सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं?
समजा आपल्याला कुणी सांगितलं की तू `पश्चद्वार` कारच घे, कारण तीच तुला परवडेल. आपण कितीही मराठीप्रेमी असू तरी हे आपल्याला कळण्याची शक्यता नाही. पश्चद्वार म्हणजे हॅचबॅक इतका तर्क कुणालाही खेचता येणार नाही. तुझं `पत्राशय` चेक कर, मेल पाठवलाय. असं कुणी सांगितलं तरी आपण आपल्या मेलचा इनबॉक्स धुंडाळायला जाणार नाही. गर्भाशयात बाळ असतं तसं पत्राशयात मेल, हे कितीही हळवा कवी असला तरी त्याच्या प्रतिभेला स्फुरणार नाही.
एखाद्या मंत्र्याच्या पीएला सांगितलं की साहेबांच्या `छापील पत्र पुस्तिके`वर मला पत्र हवंय. तर तो आपल्याला हाकलून नक्कीच लावेल. कारण लेटरहेडला असं काही तरी म्हणत असतील, असा विचारही तो करू शकणार नाही. सध्या कम्प्युटरवर लिहिताना सर्रास वापरल्या जाणाऱ्या युनिकोड फॉण्टना कुणी विश्वसंकेत म्हटलं तर आणि व्हाईट कॉलर्ड क्राईमला ‘श्वेत गुन्हेगारी' असा मराठी शब्द दिला तर त्याचा शिवाजी पार्कवर सत्कार व्हायला नको का?
हेही वाचा : कुणा एकाच्याच मालकीची आहे का ही भाषिक संस्कृती?
हे सगळं महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा खात्याच्या एका सरकारी पत्रकाशी संबंधित आहे. ३१ मे २०२१ या तारखेचं हे पत्रक सध्या सोशल मीडियावर फिरतंय. त्याचं आपल्या मराठीत सार असं – १९७३ साली एक शासन व्यवहार कोश तयार करण्यात आला होता. त्यात सरकारी कामकाजात वापरण्यासाठी जवळपास साडेचोवीस हजार इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द दिलेत. सरकारचं भाषा संचालनालय काळानुसार हा कोश अपडेट करत असतं.
या सुधारणेसाठी नेमलेल्या उपसमितीने त्यात आणखी साडेसात हजार शब्दांची भर टाकलीय. हे नवेजुने शब्द एकत्र करून सरकारला कोशाची नवी आवृत्ती काढायचीय. पण मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय आला, तेव्हा त्यांनी सांगितलं की हा कोश सोपा करा. त्यामुळे मराठी भाषा खात्याने ही जबाबदारी आता राज्यभरातल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोपवलीय. त्यांना फक्त एका महिन्याच्या अवधीत शब्दांचे सोपे पर्याय सुचवायचेत.
आता हे अधिकारी कर्मचारी कोरोनाच्या आणीबाणीत आपली कामं करणार की एका महिन्यात पर्यायी शब्दांसाठी डोकं खाजवत बसणार? त्यांना आणखी वेळ द्यायला नको का? तरीही या शब्दांचा वापर करणाऱ्यांना या कोशनिर्मितीच्या प्रक्रियेत सामील करून घेण्याचं स्वागतच करायला हवं. हे असं पहिल्यांदाच घडत असावं. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठी भाषा खात्याचे मंत्री सुभाष देसाई यांचं अभिनंदन करायला हवं. त्यांना शासन व्यवहार कोशाचं म्हणजेच सरकारी कामकाजातलं भाषेचं महत्त्व कळलं असावं, अशी शंका घ्यायला पूर्ण वाव आहे.
पण त्यांना सरकारी भाषा खरंच सोपी करायची असेल तर एक चक्र पूर्ण उलटं फिरवावं लागणार आहे. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा जवळपास पन्नास वर्षं झाली, तरी प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं?
`अत्रेटोला` या पुस्तकांत अत्रेंचं `पदनाम... छे! बदनाम कोश` हे १८ फेब्रुवारी १९६३ ला राज्यपालांच्या अभिभाषणावर केलेलं भाषण छापलंय. ते वाचताना आपल्या लक्षात येतं की गेल्या पन्नास वर्षांत काहीच बदलेललं नाही.
