आनंदी प्रजासत्ताकासाठी 'बंधुता' विसरून चालणार नाही

२६ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ९ मिनिटं


आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे.

स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वत्रयी भारतीय संविधानाचा पाया आहे. २५ नोव्हेंबर १९४९ला भारतीय संविधानसभेतल्या आपल्या शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याबाबतच्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वत्रयीचा आपल्याला एकत्रितच विचार करावा लागतो, त्यांचा सुटासुटा विचार करता येत नाही असं बाबासाहेब त्यावेळी म्हणाले आहेत.

समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचं बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणं होय ; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. आणि बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात रहाणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल. याच भाषणात त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे की, भारतीय समाजात दोन गोष्टींची उणीव आहे हे वास्तव आपण स्विकारलं पाहिजे, त्या दोन गोष्टी म्हणजे समता आणि बंधुत्व.

बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव

आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. सर्वांना स्वातंत्र्य उपभोगायला मिळावं आणि त्यासाठी संधीची समानता अस्तित्वात असली पाहिजे यासाठीच्या रचनेला कायद्याचं पाठबळ देता येतं. पण बंधुता हा मात्र मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे.

भारतीय संविधानात अप्रत्यक्षपणे बंधुतेचं मूल्य जागोजागी डोकावताना दिसतं. पण संविधानात दोन ठिकाणी बंधुत्वाचा थेटपणे उल्लेख आहे. पहिला उल्लेख संविधानाच्या उद्देशिकेत आहे. ...आणि त्या सर्वांमधे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन.... असा तो उल्लेख आहे. बंधुता कशासाठी? तर प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जपली जाईल आणि त्यातूनच राष्ट्रीय ऐक्य आकाराला येईल, यासाठी समाजात बंधुतेची भावना वाढीस लावण्याचा संकल्प आपण संविधानाद्वारे स्विकारला आहे.

बंधुतेबाबतचा दुसरा उल्लेख संविधानातल्या कलम ५१ क मधे आहे. नागरिकांची मूलभूत कर्तव्य स्पष्ट करणारं हे कलम आहे. त्याच्या उपकलम ड मधे असं म्हटलं आहे की, 'धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातल्या सर्व जनतेमधे सामंजस्य आणि बंधुभाव वाढीला लावणं ; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणं हे नागरिक म्हणून आम्हा भारतीयांचं मूलभूत कर्तव्य आहे'.

भारताला एक राष्ट्र म्हणून जर समर्थपणे उभं रहायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीला एक माणूस म्हणून आदराची आणि सन्मानाची वागणूक इतरांकडून आणि व्यवस्थेकडून मिळाली पाहिजे. बंधुतेच्या भावनेशिवाय इतरांबद्दल अशी वागणूक हा आपल्या आचरणाचा भाग बनणार नाही. एक राष्ट्र म्हणून भारताला जर समर्थपणे आपली वाटचाल करायची असेल तर नागरिकांमधे सामंजस्य आणि परस्पर सहकार्याची भावना वाढीला लागली पाहिजे असाच आपल्या संविधानाचा सांगावा आहे.

हेही वाचा: सातवीच्या पुस्तकातलं संविधान वाचलंय?

बंधुतेशिवाय संविधानाची अंमलबजावणी अशक्य

लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि राष्ट्रप्रेम ही संविधानाची पंचसुत्री आहे. जात, धर्म, भाषा आणि लिंगाधारित भेदभावाला मुठमाती देऊन सर्व भारतीय नागरिकांच्यामधे आदर आणि सहकार्याची भावना जोवर वाढीला लागत नाही तोपर्यंत वरच्या पंचसुत्रीपैकी एकही गोष्ट समाजात रुजू शकणार नाही.

