फ्लॅश दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचं नवं अपत्यच!

३० ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच  फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या  संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. 

एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी शे पाचशे लोकांनी एकत्र यावं. मोठ्याने गाणी लागावीत. आजूबाजूच्या घटनांचं भान न राहता सगळ्यांनी एकाच प्रकारच्या स्टेप नाचत सुटावं. लोकांचं लक्ष तिथं जावं. त्यातून नवा विषय मांडावा. निषेध नोंदवावा. जागृती करावी. असा हा फ्लॅश डान्स सध्या भारतासह जगभर लोकांच्या अभिव्यक्तीचं नवं माध्यम बनलाय.  

त्याच्या प्रभावामुळेच अचानक होणाऱ्या ढगफुटीसारख्या पुराला फ्लॅश फ्लड नाव मिळालं. आता हे फ्लॅश फ्लड जगाला नवे राहिलेले नाहीत. पण आता फ्लॅश ड्रॉट म्हणजे अचानक येणारे दुष्काळही चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनलाय.

हवामान बदलाच्या संकटांनं जगाला घेरलं असताना त्याचे गंभीर परिणाम जग अनुभवतंय. भारतासारख्या शेतीवरच सगळं काही असलेल्या देशाला याची झळ अधिक तीव्रतेनं बसतेय. भारतातलं शेती उत्पादन, सिंचन, पाण्याची पातळी यातून निर्माण होणाऱ्या समस्या तापदायक आहेत. वातावरण बदलतंय. कोणत्या हंगामात काय स्थिती असेल सांगता येत नाही. अशावेळी फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणारा दुष्काळ हेही आता नव्या संकटाची भर बनलंय.

हेही वाचा : अर्थव्यवस्था सावरण्यासाठी धाडस हवं!

फ्लॅश ड्रॉट नेमकं आहे काय?

फ्लॅश ड्रॉटचा सरळ साधा अर्थ म्हणजे एकाएकी किंवा अचानक आलेला दुष्काळ. 'नॅशनल इंटिग्रेटेड ड्रॉट इन्फॉर्मेशन सिस्टीम' हे अमेरिकेतलं अशा दुष्काळासंबंधी माहिती पुरवणारं एक पोर्टल आहे. फ्लॅश दुष्काळाबद्दलची माहिती या साईटवर वाचायला मिळते. फ्लॅश दुष्काळात तापमान जास्त असतं. वारा किंवा येणार्‍या रेडिएशनचा समावेश असल्याने मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतं. वेळीच अशाप्रकारच्या दुष्काळाचा अंदाज आला नाही तर त्याचा थेट परिणाम शेतीवर होतो.

इतर दुष्काळाच्या मानाने फ्लॅश दुष्काळ वेगाने पसरतो. त्याचं महत्वाचं कारण हे पाऊस १५ ते २० दिवसाने लांबण्यात आहे असं विमल मिश्रा यांचं म्हणणं आहे. मिश्रा आयआयटी, गांधीनगरच्या पृथ्वी विज्ञान आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर आहेत. 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फ्लॅश दुष्काळाबद्दल काही महत्वाच्या नोंदी केल्यात. त्यांच्या मते, बाहेरच्या देशांमधे उन्हाळ्याच्या दिवसात फ्लॅश दुष्काळ येतो. उष्णतेच्या लाटा आणि वाढत्या तापमानामुळे हे वाढत जातं. 

भारतात पावसाळ्यात फ्लॅश दुष्काळाच्या घटना

भारतात मात्र पावसाळ्यात फ्लॅश दुष्काळाच्या ८२ टक्के घटना घडतात असं महत्वाचं निरीक्षण नोंदवलं गेलंय. याचं आश्चर्य वाटतं असल्याचं मिश्रा म्हणतात. १९५१ ते २०१८ या काळात देशभरात फ्लॅश दुष्काळाच्या ३९ घटना घडल्यात. हे संशोधन करताना या रिसर्च टीमला अनेक प्रदेश फ्लॅश दुष्काळाच्या सावटाखाली असल्याचं दिसलं. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीचा उपयोग करून त्यांनी ओलसर मातीची पातळी नेमकी कितीय याचा अंदाज बांधला. त्यांना या संशोधनातून असं दिसून आलंय की पावसाला १५ ते २० दिवसांचा ब्रेक लागतो तेव्हा तापमान वाढतं. मातीचा ओलसरपणा कमी होतो. त्यामुळे दुष्काळ येतो.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

हंगाम पावसाचा पण सामना दुष्काळाशी

महाराष्ट्रातली अनेक गावं उन्हाळ्याच्या कडाक्यात पाण्यासाठी वणवण करत असतात. मैलोनमैल चालावं लागतं. उन्हाळा सरून पावसाळा सुरू झाला की, पाण्याच्या अपेक्षेनं आभाळाकडे नजरा असतात. पण कुठलं काय? काळ सोकावतोय. हंगाम पावसाचा असला तरी  कित्येक ठिकाणी टिपूसभर पाण्याची माणसांना वाट पहावी लागते.  भर पावसाळ्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. फ्लॅश दुष्काळाची ही पार्श्वभूमी म्हणायला हरकत नाही.

पाऊस म्हटलं की त्यातून निर्माण होणारी पूरस्थितीही आपल्या डोळ्यासमोर असते. फ्लॅश दुष्काळ हे एक नवं संकट आहे. भारतीय संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात फ्लॅश दुष्काळाच्या एका वेगळ्याच आणि तितक्याच गंभीर मुद्याला हात घातलाय. पावसाळ्याच्या काळात भारतात वेगानं दुष्काळी परिस्थिती येत असल्याचं त्यांचं संशोधन सांगतंय. खूप मोठा काळ पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पावसाचा हंगाम कोरडा पडतो. त्यामुळे भारतात अचानक दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. त्याचा परिणाम हा खरिपाचं पीक कमी येणं आणि पाण्याची पातळी खालावण्यावर होतो. 