अत्रे उवाच, `जेव्हा १ मे १९६० रोजी आपलं मराठी राज्य निर्माण करण्यात आलं तेव्हा आम्हाला साहजिकच असं वाटलं की नामदार यशवंतराव हे बहुजन समाजाचे पुढारी असल्यामुळे बहुजन समाजातील लोकांना समजेल अशा मराठी भाषेतून राज्यकारभार चालवला जाईल. आपण संयुक्त महाराष्ट्र मिळवला तो केवळ काही मराठी भाषी लोकांना मानाचं स्थान मिळावं म्हणून नाही. तर सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना आणि कामगारांना कळते, त्या भाषेतून राज्यकारभार चालावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र आपण मिळवलाय.’
`इंग्रजी भाषा जाऊन त्याऐवजी प्रादेशिक भाषा याव्यात असं आमचं म्हणणं आहे. पण त्या योग्य मार्गाने आल्या पाहिजेत. निरनिराळ्या डेसिग्नेशन्सना मराठी प्रतिशब्द या पदनाम कोशात दिलेत. तेव्हा डेसिग्नेशन हाच शब्द आपण घेऊ या. डेसिग्नेशन याचा मराठी प्रतिशब्द हुद्दे असा आहे. पण त्यासाठी जो शब्द या समितीने वापरला आहे, तो म्हणजे पदनाम.’
‘मी काही दिवसांपूर्वी सचिवालयात गेलो होतो. तिथं एका अधिकाऱ्याच्या नावाखाली अभियंता अशी उपाधी आढळली. आता अभियंता म्हणजे काय कुणाला कळणार आहे? पब्लिक प्रॉसिक्युटर या शब्दाला मराठी शब्द सरकारी अभियोक्ता असा दिलाय. आता हा शब्द सामान्य मराठी माणसाला कळणार आहे का? माझं असं म्हणणंय की हा शब्दकोश तयार करताना सामान्य माणसाला ते शब्द कळतील की नाही याचा विचारच केलेला दिसत नाही.`
हेही वाचा : मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे
अत्रेंनी भाषणात कॅशियरसाठी रोखपाल ऐवजी नाणावटी हा गुजराती शब्द वापरण्याची सूचना केलीय. वायरमनला तारतंत्रज्ञ कसं म्हणायचं? पिगरीला सुकरायला न म्हणता डुक्करखाना का म्हणू नये? पोल्ट्रीला कुक्कुटपालन केंद्र न म्हणता कोंबडी केंद्र म्हटलं तर काय बिघडेल? असे त्यांचे प्रश्न आजही तितकेच लागू होतात.
पश्चद्वार, पत्राशय, विश्वसंकेत हे आज २०२१मधे शासन व्यवहार कोशात सुचवलेले पर्यायी शब्द अत्रेंनी टीका केलेल्या मानसिकतेतून जन्माला आलेत. हा शब्द सर्वसामान्य मराठी माणसाला कळेल का, हाच एकमेव निकष शब्दांची निवड करताना असायला हवा. सरकारच्या निर्णयप्रक्रियेच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य माणूस आहे की नाही, हे मंत्रालयातली भाषा सांगू शकते. ती भाषा मूठभरांची बटीक असेल तर मंत्रालयात शिरताना दिसणारी गाडगेबाबांची दशसूत्री ही फक्त शोभिवंत शोपीस बनून राहते.
अत्रे भाषणात सांगतात की, डॉ. रघुवीर यांच्या हिंदी शब्दकोशांच्या प्रभावात हे अवघड शब्द तयार केले जातात. ते रघुवीर तेव्हा नुकतेच जनसंघाचे अध्यक्ष झाले होते. हे नोंदवताना अत्रे सांगतात, त्यांनी जो वारसा ठेवला त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. कुणी काहीही म्हणो, पण डॉ. रघुवीर यांचा हा वारसा ब्राह्मणी हिंदुत्ववादाचा आहे.
महाराष्ट्रात जन्मलेल्या उर्दूला घाबरून रघुवीर आणि त्यांच्या चेल्यांनी हिंदीला संस्कृतच्या तुपात तळून काढलं आणि तिचं दीर्घकाळ नुकसान झालं. मराठीतही याच विचारधारेने भाषाशुद्धीचा आग्रह धरला होता. भाषाशुद्धी ही गोष्टच मुळात कोती मानसिकता दाखवते. उर्दू, फारसी, अरबी अशा भाषा मुसलमानांशी संबंधित मानून त्यातल्या शब्दांना अशुद्ध ठरवायचं. कष्टकऱ्यांच्या रोजच्या वापरातल्या शब्दांना अशुद्ध मानायचं. फक्त पळीपंचपात्रात बुचकळलेले शब्द तितके शुद्ध ठरवायचे. हा कुठला न्याय?
