बेकायदेशीरपणे घुसणाऱ्या भारतीयांमुळे अमेरिका हैराण

०४ मे २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


'अमेरिकन नोकरी आणि देशी छोकरी' हा फॉर्म्युला वापरून सुखी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. दुसरीकडे भारतातल्या अर्थव्यवस्थेला मंदीची चाहूल लागली असून, महागाई आणि बेकारीमुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळेच अनेक भारतीय मिळेल त्या मार्गानं अमेरिकेत घुसण्यासाठी प्रयत्न करतायत. या बेकादेशीर घुसखोरांमुळे अमेरिका हैराण झाली असून, त्यात गुजराती लोकांची संख्या लक्षणीय आहे.

जिथं साखर असते तिथं मुंग्या येणारंच! अशी आपल्याकडं एक म्हण आहे. तसंच आज अमेरिकंच झालंय. अमेरिकेत सगळ्यात सुखी लोक राहतात असा अख्ख्या जगाचा समज झालाय. त्यामुळे जो उठतोय त्याला अमेरिकेत जायचंय. आता पद्धतशीररित्या विसा, पासपोर्ट घेऊन अमेरिकेत जाणारी जनताही आहेच. पण एजंटकडून सेटिंग लावून, अमेरिकेच्या सीमा ओलांडून घुसणारं पब्लिकही प्रचंड आहे.

अमेरिकेत गेलं की आपली सेटिंग लागेल, काहीतरी व्यवस्था होईल आणि अमेरिेकेत सेटल होता येईल, म्हणून जगभरातले लोक कॅनडातून, मेक्सिकोतून अमेरिकेत घुसतात. या सगळ्यात भारतीयांची संख्याही मोठी आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतेय. जगभरातल्या सर्वच देशात कोरोनानंतर अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय. भारतातही काही वेगळी अवस्था नाही. त्यामुळेच पोटापाण्यासाठी अमेरिकेत घुसणारे वाढतायत. 

भारतीय घुसखोरांचा आकडा का वाढतोय?

अमेरिकेत घुसणाऱ्यांचं काय करायचं, हा प्रश्न अमेरिकेपुढे कायमच होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात तर मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याची तयारी झाली होती. या सगळ्याचं कारण साधसोपं आहे, अमेरिकेत असलेल्या संपन्नतेमुळे प्रत्येकाला अमेरिकेत प्रवेश मिळावा असं वाटतंय. त्यामुळे आपला जीव धोक्यात टाकूनही लोक अमेरिकेत घुसण्यासाठी धडपडतायत.

यात आफ्रिकन, दक्षिण अमेरिकन, मध्यपूर्व, आशियायी अशा सगळ्याच भागातले लोक आहेत. भारतीयांची संख्या मात्र गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढतेय. फेब्रुवारी २०१९ ते मार्च २०२३ या कालखंडात १ लाख १९ हजार भारतीयांना अमेरिकेत अवैधरित्या घुसताना पकडलं गेलंय. या सगळ्यांमध्ये गुजराती लोकांची संख्या मोठी असल्याचं, अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

जानेवारी २०२२मधे ५४५९ भारतीयांना पकडलं गेलं होतं. त्यातल्या ७४० जणांना अमेरिका-कॅनडा सीमेवर पकडलं होतं. जानेवारी २०२३मधे ही संख्या ३५.९ टक्क्यांनी वाढून ७,४२१ झाली आहे. भारतीयांची संख्या जगभरातल्या इतर देशांच्या तुलनेत दोन टक्के असली तरी ती दरवर्षी वाढतेय, याची चिंता मोठी आहे. या सगळ्या पकडलेल्या लोकांना डिपोर्ट करण्यात आलंय.

हेही वाचा: गडाफी जिवंत असता तर जग आणखी चांगलं झालं असतं?

