कोविड १९ मधून बरं झालेल्यांनीही कोरोनाची लस घ्यायची का?

०४ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोनाची लस शरीराला वायरसशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडी पुरवण्याचं काम करते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी सगळे जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना आधीच कोरोना होऊन गेलाय, त्याचं काय? कोरोनातून बरं झालेल्या माणसांच्या शरीरात अँटिबॉडी आपोआप तयार झालेल्या असतात. मग अशा माणसांनी लस घ्यायची की नाही?

कोरोनाचा कहर वाढतोय म्हणून एकीकडे सरकारकडून ३ एप्रिलपासून काही शहरात मिनी लॉकडाऊन घोषित केलाय. तर दुसरीकडे लसीकरणाची मोहीमही दणक्यात सुरूय. १ एप्रिलला ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांसाठी लसीकरण सुरू केलं. पहिल्याच दिवशी देशात ३३ लाख लोकांना लसीचा पहिला डोस दिल्याचं तर ३ लाख लोकांना लसीचा दुसरा डोस दिल्याचं, केंद्रीय आरोग्य खात्याच्या आकडेवारीतून सांगण्यात आलंय.

२ एप्रिल सकाळी ७ वाजता प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारतात आत्तापर्यंत जवळपास ६ कोटी लोकांना लस मिळालीय. कोरोनापासून वाचण्यासाठी सगळेच नागरिक जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांचं काय? लस येण्याआधीच कोरोनाची लागण झालेल्या आणि त्यातून बरं झालेल्या लोकांनी कोरोनाची लस घ्यायची की नाही?

हेही वाचा : लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

लसीची गरज काय?

लसीचं काम असतं शरीराला वायरसची ओळख करून देणं. म्हणूनच लसीत त्या आजाराचेच अर्धमेले किंवा इनऍक्टिव वायरस असतात. असे वायरस शरीरात आले की त्याविरोधातली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच अँटिबॉडी तयार होतात. मग पुन्हा कधीही खरंच संसर्ग झाला तरी त्याचा फार त्रास होत नाही.

पण लस न घेता कोरोनाचा संसर्ग झाला तरी हीच प्रक्रिया घडते. शरीर वायरसशी दोन हात करतं. आपण त्यातून बरे होतो म्हणजेच त्याविरोधातल्या अँटिबॉडी आपल्या शरीरात तयार होतात. थोडक्यात, जे काम लस करणार असते ते शरीरात आधीच झालेलं असतं. मग लसीची काय गरज? असं टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखात 'इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'चे डायरेक्टर आणि साथरोगतज्ञ देबप्रसाद चट्टोपाध्याय यांनी म्हटलंय.

कांजण्यांसारख्या मोठ्या आजारात एकदा आजार होऊन गेला की परत लस घ्यायची गरजही नसते, असं प्राथमिकरित्या दिसतं. पण कोरोनासारख्या फ्लू आजारांना हे पुरेसं होत नाही, असंही अनेक तज्ञांचं मत आहे. त्यामुळे कोरोनातून बरं झालेल्या लोकांनी कोरोनाची लस घ्यायची की नाही याबाबत तज्ञांची मतं विभागलेली दिसतात.

९० दिवसांनंतर लस हवीच

'सेंटर फॉर डिसीज कंट्रोल' या अमेरिकेतल्या संस्थेनं आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या प्रश्नोत्तरात कोरोना झाला असेल तरी लस घ्यायलाच हवी, असं सांगितलंय. कोरोनातून बरं झाल्यानंतर काही एक रोगप्रतिकारक शक्ती मिळते हे खरंय. पण ही रोगप्रतिकारक शक्ती किती काळ टिकते याबाबत अजून तज्ञांना पुरेशी माहिती नाहीय. ‘तुम्ही कोविड १९ मधून बरे झाला असाल तरी तुम्हाला पुन्हा कोरोनाचा संसर्ग व्हायची शक्यता आहे. ही शक्यता कमी असली तरी नाकारता येणार नाही,’ असं सीडीसीनं म्हटलंय. 

'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' या जर्नलमधे प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार कोरोना वायरसचा संसर्ग आणि लस एकत्र आले तर अतिशय चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकते. संसर्ग झालेल्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले तर संसर्ग न झालेल्यांच्या तुलनेत ६ पटींनी जास्त अँटिबॉडी तयार होतात, असं या संशोधनात सांगितलंय. पण, संसर्ग झाल्यामुळे आधीच अँटिबॉडी तयार झालेल्या असतात. त्यात लस घेतली तर त्याने रोगप्रतिकारक शक्ती जास्त वाढते. याचा अर्थ लस घेण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःला वायरसचा संसर्ग करून घ्यायला हवा, असा होत नाही. 

महत्त्वाचं म्हणजे, संसर्ग झाल्यानंतरही लस घ्यायची असेल तर त्यासाठी ९० दिवस वाट बघण्याचा सल्ला सीडीसीने दिलाय. मोनोक्लोनस अँटिबॉडी म्हणजे, मानवनिर्मिती अँटिबॉडीचा वापर करून किंवा प्लाझमा थेरपीने तुमच्यावर उपचार केले गेले असतील तर लस घेण्यासाठी ९० दिवस थांबणं आवश्यक आहे. आपल्या डॉक्टरांना विचारून आपल्यावर कोणते उपचार केले गेलेत ते आपण शोधून काढू शकतो. 

असे कोणतेही उपाचार केले नसतील तर आजारातून पूर्णपणे बरं झाल्यानंतर कधीही लस घेता येईल. पण सर्वांसाठी लसीची उपलब्धता, उत्पादन आणि पुरवठा यांचा ताळमेळ बसवताना सगळ्यांनीच ९० दिवसांची वेळ पाळली तर प्रशासनाला जास्त सोपं पडेल, असं सीडीसीनं म्हटलंय.

हेही वाचा : हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

एकच डोस पुरेसा

१ एप्रिल २०२१ ला 'नेचर मेडिसिन' या जर्नलमधे प्रकाशित झालेल्या एका रिसर्च पेपरमधे कोरोनातून बरं झालेल्यांना कोरोनाच्या लसीचा एकच डोस घेणं पुरेसं ठरेल असं सांगण्यात आलंय. अमेरिकेल्या लॉस एंजेल्समधल्या 'सेडर्स सिनाई मेडिकल सेंटर'मधे करण्यात आलेल्या संशोधनावर हा रिसर्च पेपर लिहिला गेलाय. कोविड १९ मधून बरं झालेल्या पेशंटना फायझर लसीचा पहिला डोस दिला तर त्यांच्यात कधीही संसर्ग न झालेल्या आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांएवढ्याच प्रमाणात अँटिबॉडी सापडतात, असं या पेपरमधे लिहिलंय.

कोरोनाच्या लसीचा पहिला डोस शरीरात अँटिबॉडी तयार करतो. पण दुसरा डोस मिळाला की ही अँटिबॉडी तयार करण्याची प्रक्रिया एकदम जोरात होऊ लागते. म्हणूनच या दुसऱ्या मात्रेला ‘बुस्टर शॉट’ असं म्हणतात. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आधीच काही प्रमाणात शरीरात अँटिबॉडी तयार झाल्या असतात. त्यामुळे संसर्ग झालेल्या लोकांसाठी लसीचा पहिलाच डोस बुस्टर शॉटसारखं काम करतो. त्यामुळे संसर्ग झालेल्यांसाठी लसीचा पहिलाच डोस पुरेसा असेल.

नेमकं काय करायचं?

अमेरिकेतल्याच 'इकहान स्कूल ऑफ मेडिसिन'कडून करण्यात आलेल्या संशोधनातही लसीचा पहिला डोस पुरेसा असल्याचं सांगितलंय. तरीही सीडीसीने संसर्ग झालेल्यांसाठी लसीचे दोन डोस गरजेचे असल्याचीच भूमिका घेतलीय.

सीडीसीची भूमिका एकप्रकारे योग्यच आहे असं म्हणता येईल. एकदा संसर्ग झाल्यानंतरही कोरोनाची पुन्हा लागण झाल्याचं आपण सगळ्यांनीच वाचलं असेल. किंवा अनेकदा कोरोना वायरस म्युटेट झाल्यामुळेही कोरोनाची पुन्हा लागण होण्याची शक्यता असते. अशात, कोरोनाची लस घेऊन जास्त रोगप्रतिकारक शक्ती मिळवणं हा नेहमीच चांगला पर्याय ठरेल.

शिवाय, संसर्ग झालेल्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर त्यांना कोणतेही साईड इफेक्ट झाल्याचं संशोधनातून समोर आलेलं नाही. म्हणजेच, संसर्ग झाल्याने लस घेतली तर काही तोटा होणार नाहीय. झाला तर फायदाच होईल. त्यामुळे संसर्ग झाला असला तरी लसीचे दोन्ही डोस घ्यायलाच हवेत. पण भारतात लसीचा तुटवडा निर्माण होत असताना संसर्ग न झालेल्यांबरोबरच तो झालेल्यांसाठीही लस कशी पुरवणार हे सरकार समोरचं मोठं आव्हान असणार आहे.

हेही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?