आपापल्या प्रबोधनाची एकादशी

१९ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीला देव झोपतो असं मानतात. तिथून पुढं चार महिन्यांनी कार्तिकी एकादशीला हा देव उठतो. देव उठतो म्हणून या एकादशीला प्रबोधिनी, देवउठनी, मोठी एकादशी अशी वेगवेगळी नावं आहेत. त्याचा अर्थ काय असू शकेल, याचा अकराव्या दिशेने घेतलेला शोध.

एकादशी म्हणजे मराठी कॅलेंडरनुसार अकरावा दिवस. शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात अशा महिन्यातून दोन एकादशी येतात. महिन्यांनुसार शुक्ल आणि कृष्ण पक्षातल्या एकादशीची क्रमानं नावं अशी. चैत्र - कामदा आणि वरूथिनी, वैशाख - मोहिनी आणि अपरा, ज्येष्ठ - निर्जला आणि योगिनी, आषाढ - शयनी आणि कामिका, श्रावण - पुत्रदा आणि अजा, भाद्रपद - परिवर्तिनी आणि इंदिरा, अश्विन - पाषांकुशा आणि रमा, कार्तिक - प्रबोधिनी आणि फलदा, मार्गशीर्ष - मोक्षदा आणि सफला, फाल्गुन- आमलकी आणि विजया.

अकरावं ते मन 

कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ ही पाच ज्ञानेंद्रिय. हात, पाय, जीभ, गुदद्वार आणि लिंग ही पाच कर्मेंद्रिये आणि एक मन असे मिळून अकरा होतात. याही बाजूने एकादशीकडे पाहता येईल. एकादशीला उपवास करतात. उपवास म्हणजे जवळ राहणं. देवाच्या जवळ राहण्याचा या दिवशी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. देवाच्या जवळ राहणं म्हणजे त्याची मूर्ती किंवा त्याच्या फोटोजवळ बसणं, असं नाही.

स्मरण हा एक नवविधा भक्तींचाच प्रकार. त्यानुसार सतत देवाच्या स्मरणात आणि अनुसंधानात असावं असं सांगितलंय. संत गोरोबा महाराज, संत सावता महाराज हे स्वतःचा धंदापाणी करत असतानाच सतत ईश्वराच्या अनुसंधानात राहत. आपण जे काही काम करतोय, ते आपल्या ज्ञानेंद्रिय, कर्मेद्रिय आणि मनाच्या बळावर आणि त्यांच्या मदतीने करत असतो. या दिवशी देवाला पटणार नाहीत, अशी काम या एकादश म्हणजेच अकरा इंद्रियांनी करू नयेत असं म्हटलंय.

एक और एक ग्यारह

वारकरी धर्म हा समतेचा पुरस्कर्ता आहे. वैष्णव, शैव, शाक्त असे अनेक पंथ आणि उपपंथ आहेत. यातील शैव आणि वैष्णवांचं मिलन कार्तिकी एकादशीत अभिप्रेत आहे. या एकादशीला विष्णुला प्रिय असलेली तुळस ही महादेवाला अर्पण केली जाते. महादेवाच्या आवडीचं बेलाचं पान विष्णूला अर्पण केलं जातं. हरी आणि हर यातील भेद मिटवण्याचा हा प्रयत्न आहे. एकादशी म्हणजे, मनभेद, मतभेद असले तरी आपण सर्वांनी एक व्हावं हाच संदेश आहे.

तसंही पांडुरंगाला हरिहराचंच प्रतीक मानलं जातं. कट्टर शैव असलेले संत नरहरी महाराज विठ्ठलभक्तीकडे कसं वळले, याची कहाणी सळ्यांनाच माहीत आहे. जगद्गुरू तुकोबारायांनीही ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ असल्याचं म्हटलंय. हिंदीत ‘एक और एक ग्यारह’ म्हणतात. दोन जीव एकत्र आले तर त्यांना अकराचं बळ मिळतं. वारकरी धर्मात अनेक जाती, धर्म, पंथ, उपंथातले एकेक मणी जुळलेत. त्यांची एक वैश्विक माळ झाली. एक हरी आणि एक हर एकत्र येतो. एक ईश्वर आणि एक जीव एकत्र येतो. त्याचीच ही एकादशी.

