आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या ८ इंटरेस्टिंग गोष्टी

१२ मे २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज सारं जग कोरोनाविरोधात लढतंय. या लढ्यातल्या वॉरिअरपैकी एक म्हणजे हॉस्पिटलमधे काम करणाऱ्या परिचारिका. आज १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दिवसाला विशेष महत्त्व मिळालंय. आज जगभरातल्या सगळ्या नर्ससोबत आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, सुईणी यांनाही थँक्स म्हणायला हवं.

कोरोनामुळे साऱ्या जगाला कुठली गोष्ट महत्त्वाचीय आणि कुठली नाही हे नीट माहीत झालंय. कोरोनाला रोखण्यासाठी पुरेशा आरोग्य सुविधा नसतील तर सर्वशक्तिशाली अमेरिकेलाही हतबल व्हावं लागतंय. त्यामुळंच यंदाच्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाला वेगळं मोल प्राप्त झालंय. दरवर्षी जगभर १२ मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस साजरा केला जातो. लोकांना वेदनामुक्त करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या नर्सबद्दल कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

युनायटेड नेशन्सनं आजच्या आंतरराष्ट्रीय परिचारिक दिनानिमित्त एक संदेश जारी केलाय. यूएनच्या मते, ‘नर्सिंग क्षेत्रातल्या गुंतवणुकीतून आरोग्य व्यवस्थेचा दर्जा वाढायला मदत होईल. तसंच स्त्री-पुरुष समानतेला चालना मिळेल. एवढंच नाही तर आर्थिक वाढीलाही मोठा हातभार लागेल.’

हेही वाचा : तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच, एका कोरोना योद्ध्याला पत्र

इंटरनॅशनल नर्स डे कधी सुरू झाला

अमेरिकी आरोग्य खात्यातल्या अधिकारी डोरोथी सुदरलँड यांनी १९५३ मधे पहिल्यांदा नर्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांनी हा प्रस्ताव मान्य करत नर्स डे साजरा करण्याची घोषणा केली. त्यानंतर १९६५ मधे पहिल्यांदा नर्स डे साजरा झाला. पण सुरवातीला हा दिवस १२ मेला साजरा होत नव्हता. १९७४ पासून दरवर्षी १२ मेला जगभर हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

१२ मेची निवड का केली?

फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक म्हणून ओळखलं जातं. १२ मे १८२० ला त्यांचा जन्म झाला. नाइटिंगेल यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून या दिवशी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्याचं ठरलं. इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सेच्या पुढाकारानं हा दिवस साजरा केला जातो.

आपल्यापैकी अनेकांना हॉस्पिटल म्हटलं की डॉक्टर आठवतो. पण नर्सिंग सेवेशिवाय डॉक्टरकीला अर्थ उरत नाही. कारण पेशंटला तपासलं की डॉक्टरचं काम झालं. जिथं डॉक्टरचं काम झालं तिथूनच नर्सचं काम सुरू होतं. आणि हे काम खूप महत्त्वाचं आहे. पेशंटला वैद्यकीय दृष्टीनं फिट ठेवण्याची जबाबदारी नर्सवर असते. एवढंच नाही तर पेशंटचं मानसिक आरोग्य जपण्याचंही काम बघावं लागतं. नर्सिंग क्षेत्राचं हे असाधारण काम ओळखूनच दरवर्षी जगभर मोठ्या प्रमाणात परिचारिक दिन साजरा केला जातो.

भारत सरकारकडूनही दरवर्षी १२ मेला राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार दिला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढाकारानं १९७३ मधे याची सुरवात झाली. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नर्सची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. आतापर्यंत अडीचशेहून जास्त नर्सला हा पुरस्कार देण्यात आलाय. राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होतं. ५० हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि मेडल असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

फ्लॉरेन्स नाइटिंगेल कोण आहेत?

फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची यंदा द्विजन्मशताब्दी आहे. १२ मे १८२० ला विलियम आणि फेनी नाइटिंगेल यांच्या पोटी जन्मलेली फ्लॉरेन्स इंग्लडमधे वाढली. आपला जन्म लोकांची सेवा करायला झाला आहे असा साक्षात्कार फ्लॉरेन्स यांना वयाच्या १६ व्या वर्षी झाला. नर्सिंगचं शिक्षण घ्यायचा हट्ट त्यांनी आपल्या बाबांकडे धरला.

मात्र, त्यांच्या वडीलांना फ्लॉरेन्स यांचा हा निर्णय अजिबात मान्य नव्हता. कारण त्यावेळी नर्सिंग हा काही सन्मानाचा पेशा नाही, असं समजलं जायचं. दवाखान्यांची अवस्थाही खूप वाईट असायची. आजारी पेशंटच्या मरणाबद्दल लोकांमधे अनेक गैरसमज होते. तरीही वडलांची मनधरणी करून फ्लॉरेन्स यांनी नर्सिंगचं शिक्षण घेतलं. गरीब आणि शोषित रूग्णांची सेवा करायची असं त्यांनी ठरवलं.