लोकशाहीमधे प्रत्येकाचं मत विचारात घेऊन निर्णय होणं अपेक्षित आहे. हा निर्णय कधी एकमताने होईल तर कधी बहुमताने होईल. बहुमताचा निर्णय अल्पमतवाल्यांनी स्विकारायचा. पण त्याच बरोबर आपण बहुमतात आहोत म्हणजे आपण काहीही दांडगाई करायला मोकळे आहोत असं बहुमतवाल्यांनी न मानता, त्यांनी अल्पमतातल्या नागरिकांच्या भावनांचा आदर करत, त्यांना सोबत घेऊनच पुढची वाटचाल करायची हा लोकशाही व्यवहाराचा गाभा आहे. एकमेकाबद्दलच्या आदराची भावना जर मनात नसेल तर दोन्ही बाजूंनी लोकशाहीला पूरक असा समंजस व्यवहार होणे अवघड आहे.

समाजवादाचा जो आर्थिक आशय आहे, तो प्रत्येकाला आपलं आयुष्य फुलवण्याची समान संधी मिळाली पाहिजे या सूत्रातून व्यक्त होतो. प्रत्येक मुली-मुलाला चांगले शिक्षण मिळावं, प्रत्येकाच्या हाताला सक्षम रोजगार मिळावा या संविधानिक तरतुदीवर प्रभावी अंमलबजावणी झाल्याशिवाय प्रत्येकाला आपल्यातल्या सुप्त क्षमतांचा विकास करता येणार नाही. राष्ट्राच्या प्रगतीत सहभागी होता येणार नाही.

बंधूतेच्या भावनेची उणीव

संविधानातील ३८वं कलम हे नागरिकांच्या आर्थिक उत्पन्नांमधली विषमता कमी करण्याची जबाबदारी सरकारवर टाकते. जगण्यासाठीची साधनं आणि संपत्तीचं केंद्रीकरण मुठभरांच्या हाती होणार नाही तसंच समाजातल्या भौतिक साधनांचं स्वामित्व आणि वितरण बहुसंख्य समाजाच्या हिताच्या दृष्टीनेच व्हावं अशी आर्थिक धोरणं राबवण्याची अपेक्षा ३९व्या कलमाने राज्यव्यवस्थेकडून केलेली आहे.

आता याबद्दल शासनसत्ता कायदे कधी करेल? किंवा केलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी कधी होऊ शकेल? माझ्यासोबतच इतरांचाही सन्मानाने जगण्याचा संवैधानिक अधिकार आपण सर्वजण जेव्हा मनापासून स्विकारू तेव्हाच हे होऊ शकेल.

संविधानाचे २५वं कलम, भारतीय नागरिकांना वैयक्तिक जीवनात आपल्या पसंतीप्रमाणे धर्मपालनाचा आणि सद्सदविवेकाने वागण्याचा अधिकार देतं. पण हा अधिकार देताना संविधानाने याला काही मर्यादाही घातल्या आहेत. आपल्यापेक्षा वेगळी श्रध्दा बाळगणाऱ्या इतर नागरिकांच्या तशी श्रध्दा बाळगण्याच्या अधिकाराचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे ही त्यापैकी एक मर्यादा आहे. याशिवाय, आपल्या धार्मिक आचरणामूळे इतर नागरिकांच्या कुठल्याही मूलभूत अधिकारांचा संकोच होणार नाही ही काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे.

बाबासाहेब म्हणाले तसं, भारतीय समाजात बंधूतेच्या भावनेची उणीव असल्याने, आज स्वधर्माबद्दल कट्टर अभिमान बाळगणारे लोक आणि काही कट्टर धर्मांध संघटना इतरांच्या धर्माबद्दल वाट्टेल तशी गरळ ओकताना, विषारी प्रचार करताना दिसतात. त्यातून वाढणारे धार्मिक तणाव, होणाऱ्या धार्मिक दंगली अनेक निरपराधांची आयुष्य उध्वस्त करतात. मॉब लिंचींगसारख्या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडतात. सार्वजनिक संपत्तीची नासधुस केली जाते. नागरिकांमधला परस्पर स्नेह आणि सामंजस्याच्या भावनेशिवाय भारतीय संविधानाला अपेक्षित धर्मनिरपेक्षतेची संकल्पना भारतीय समाजात कशी रुजेल.

हेही वाचा: संविधान म्हणजे काय रे भाऊ!

मनामनात बंधुतेची भावना हवी

अलीकडच्या काळात जातीय अत्याचार आणि महिला अत्याचारांच्या घटनांमधलं क्रौर्य वाढलेलं दिसत आहे. एक माणूस म्हणून आपल्याला मिळालेल्या संविधानिक अधिकारांची जाणीव झाल्याने, शोषित जातीसमुहातले नागरिक, महिला यांनी आपल्यावरचे अन्याय, शोषण हे पुर्वीप्रमाणे मुकाटपणे सहन करण्याचं नाकारायला सुरवात केली आहे. आपल्या सन्मानाबद्दल, संवैधानिक अधिकारांबद्दल बोलायला सुरवात केली आहे.

कालपर्यंत जे आपल्या समोर मान वर करत नव्हते ते आज अधिकारांची भाषा करायला लागलेत ही गोष्ट अजूनही उच्चजातवर्णीय मानसिकता बाळगून असणाऱ्यांना सहन होत नाही. त्यातून हे क्रौर्य वाढत आहे. जातीय अत्याचार, महिला अत्याचार रोखण्याच्या हेतूने बनवलेले अनेक कायदे असताना आणखी नव्या कठोर कायद्यांची मागणी होते. नवे कायदे केलेही जातात पण अत्याचारांची मालिका थांबत नाही.

संविधानाने सर्वांना आपलं आयुष्य फुलवण्याचं स्वातंत्र्य दिलंय, जन्माच्या आधारे भेदभावाची भूमिका नाकारलीय, सर्वांना बरोबरीच्या रांगेत आणून बसवलय. हे जे संविधानाचं स्वप्न आहे ते रुजविण्यासाठी कायदे तर आवश्यक आहेतच पण कायद्यांच्या जोडीला नागरिकांच्या मनामनात बंधुतेची भावना वाढीला लागल्याशिवाय त्या स्वप्नाच्या दिशेने निर्धाराने वाटचाल होणार नाही.

संविधानाचा सांगावा

सामाजिक न्याय हा भारतीय संविधानाचा गाभा आहे. मुलं, बालकं, दिव्यांग समूह, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास समूह, आदिवासी जमाती, पुर्वाश्रमीचे अस्पृश्य जाती समूह अशा सर्वांनाही प्रगतीच्या रस्त्यावर चालण्याची समान संधी असावी म्हणून अशा समुहांना विशेष संधी, प्राधान्याने संधी उपलब्ध व्हावी यासाठी राज्यव्यवस्था कायदे करु शकते, राखीव निधी ठेवू शकते, विकासाच्या विशेष योजना आणू शकते, शिक्षण आणि नोकऱ्यांमधे आरक्षणाची तरतूद करु शकते.

सरकारने केलेल्या अशा अनेक कायद्यांची आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही कारण विविध पातळ्यांवरच्या सत्तासमूहांनी किंवा निर्णयप्रक्रियेच्या केंद्रस्थानी असणारांनी अजूनही समान संधीबाबतचा संविधानाचा सांगावा मनोमन स्विकारलेला नाही हे लक्षात येतं.

हेही वाचा: संविधानाची भीती कोणाला आणि कशासाठी?

विवेकी भारतीय प्रबोधन परंपरा

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली असं मानलं जातं. शालेय किंवा विद्यापीठीय शिक्षणात हेच शिकवलं जातं. आम्ही तेचं सांगत रहातो. ते योग्यही आहे. पण भारतीय समाजात गौतम बुद्ध ते संत कबीर, बसवण्णा ते संत तुकाराम, संत सोयराबाई ते संत जनाबाई अशी जी एक सकस विवेकी प्रबोधन परंपरा होऊन गेली या परंपरेने आम्हाला काय शिकवल, हेच तर शिकवलं.

