आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट

१० सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख.

वर्ल्डकपच्या आपल्या इंग्लंड आणि बांग्लादेशच्या मॅचेस लागोपाठ एजबॅस्टनला असल्याने सलग पाच दिवस बर्मिंगहॅमला मुक्काम होता. बर्मिंगहॅमचा न्यू स्ट्रीट रस्ता तसा कायम गजबजलेला असतो. विकेंडला तर जास्तच. कारण रस्त्याच्या टाऊन सेंटरच्या बाजूला पब्ज फुललेले असतात. इंग्लंडमधे महिनाभर राहिल्यावर भारतीय जेवण खुणावायला लागते.  न्यू स्ट्रीटच्या दुसऱ्या बाजूला आलो तर अचानक एका भारतीय रेस्टॉरंटसमोर पावलं थबकली  कारण रेस्टॉरंटचं नाव होतं ‘आशाज्’.

प्रशस्त फाईन डायनिंगसाठी

गळ्यातून फक्त सूरच  नाही तर अनेक रसांना तृप्त करणारे घासही मार्गक्रमण करतात हे ओळखून आशाताईंनी या रेस्टॉरंट दुनियेतही आपला ठसा उमटवला. त्या आशाज् रेस्टॉरंटच्या चेनमधलंच हे बर्मिंगहॅमचं रेस्टॉरंट. प्रशस्त रेस्टॉरंटमधे आशाताईंचे वेगवेगळ्या कालखंडातले फोटो लावलेले बघून हेच ते आशाज् याची खात्री केली. रेस्टॉरंट माणसांनी फुललेलं नव्हतं. पण मोठे मोठे ग्रुप्स मैफिलीचा आनंद घ्यावा तसं जेवणात रमले होते.

बर्मिंगहॅममधे भारतीय रेस्टॉरंट्सची कमी नाही. पण हे एक मालकाच्या नावाच्या महिम्याला साजेसं उच्च प्रतीचं थोडक्यात फाईन डायनिंग रेस्टॉरंट होतं. फाईन डायनिंग ही एकट्याने करण्याची गोष्ट नसते. त्याला एकतर कंपनी लागते किंवा निमित्त. माझ्याकडे तेव्हा ना कंपनी होती ना निमित्त. पण हे झालं सांगायचं कारण.

हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

कॉन्सर्टच्या पहिल्या रांगेसारखं मेन्यूकार्ड

इंग्लंडमधे किंवा एकूणच परदेशात रेस्टॉरंटच्या बाहेर मेन्यू लावलेला असतो. आशाज्चा मेन्यू आशाताईंनी एका मुलाखतीत सांगितला तसा थोडा हटके होता. पण त्याच्यासमोरच्या किमती या आशाताईंच्या कॉन्सर्टच्या पहिल्या रांगेतल्या किमतीसारख्या होत्या. मी तिथे जेवलो नाही पण त्या ठिकाणी आशाज्चा आवाका अबुधाबी, दुबई, बहारीन, मँचेस्टर, कुवेत आणि कतारमधे आहे हे बघून आशाताईंच्या कर्तृत्वाला सलाम केला.

आशाताईंचं गाणं हे सर्वव्यापी आहे. याच  रेस्टॉरंटच्या सुरवातीला असलेल्या पब्जच्या संगीतातही ते डोकावतं. शास्त्रीय सुरावटीतही ते दिसतं. नाट्यसंगीत, भावगीत, लावणी ते कॅब्रेपर्यंत कुठचेही संगीत त्यांच्या सुराला अस्पृश्य नाही. किंबहुना त्यांच्या मखमली आवाजाचा स्पर्श झाल्यावर त्या त्या संगीताच्या प्रकाराला एक अफाट उंची मिळाली.

दारात आदर, घरात जिव्हाळा

बरं हे संगीत गळ्यात जरी उपजत, नैसर्गिक असलं तरी या माउलीने ज्या खस्ता वैयक्तिक आयुष्यात खाल्ल्या आहेत ते बघता कुणाचा जगण्याचा सूरच हरवला असता. पण सर्व संकटांवर मात करत त्या अनवट सुरांचा अभिषेक आपल्यावर अविरत करत राहिल्या. ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळांनी प्रभुकुंजच्या दोन शेजाऱ्यांचं वर्णन अचूक केलं होतं. एका दारात आहे तो आदर तर दुसऱ्या दारात आहे तो जिव्हाळा. आता आशाताईंचं वास्तव्य प्रभुकुंजमधे नसतं, पण ते जिव्हाळ्याचं दार अजूनही त्यांच्या गाण्यातून उघडं दिसतं.