दिवा घेऊन फिरणारी नर्स

१८५१ मधे फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी नर्सिंगचं शिक्षण सुरू केलं. १८५३ मधे महिलांसाठी दवाखाना सुरू केला. पुढच्या वर्षी १९५४ मधे क्रिमियाचं युद्ध झालं. यात ब्रिटननं रशियाच्या दक्षिणेकडे वसलेल्या क्रिमियात आपले सैनिक पाठवले. ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्की यांची लढाई रशियाशी होती. यात सैनिक जखमी होऊ लागले, मरू लागले. याची वार्ता कळाल्यावर फ्लॉरेन्स नाइटिंगेल आपल्या नर्सिंग स्टाफ घेऊन युद्धस्थळी दाखल झाल्या.

अस्वच्छता, उपकरणांची कमतरता, बेड, पाणी अशा गैरसोयींमुळे रोगराई वाढली. सैनिकांना वेगवेगळे आजार होऊ लागले. फ्लॉरेन्स यांनी युद्धस्थळी दाखल झाल्यावर पेशंटचं आंघोळपाणी, खाणंपिणं तसंच औषधोपचार अशा सर्व गोष्टींवर लक्ष देणं सुरू केलं. बघता बघता सैनिकांच्या प्रकृतीमधे सुधारणा दिसून लागली.

एवढंच नाही तर फ्लॉरेन्स नाइटिंगेल या सैनिकांतर्फे त्यांच्या घरच्यांना पत्रही लिहून पाठवायच्या. रात्री हातात कंदील घेऊन रूग्णांची सेवासुश्रुषा करत त्या फिरायच्या. याचमुळे सैनिक त्यांना आदरानं, प्रेमानं ‘लेडी विथ लँप’ असं म्हणायचे. १८५६ मधे युद्ध संपल्यावर मायदेशी परतल्यावर लोक त्यांना याच नावानं ओळखू लागले. रूग्णांच्या आयुष्यात त्यांनी नवा दिवा पेटवला होता.

हेही वाचा : डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

नाइटिंगेल शपथ

९९ हून अधिक वर्ष जगलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचं १३ ऑगस्ट १९१९ ला निधन झालं. गेल्यावर्षीच त्यांची स्मृती शताब्दी झाली. आजही नर्सिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामावर रूजू होण्यापूर्वी जगभरातल्या नर्स नाइटिंगेल यांच्या नावाची शपथ घेतात. अखंड रूग्णांची सेवा करण्याचं आश्वासन देतात. 

नर्सचा तुटवडा

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जगभरात विकसित आणि अविकसित अशा दोन्ही प्रकारच्या देशांमधे सध्या नर्सचा तुटवडा चालू आहे. विकसित देश आपल्याकडचा हा तुटवडा कमी करण्यासाठी इतर देशांतून नर्स आणतायत. इथं त्यांना मोठा पगार आणि चांगल्या सोयीसुविधाही दिल्या जातात. त्यामुळे विकसनशील आणि अविकसित देशांची अवस्था आणखी बिकट बनतेय.

यावर्षीची थीम काय?

इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्स या संस्थेच्या वेबसाईटवर दरवर्षी परिचारिका दिनाच्या निमित्ताने एक थीम देण्यात येते. जगाच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या नर्स असा यंदाचा विषय आहे. नर्सचा तुटवडा भरून निघावा यासाठी पुढच्या पिढीतले मुलंमुलीही या क्षेत्राकडे वळावेत म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं असंही आयसीएनचं म्हणणं आहे.

डब्लूएचओनं तर २०२० हे संपूर्ण वर्षच नर्स आणि सुईणींच्या नावावर केलेलं आहे. कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात नर्स आणि सुईणी झोकून देऊन काम करतायत. त्यांची आठवण आपण हे संपूर्ण वर्ष ठेवायलाच हवी.

हेही वाचा : अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

अंगणवाडी सेविका, आशा यासुद्धा नर्सच

लोकांची सेवा सुश्रूषा करण्याच्या या क्षेत्रात स्त्रीयांचं प्रमाण अधिक असतं. पुरूष नर्स अजूनही दुर्मिळच दिसतात. एवढं महत्त्वाचं काम करणाऱ्या या नर्सना नेहमीच गृहीत धरलं जातं. त्यांच्या कामाचे तास असोत किंवा पगारवाढ असो, त्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण होतं.

शिवाय, भारतात हॉस्पिटलमधल्या नर्ससोबतच घरोघरी वृद्ध लोकांची सेवा करणाऱ्या मदतनीस, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका यांनाही नर्सच म्हणायला हवं. आजच्या जागतिक परिचारिकेदिवशी आपण त्यांचीही आठवण काढायला हवी. 

हेही वाचा : 

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

कोविड टो म्हणजे काय? हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

WHOनं सांगितलेल्या खाण्यापिण्याबद्दलच्या पाच टिप्स भिंतीवर चिकटवा

कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?