शरण मिळेल या आशेवरच सगळा खटाटोप

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत शरणार्थींसाठी स्वतंत्र धोरण आखण्यात आलं होतं. त्यातल्या नियम क्रमांक ४२ च्या आधारावर आपल्याला अमेरिकेत प्रवेश मिळेल अशी अनेकांना आशा आहे. हा नियम ११ मे रोजी रद्द होणार आहे. त्यामुळे त्याआधी अमेरिकेत प्रवेश मिळावा यासाठी अनेक घुसखोर जीव तोडून प्रयत्न करतायत, असं वृत्त आहे.

मेक्सिकोतून अमेरिकेत घुसणं हे तुलनेनं सोपं मानलं जातं. त्यामुळे मेक्सिकन लोक मोठ्या प्रमाणात अमेरिकेत जात होते. पण आता त्यांच्यासोबत पेरू, वेनेझुएला, हैती, भारत आणि रशियातले लोकही मोठ्या प्रमाणात आहेत. २०११मधे एकूण घुसखोरांपैकी ८५ टक्के लोक मेक्सिकोतले असायचे. आता ही संख्या ३३ टक्क्याहून कमी झालीय.

माणुसकीच्या आधारावर शरणार्थी म्हणून परवानगी मिळणं, हीच या सगळ्यांची मोठी आशा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार अमेरिका जगभरातल्या शरणार्थींचं मोठं केंद्र बनलंय. अमेरिकेच्या नॅशनल बॉर्डर पेट्रोल काउंसिलचे अध्यक्ष ब्रॅडन जड यांच्या म्हणण्यानुसार, सध्या दरररोज सुमारे ७२०० प्रवासी सीमेवर येतायत. मार्च महिन्यात ही संख्या ५२००च्या आसपास होती.

जीवघेण्या जंगल-पाण्यातून पोराबाळांसकट प्रवास

कोलंबिया आणि पनामा या दोन देशांच्या मध्ये असलेल्या डॅरियन गॅप या जंगलाला मृत्यूचं जंगल म्हणून ओळखलं जातं. या जंगलामधे हिंस्र श्वापदं, साप आणि लुटारू मोठ्या प्रमाणात आहेत. या जंगलात मोठ्या प्रमाणात मानवी मृतदेह पडले आहेत, अशीही चर्चा सातत्याने होत असते. तरीही दक्षिण अमेरिका खंडातल्या विविध देशातून अमेरिकेत जाण्यासाठी हाच रस्ता निवडला जातो.

कोलंबियातल्या निकोली टाऊनमधून एजंट त्याना या जंगलात जाण्याची वाट दाखवतात. या जंगलात घुसलेले अनेकजण पुढे बाहेर येतील याची खात्री नसते. हैतीसारख्या गुन्हेगारीने वेढलेल्या देशातले लोक समूह करून पोराबाळासकट या जंगलात घुसतात. पाच-सहा दिवसांच्या जंगलातल्या पायपीटीसाठी लागणारं सामान पाठीवर घेऊन ते या जंगलातला अवघड प्रवास करतात.

जंगलात ड्रगचा अवैध व्यापार चालतो. तिथल्या गुंडांना खंडणी देऊन लोक पुढे जातात. पनामाच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी अनेक डॉलर ते मोजतात. एवढा खर्च करूनही जंगलातून जिवंतपणे बाहेर पडू का, याबद्दल कोणालाच खात्री नसते. पण आपल्या देशात मरण्यापेक्षा अमेरिकेत प्रवेश करताना मेलेलं बरं, असा विचार करून मानवी तस्करीचा हा व्यापार वर्षानुवर्षे चाललाय.

हेही वाचा: ऐन निवडणुकीत ट्रम्पतात्यांचा मोदींच्या धोरणाला झटका

गुजरातमधून कॅनडामार्गे अमेरिकेत घुसखोरी

गेल्या वर्षी २०२२ मधे अमेरिकेत अवैध पद्धतीने घुसण्याचा प्रयत्न करताना एका गुजराती कुटुंबातले चौघे थंडीने गारठून मरण पावले होते. जगदीश पटेल, वैशालीबेन पटेल, विहांगी पटेल आणि धार्मिक पटेल अशी या चार मृतांची नावे होती. एकूण ११ जणांच्या समूहाचा ते भाग होते, त्यातल्या उरलेल्या सात जणांना पुढे अटक झाली.

गुजरातच्या कलोलजवळच्या डिंगुचा या गावात राहणारं हे पटेल कुटुंब अमेरिकन सीमेपासून १२ मीटरवर असलेल्या कॅनडाच्या मॅनिटोबातल्या एका शेतात मृतावस्थेत सापडलं. हे कुटुंब कॅनडातून अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करत होतं. पण उणे ३५ डिग्री तपमानात अनेक तास चालल्यामुळे या चौघांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालं.

या प्रकरणी आणखी दोघांना अटकही करण्यात आली होती. अटक झालेल्या व्यक्ती या बेकायदेशीर इमिग्रेशन एजंट म्हणून काम करत होत्या. या गुजराती लोकांचं अमेरिकेत त्यांच्या त्यांच्या समाजाचं नेटवर्क असतं. या नेटवर्कच्या माध्यमातून ते तिथल्या व्यवस्थेत घुसतात. त्यांच्यातले काही जण हे ट्रॅवल एजंट असल्याचे सांगतात, पण ते या बेकायदेशीर प्रवासाला लागणारी कागदपत्रं तयार करून देण्यासाठी मदत करतात.

अमेरिकेत सगळेच बाहेरचे, पण आता संघर्ष वाढतोय

अमेरिकेचा इतिहास पाहिला तर अमेरिकेत राहणारे सगळेच जण अमेरिकेबाहेरून आलेले आहेत. युरोपधून आलेल्या व्यापाऱ्यांनी स्थानिकांना संपवून हा देश आपल्या ताब्यात घेतला. गुलामगिरीसाठी आणलेल्या कित्येक पिढ्या अमेरिकेत वाढल्या. भांडवलशाहीसोबतच वाढलेल्या नोकऱ्यांसाठी जगभरातली माणसं अमेरिकेत आली आणि कायमची अमेरिकन होऊन गेली.

जगाचा मेल्टिंग पॉट असलेल्या या अमेरिकन लोकांना आता विसा, पासपोर्टशिवाय होणारी घुसखोरी ही मोठी डोकेदुखी बनून बसलीय. अमेरिकेत घुसण्यासाठी मेक्सिको, ग्वाटेमाला, होंडुरस आणि एल्स अल्वाडोर अशा रस्त्याने अमेरिकेत शिरण्याचा मार्ग लोकप्रिय आहे. तसंच उत्तरेतल्या कॅनडामधून अल्बार्टामार्गेही घुसखोरी होते. 

मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार २०२१मधे २७ लाखाहून अधिक भारतीय अमेरिकेत आहेत. त्यातली ६ टक्के लोकसंख्या ही अमेरिकेत जन्मलीय. १९८०मधे ही अमेरिकेतल्या भारतीयांची संख्या फक्त दोन लाख होती. हे सगळे आकडे चक्रावून टाकणारे आहेत. यातले वैध मार्गाने गेलेले किती आणि अवैध मार्गाने गेलेले किती, याबद्दल कोणीच काही बोलत नाही.

अमेरिकेच्या कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शनच्या आकडेवारीनुसार २०१३पासून २०१९पर्यंत साधारणतः दरवर्षी १० हजाराच्या आसपास भारतीय अवैधरित्या अमेरिकेत शिरले. पण २०२२मधे हा आकडा ६३९२७ एवढा झालाय. सहापट वाढलेल्या या आकड्यात गुजरातींची संख्या मोठी आहे. हे आकडे देशासाठी लज्जास्पद असून एकीकडे 'वायब्रंट गुजरात' आणि 'मेक इन इंडिया'ची भाषणबाजी करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत.

हेही वाचा: 

अमेरिकन राजकारणाचा किस पाडणारी निवडणूक

ट्रम्प हरलेत, ट्रम्पवाद अमेरिकेत बोकाळलेला आहेच

ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीपासून भारतीय लोक दूर का राहतात?

ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका