मोबाईलमधून खासगी गोष्टीत डोकावणाऱ्या वॉट्सअॅपचं काय करायचं?

१६ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


वॉट्सअॅपची प्रायवसी पॉलिसी बदलल्यापासून ते वापरावं की नाही याविषयी मतंमतांतरं दिसू लागलीयत. आपल्या मोबाईलच्या विंडोमधून वाकून पाहिल्यानंतर मिळणारी आपली माहिती वॉट्सअॅप फेसबुक आणि इतरांना शेअर करणार आहे. त्यामुळेच, अनेकजण वॉट्सअॅपला पर्याय म्हणून दुसऱ्या अॅपचा विचार करतायत. पण ही अॅप तरी वापरायला सुरक्षित आहेत का?

मुलगा आपल्या क्रशला म्हणजे आवडणाऱ्या मुलीला मेसेजवर विचारतो, ‘होकार आहे की नाही?’ तिकडून लाजल्याचा स्माईली येतो आणि संपूर्ण वॉट्सअॅप हेडक्वार्टरमधे जल्लोष सुरू होतो. या दोघांच्या लव स्टोरीचा आधीपासून मागोवा घेणारे, तिच्या उत्तराच्या अपेक्षेत असणारे वॉट्सअॅप कर्मचारी आनंद व्यक्त करतात.

वॉट्सअॅपची प्रायवसी पॉलिसी बदलल्याचं नोटिफिकेशन आल्यापासून हे असे मीम, जोक सगळीकडे वायरल होतायत. वॉट्सअॅपच्या नव्या प्रायवसी पॉलिसीची सगळीकडे चर्चा सुरूय. नव्या प्रायवसी पॉलिसीनं आपल्या खासजीपणावर गदा येईल म्हणून अनेकांनी वॉट्सअॅप आपल्या मोबाईलमधून डिलीट करून टाकलंय आणि वॉट्सअॅपला पर्याय शोधणंही चालू केलंय.

पण हे पर्यायी अॅप तरी सुरक्षित असतील का? वॉट्सअॅप डिलीट केलं की आपलं खासगीपण जपलं जाईल का? आणि असं होणार नसेल तर आपल्या मोबाईलच्या खिडकीतून म्हणजेच विंडोमधून वाकून बघणाऱ्या वॉट्सअॅप आणि इतर अॅपचं काय करायचं याचा विचार आता करायला हवा.

एण्ड टू एण्ड इन्क्रिप्शनचं महत्त्व

वॉट्सअॅपची प्रायवसी व्यवस्था एण्ड टू एण्ड इन्क्रिप्शनवर चालते. दोन युजरने एकमेकांना पाठवलेले मेसेज सुरक्षित ठेवण्यासाठी वॉट्सअॅप या व्यवस्थेचा वापर करतं. समीर आठल्ये सांगतात, ‘एण्ड टू एण्ड इन्क्रिप्शन हा एक प्रोटोकॉल आहे. याचा अर्थ असा की दोन युजर्सने एकमेकांना पाठवलेले मेसेज त्या दोन युजरच्या वॉट्सअॅपशिवाय इतर कुणीही वाचू शकत नाही. ज्या माणसासाठी तो मेसेज पाठवलाय फक्त त्याच माणसाच्या वॉट्सअॅपमधे तो वाचता येतो.’

‘थेट आपल्या मेसेज नाही पण वॉट्सअॅप या मेसेजची माहिती गोळा करत असतं. त्याला मेटा डेटा असं म्हणतात. म्हणजे, एका युजरने दुसऱ्या युजरला किती वाजता मेसेज केला, ते किती वेळ बोलत होते, दोन्ही युजरचा आयपी ऍड्रेस, आयडेंटीफायर, मोबाईल नंबर अशा पद्धतीचा डेटा वॉट्सअॅप गोळा करतात. मुख्य माहितीची माहिती वॉट्सअॅपकडे असते आणि ती फेसबुक आणि इतर कंपन्यांना शेअर होते,’ असंही ते पुढे म्हणाले.

मेटा डेटा सोडल्यास दोन युजर एकमेकांशी काय चॅट करतात हे स्वतः वॉट्सअॅपलाही समजत नाही, असं वॉट्सअॅप सांगतं. त्यामुळे क्रश ‘हो’ म्हणाली म्हणून जल्लोष व्यक्त करणारं वॉट्सअॅपचं हेडक्वार्टर हा जोक म्हणून मस्त असला तरी अतिशोयोक्तीच आहे. ही माहिती फक्त पोलिसांना गुन्हाच्या तपासासाठी वगैरे दिली जाते. पण त्याबाबतचं कोणतंही स्पष्ट धोरण वॉट्सअॅपच्या कोणत्याही पॉलिसीत दिलं नाहीय.

हेही वाचा : द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने  आपल्याला विकायला काढलंय

नवीन प्रायवसी पॉलिसीत आहे काय?

नव्या प्रायवसी पॉलिसीत एण्ड टू एण्ड एन्क्रिप्शन तसंच राहणार आहे. फक्त मेटा डेटा कुणाला शेअर करणार याबद्दलची पॉलिसी बदलणार आहे. ही नवी पॉलिसी आपल्या अकाऊंटला लागू करण्यासाठी आपली परवानगी मागणारं नोटिफिकेशन वॉट्सअॅपने अनेकांना दिलं. ‘परवानगी द्या’ किंवा ‘आत्ता नको’ असे दोनच पर्याय इथं उपलब्ध होते. ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही परनवागनी दिली नाही तर तुमचं वॉट्सअॅप अकाऊंट डिलीट होईल.

या नव्या प्रायवसी पॉलिसीत वॉट्सअॅप फेसबुकला आणि इन्स्टाग्रामसारख्या फेसबुकच्या इतर कंपन्यांनाही युजरचा सगळा डेटा देईल, असं स्पष्टपणे लिहिण्यात आलंय. वॉट्सअॅप लिहितं, ‘फेसबुक कंपनीचा भाग असल्याने वॉट्सअॅपला इतर फेसबुक कंपन्यांकडून माहिती मिळते आणि ते ती इतरांना शेअरही करतं. आम्हाला त्यांच्याकडून मिळालेली माहिती आम्ही वापरू आणि आमच्याकडून मिळालेली माहिती ते वापरतील.’

अमेरिकेतही जाईल आपला डेटा

हा डेटा म्हणजे नेमकं काय असेल? तर युजरचा मोबाईल नंबर, पत्ता, देश, शहर, वय, आयपी ऍड्रेस, युजरच्या कॉण्टॅक्टमधे किती आणि कोण माणसं आहेत त्याची माहिती, त्यांचा कॉण्टॅक्ट नंबर, त्यांचे पत्ते इतकंच नाही, तर युजरच्या मोबाईलची बॅटरी लेवल, सिग्नल स्ट्रेन्थ, भाषा, इंटरनेट कोणत्या कंपनीचं वापरतोय अशी बरीचशी माहिती. म्हणजेच, मेटा डेटा. वॉट्सअॅप पे वापरुन पैसे ट्रान्सफर करणाऱ्यांचीही काही खासगी माहिती वॉट्सअॅपकडे साठवली जाईल.

वॉट्सअॅपचं मुख्य ऑफिस आहे अमेरिकेत. हा सगळा डेटा साठवणारं केंद्रही मुख्य ऑफिसमधेच आहे. त्यामुळे गरज पडली तर युजरची खासगी माहिती तिकडे पाठवली जाऊ शकते असंही वॉट्सअॅपने सांगितलंय. फक्त अमेरिकेतच नाही तर इतर देशांतल्या फेसबुकच्या, इन्स्टाग्रामच्या ऑफिसमधेही ही माहिती पाठवली जाईल.

हेही वाचा : फेसबुक झालंय 'बुक्ड'!

वॉट्सअॅपचं स्पष्टीकरण

या प्रायवसी पॉलिसीवरून भारतातून फेसबुकवर भरपूर टीका झाली. या टीकेचा रोख इतका जास्त होता की फेसबुकला त्यावर स्पष्टीकरण जाहीर करावं लागलं. या पॉलिसी अपडेटनं मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत केलेल्या चॅटवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट हा अपडेट वॉट्सअॅप बिझनेस अकाऊंट वापरणाऱ्या लोकांपुरताच मर्यादित असणार आहे, असं स्पष्टीकरण वॉट्सअॅपने दिलं.

पण बिझनेस अकाऊंट वापरणाऱ्या लोकांसाठी अपडेट असेल तर सरसकट सगळ्यांना तो मान्य करण्याची सक्ती का केली गेली या प्रश्नाचं वॉट्सअॅपच्या स्पष्टीकरणातून मिळत नाही. ‘वॉट्सअॅपने बिझनेस अकाऊंटची सोय सुरू केलीय. बँकांपासून ते कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी हे बिझनेस अकाऊंट उघडता येतं. अकाऊंट बिझनेसचं असलं तरी त्याचे ग्राहक मात्र सामान्य माणसं असणार. तेही लाखोंच्या संख्येनं असणार. हे हजारो ग्राहक साधी अकाऊंट वापरत असले तरी बिझनेस अकाऊंटच्या संपर्कात असल्याने त्यांचाही डेटा वॉट्सअॅपला मिळवता येईल,’ अशी माहिती ओपनसोर्स टेक्नॉलॉजीत आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक प्रसाद शिरगावकर यांनी सांगितलं.

पॉलिसीतला नेमका बदल

‘पॉलिसी बदलली याचा अर्थ आपला डेटा फेब्रुवारीपासून वॉट्सअॅपकडे जाईल असं नाही. हा डेटा या आधीही फेसबुककडे जात होताच,’ असं शिरगावकर पुढे सांगतात. आपल्या फोनमधे नवीन नंबर सेव केला आणि त्या माणसाशी वॉट्सअॅपवर चॅट केलं की लगेचच त्याचं नाव फेसबुकला ‘पिपल यू मे नो’मधे येतं. यावरून आपला मेगा डेटा फेसबुककडे जात होताच हे स्पष्ट होतं.

‘पॉलिसीतला बदल एवढाच की आधी हा डेटा फेसबुकला द्यायचा की नाही हे ठरवण्याची मोकळीक युजरला होती. माझा डेटा फेसबुकसोबत शेअर करू नका असा एक पर्याय आपल्याला दिला होता. आता त्यांनी फेसबुकसोबत डेटा शेअर करणार असून ते स्वीकारलं तरच तुम्हाला वॉट्सअॅप वापरता येईल असं सांगितलंय.’ असं ते पुढे म्हणाले.

हेही वाचा : मीम्सवादाचा भावनिक जांगडगुत्ता!

या सगळ्या डेटाचं काय होतं?

या सगळ्या डेटाचा वापर हा फक्त आणि फक्त एकाच कारणासाठी होईल. ते कारण म्हणजे, पैसे कमावणं. वॉट्सअॅप वापण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीत. मग या कंपन्या आपला डेटा विकून, त्या डेटावर जहिरातदारांना आकर्षित करून पैसे कमवतात. म्हणजे, आपण वॉट्सअॅपवर गिटारबद्दल कुणाशी बोललो तर आपल्याला फेसबुकवर लगेचच गिटारच्या जहिराती दिसू लागतील. त्या जहिरातींचे पैसे फेसबुक कंपनीला मिळणार असतात. म्हणून त्यांना आपला डेटा हवा असतो.

यासोबतच वॉट्सअॅपने हा डेटा थर्ड पार्टीलाही देणार असल्याचं सांगितलंय. थर्ड पार्टी अत्यंत विवादीत आणि कमी माहिती असणारा मुद्दा आहे. यात बुक माय शोसारख्या कंपन्या असू शकतात. वॉट्सअॅपवर ते तिकिटं पाठवतात आणि फेसबुकवर जहिरात करतात. त्यांना ही माहिती शेअर केली जाते.

आता ही थर्डी पार्टी बुक माय शोसारखी कंपन्यांपुरती मर्यादित असेल तर ते ठिक. पण आपल्या राजकीय, भावनिक, समाजमन घडवण्याऱ्या गोष्टींबद्दल ते केलं जाऊ लागेल तर त्याला चूकच म्हणावं लागेल. एका विशिष्ट राजकीय विचारधारा भारतातल्या लोकांच्या मनात रुजावी यासाठी या माहितीचा वापर केला तर त्यातून आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरही गदा येऊ शकते.

पर्यायी अॅपची सुरक्षितता

फक्त वॉट्सअॅपच्या बदललेल्या प्रायवसी पॉलिसीमुळे अचानकच आपल्या खासगीपणावर गदा आलीय असं नाहीय. ती आधीपासूनच येत होती. वॉट्सअॅपचं जाऊ दे. पण फेसबुकचं अॅप आपण वापरत असू तर आपला डेटा थेट फेसबुकला देण्याचं आपण मान्य केलेलंच असतं. हे दोन्ही अॅप वापरत नसू तरी गुगलकडे आपला केवढा डेटा असतो हे सांगणंही कठीण आहे.

‘वॉट्सअॅपला पर्याय म्हणून लोक सिग्नल, टेलिग्रामचा विचार करतायत. त्यातल्या त्यात सिग्नल आत्ता सुरक्षित अॅप आहे, असं म्हणता येईल. वॉट्सअॅप आणि सिग्नल दोन्ही एकच सुरक्षा व्यवस्था वापरतात. पण सिग्नलचा मेटा डेटाही इन्क्रिप्टेड असतो. कारण, सिग्नल ही कंपनी नफा कमवाण्यासाठी काम करत नाही, म्हणून त्यांना हे शक्य होतं,’ अशी माहिती समीर आठल्ये यांनी दिली. 

हेही वाचा : सोशल मीडियाला आचारसंहिता लागू झालीय, म्हणजे काय झालंय?

आमचा डेटा खुशाल घ्या!

सिग्नल असो वा वॉट्सअॅप आज आपली डिजीटल प्रायवसी जपणं फार कठीण झालंय. या खिडकीतून वाकून पाहणाऱ्या अॅपचं करायचं काय असा प्रश्न पुढच्या काळात फार जटील होत जाणार आहे. अनेकदा तुमची खिडकीच बंद करून घ्या असा एक सल्ला दिला जातो. अॅपच नाही तर संपूर्ण मोबाईलचा वापरच बंद करा असा त्याचा अर्थ होईल.

‘आजच्या जगात अँड्रॉईड फोनचा वापर बंद करणं शक्य नाही हे उघड आहे. म्हणूनच कॉन्शिअस डेटा शेअरिंग सारख्या संकल्पना पुढे येतायत. हॅकिंग हॅपिनेस या आपल्या पुस्तकात ही संकल्पना समजावून देताना तत्त्वचिंतक जॉन हेवन्स आमचा डेटा खुशाल वापरा असं सांगतात. फक्त तुम्ही कोणता डेटा वापरताय ते आम्हाला सांगा.

इतकंच नाही, तर हा डेटा विकल्याने तुम्ही पैसेही कमवा. पण त्यातले थोडे पैसे आम्हालाही द्या. हे पैसे फारच तुटपुंजे असले तरी हरकत नाही. पण आमच्या डेटावरती कमावलेल्या पैशातल्या काही भाग तरी आम्हाला मिळेल, असं हेवन्स यांचं म्हणणं आहे.

टीका केली ते बरंच झालं

वॉट्सअॅपने बदलेली प्रायवसी पॉलिसी युरोपियन क्षेत्रांच्या बाहेर राहत असू तरच लागू होणार आहे. युरोपियन देशांसाठी वॉट्सअॅपने वेगळी प्रायवसी पॉलिसी आखलीय. ही पॉलिसी त्यांच्या खासगीपणाचं जास्तीत जास्त रक्षण करणारी आहे. मग भारतातच अशी पॉलिसी का याचं उत्तर देताना प्रसाद शिरगावकर म्हणाले, ‘युरोपियन आपल्या खासगीपणाबद्दल जास्त सतर्क असतात. त्यामुळेच युरोपियन युनियनने तिथे जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन म्हणजेच जीडीपीआर नावाचा एक कायदा केलाय. या कायद्यामुळे युजरची खासगी माहिती वॉट्सअॅपला कुणालाही शेअर करता येत नाही.’

भारतात डेटा प्रोटेक्शन कायदा आणणारं बील गेली दोन ते तीन वर्ष संसदेत पडून आहे. नागरिकांनाच आपलं खासगीपण महत्त्वाचं वाटत नसल्याने त्यांचं प्रतिनिधित्व करणारी नेते मंडळीही या बिलाकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण युरोपियन देशांप्रमाणे भारतातही लवकरात लवकर डेटा प्रोटेक्शन कायदा आणावा लागेल.

वॉट्सअॅपची प्रायवसी पॉलिसी बदलल्यावर भारतीय लोकांनी केलेली टीका, घातलेला गोंधळ या दृष्टीने चांगलाच म्हणावा लागेल. भारतात कायदा नसला तरी तिथल्या लोकांना गंडवता येणार नाही हे वॉट्सअॅपला उलगडलंय. म्हणूनच तर काल १५ जानेवारीला त्यांनी या प्रायवसीची अंतिम तारीख पुढे ढकलणार असल्याचं जाहीर केलंय. आता ८ फेब्रुवारी ऐजवी १५ मेपर्यंत या अपडेटला मान्यता न देता वॉट्सअॅप वापरता येईल. आपली तात्पुरती सोय झाली असली खिडकीतून वाकून पाहणाऱ्या वॉट्सअॅपची कायमची सोय आणायची असेल तर लवकरात लवकर डेटा प्रोटेक्शन कायदा आणावा लागेल.

हेही वाचा : 

कोरोनाची माहिती नको, पण फेक न्यूज आवर!

तिसऱ्या जगाचं नेतृत्व करायची संधी भारताने गमावलीय?

ट्रम्पना सोशल मीडियातून बॅन करण्याची मागणी का होतेय?

आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?

ट्रम्प समर्थकांचा निषेध करणाऱ्या मोदींचे भक्त आपला पराभव स्वीकारतील?