झाडाखाली अडकलेल्या माणसाला सोडवायचं कुणी?

०७ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


एका कर्मचाऱ्याच्या हाताखाली दुसरा कर्मचारी, त्याच्या हाताखाली आणखी एक कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांच्या उतरंडीला ब्युरोक्रसी किंवा नोकरशाही असं म्हणतात. सरकारी प्रशासनातल्या या नोकशाहीमुळे शेतकऱ्याची झाडाखाली असलेल्या माणसासारखी गत झाली आहे. झाड कापलं नाही तर या शेतकऱ्याचाही लवकरच मृत्यू होईल.

आजचा दिवस तसा निवांत आहे. गेले काही दिवस सगळेच आपापल्या व्यापात असतील. मीडियात सुरु असलेल्या घडामोडींनी थकलेही असावेत. अगदी पत्रकारही. मी आपल्या सगळ्यांना निवांत होण्यासाठी एक गोष्ट सांगतो. मूळ लेखक आहेत कृष्ण चंदर. हिंदीतले मान्यवर लेखक. केंद्र सरकारनं त्यांना पद्मश्रीनं सन्मानित केलंय. आयसीएसईच्या दहावीच्या पुस्तकात त्यांची ही गोष्ट होती. आणि ती नंतर काढून टाकण्यात आली.

आर. जे. सायेमा हिने आपल्या रेडिओ प्रोग्रॅममधे ही गोष्ट सांगितलीय. थोडं सायेमाविषयी. ही पोरगी भारीय. वेगळेपण काय बघावं हे तिला कळतं. हिंदी साहित्य, अभिनय, ज्ञानाची जिज्ञासा यात ती हुशार आहेच. पण त्याहीपेक्षा संवादिनी आहे. किती बोलावं आणि नेमकं कुठं थांबवं याचं उत्तम भानही तिला आहे. तिच्या एकएका यू ट्यूब शेअरला ६ मिलियन म्हणजे सहा दशलक्ष वगैरे लाईक्स येतात आणि सहा हजाराच्या घरात शेअर आहेत. यावरुन तिची महती आपल्याला कळू शकेल.

तर तिने सांगितलेली कथा अनुवाद करुन सांगतो. पटली तर स्वीकारा. नसेल तर नाकारण्याचा मूलभूत अधिकार आहेच. तर गोष्टीचं नाव आहे - जांभळाचं झाड.

हेही वाचा : वाफाळलेले दिवसः वयात येणाऱ्या पाल्यांसोबत पालकांनी बघावा असा अभिवाचनाचा प्रयोग

एकदा रात्रीच्या वेळी खूप जोराचं वादळ आलं. सचिवालयाच्या परिसरातलं एक जांभळाचं झाडं पडलं. सकाळी जेव्हा माळ्याने बघितलं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्या झाडाच्या खाली एक माणूस अडकलाय. माळी धावत धावत शिपायाकडे गेला. शिपाई धावत धावत लिपिकाकडे गेला. लिपिक धावत धावत निरीक्षकाकडे केला. निरीक्षक धावत धावत बाहेर बागेत आला. काही मिनिटांत झाडाखाली अडकलेल्या माणसाच्या अवतीभवती गर्दी जमा झाली.

‘बिचारं जांभळाचं झाडं किती फळ देत होतं,’ एक लिपिक म्हणाला.

या झाडाची जांभळं किती चविष्ट, रसदार होती हे म्हणताना त्याचा गळा भरुन आला.

‘पण हा माणूस?’, झाडाखाली अडकलेल्या माणसाकडे पाहून माळी म्हणाला.

‘हं, हा माणूस’, असं म्हणून निरीक्षक विचारात पडला.

‘माहीत नाही, जिवंत आहे की मेलाय?’ एका शिपायाने विचारलं.

‘मेलाच असेल. इतकं मोठं झाड ज्या माणसाच्या अंगावर पडलं, तो जिवंत कसा असू शकेल,’ दुसऱ्या शिपायानं उत्तर दिलं.

‘नाही, मी जिवंत आहे,’ कण्हलेल्या आवाजात अडकलेला माणूस उद्गारला.

‘जिवंत आहे?,’ एका लिपिकानं आश्चर्यानं विचारलं.

‘झाडाला हटवून त्याला जीवदान द्यायला हवं,’ माळ्याने सल्ला दिला.

‘अवघड दिसतंय,’ एका जाडसर शिपायानं उत्तर दिलं. ‘झाडाचं खोडं मजबूत आणि वजनदार आहे.’