बीज झोपतं, बीज जागं होतं

आषाढी ते कार्तिकी हा चार महिन्यांचा काळ आहे. हा पावसाळ्याचा काळ असतो. शक्यतो या काळात कोणत्याच मोहिमा आणि प्रवास जुन्या काळात होत नसत. जणू काही सगळं अगदी एका ठिकाणी थांबायचं. निसर्ग म्हणजेच देव. बियाणंदेखील मातीत बराच काळ झोपलेलं असतं. याचा अर्थ असा नाही की ते संपलंय. तर ते बीज नव्या सृजनाच्या तयारीत असतं. पावसाळ्यात देहाच्याही हालचाली आणि क्रिया ह्या झोपी गेल्याप्रमाणे मंदावलेल्या असतात.

या चातुर्मासात म्हणजेच चार महिन्यांच्या काळात शेतीवर जास्त फोकस असतो. बिजांची निद्रावस्था हळूहळू संपत जाऊन मातीतून कोंब बाहेर डोकावयाला लागतात. पुढं दिवाळीपर्यंत ते फळतंही. आषाढीला मातीत ‘बीजशयन’ होतं. कार्तिकीला फळ, धान्य आदी स्वरूपात ‘बीजप्रबोधिनी’ होते.

जगद्गुरू तुकोबारायांनी अनेक अभंगांतून संतांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केलीय. एका अभंगात ते म्हणतात, ‘आय सांगो आता संतांचे उपकार ? मज निरंतर जागविती’

आता जगद्गुरू तुकोबा माउली जागविती या शब्दाआधी  ‘निरंतर’ हा शब्द वापरतात. ते शब्दांचे धनी होते आणि सावकारही. त्यामुळे शब्दांचा ‘अर्थपूर्ण’ वापर ते नेहमी अगदी काळजीपूर्वक करतात. निरंतर म्हणजे वारंवार किंवा पुन्हा पुन्हा. एखाद्या विषयांची इंटेन्सिटी दाखवताना आपण द्विरुक्ती वापरतो. काही मुळीच नको असल्याचं आपण, ‘नाही, म्हणजे नाही’ असं दोनदा म्हणतो. हे तसंच आहे.

आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात असं दिवसभर अधूनमधून शारीरिकदृष्ट्या झोपत असतो. ही वैचारिक झोप असते. ‘बी अलर्ट’ हा सिग्नल आपण विसरतो. आपण सैनिकासारखेच दक्ष असलं पाहिजे. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ म्हणून आपण जागं राहायला हवं. बॉर्डरवरील जवान सदैव जागे असतात. आपल्या सीमेत कुणी येऊ नये म्हणून त्यांना सतत जागता पाहरा द्यावा लागतो.

देव कसा झोपतो?

आपल्याला काम, क्रोध वगैरे सहा विकारांपासून सावध राहायचंय. आपल्यातली माणुसकी सांभाळायचीय. पण कधी कधी आपण आपल्या प्रपंचात खूप जास्त रमतो. मग आपल्याला आध्यात्मिक झोप लागते. आपण आपल्या प्रापंचिक स्वार्थासाठी समाज, मानवता हे सगळं विसरतो. या वेळी प्रबोधनाची गरज असते. आपली कर्तव्य आणि मानवता आपण अनेकदा प्रपंचात गुंतल्यामुळे झोप लागल्यासारखं विसरतो. म्हणून संत आपल्याला वारंवार जागवतात. आपलं प्रबोधन करतात. आपल्याला उठवतात.

देव, ईश्वर हा तर सर्व सृष्टी चालवतो असं मानलं, तर मग या चातुर्मासात झोपलेला देव सृष्टी कशी चालवत असेल? हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. आषाढी ते कार्तिकी सृष्टीच्या पालनाची जबाबदारी असलेल्या विष्णुचं शयन म्हणजे केवढी मोठी रिस्क असायला हवी होती निसर्गाला. ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात, विष्णू पालन करतात आणि शिव संहार करतात, असं आपण अनेक कथांमधून ऐकलं किंवा वाचलेलंय. मग देव झोपतो म्हणजे नेमकं काय याचाही वेगळ्या अंगाने विचार करायला हवा.

एखादं व्यापाऱ्याचं कुटुंब पाहा. तो तरुण असतो तोपर्यंत अगदी काही क्षणांसाठीही तो आपलं दुकान सोडून इकडं तिकडं भटकत नाही. पुढं त्याची मुलं तरणी झाल्यावर तो बऱ्यापैकी रिलॅक्स होतो. मग कुठंतरी प्रवासाला जातो. आपल्या व्यक्तीगत छंद, आवडीनिवडी जोपासतो. इथंही तसंच आहे.

ईश्वराला वाटतं की, आता त्याचे भक्त ‘सज्ञान’ झालेत. मी काही काळ ‘रेस्ट’ घ्यायला काही हरकत नाही. सर्व काही देवाच्याच भरवशावर टाकून चालणार नाही. आपणही आता आपलं कर्तव्य करायला हवं, असा प्रबोधिनी एकादशीचे संदेश आहे. भक्तांनी मानवता जोपासण्याचं ईश्वरी कार्य स्वतः करावं, असाही सांगावा असावा.

ज्ञानदीप लावू जगी

जागा असणाराच दुसऱ्याला झोपेतून जागं करू शकतो. झोपलेला माणूस दुसऱ्याला जाणीवपूर्वक जागं करू शकत नाही. एक झोप अज्ञानाचीही असते. या झोपेतून उठवायचं असेल तर ज्ञानाचे दीप लावले पाहिजेत. ज्ञानमूर्ती संत नामदेव महाराज ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ असं म्हणतात. संध्याकाळी अंधार पडायला लागला की दिवेलावणीची वेळ होते. दुसरी वेळ अगदी पहाटे उठल्यावर परत कामाला लागण्याची असते. या दोन्ही वेळेत आपण जागं असतो.

आपण झोपताना दिवा शांत करतो. मग आपल्याला निवांत झोप लागते. आजच्या काळातदेखील आपण झोपण्यापूर्वी मोठे लाईट बंद करतोच की. पण जागं झाल्यावर लाईट लावले नाही तर किती अडचणी होतील. पहाटेच्या वेळी अंधारच असतो. आपल्याला कामं करायची असतात. त्यामुळे लाईट लावणं आवश्यक असते. आपल्या बेडच्या बाजूलाच लाईटचं बटन असतं. डोळे उघडताच आपण पहिल्यांदा लाईट लावतो. मग पुढील कामांना लागतो.

प्रबोधन, ज्ञान आणि कृती

प्रबोधन आणि प्रकाश हे सलगच येतात. यातही प्रबोधन आधी आणि मग प्रकाश पडतो. किंबहुना तो पडणं आवश्यकच आहे. नाहीतर आपण थंडीच्या दिवसात लवकर उठतो. मात्र आपल्याला बेड काही सोडवत नाही. विनाकारण आपण आपल्या रजईतच लोळत असतो. मात्र जेव्हा या जागृतीसोबत आपण उठून कामाला लागावं असं ‘ज्ञान’ मिळेल, तेव्हाच पुढच्या हालचाली सुरू होतील.

बरं केवळ प्रबोधन होऊन आणि ज्ञानप्राप्ती होऊनही चालत नाही, तर कृतीदेखील तेवढीच आवश्यक आहे. समजा मी झोपेतून सकाळी सहाला उठलो. मला सकाळी नऊची गाडी पकडायचीय, हे माहीत आहे. पण मी सहापासून ‘नऊची गाडी, नऊची गाडी’ असं पुटपुटत बसलो तर त्याला काही अर्थ नाही. मला लगेच माझी खाट सोडून तयारी करावी लागेल.

