पन्नाशीनंतरही आपला 'रोमँटिक चॉकलेट हिरो' चार्म जपणारा माधवन

०१ जून २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


आर. माधवन म्हणजेच मॅडी हा पहिलाच असा अभिनेता होता ज्याला पदार्पणातच प्रख्यात सिनेदिग्दर्शक मणी रत्नमच्या सिनेमात प्रमुख भूमिका मिळाली आणि त्याने हे अग्निदिव्य यशस्वीपणे पारही पाडलं होतं. मणी रत्नमने या रत्नाची पारख एकदम अचूक केलीय हेच मॅडी वर्षानुवर्षे त्याच्या अभिनयातून दाखवत राहतो.

‘एक लडकी देखी. बिलकुल बिजली की तरह. वन फ्लॅश. एक चमक और मैं अपना दिल खो बैठा. मुझे लगता है मुझे उस लडकी से बेहद प्यार हो गया है. बस अब एकही तमन्ना है. रहना है उसके दिल मैं.’

- मॅडी (रहना है तेरे दिल में, २००१)

ज्यांनी ज्यांनी ‘रहना है तेरे दिल में’ बघितलाय त्यांना हा सीन आठवत असेलच. या सिनेमाची पारायणं केलेले कित्येक लोक आहेत. आणि या पारायणांमागे एकच कारण होतं किंवा आहे. ते म्हणजे- मॅडी! अर्थात, आर. माधवन.

सैन्यभरती ते मॉडेलिंग

जमशेदपूरच्या तमिळ ब्राम्हण कुटुंबात मॅडी जन्माला आला. वयाच्या अठराव्या वर्षी, कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून सांस्कृतिक राजदूत म्हणून कॅनडाला जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करायची संधी त्याला मिळाली. वर्षभराने मॅडी भारतात परतला आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयातली पदवी मिळवून आपलं शिक्षणही त्याने पूर्ण केलं. कॉलेजमधे असतानाच मॅडीला एनसीसीचा भाग म्हणून लष्करी प्रशिक्षण मिळालं होतं.

वयाच्या बावीसाव्या वर्षी त्याला इंग्लंड दौऱ्यावर महाराष्ट्रातला एक नावाजलेला कॅडेट म्हणून जायची संधी मिळाली आणि त्याने तिथेही ब्रिटिश सैन्यदलाचं प्रशिक्षण घेतलं. एव्हाना सैन्यात भरती व्हायचं त्याने ठरवलंच होतं पण फक्त सहा महिन्यांच्या फरकाने त्याचा एज कट-ऑफ हुकला आणि सैन्यभरतीची त्याची संधी कायमची गेली.

पण त्यामुळे निराश न होता त्याने कोल्हापूरातच पब्लिक स्पिकिंग आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे द्यायला सुरवात केली. मुंबईच्या केसी कॉलेजमधे पब्लिक स्पिकिंगचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरु केला आणि काही काळातच इथेही चॅम्पियन बनून जपानच्या यंग बिझनेसमेन कॉन्फरन्समधे भारताचं प्रतिनिधित्व केलं. एव्हाना मुंबईत राहून या भिडूने स्वतःचा मॉडेलिंग पोर्टफोलिओसुद्धा बनवून घेतला होता.

हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

टीवी शोमधून मिळाली प्रसिद्धी

त्याला पहिला चान्स मिळाला १९९६मधे, आणि तोही सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणी रत्नमसोबत! प्रमुख भूमिकेसाठी त्याने स्क्रीन टेस्ट दिली खरी, पण मणी रत्नमच्या मते तो त्या भूमिकेच्या मानाने बराच तरुण दिसत असल्याने ही संधीही हुकली. त्यानंतर तो पुन्हा मुंबईला येऊन ‘बनेगी अपनी बात’, ‘घरजमाई’सारख्या मालिकांमधे काम करू लागला. त्याला ‘तोल मोल के बोल’ या टीवी शोमधून खरी प्रसिद्धी मिळाली. पुढे तो ‘इस रात की सुबह नही’मधे एक बार सिंगर म्हणून झळकला होता. 

१९९७ला त्याला फ्रेड रेच्या ‘इन्फर्नो’ या इंग्लिश सिनेमात पोलीस इन्स्पेक्टर रवीचा सपोर्टिंग रोल मिळाला. ‘शांती शांती शांती’ या कन्नड सिनेमाच्या निमित्ताने त्याचं खऱ्या अर्थाने भारतीय सिनेसृष्टीत आगमन झालं पण सिनेमा दणकून आपटल्यामुळे तोही झाकोळला गेला. १९९९मधे मणी रत्नमने त्याला कास्ट केलं ‘आलैपायदे’मधे आणि तेही लीड रोलसाठी. त्याने साकारलेला कार्तिक प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.