‘काय अवघड आहे,’ माळी म्हणाला.

‘काय अवघड आहे, जर निरीक्षकांनी आत्ता आदेश दिला, तर १५-२० शिपाई, लिपिक मिळून हे झाड आपण त्याच्या अंगावरुन हटवू शकू,’ माळी म्हणाला.

‘माळी बरोबर म्हणतोय,’ बरेचशे लिपिक एकसाथ म्हणाले.

‘लावा जोर, आम्ही तयार आहोत,’ एकदम काही जण झाड तोडण्याच्या तयारीत आले.

‘थांबा,’ निरीक्षक म्हणाला, ‘मी माझ्या वरिष्ठ निरीक्षकांशी एकदा बोलून घेतो.’

निरीक्षक त्याच्या वरिष्ठांकडे गेला. त्याचा वरिष्ठ उपनिरीक्षकाकडे गेला. उपनिरीक्षक संयुक्त निरीक्षकाकडे गेला. संयुक्त निरीक्षक मुख्य निरीक्षकाकडे गेला. मुख्य निरीक्षकाने संयुक्त निरीक्षकांशी चर्चा केली. संयुक्त निरीक्षकरांनी उपनिरीक्षकांशी काही चर्चा केला. उपनिरीक्षकाने निरिक्षकाच्या वरिष्ठाशी बातचित केली. असंच चालत राहलं. यात अर्धा दिवस निघून गेला.

दुपारी जेवणाच्या सुट्टीत झाडाखाली अडकलेल्या माणसाच्या अवतीभवती मोठी गर्दी जमा झाली होती. लोक वेगवेगळ्या प्रकारे बोलत होते. काही मनमानी लिपिकांनी हे प्रकरण आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. सरकारी निर्णयाआधीच झाडं कापावं, अशी त्यांची इच्छा होती. ते तसं करायला तयारही होते.

तेवढ्यात निरीक्षक धावत धावत फाईल घेऊन आला आणि म्हणाला ‘आपण स्वतःहून या झाडाला इथून हटवू शकत नाही. आपण व्यापारी विभागाचे कर्मचारी आहोत आणि हे झाडाचं प्रकरण आहे. झाड कृषी विभागाच्या अंतर्गत येतं. यासाठी या फाईलवर तातडीचा शेरा मारुन मी कृषी विभागाकडे पाठवतोय. तिथून उत्तर येताच, या झाडाला इथून हटवण्यात येईल.’

दुसऱ्या दिवशी कृषी विभागाचं उत्तर आलं की, झाड हटवण्याची जबाबदारी तर व्यापार विभागाचीच आहे. हे उत्तर ऐकल्यावर व्यापार विभागाला राग आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की झाड हटवण्याची किंवा न हटवण्याची जबाबदारी ही तर कृषी विभागाची आहे. व्यापार विभागाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीय. दुसऱ्या दिवशीही फाईल इकडून तिकडे सरकत राहिली.

संध्याकाळी उत्तर आलं तेव्हा त्यात होतं की, हे प्रकरण आम्ही हॉर्टिकल्चर म्हणजेच फलोत्पादन विभागाकडे सूपूर्द करतोय. कारण हे एका फळ देणाऱ्या झाडाचं प्रकरण आहे. आणि कृषी विभागाला फक्त धान्य आणि शेतीच्या प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जांभळाचं झाडं हे फळ देणारं झाडं असल्यानं फलोत्पादन विभागाच्या अंतर्गत त्याचा समावेश होतो.

रात्री झाडाखाली अडकलेल्या माणसाला माळ्यानं वरण भात खावू घातला. रात्रभर बगेच्याबाहेर पोलिसांचा पाहरा होता. लोकांनी कायदा हातात घेवून झाडं स्वतः तोडण्याचा प्रयत्न तर करु नयेत यासाठी. मात्र एका पोलिस हवालदाराला थोडी दया आली आणि त्यानं माळ्याला अडकलेल्या माणसाला वरण भात खावू घालण्याची परवानगी दिली.

माळ्यांनी अडकलेल्या माणसाला सांगितलं, ‘तुझी केस सुरु आहे. उद्यापर्यंत निर्णय़ होईल अशी आशा आहे.’ अडकलेला माणूस काहीच म्हणाला नाही.

माळी झाडाच्या खोडाचं निरीक्षण करत म्हणाला, ‘बरं झालं झाड तुझ्या ढुंगणावर पडलं, जर ते तुझ्या कंबरेवर पडलं असतं तर मणक्याचं हाड मोडलं असतं.’ अडकलेला माणूस परत काहीच म्हणाला नाही.

माळी परत म्हणाला, ‘तुझा इथे कुणी वारस असेल तर मला सांग, मी त्याला हे सगळं त्याच्या कानावर जाईल, यासाठी प्रयत्न करेन.’

‘मी अनाथ आहे,’ अडकलेल्या माणसानं खूप अवघडलेल्या अवस्थेत उत्तर दिलं.

माळी दु:ख करत तिथून निघून गेला.

हेही वाचा : गंभीर सत्यघटनेचा विनोदी सिनेमा आपल्या चांगलाच लक्षात राहील

तिसऱ्या दिवशी फलोत्पादन विभागाकडून उत्तरं आलं. खूपच कडक उत्तर देण्यात आलं. त्यात खूपशी टीकाही होती. फलोत्पादन विभागाच्या सचिव पातळीवरच्या माणसानं लिहिलं असावं असं अनुमान काढण्यात आला. त्यांनी लिहिलं, ‘आश्चर्य आहे, झाडं लावा ही मोहीम जास्त मोठ्या प्रमाणात सुरु असताना, आपल्या देशात असेही सरकारी अधिकारी आहेत की, जे झाडं तोडण्याचा सल्ला देताहेत. ते ही एक फळ देणाऱ्या झाडाला आणि तेही जांभळाच्या! या झाडाची फळं लोक मोठ्या चवीने खातात, आमचा विभाग कुठल्याही स्थितीत या फळदार झाडाला तोडण्याची परावनगी देऊ शकत नाही.’

‘आता काय करायचं?,’ एका मनमानी अधिकाऱ्यानं विचारलं, ‘जर झाड तोडता येत नसेल, तर या माणसाला तोडून काढता यईलच ना.’ ‘हे बघा,’ त्यानं इशाऱ्यानं दाखवलं, ‘या माणसाला जर धडाच्याखाली कापलं, तर अर्धा माणूस एका बाजूनं तर अर्धा माणूस दुसऱ्या बाजूनं बाहेर काढता येईल. आणि झाडंही आहे तसंच राहील.’

‘मात्र असं केलं, तर मी मरुन जाईन,’ अडकलेल्या माणसानं हरकत घेतली.

‘हा म्हणतोय तेही बरोबरच आहे,’ एक लिपिक म्हणाला. माणसाला कापून काढण्याचा पर्याय देणाऱ्यांनी याबाबत एक समर्थनार्थ युक्तिवाद केला, ‘तुम्हाला माहीत नाही, आज काल प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून या तोडलेल्या माणसाला पुन्हा जोडता येवू शकेल.’

त्याच्या सल्लानुसार अडकलेल्या माणसाची फाईल वैद्यकीय विभागात पाठवण्यात आली. वैद्यकीय विभागाने लगेच यावर कृती केली आणि ज्या दिवशी फाईल मिळाली त्याच दिवशी विभागातल्या सर्वात कार्यक्षम प्लास्टिक सर्जनला घटनास्थळी पाठवण्यात आलं.

सर्जनने अडकलेल्या माणसाची पूर्ण पाहणी करुन, त्याची तब्येत तपासून, रक्तदाब, श्वासाची गती, ह्रदय आणि फुफ्फुसाची तपासणी करुन अहवाल सादर केला. ‘या माणसाची प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रिया तर होवू शकेल आणि शस्त्रक्रिया यशस्वीही होईल. मात्र माणूस मरुन जाईल.’ असं कारण देत हा प्रस्तावही रद्द करण्यात आला.

रात्री अडकलेल्या माणसाच्या घशात खिचडी टाकताना माळी म्हणाला, ‘आता हे प्रकरण वरपर्यंत गेलंय. आता सर्व सचिवालयातल्या सचिवांची बैठक होणार आहे असं समजलंय. आणि त्यात तुझं प्रकरण ठेवण्यात येईल. आशा आहे की आता सर्व काही सुरळीत होईल.’

अडकलेला माणूस कण्हत हळू आवाजात म्हणाला, 

‘हमनें माना की तवाफूल ना करोगे लेकिन,
खाक हो जायेंगे, हम तुमको खबर होने तक’

माळ्याने आश्चर्याने तोंडात बोटं टाकतं आणि विस्फारत त्याला विचारंल की ‘तुम्ही काय शायर आहात?’

अडकलेल्या माणसानं हळूवारपणे मान डोलावली.

दुसऱ्या दिवशी माळ्यानं शिपायाला सांगितलं. शिपायाने लिपिकाला आणि लिपिकानं त्याच्या वरिष्ठाला. थोड्याच वेळात सचिवालयात हे पसरलं की अडकलेला माणूस हा शायर आहे. मग काय! थोड्याच वेळात अडकलेल्या शायरला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जमा होऊ लागले. बातमी हवेबरोबर शहरातही गेली आणि संध्याकाळपर्यंत गल्ली गल्लीतले शायर एकत्र येऊ लागले. सचिवालयाची बाग वेगवेगळ्या प्रकारच्या शायरांनी भरुन गेली.

शायरीची आवड असणारे सचिवालयातले अनेक लिपिक, निरीक्षक सगळे संध्याकाळी तिथंच थांबले. काही शायर अडकलेल्या माणसाला आपली शायरी ऐकवण्यात मश्गूल झाले. अनेक लिपिक आपल्या शायरीबाबत त्याच्याकडून सल्ला घेण्यासाठी पुढे सरसावले.

जेव्हा कळलं की अडकलेला माणूस हा शायर आहे, तेव्हा सचिवालयातल्या उपसमितीने निर्णय घेतला. अडकलेला माणूस हा शायर आहे, त्यामुळे या फाईलचा संबंध ना कृषी विभागाशी आहे ना फलोत्पादन विभागाशी. तर फक्त सांस्कृतिक विभागाशी आहे.’ आता सांस्कृतिक विभागाला विनंती करण्यात आली की लवकरात लवकर त्यांनी या प्रकरणात निर्णय करावा. आणि या दुर्देवी शायरला या झाडाखालून मुक्त करावं.

फाईल सांस्कृतिक विभागाच्या निरनिराळ्या विभागांतून जाऊन साहित्य विभागाच्या सचिवापर्यंत पोचली. बिचारा सचिव त्याचवेळी आपल्या गाडीत बसून तातडीने घटनास्थळी पोचला. आणि अडकलेल्या माणसाची मुलाखत घेवू लागला.

‘तू शायर आहेस,’ त्याने विचारलं,

‘हो,’ अडकलेल्या माणसाने उत्तर दिलं.

सचिव ‘कुठली साहित्यकृती?’ 

अडकलेला माणूस ‘अवस’

‘अवस!’ सचिव जोरात ओरडला, ‘तो तूच आहेस का, ज्याचं ‘मजमुआए कलामे अवस के फुल’ हे पुस्तक आत्ताच प्रकाशित झालंय.’

अडकलेल्या शायरने यावेळी फक्त होकारार्थी मान डोलावली.

‘तू आमच्या अकादमीचा सदस्य आहेस?’ सचिवाने विचारलं.

अडकलेला शायर म्हणाला, ‘नाही’

‘आश्चर्य आहे,’ सचिव जोरात ओरडला. ‘इतका मोठा शायर, अवस के फूलचा लेखक, आणि आमच्या अकादमीचा सदस्य नाही? अरेरे! मोठी चूक झाली आमच्याकडून. किती मोठा शायर आणि आता कुठल्या अनोळखी अंधारात पडलाय.’

शायर म्हणाले, ‘अनोळखी अंधारात नाही, तर झाडाखाली अडकलोय. भगवंतासाठी मला या झाडाखालून वाचवा.’

‘लगेच व्यवस्था करतो,’ असं सांगत सचिव तातडीनं निघाला आणि त्यानं आपल्या विभागाला अहवाल सादर केला.

दुसऱ्या दिवशी सचिव धावत धावत शायरकडे आला आणि म्हणाला ‘अभिनंदन, मिठाई खिलवं, आमच्या सरकारी साहित्य अकादमीनं तुझी आमच्या साहित्य अकादमीच्या सदस्यपदी निवड केलीय. ही घे निर्णयाची प्रत.’

‘अरे पण मला या झाडाखालून तर काढा,’ अडकलेल्या माणसानं कण्हत उत्तर दिलं.

त्याला आता श्वास घेणं अवघड होऊ लागलं होतं. आणि त्याच्या डोळ्यांकडे पाहून कळत होतं की तो खूप दु:खात आहे.

‘हे आम्ही करु शकत नाही,’ सचिव म्हणाला

‘जे आम्हाला शक्य होतं, ते आम्ही केलं, आम्ही एवढंच करु शकतो की जर तू मेलास तर तुझ्या बायकोला आम्ही निवृत्तीवेतन मिळवून देवू शकतो. तू जर याबाबत अर्ज केला तर आम्ही हे करु शकतो.’