शेकडो वर्षं वापरात असलेल्या तारीखला अशुद्ध ठरवून दिनांक हा शुद्ध शब्द देऊन तुम्ही मराठी भाषेचं काय कल्याण केलंय? याच शुद्धतेविषयी टोचून बोलत मराठी माणसाच्याच पिढ्यांची मानसिकता खच्ची करण्या पलीकडे यातून काहीही घडलेलं नाही. आम्ही भाषेला आई मानणारे लोक आहोत. आईत शुद्ध अशुद्ध शोधण्याइतकं आमचं इमान अद्याप भ्रष्ट झालेलं नाही, हे शुद्दीच्या दुकानदारांना ठणकावून सांगण्याची वेळ आता आलेली आहे.
हेही वाचा : महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून
दुसऱ्या भाषेतले शब्द नाकारणं हे दुबळ्यांचं आणि भेकडांचं काम आहे. आज इंग्रजी बळकट आहे म्हणून मराठीसह जगभरातल्या सगळ्या भाषांमधले शब्द खुल्लमखुल्ला आपले बनवतेय. मराठीही शेकडो वर्षं देशावर राज्य करत होती, तेव्हा तिने बेबंदपणे देशभरातलेच नाही, तर जगभरातले शब्द आपलेसे केलेत. आज कोणताही मराठी शब्द काढला तर त्याचं मूळ दुसऱ्याच कोणत्या तरी भाषेत सापडेल.
बायकोसारखा अस्सल मराठी शब्द तुर्की भाषेतून आलाय आणि दगड तामिळमधून आलाय, बाकीचं सोडाच. मग आता इंग्रजी आणि हिंदी शब्दांसाठीच सोवळं ओवळं कशाला? काहीशे इंग्रजी शब्द आधीच मराठीचा भाग बनलेत. त्या शब्दांना कोशांमधे घेतलं किंवा नाही, त्याने मराठीचं काहीच बिघडत नाही. पण याला विस्तार मानण्याऐवजी आक्रमण मानण्याने दिसतं ते फक्त सोवळंओवळंच.
`कुंभाराला आपण हवं तसं भांडं घडवून दे असं सांगतो, तसं शब्दांचं नाही करता येत. शब्द लोकच आपल्या वापरातून तयार करतात, सोडतात किंवा स्वीकारतात`, असं खुद्द भगवान पतंजलीने सांगून ठेवलंय. पण आपण आजही ऐकायला तयार नाही. इंग्रजी नव्या टेक्नॉलॉजीसोबत व्यवहारात रुळते. आपल्याला नवं काही शोधता येत नाही. फक्त आलेल्या टेक्नॉलॉजीवर संस्कृताळलेलं लेबल चिटकवणं, हे आपलं कर्तृत्व असेल तर अशा ढोंगी माणसांच्या भाषेचं भलं कसं होणार?
संस्कृत ही महान भाषा आहे. तिच्याविषयी आदरच बाळगायला हवा. पण मराठी ही संस्कृतमधून जन्मलेली नाही, हेदेखील तितकंच खरंय. मराठीने अभिजात भाषेचे सगळे निकष खणखणीत वाजवून सिद्ध केलेत. देशच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विद्वानांनी मराठी ही संस्कृतइतकीच जुनी भाषा असल्याचं मान्य केलंय. त्यामुळे फक्त संस्कृतमधून आलेलं ते शुद्ध आणि दुसरं सगळं अशुद्ध ही मानसिकता सोडूया.
इंग्रजीच काय, मराठीच्या बोलीभाषांसह जगभरातल्या भाषांमधून कोशांमधे शब्द येणारच. त्याचं स्वागत करायला हवं. घाबरायची गरजच नाही. विकिपिडियावर बघितलं तरी कळतं सर्वाधिक लोकसंख्येच्या निकषात मराठी ही जगातली पहिल्या दहा ते वीस नंबरमधली भाषा आहे. संपणार असतीलच तरी तिच्या नंतरच्या हजारो भाषा आधी संपतील आणि मराठीचा नंबर काहीशे हजार वर्षांनंतर येईल. तिची काळजी घेण्यासाठी ती मजबूत आहे.
हेही वाचा :
इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई
मराठी भाषेच्या अभिजातपणाची कूळकथा
गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ
आपली आजीही बावन्नला पन्नासवर दोन म्हणते, मग वादाचं कारण काय?
(दिव्य मराठीतील अघळ पघळ कॉलममधे ६ जूनला छापून आलेला लेख. )