गौतम बुद्ध जेव्हा प्रज्ञा, शिल आणि करुणेवर आधारित धम्माचा संदेश देत असतात तेव्हा ते मानवतावादाची, प्राणीमात्रावर प्रेम करण्याची शिकवणच देत असतात. चातुवर्ण्याला नकार देणारे तथागत जन्माच्या आधारे कुणीतरी छोटा आणि कुणीतरी मोठा ही विषमतेची परंपरा नाकारत असतात.

वैष्णवांचा धर्म सांगताना संत तुकाराम जेव्हा,

'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,
भेदाभेद भ्रम अमंगळ!'

ही रचना करतात तेव्हा ते ही हेच तर सांगत असतात. याच अभंगात तुकोबा पुढे म्हणतात,

'कोणाही जीवाचा न घडो मत्सर,
वर्म सर्वेश्वर पुजनाचे!'

प्रेमाचा, बंधुभावाचा यापेक्षा प्रभावी संदेश कुठला असणार!

संत कबीर प्रेमाचे महत्व सांगताना म्हणतात,

'पोथी पढि पढि जग मुआ,
पंडीत भया न कोय!
ढाई आखर प्रेमका,
पढे सो पंडीत होय!'

कितीही पोथ्या, ग्रंथ वाचले तरी तुम्ही काही विद्वान होऊ शकत नाही पण तुम्हाला जर प्रेमाची भावना समजत असेल, तुम्ही निरपेक्ष प्रेम करु शकत असाल तर तुम्ही खरे ज्ञानी अहात. एकूणच भक्ती संप्रदायाने प्रेमभावनेला महत्व दिलं आहे. वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचं महत्व सांगितलं. ईश्वरावरच्या भक्तीसाठी कुठलंही कर्मकांड करायची गरज नाही. ईश्वर आणि भक्तामधे मध्यस्थाची गरज नाही. आपलं काम नीट करत असताना हरीचं नाव मुखी असावं. आणि ईश्वरावर प्रेम करायचं म्हणजे ईश्वराने निर्मिलेल्या सृष्टीवर, प्राणीमात्रावर प्रेम करायचं. निरपेक्ष प्रेम हाच भक्तीसंप्रदायाचा पाया आहे.

दुष्टांचा दुष्टपणा गळून पडावा

बाराव्या शतकात जातीअंतासाठी, आंतरजातीय विवाहासाठी आपलं पद आणि प्रतिष्ठा पणाला लावणारे बसवण्णा यांनी सर्वांच्या सहभागातून निर्णय घेणारी अनुभव मंटप ही प्रक्रिया सुरु केली. बसवण्णांची अनेक वचनं उदारमतवादाची, मानवधर्माची भूमिका स्पष्ट करणारी आहेत.

हा कोणाचा, हा कोणाचा असं म्हणू नये तर, 'हा माझा हा माझा' असं म्हणावं अशी त्यांची शिकवण होती. ज्ञानोबा माऊलींनी पसायदानाच्या द्वारे सकल जगाचं कल्याण चिंतीलं आहे. त्यांनी सांगितलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गीतेवरचं भाष्य म्हणून प्रसिध्द आहे. गीता या ग्रंथातल्या सातशे संस्कृत श्लोकांचं स्पष्टीकरण करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी नऊ हजार ओव्या मराठीत लिहील्या. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा विनाश हे गीता या ग्रंथाचे सारभूत तत्व आहे.

'यदा हि यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत! 
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्!!
परित्राणाय साधूनां विनाशायच दृष्कृताम्!
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे'

या संदेशामधे दुष्टांच्या समूळ निर्दालनाची भूमिका मांडली आहे. त्यासाठी भगवंत पुन्हा पुन्हा अवतार घेतात अशी श्रध्दाळूंची मान्यता आहे. ज्ञानेश्वर हे मात्र संत होते. त्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा समारोप करताना मागितलेल्या पसायदानामधे,

'जे खळांची व्यंकटी सांडो,
तया सत्कर्मी रती वाढो!'