‘मी अजून जिवंतं आहे,’ शायर थांबून थांबून बोलला. ‘मला जिवंत ठेवा.’

‘अडचण ही आहे,’ सांस्कृतिक विभागाचा सचिव हात चोळत म्हणाला की ‘आमचा विभाग केवळ संस्कृतीशी संबंधित आहे. तुमच्यासाठी आम्ही वन विभागाला लिहिलं आहे, त्यात तात्काळ असं लिहलंय.’

संध्याकाळी माळ्यानं अडकलेल्या माणसाला येऊन सांगितलं, ‘उद्या वन विभागाचे कर्मचारी येऊन झाड तोडून टाकतील. आणि तुझा जीव वाचेल.’ माळी खूपच आनंदी होता. मात्र अडकलेल्या माणसाची प्रकृती उत्तर देत होती, त्या स्थितीतही तो आपल्या जगण्यासाठी संघर्ष करत होता. उद्यापर्यंत, सकाळपर्यंत कसंही करुन त्याला जिवंत राहायचंय.

दुसऱ्या दिवशी वनविभागाचे कर्मचारी कुऱ्हाड आणि करवत घेवून पोचले, तेव्हा त्यांना झाड तोडण्यापासून रोखण्यात आलं. या झाडाला तोडू नये असा परराष्ट्र मंत्रालयातून आदेश आला होता. दहा वर्षांपूर्वी पिटोनियाच्या पंतप्रधानांनी हे झाड स्वतः:च्या हातांनी सचिवालयात लावलं होतं असं त्यामागचं कारण होतं. झाड तोडलं तर पिटोनिया सराकरशी देशाचे सुरळीत झालेले संबंध बिघडतील, असा अंदाज होता.

‘मात्र एका माणसाच्या जगण्याचा प्रश्न आहे,’ एक लिपिक रागात ओरडला.

‘दुसरीकडे दोन सत्तेतील संबंधांचा प्रश्न आहे,’ वरिष्ठ लिपिकाने पहिल्या लिपिकाला समजावलं. ‘आणि हेही समजून घे की पिटोनिया सरकार आपल्या सरकारला किती मदत देतं. आपण या दोन्ही देशांच्या मैत्रीखातर एका माणसाचं जगणं बलिदान करु शकत नाही का?’

लिपिक- ‘शायरला मरायला हवं का?,’

वरिष्ठ - ‘हो’

वरिष्ठ निरीक्षकाने निरीक्षकाला सांगितलं, ‘आज सकाळी पंतप्रधान विदेश दौऱ्यावरुन परत आलेत. आज चार वाजता परराष्ट्र मंत्रायल या झाडाची फाईल त्यांच्यासमोर सादर करेल. ते जो निर्णय घेतील, तो सगळ्यांना मंजूर असेल.’

संध्याकाळी चार वाजता स्वत: निरीक्षक फाईल घेऊन अडकलेल्या माणसाजवळ आला, ‘ऐकतोस का?’ आल्यावरच आनंदात फाईल हवेत फैलावत तो ओरडला. ‘पंतप्रधानांनी झाड तोडण्याचा आदेश दिलाय आणि या प्रकरणाची सर्व आंतरराष्ट्रीय जबाबदारी स्वतःवर घेतलीय. उद्य़ा हे झाड तोडून टाकण्यात येईल. आणि तुझी या संकटातून सुटका होईल.’ ‘ऐकतोस का, आज तुझी केस निर्णयाप्रत आलीय.’

निरीक्षकाने शायरचा खांदा हलवत त्याला सांगितलं. मात्र शायरचा हात थंड पडला होता. डोळ्यातील बुबळे निर्जिव झाली होती आणि मुंग्यांची एक मोठी रांग त्याच्या तोंडात जात होती. त्याच्याजगण्याची केस अंतिम निर्णयावर पोचली होती.

गोष्ट संपली. गोष्ट अंतर्मुख करणारी आहे. राज्यात, केंद्रात जे काही सुरु आहे, एवढ्या सत्तासंघर्षानंतरही राज्यात पिचलेला शेतकरी, बेरोजगार कुठल्या अवस्थेत आहे, हे सांगण्यासाठी वेगळं काही लिहिण्याची गरज आहे, असं वाटत नाही. कथा अभ्यासक्रमातून का काढली असावी, याचंही उत्तरं कथेतच आहे.

हेही वाचा : 

प्रसिद्धीच्या झोतात असलेला बालकुमार तैमूर

महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळे उमगतात, त्याची गोष्ट

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?