रिसर्च नेमकं काय म्हणतोय?

'एनवायरनमेंट रिसर्च लेटर्स' या ऑनलाइन जर्नलमधे नुकताच फ्लॅश ड्रॉट बद्दलचा रिसर्च प्रकाशित झालाय. आयआयटी गांधीनगरच्या शांती स्वरूप महतो आणि विमल मिश्रा यांनी हा अभ्यास केला. या अभ्यासानुसार, ८० टक्यांपेक्षा अधिक तीव्र हवामानाच्या घटना या पावसाळ्यात घडतात. आयआयटीच्या संशोधकांनी रिसर्चमधून काही महत्वाच्या मुद्यांना हायलाईट केलंय. या रिसर्चचे एक संशोधक असलेल्या विमल मिश्रा सांगतात, शेती आणि पाणी व्यवस्थापन या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर या सगळ्याचा गंभीर परिणाम होत आहे. शिवाय पीक उभं राहिल्यावर जर पाणी नसेल तर जे काही पाणी शिल्लक आहे ते  उपसण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे भूजल पातळीही खालावते. 

दरवर्षी भात आणि मका पिकाखालच्या जवळपास १० ते १५ टक्के क्षेत्रावर दुष्काळ पडतो असं या संशोधनातून समोर आलंय. अचानक आलेल्या तीव्र स्वरूपाच्या दुष्काळामुळे पीक उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. विशेषतः १९७९, १९८६ आणि २००१ या तीन वर्षात हा अधिक आहे. या सगळ्याचं विश्लेषण करताना मिश्रा यांनी म्हटलंय की, पावसाळ्यात तापमानात जी वाढ होतेय त्यामुळे भारतात अशाप्रकारच्या घटना घडू शकतात. या वाढत्या फ्लॅश दुष्काळाच्या सावटामुळे पुढच्या काळात भारतातलं शेती उत्पादन, सिंचन या सगळ्यावर याचे गंभीर परिणाम होतील असंही संशोधक सांगतायत.

हेही वाचा : पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

पाणी असलेल्या भागातही दुष्काळ

फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक आलेला दुष्काळ ही गंभीर समस्या म्हणायला हवी. शेतीच्या अर्थकारणावर याचा थेट परिणाम होतो. पारंपरिक दुष्काळाच्या पद्धतीपेक्षा हा दुष्काळ अधिक तीव्रतेनं वाढतो. या स्थितीत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. पाऊस अनेक दिवस लांबतो. देशातल्या काही भागांमधे अचानक येणाऱ्या या दुष्काळाची तीव्रता वाढतेय. पाऊस कमी पडणाऱ्या गंगेच्या मैदानी खोऱ्यात अशी काही उदाहरण आहेत. 

या संशोधनासाठी सहा वेगवेगळे प्रदेशनिहाय भाग करण्यात आले. त्याचा अभ्यास झाला. पाऊस नसताना प्रामुख्याने चोहोबाजूंनी पाणी असलेली बेटं आणि हिमालयीन भागातही फ्लॅश दुष्काळ पडत असल्याचं संशोधनातून  समोर आलंय. 

हवामान बदलाची झळ शेती, मातीला

दुष्काळाच्या झळा आपण वारंवार अनुभवतो. पाऊस, उन्हाचे खेळ आपल्याला नवीन नाहीत. अशातच अचानक येणाऱ्या दुष्काळालाही सामोरं जावं लागतं. एकप्रकारे दुष्काळाचा नवा प्रकार म्हणून फ्लॅश ड्रॉटला मान्यता मिळालीय. त्यामुळे दुष्काळाच्या भयंकर स्थितीचा अंदाज बांधता येतो. शेती, मातीचे प्रश्न मात्र या अचानक येणाऱ्या दुष्काळामुळे अतिशय गंभीर बनलेत. या अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे हवामान तज्ञांचे अंदाजही फोल ठरू लागलेत. त्यांच्यावर आता नव्यानं मांडणी करायची वेळ आलीय. 

सद्यस्थितीतला अचानक येणारा दुष्काळ, त्याचे परिणाम, त्याची कारणं याचा शोध सध्याची पर्यावरणीय आव्हानं समोर ठेवून करायला हवा. तसा विचार करूनच आपल्याला उपाययोजना करता येतील. अचानक येणाऱ्या दुष्काळामागचे सगळे बारकावे, त्याची तीव्रता समजून घ्यायला हवी. तरच त्याची मुळं शोधता येतील. हवामान बदलाचं संकट जगभर घोंगावतंय. त्यातून निर्माण झालेले धोके भयंकर आहेत. फ्लॅश ड्रॉट त्याचंच अपत्य आहे. इतर अनेक गोष्टींसोबत शेती, मातीच्या प्रश्नांना याची झळ अधिक बसतेय.

हेही वाचा :

कुछ वायरस अच्छे होते है!

चीनी स्वप्नपूर्तीच्या नावाखाली चालतो इंटरनेटबंदीचा अजेंडा

लॉकडाऊन संपल्यावर खासगी वाहनं कायमची ‘लॉकडाऊन’ करा!

 

एकनाथांनी सांगितलेले वृक्षांचे गुण आपल्यात कायम झिरपत रहायला हवेत!

१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झाला