आता बजेट नाही तर वहीखातं म्हणायचं, कारण

०५ जुलै २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


देशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपला पहिलावहिला अर्थसंकल्प आज मांडणार आहेत. बजेट सादर करण्याआधीच त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. देशाच्या हिशेबाची कागदपत्र लेदरच्या ब्रिफकेसऐवजी लाल कपड्यात गुंडाळलेल्या फाईलमधून आणली. हे बजेट नाही तर वहीखातं असल्याचं सरकारी अधिकारी सांगत आहेत.

बजेट हे आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्यासाठी कोणत्या योजना येत आहेत? किती पैसे कोणत्या क्षेत्रात गुंतवले जाणार आहेत? काय महागणार? काय स्वस्त होणार? या येत्या वर्षातल्या सगळ्या गोष्टींची दिशा बजेटमधे निश्चित होते. पण आता या सगळ्याला बजेट नाही तर वही खातं म्हणायचंय. हो. सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी असंच सांगितलंय.

पाश्चात्यांच्या विचारांतून मुक्ती

आज शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेटची कॉपी घेऊन अर्थ मंत्रालयातून बाहेर आल्या तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कारण त्यांच्या हातात लेदर ब्रिफकेसऐवजी पोथीसारखं लाल कपड्यात गुंडाळलेली फाईल होती. बजेटची कॉपी म्हणजे एक पवित्र ग्रंथ असल्यासारखी त्यांनी सादर केली. त्या लाल कपड्यावर अशोक स्तंभ होतं. ज्यामुळे ते सरकारचं ऑपिशिअल दस्तऐवज असल्याचं सांगत होतं.

याआधी सोशल मीडियावर सीतारमण यांना लक्ष्मीच्या रुपातही दाखवण्यात आलं होतं. एएनआय  न्यूज एजन्सीने ट्विट केलं. 'मुख्य आर्थिक सल्लागार के. वी. सुब्रमण्यम यांच्यामते ब्रिफकेसऐवजी चार वेळा घडी घातलेल्या लाल कपड्यात बजेटची कागदपत्रं ठेवणं म्हणजे आपली भारतीय परंपरा आहे. आपण पाश्चात्य विचारांच्या गुलामगिरीतून मुक्त होतोय याचं हे प्रतिक आहे. आणि हे बजेट नाही तर वही खातं आहे.'

हेही वाचाः बजेटविषयी या बेसिक गोष्टी समजून घ्यायलाच हव्यात

पीयूष गोयल यांना मिळाली शेवटची संधी

तत्कालीन हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सर्वात शेवटी ब्रिफकेस घेऊन बजेट सादर केलं होतं. गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीआधी हंगामी अर्थसंकल्प सादर करण्याची संधी गोयल यांना मिळाली. महत्त्वाचं म्हणजे हंगामी अर्थसंकल्प मांडणारे गोयल हेही अर्थखात्याचे हंगामीच मंत्री होते.

कारण या खात्याचा पूर्णवेळ कारभार सांभाळणारे अरुण जेटली आजारी पडले. त्यामुळे अर्थखात्याचा तात्पुरता कारभार रेल्वेमंत्री असलेल्या गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

हेही वाचाः असं आहे देशाचं आर्थिक आरोग्य, आर्थिक सर्वेक्षणातल्या १० ठळक गोष्टी

बजेट म्हणजे लेदरची बॅग

हंगामी अर्थमंत्र्यांपासून सगळ्यांनी ब्रीफकेस वापरली आणि सीतारमण यांनी वापरली नाही. पण देशाचा आर्थिक लेखाजोखा ज्याला आपण वर्षानुवर्षं बजेट म्हणत आलोय त्याला आता वही खातं का म्हणायचंय? आपल्या आसपासच्या दुकानांमधे असलं खातेपुस्तक आपल्याला बघायला मिळतं. पण हल्ली तिथेही कॉम्प्यूटर आलाय. मग जर पारंपरिकरीत्या वही खातं म्हणायचं आहे तर बजेट हा शब्द आला कुठून? बॉगेटी या फ्रेंच शब्दावरुन बजेट हा शब्द आला. याचा अर्थ चामड्याची पिशवी असा होतो. १८६० मधे चान्सलर ऑफ दी एक्सचेकर चीफ विलियम एवर्ट ग्लॅडस्टन यांनी ब्रिटनच्या हिशेबांची कागदपत्रं लेदरच्या ब्रिफकेसमधून आणली होती. ही बॅग ब्रिटनच्या महाराणीने त्यांना दिली होती. इथूनच बजेट सादर करण्यासाठी लेदर ब्रिफकेस वापरण्याचा ट्रेंड सुरु झाला.

ब्रिफकेसला बजेट का म्हटलं गेलं? त्यामागची गोष्ट हिस्ट्री टुडे आणि बजेट हिस्ट्री वेबसाईटवर सांगितलीय. १७३३ मधे ब्रिटिश अर्थमंत्री सर रॉबर्ट वालपोल यांनी हिशोब सादर करण्याची कागदपत्रं चामड्याच्या पिशवीतून आणली. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी विचारलं की यात काय आहे? ते म्हणाले हे बजेट आहे. तेव्हापासून देशाच्या हिशेबाच्या कागदपत्रांना बजेट म्हटलं जाऊ लागलं.

बॅगच नाही तर बजेट कसलं?

आता या सरकारने १५९ वर्षांची ही ब्रिफकेसची परंपरा मोडली किंवा बदलली असं म्हणता येईल. लेदरच्या बॅगेमुळे त्याला हिशेबाच्या कागदपत्रांना बजेट म्हणतात. पण आता लेदरची बॅगच वापरली जाणार नाही. तर बजेट का म्हणावं असा प्रश्न येतो. मग आता वहीच म्हणावं लागेल. आणि तसं स्वत: मुख्य आर्थिक सल्लागारांनीही याला वही खातं म्हटलंय.

या वही खात्यावरुन एक गोष्ट आठवते, दिवाळीत आपल्या आजूबाजूच्या दुकांनांमधे लक्ष्मी पूजन केलं जातं आणि त्याच्यासोबत हिशोबाच्या वह्यांचंसुद्धा पूजन करतात. कारण त्या दिवसापासून व्यापाऱ्यांचं नव वर्ष सुरु होतं. तसं देशाचं नवं आर्थिक वर्ष सुरु होतंय.

हेही वाचाः 

बजेट कळणाऱ्यांकडून समजून घेऊया बजेट

थँक्यू करदात्यांनो, तुमच्यासाठीच बजेट आहे!

राहुल गांधींचा अख्खा राजीनामा समजून घ्या ८ पॉईंटमधे

पीयूष गोयल यांच्याऐवजी निर्मला सीतारामन अर्थमंत्री बनण्याची गोष्ट