मॅडी हा पहिलाच असा अभिनेता होता ज्याला पदार्पणातच मणी रत्नमच्या सिनेमात प्रमुख भूमिका मिळाली आणि त्याने हे अग्निदिव्य यशस्वीपणे पारही पाडलं होतं. या यशाचा फायदा उचलण्यासाठी ‘शांती शांती शांती’च्या निर्मात्यांनी तो सिनेमा पुन्हा तमिळमधे ‘रिलॅक्स’ नावाने रिलीज केला पण काही खास फायदा झाला नाही. माधवनचा दुसरा सिनेमा ‘एन्नवलै’ही फारसा चालला नाही. त्याने ‘आलैपायदे’च्या यशानंतर असा सिनेमा करायला नको, असं समीक्षकांचं मत होतं.

२००१चा गौतम मेनन-दिग्दर्शित ‘मिन्नाले’ मात्र सुपर डुपर हिट ठरला. आजही तमिळ सिनेसृष्टीतला एक सर्वोत्तम रोमँटिक सिनेमा म्हणून गणल्या जाणाऱ्या या सिनेमाने मॅडीला ‘रोमँटिक चॉकलेट हिरो’चा किताब बहाल केला. याचा हिंदी रिमेक ‘रहना है तेरे दिल में’ बॉक्स ऑफिसवर ‘मिन्नाले’इतकं यश मिळवू शकला नाही. पण यथावकाश टीवीवर हा सिनेमा चालू झाल्यावर मात्र तुफ्फान लोकप्रिय झाला. आजही हा सिनेमा कित्येकजण त्याच आवडीने बघतात. 

‘अन्बे सिवम’ ठरला मैलाचा दगड

त्यापाठोपाठ मॅडीने मणी रत्नमबरोबर पुन्हा एकदा ‘दुम दुम दुम’ या हिट रॉमकॉममधे काम केलं. मॅडीचा त्यावर्षीच आलेला प्रख्यात दिग्दर्शक के. बालचंदर यांचा ‘पार्त्तले परवसम’ मात्र बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. २००२ला मॅडी मणी रत्नमच्या ‘कन्नतिल मुत्तमिट्टाल’मधे एका दत्तक घेतलेल्या मुलीच्या बापाच्या रोलमधे दिसला.

मॅडीची ‘रोमँटिक, चॉकलेट हिरो’ ही इमेज पुसायला हा नॅशनल अॅवॉर्ड विनर सिनेमा कारणीभूत ठरला. या फिल्ममधल्या मॅडीच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक केलं गेलं. त्यापाठोपाठ आलेल्या ‘रन’ने मॅडीला ऍक्शन हिरोच्या पंगतीत नेऊन बसवलं. ‘रन’ आणि ‘कन्नतिल मुत्तमिट्टाल’च्या यशासाठी मॅडीला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२००३ला मॅडी कमल हसन सोबत ‘अन्बे सिवम’मधे दिसला. मॅडी यात भांडवलशाही विचारसरणीचा फिल्ममेकर दाखवला होता तर कमल हसन एक अपंग कम्युनिस्ट. दोन भिन्न व्यक्तिमत्वांचा भुवनेश्वर ते चेन्नईचा प्रवास दाखवणारा हा सिनेमा समीक्षकांनी नावाजूनही तिकीटबारीवर गल्ला कमवण्यात अपयशी ठरला मात्र कालांतराने लोकप्रिय होऊन ‘कल्ट क्लासिक’ बनला.

हा सिनेमा मॅडीच्या सिनेकारकीर्दीतला मैलाचा दगड ठरला. कमल हसन मॅडीच्या कामाने इतका प्रभावित झाला की त्याने त्याची निर्मिती असलेल्या ‘नल दमयंती’मधे मॅडीला लीडरोल दिला. २००५ला याचा हिंदी रिमेक ‘रामजी लंडनवाले’ हा मॅडीला मुख्य भूमिकेत ठेवून करण्यात आला होता. निशिकांत कामतने २००७ला ‘डोंबिवली फास्ट’चा ‘इवानो ओरुवन’ या नावाने तमिळ रिमेक बनवला. सिनेमा फ्लॉप झाला तरी प्रमुख भूमिकेतल्या मॅडीच्या अभिनयाचं मात्र कौतुक केलं गेलं.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

बॉलीवूडवरही टाकली मोहिनी

२००४ला मणी रत्नमने त्याला ‘आयदा एळद’मधे इन्बाशेखरच्या खलनायकी व्यक्तिरेखेसाठी कास्ट केलं. या भुमिकेसाठी मॅडीने त्याच्या करिअरमधे पहिल्यांदाच टक्कल केलं होतं. याच्याच हिंदी रिमेक ‘युवा’मधे अभिषेक बच्चनने जे काम केलंय त्यापेक्षा लाखपटीने जबरा काम मॅडीने या फिल्ममधे केलंय. त्याचा हा रफ अँड टफ, खलनायकी इन्बासेखर बघून एकेकाळी हाच गुंडा तो टॉपक्लास रोमँटिक, चॉकलेट हिरो होता का? असा प्रश्न पडतो.