असं म्हणत दुष्टांचा दुष्टपणा गळून पडावा आणि त्यांना सत्कार्याची आस लागो, अशी भूमिका घेतली आहे. आणि मग शेवटी सर्वांच्या कल्याणाची अपेक्षा केलेली आहे. प्रेम हाच भक्ती संप्रदायाचा पाया आहे.

हेही वाचा: संविधानासाठी २६ जानेवारीचा मुहूर्त का ठरला?

आनंद करावा भांडू नये!

निरर्थक कर्मकांडाच्याद्वारे पूरोहितशाहीकडून बहुजन समाजाच्या होणाऱ्या लुटीबद्दल म. फुले यांनी अतिशय कठोर शब्दात आसूड ओढलेले आहेत. पूरोहितशाहीच्या विषमतावादी प्रथा-परंपरांना पर्याय म्हणून सत्यशोधक समाजाचा पाया घालणाऱ्या म. फुले यांनी आपली रचनात्मक भूमिका स्पष्ट करणारे अनेक अखंड रचले आहेत. 
एका अखंडात त्यांनी,

'ख्रिस्त महंमद मांग ब्राम्हणासि,
धरावे पोटाशी बंधुपरी!'

असं म्हणत आपल्या मनातल्या बंधुत्वाच्या व्यापक भूमिकेला स्पष्ट केले आहे. आपली भूमिका आणखी नेमकेपणाने मांडताना एका दुसऱ्या अखंडात ते म्हणतात,

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी,
त्याचे भय मनी धरा सर्व!
न्यायाने वस्तुंचा उपभोग घ्यावा,
आनंद करावा भांडू नये!

मला वाटतं, या अखंडाचा अर्थ उलगडून सांगण्याची गरज नसावी.

साने गुरुजींचं विश्वबंधुत्व

महाराष्ट्राचे आधुनिक संत म्हणून ओळखले जाणाऱ्या साने गुरुजींनी, 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' या साध्या, सरळ रचनेतून विश्वबंधुत्वाचा संदेश दिलेला दिसतो. त्रिचनापल्लीच्या तुरुंगात असताना सोबत तुरुंगात आलेल्या सहकाऱ्यांसमोर आंतरभारतीची संकल्पना स्पष्ट करताना साने गुरुजींनी मनाला फार भिडणारं एक उदाहरण दिलंय.

पायात काटा मोडला तर त्याची वेदना मेंदूमधे जाणवते, ती वेदना डोळ्यांमधून अश्रुंद्वारे बाहेर येते आणि त्या वेदनेचं कारण म्हणजेच पायातला काटा दूर करण्यासाठी हात पायाकडे सरसावतात. एका शरीराचे हे  वेगवेगळे अवयव असले तरी, त्या अवयवांतल्या अशा एकतानतेप्रमाणेच विविध भाषा बोलणाऱ्या भारतीयांनी परस्परांच्या सुखदुःखात सामील होण्याची भूमिका घेतली तर राष्ट्रीय ऐक्य हा हा म्हणता साधले जाईल ही साने गुरुजींची भूमिका आजही तितकीच अनुकरणीय आहे. 

कृतज्ञता; निर्मळ मानवी भावना

मानवी समाजाचा आजवरचा प्रवास हा अनेकांच्या मेहनतीतून, प्रयोगांमधून आणि अभ्यासातून झालेला आहे. आपलं दररोजचं जगणं आनंदी आणि सुखकर बनविण्यासाठी आज आपण ज्या अनेक संकल्पनांचा, शोधांचा, उपकरणांचा, सोई-सुविधांचा वापर करत असतो त्या सर्व गोष्टी शोधण्यासाठी, बनवण्यासाठी अनेकांनी आपली आयुष्य खर्ची घातलेली असतात. त्याबद्दल त्यांना फार काही लाभ मिळालेले नसतात.

मानवी संस्कृतीचा हा प्रवास अक्षरशः लाखोंच्या योगदानातून पुढे जात राहिलेला आहे. आज कुणीही आपल्या व्यक्तीगत आयुष्यात जे काही साध्य केलेलं असतं ते काही केवळ त्या व्यक्तीच्या वैयक्तिक कर्तृत्वामूळेच साध्य केलेलं नसतं. त्यामधे समाजातल्या अनेकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असतो. अशा सर्वांचं आपल्या आयुष्यावर काही ना काही ओझं आहे, आपण त्यांना काही देणं लागतो, ही कृतज्ञतेची भावना फार सुंदर असते. निर्मळ मनाची द्योतक असते.

अशावेळी मग आपलीही काही जबाबदारी ठरते. बंधुतेच्या भावनेनं, प्रेमाच्या भावनेनं इतरांसोबत व्यवहार करत सहकार्याची, समन्वयाची प्रवृत्ती वाढीला लावण्यासाठी हातभार लावण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे.

हेही वाचा: सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही

हवं सहकार्य आणि समन्वयही

आपल्या सुखदुःखात सामील होणारं कुणीतरी आहे. आपल्यावर संकट आलं तर रात्री बारा वाजता धावून येणारं कुणीतरी आहे, असा स्नेह, आपलेपणा ज्यांच्या वाट्याला येतो अशी माणसं संकट आल्यावर गलितगात्र न होता, धैर्याने संकटाचा मुकाबला करतात. आपल्या आयुष्यात पुढे जायचं स्वप्न पहातात. मानवी मन आणि त्या मनाच्या सुचनांप्रमाणे वागणारं शरीर यांच्या एकत्रित क्षमता अफाट आहेत.

मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात मानवी मन आणि शरीराच्या अफाट क्षमता अजुनही पुर्णपणे समोर आलेल्या नाहीत, वापरल्या गेल्या नाहीत. सहकार्याच्या आणि समन्वयाच्या वातावरणातच  हे होणं शक्य आहे. जात, खानदान, धर्म, भाषा यांच्या टोकदार अस्मिता द्वेष किंवा हेवेदावे शिकवतात. द्वेष आणि हेवेदाव्याच्या प्रभावात मनाची सकारात्मकता गळून पडते. नकारात्मकतेच्या प्रभावात प्रगतीची वाट हरवून जाते. आपली गुणवत्ता सुधारण्यासाठी निकोप स्पर्धा मदत करते.

आनंदाच्या गावाचा रस्ता

आज एका बाजूला जात-धर्माच्या टोकदार अस्मितांचे जीवघेणे संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला पुढे जाण्यासाठी सुरू असलेली गळेकापू स्पर्धा, अशा वातावरणात मानवी मनाची सर्जनशीलता मारली जातेय. नवनिर्माणाच्या शक्यता मावळत आहेत.

मागचा जन्म आपल्याला आठवत नाही, पुढचा जन्म आपल्याला माहित नाही. अशावेळी मिळालेल्या या जन्मात प्रत्येक जीवाला सुखी होण्याचा अधिकार आहे आणि ते शक्यही आहे. एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या क्षमतांचा परस्परपूरक पध्दतीने उपयोग करुन घेत आपल्याला सामुहिकरित्या आनंदाच्या गावाचा रस्ता सापडणं शक्य आहे. पण त्यासाठी बाबासाहेबांनी व्यक्त केलेली खंत दूर केली पाहिजे.

भारतीय समाजातल्या बंधुतेच्या भावनेची उणीव भरुन काढली पाहिजे. तथागत गोतम बुद्ध, बसवण्णा, संत कबीर, संत सोयराबाई, संत जनाबाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, म. फुले, साने गुरुजी आणि या सर्वांच्या जोडीला भारतीय संविधानाचाही हाच आपल्यासाठी सांगावा आहे. आपण तो आचरणात आणूया.

हेही वाचा: 

बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

आपल्या आतला विवेकाचा आवाज म्हणजे गुरू

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

गोरोबांच्या भूमीत साहित्याची नवी वाट तयार झालीय

केंद्राच्या कायद्याला राज्य सरकार आव्हान देऊ शकतं का?

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचा हा लेख आंतरभारती दिवाळी अंकात प्रकाशित झालेला आहे)