हिंदी पार्श्वगायनात त्यांची सुरवात भारतरत्नाच्या छायेत झाली तरी या रत्नाला स्वतः:चे इतके पैलू होते की ज्या ज्या संधींचा प्रकाश त्या पैलूंवर पडला तो चमकून त्रिखंडात पसरला. मराठीत सुधीर फडके आणि आशा भोसले जोडीने इतिहास रचला. पण आशाताईंनी अशा अनेक संगीतकारांबरोबर गाणी गायली ज्यांचं नावही कदाचित एक, दोन सिनेमांपुरतं झळकलं असेल. वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या अनेक कठीण प्रसंगांमुळे त्यांना घर चालवण्यासाठी अशी गाणी करावी लागली. पण त्या संगीतकारांना आणि पर्यायाने गाण्याला परिसस्पर्श लाभला.

हेही वाचा : लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम

आवाजावर उभं विश्व

एखाद्या बॅट्समॅनने अफगाणिस्तानविरुद्ध शतक काढलं तरी ते शतक असतं आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध काढलं तरी ते शतकच असतं. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शतकात त्याचा कस पणाला लागलेला असतो.  आशाताईंनी अशा अनेक अफगाणिस्तानी संगीतकारांबरोबर शतकं लगावली असली तरी त्यांना ऑस्ट्रेलिया दर्जाचे संगीतकार मिळाले ते आर डी बर्मन हिंदीत आणि सुधीर फडके, पं. हृदयनाथ मंगेशकर हे मराठीत.

ओ.पी. नय्यर हे नाव मी ऑस्ट्रेलियापेक्षा का कोण जाणे पण दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंडच्या विश्वचषक विजेत्या नाही तर ऍशेस हरलेल्या दर्जात टाकीन. कदाचित आवाजाची उत्तम धार उपलब्ध असतानाही ठेक्याची साथ ओपींना दूर करावीशी वाटली नाही.

निव्वळ स्वतः:चा आवाज या एकाच देणगीवर आपलं विश्व उभं करणाऱ्या आशाताई त्यांच्या चाहत्यांना कधी दूर वाटल्या नाहीत. आपल्या कार्यक्रमातूनही त्या प्रेक्षकांशी संवाद साधायच्या त्यामुळे या नात्यात एक कायमची जवळीक निर्माण झाली. प्रसिद्धीचं शिखर गाठताना जे कष्ट त्यांनी सोसले त्यामुळे असेल पण जेव्हा जेव्हा त्यांना बघण्याचा योग आला तेव्हा त्यांचे सूर गगनात भिडत असले तरी पाय कायम जमिनीवरच वाटले.

दुर्गेसारखी अनेक रुपं 

पूर्वी पार्ल्याला दीनानाथ नाट्यगृहात कधी कार्यक्रमाला आल्या तर पार्ल्याच्या मंडईत मटार चांगले मिळतात म्हणून गाडी थांबवून भाजी घ्यायलाही त्यांना कधी वावगे वाटलं नाही. एकदा मी बाजारात असताना बाजूच्या गाडीची काच खाली झाली आणि मार्केटमधून बाहेर पडायचा रस्ता विचारणारी व्यक्ती साक्षात आशा भोसले होती, हे तेव्हा माझ्या नजरेतून मेंदूपर्यंत शिरायला काही क्षण लागले होते इतका मी अवाक झालो होतो.

तेव्हा ती गाडी जुनी टाटा इस्टेट होती. हल्ली काही वर्षांपूर्वी पार्ल्यात असेच जवळून दर्शन झालं तेव्हा गाडी आलिशान मर्सिडीज होती. बहुतेकांना कुठच्याही मोठ्या कलाकाराची फक्त संपत्ती दिसते. पण त्यामागे असलेली कठोर मेहनत दाखवायची दुर्दैवाने काही सोय नाही.

बर्मिंगहॅमच्या त्या रेस्टॉरंटसमोर उभा असताना दुर्गेची जशी अनेक रूपं असतात तशी एका नाट्यव्यावसायिकाच्या पण साध्या घरातून जन्मलेल्या या माउलीने  स्त्रीच्या अनेक रूपातून प्रवास करताना यशस्वी गायिका म्हणून प्रवास केलाच. पण यशस्वी उद्योजिका म्हणूनही प्रवास दिसत होता. मुलाच्या साथीने वाढवलेल्या या खाद्यसंस्कृतीचं रूप समोर दिसत होतं.

नुकतीच आशाताईंना ८७ वर्ष पूर्ण झाली. एकदा त्या म्हणाल्या होत्या, ‘ज्यांच्या आयुष्यात ‘दर्द’ असतो तेव्हाच आवाज उत्तम लागतो.’ कदाचित आपल्याला उत्तमोत्तम गाणी मिळावीत म्हणून वेळोवेळी देव किंवा दैव त्यांच्या आयुष्यात हा दर्द पेरत गेले. पण आता त्यांची शतकाकडे वाटचाल मात्र सुखातच व्हावी!

हेही वाचा :

आशाताई जेव्हा रहमानसाठी गातात

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

मोहम्मद अझीजः चेहरा नसणाऱ्या माणसांचा आवाज

प्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे

पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

kolaj.in