जनतेच्या जीवनावर सुखाची सावली निर्माण करणें हें राजाचें कार्य आतां प्रत्येक मराठी माणसानें केलें पाहिजे. एकेक माणूस, एकेक मूल, हें सावली देणारें झाड आहे असें मानून त्यास खतपाणी घातलें पाहिजे. येतीं पंधरावीस वर्षे पुरणारें असें हें काम आहे.
हेही वाचा : शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यावर यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते?
आज सकाळपासून माझ्या मनांत अनेक भावनांनीं गर्दी करून सोडली आहे. तुम्ही मला आपला कर्णधार नेमला आहे. त्या नात्याने मी बोलतों आहें; पण मनांत जबाबदारीनें वाकलों आहें. आजचे हे आनंद सोहळ्याचे चार दिवस निघून जातील आणि मी जेव्हां उद्यां विधानसभेंत बसेन,त्यावेळीं महाराष्ट्राच्या भवितव्यासंबंधींच्या कामाचा आपण अहवाल मागाल. लोकांना थोडें थांबा असें मला म्हणतां येणार नाहीं. ते म्हणतील, वर्षानुवर्षे थांबलों. आतां थांबायला वेळ नाहीं. हा कांहीं मी तुम्हांला उपदेश करतों असें समजूं नका, तर माझ्या जबाबदारीचे पडसाद जे मनांत उमटत आहेत ते शब्दांनीं मी तुमच्यासमोर उघडे करीत आहें.
खूप मोठीं कामें करावयाचीं आहेत. तिसरी पंचवर्षिक योजना आतां आंखावयाची आहे. देशाची ही तिसरी योजना आहे. पण एका अर्थानें महाराष्ट्रात आपली योजना मांडावयाची ही पहिलीच संधि आहे. महाराष्ट्रांच्या कडेकपारींत पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब आपल्या शेतांतल्या पिकांना पोचवावयाचा आहे. उद्योगधंदे वाढवावयाचे आहेत. उद्योगधंदे, कारखाने द्या म्हणून कोणी देत नाहीं, तर जेथे दोन हातांचे श्रम उभे राहतात तेथें ते येतात. ते हात सर्व जनतेचे आहेत, सरकारचे नव्हेत. राज्य म्हणजे सरकार नव्हे. सरकारें येतील आणि जातील.
मी पुन्हा एकदां तुम्हांला आठवण देतों कीं, महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून जें मी सारखें म्हणतों आहें त्याचा अर्थ तुम्ही लक्षांत घ्या. भारतीय संदर्भ दृष्टिआड करून मी महाराष्ट्र म्हणत नाहीं. भारताबरोबर महाराष्ट्र आपणांला मोठा करावयाचा आहे. भारत जगेल तरच महाराष्ट्र जगणार आहे, वाढणार आहे. म्हणून या शिवनेरीच्या साक्षीनें आणि तुम्हां सर्वांच्या वतीनें मी पुन्हा एकदां सांगतों कीं, आमच्या महाराष्ट्रीय परंपरेंत जें जें पवित्र आणि उच्च असेल तें तें भारताच्या उत्थापनासाठीं आम्ही देणार आहोंत. जीं वैगुण्यें असतील तीं आम्ही आमच्यापाशीं ठेवूं.
माझ्यापुढील कामाचें मला तीन तऱ्हेनें दर्शन घडत आहे. उद्यांच्या महाराष्ट्र राज्याचा कारभार उत्तम, चोख झाला पाहिजे आणि आपला लौकिक कायम राहिला पाहिजे. दुसरी गोष्ट, पंचवार्षिक योजनेचें बाळ पाळण्यांत पाय दाखवून नवमहाराष्ट्राची ग्वाही देणारें झालें पाहिजे; आणि तिसरी गोष्ट आपण तीन भाऊ अनेक शतकांनंतर प्रथम एकत्र येत आहोंत त्यांचें एकसंध मन तयार झालें पाहिजे. राजकीय, सामाजिक, साहित्यिक सर्वच क्षेत्रांत एकात्म भावनेचा प्रयत्न सर्वांनी करावयाचा आहे.
त्याच बरोबर कांहीं काळ - दहापंधरा वर्षे तरी - मला या महाराष्ट्रांत औद्योगिक शांतता हवी आहे. संपाची भाषा आपण बंद केली पाहिजे. याचा अर्थ तुमच्यावर अन्याय, तुमच्या अडचणी तुम्ही मुकाट्यानें सहन कराव्यात असें मी म्हणत नाहीं. आपल्या हक्कांसाठी तुम्ही जरूर भांडा; यशवंतरावांशीं भांडा, महाराष्ट्र सरकारशीं भांडा. पण महाराष्ट्राचें राज्य रांगतें आहे तोंवर संपाची भाषा बोलूं नका. अन्यायाविरुद्ध वापरावयाचें संप हें एकमेव हत्यार आहे. तें वापरतांना महाराष्ट्राचा त्रिवार विचार करा.
हेही वाचा : शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश
मी आज येथें एक अपूर्व योगायोगानें उभा आहें. महाराष्ट्र राज्याचा उत्सव शिवछत्रपतींच्या जन्मदिवशीं सुरू होत आहे. शिवनेरीच्या माथ्यावर जिजामातोश्री बालशिवाजींना घेऊन उभ्या आहेत. महाराष्ट्राला तें अमोल देणें देणाऱ्या मातेचें मला दर्शन घडलें आहे. त्यांतील मर्महि आपण लक्षांत घ्या. जिजामातोश्री शिवनेरीवर आल्या हें या स्थळाचें परमभाग्य. पण त्या आल्या त्या वेळीं त्यांच्या पाठीवर त्यांचेच वडील आणि भाऊ पाठलाग करत घोडदौडीनें येत होते हा इतिहास आपण विसरूं नका. नवमहाराष्ट्राच्या मागें त्याचे मामा नि आजोबा पाठलाग करीत येत आहेत असें होतां कामा नये.
आज सह्याद्रीच्या सान्निध्यांत मराठी मन महाराष्ट्राच्या इतिहासानें भरून गेलें आहे. छत्रपतींना जन्म देणारी शिवनेरी, त्यांना पुनर्जन्म देणारा प्रतापगड आणि त्यांना राजसिंहासनावर बसविणारा दुर्गराज रायगड यांच्या स्मृतींनीं तें मन भरून गेलें आहे. या सर्व जुन्या स्मृतींची पवित्र आठवण करून मी परमेश्वराची प्रार्थना करतों, 'देवा, आम्हांला अशी दानत आणि शक्ति दे कीं, हें महाराष्ट्र राज्य जनतेचें राज्य होईल. तें राज्य लोककल्याणाकरितां झटेल आणि भारताच्या नकाशावरील ताऱ्यांत एका नव्या तेजस्वी ताऱ्याची भर टाकील.' मी तुम्हांला पुन्हा एकदां धन्यवाद देतो.
हेही वाचा :
यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसातल्या आठवणी
बगलबाज अर्जुनापेक्षा दगलबाज शिवराय शतपट श्रेष्ठ
संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?
दांभिकतेच्या वेढ्यात अडकलेली 'आयडिया ऑफ महाराष्ट्र'
आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे
आयडिया ऑफ महाराष्ट्रः शरद पवारांच्या नजरेत महाराष्ट्र विचार
बहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले?
(साठ वर्षांपूर्वीचं हे भाषण जुन्या व्याकरणाच्या नियमांप्रमाणे उतरवलेलं आहे. ते तसंच कायम ठेवलेलं आहे. हे भाषण ybchavan.in या वेबसाईटवरून साभार.)