संतांची परंपरा प्रबोधनाची 

भारतीय संतांनी वारंवार प्रबोधनाची परंपरा चालवलीय. त्यांनी क्षणोक्षणी आपल्याला अलर्ट केलंय. त्यांचे अभंग म्हणजे जीवनसंवादच आहेत. मात्र केवळ त्यांचे अभंग म्हणून चालणार नाही. त्यावर अॅक्शन घेणंही तेवढंच गरजेचं आहे. वारकरी संतांना संपूर्ण समाजाचा सखोल अभ्यास होता. समाजाचे वीक पॉईंट, स्ट्राँग पॉइंट त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी नेमकं वर्मावर बोट ठेवून सामान्यजनांना वारंवार जागं केलंय.

गुरू नानकदेव देव, संत कबीर महाराज, महात्मा बसवेश्वर, सर्वज्ञ चक्रधर स्वामी, संत तुकाराम महाराज आदी महामानवांनी आपल्याला निरंतर जागवण्याचा प्रयत्न केलाय. कठोपनिषदामध्ये ‘उतिष्ठ जाग्रत’ असं म्हटलंय. आपलं उठणंच पुरं नाही, तर सोबत जागं होणंही आवश्यक आहे. आपण जागं झालोच तर आपण आपलं कल्याण करू शकतो. आपल्या सोबत इतरांचंही भलं करू शकतो.


या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ।।

हा गीतेतला श्लोक आहे. याचा भावार्थ असा की, जेव्हा सर्वसामान्य लोकांची रात्र असते, तेव्हा संयमी लोक जागं असतात. आणि जेव्हा सामान्यजनांची रात्र असते, तेव्हा मुनी किंवा साधक जागं राहतात. सामान्य लोक झोपतात तेव्हा संयमी जागे असतात आणि सामान्य लोक जागं असतात तेव्हा संयमी झोपतात असा याचा अर्थ नाही. सोप्या शब्दांमधे सांगायचं झालं, तर जेव्हा आपण सर्वसामान्य लोक आपल्या संसारात गुंतलेले असतो, तेव्हा महापुरूष हे समाजासाठी जागृत राहून काम करतात. त्यांनी वैयक्तिक स्वार्थाचा त्याग केलेला असतो.

अलीकडच्याच काळातली उदाहरणं घ्यायची झालीत तर महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मयोगी गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही महामानवांची परंपराच डोळ्यांसमोर येते.

शिवकाळात अनेक वतनदार, जहागिरदार हे आपापल्याच जगात खूश होते. ते आपल्याच आनंदात रममाण होते. त्यावेळी फर्जंद शहाजी राजे, राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वराज्य संस्थापक शिवराय जागृत होते. बाल शिवबांची छत्रपती शिवरायांपर्यंतची ही जागृतावस्थेचीच पूर्तता आहे. आपण आपल्या व्यक्तिगत प्रपंचाच्या मोहपाशातून जागं झालं पाहिजे. विश्वात्मक प्रपंचासाठी जागं राहून काम केलं पाहिजे. त्यासाठी आत्मशोध घेणं आवश्यक आहे.

अकराव्या दिशेने शोध

मी कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. हरवलेली वस्तू सापडण्याची शक्यता दहा दिशांमध्ये असते. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, खाली आणि वर या दहा दिशा आहेत. या दहा दिशांमध्ये आपली हरवलेली वस्तू किंवा आपल्याला नव्यानं जी शोधायचीय, ती वस्तू सहज सापडेल. 

यासाठी आपल्याला ‘आत्मशोध’ घ्यायचाय. ‘मी’ शोधायचाय. हा मी या दहा दिशांमध्ये नक्कीच नाही. तर तो आपल्या अंतरातल्या अकराव्या दिशेत सापडेल. ही आपल्या अंतरातली अकरावी दिशा प्रबोधित, प्रकाशित असेल तरच तो ‘मी’ आपल्याला दिसेल. ही प्रबोधिनी एकादशी या अकराव्या दिशेत लपलेल्या ‘मी’च्या शोधास प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा... हॅप्पी जिंदगी...