२००५ची ‘रामजी लंडनवाले’ बॉक्स ऑफिसवर फार काळ तग धरू शकली नाही. पण बॉलिवूडचं बॉक्स ऑफिस म्हणजे काय झकास चीज आहे हे समजायला मॅडीला फार वेळ लागला नाही. २००६चा ‘रंग दे बसंती’ पुरेसा होता त्यासाठी. ‘रहना है तेरे दिल में’ नंतर ‘रंग दे बसंती’च्या निमित्ताने मॅडी पुन्हा एकदा बॉलिवूडमधे दणक्यात प्रवेश करता झाला. २००७ला आलेल्या मणीरत्नम दिग्दर्शित ‘गुरू’मधला त्याचा ‘शाम सक्सेना’ मनाला भावला.

२००९. राजकुमार हिराणी. आमीर खान, बोमन इराणी, करीना कपूर आणि शर्मन जोशी. थ्री इडियट्स. मॅडीचा ‘अब्बू नही मानेंगे’वाला इंजिनिअर कम फोटोग्राफर फरहान. सिनेमा आणि मॅडी, दोन्हीही फुल टू फट्याक. न भूतो न भविष्यति असं यश मिळवून दिलं मॅडीला या फिल्मने.

‘तनू वेड्स मनू’ आणि ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’मधे कंगणाने साकारलेल्या तनूच्या डॅशिंग भूमिकेबरोबरच मॅडीने उभा केलेला मनोज कुमार शर्मा उर्फ मनूही जबरदस्त होता. अर्थात, त्याने या फिल्म्सच्या यशाचं क्रेडिट कंगणालाच दिलं होतं.

हरहुन्नरी अभिनेता

२०१६चा ‘इरुदी चुट्र’ हा आणखी एक माईलस्टोन सिनेमा होता मॅडीच्या करिअरचा. मॅडीने या सिनेमाच्या पटकथा लेखनासोबतच निर्मिती आणि मार्केटिंग तर सांभाळलं होतंच, त्याशिवाय मुख्य भूमिका साकारणाऱ्या नवख्या रितीकाला अभिनयासाठी तयार करणं, भूमिकेसाठी लागणारी प्रचंड शारीरिक मेहनत, बॉक्सिंगचे धडे, मेटल ब्रेसेस घालून केलेलं डबिंग अशी दिव्यंसुद्धा त्याने लिलया पार पाडली. हाच सिनेमा हिंदीत ‘साला खडूस’ या नावाने रिलीज झाला होता.

२०१७ला आलेला पुष्कर-गायत्री या दिग्दर्शक द्वयीचा ‘विक्रम-वेधा’ हा आणखी एक झकास सिनेमा. ‘विक्रमादित्य राजा आणि वेताळ’ या सदाबहार कथामालिकेची झालर असलेला हा सिनेमा मॅडी आणि विजय सेथुपतीच्या सुंदर अभिनयाने नटलाय. मॅडीने साकारलेला इन्स्पेक्टर विक्रम वेधाच्या प्रत्येक कथेगणिक नवनवे रंग परिधान करतो आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वीही होतो. हा सिनेमा मॅडीचा सर्वात जास्त कमाई करणारा तमिळ सिनेमा ठरला.

२०१८ला आलेल्या ‘ब्रीद’ वेबसिरीजमधे मॅडीने साकारलेला फुटबॉल कोच डॅनी हे पात्र आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतं. लंग कॅन्सर असलेल्या पोराचा बाप साकारताना मॅडीने त्याच्या कारकीर्दीतला एक उत्कृष्ट अभिनयाचा नमुना सादर केलाय. मणी रत्नमने या रत्नाची पारख एकदम अचूक केलीय हेच मॅडीचा डॅनी त्याच्या अभिनयातून दाखवत राहतो. त्याच वर्षी आलेल्या तेलुगू ‘सव्यसाची’मधली त्याची अरुण ही खलनायकी भूमिकाही परफेक्ट जमून आलीय.

मल्याळम ‘चार्ली’च्या तमिळ रिमेक ‘मारा’मधे माधवन प्रमुख भूमिकेत झळकला. पन्नाशीनंतरही त्याचा ‘रोमँटिक चॉकलेट हिरो’ चार्म अजून ओसरला नसल्याची जाणीव हा सिनेमा करून देतो. मागच्या वर्षी आलेल्या ‘डीकपल्ड’मधे त्याने साकारलेला आर्या अय्यर त्याची विनोदबुद्धी अजूनही तरतरीत असल्याचं दाखवून देतो. चार फिल्मफेअर अॅवॉर्ड्सचा मानकरी असलेल्या या अश्या शुद्ध शाकाहारी चॉकलेट हिरोचा आज वाढदिवस. हॅप्पी वाढदिवस मॅडी!

हेही वाचा: 

#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?

ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा