झारखंडमधे किंग नाही तर किंगमेकर होण्यासाठी ताकद पणाला

१३ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


महाराष्ट्र आणि हरयाणानंतर आता सगळ्यांच्या नजरा झारखंडच्या निवडणुकीकडे लागल्यात. राहुल गांधींच्या रेप इन इंडिया या विधानानंतर तर झारखंडमधल्या निवडणूक प्रचाराने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. सगळ्याच पक्षांनी आपापली ताकद पणाला लावलीय. काही करून सत्तेत येण्याचा पण केलाय. या सगळ्यांत सत्ता कुणाची येणार यापेक्षा किंगमेकर कोण बनणार याला खूप महत्त्व आलंय.

झारखंडमधली लढाई तशी दुहेरी आहे. स्वबळ आजमावत असलेली सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसच्या नेतृत्वातले  विरोधी पक्ष. दोन्ही बाजूंनी किंग होण्याची तयारी सुरू आहे. यासाठी भाजपकडून मुख्यमंत्री रघुवर दास आणि विरोधकांकडून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन हे दोन योद्धे मैदानात उतरलेत. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे दोन्हे योद्धे स्वबळावर किंग बनतील, असं चित्र नाही.

झारखंडचा राजकीय इतिहास

विधानसभेच्या ८१ जागा असलेल्या झारखंडमधे भाजपचा ऑल झारखंड स्टुडंट युनियन अर्थात आजसू, झारखंड विकास मोर्चा, झारखंड पार्टी, संयुक्त जनता दल, लोक जनशक्ति पार्टी यासारख्या छोट्या, छोट्या पक्षांनीही सारी ताकद पणाला लावलीय.

वीसेक वर्षांच्या झारखंडचा राजकीय इतिहास बघूनच एखाद दुसऱ्या जागेवर लढणारे पक्ष, अपक्षही सत्तेची चावी आपल्याकडेच राहील असं मानून कामाला लागलेत. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निकालाने तर अनेकजण किंगमेकर बनण्याच्या उद्देशाने झारखंडच्या निवडणूक रिंगणात उतरलेत.

हेही वाचा : झारखंडचं भविष्य महिला ठरवणार, तिकीट देताना प्राधान्य मात्र पुरुषांना

आजसूच्या भूमिकेकडे लक्ष

या सगळ्यांमधे भाजपसोबत सत्तेत राहिलेला २५ वर्षांचा मित्रपक्ष आजसूच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. सुदेश महतो प्रमुख असलेल्या आजसूचा मावळत्या सरकारमधे सहभाग राहिलाय.
 ५३ जागा लढवणाऱ्या आजसूने तर 'अब की बार गांव की सरकार' असा नारा देत आपणचं सत्तेचा दावेदार असल्याचं सांगितलंय. झारखंडमधे सत्तास्थापनेसाठी ४१ आमदार  लागतात. असं असतानाही आजसूने  गांव की सरकार असा नारा दिलाय. यामागे झारखंडचा राजकीय इतिहास दडलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपची नेतेमंडळी आपल्यामुळेच राज्याला पहिल्यांदा गेल्या पाच वर्षांत स्थायी सरकार मिळाल्याचा मुद्दा प्रचारसभांमधून सांगताहेत. पण या सरकारला सुरवातीला बहुमत नव्हतं. आजसूच्या पाठिंब्याने रघुवर दास यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार आलं. याआधी १४ वर्षांच्या इतिहासात राज्याने सात मुख्यमंत्री बघितले.

एवढंच नाही तर एका अपक्ष आमदाराला मुख्यमंत्री होण्याचं भाग्यही लाभलं. एखाद्या अपक्षाला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाल्याचा बहुदा हा पहिलाच प्रसंग असावा. राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिलेल्या बाबुलाल मरांडी यांना गेल्यावेळी निकाल आल्यावर अनेक महिने आपले आमदार एकजूट ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तरीही शेवटी भाजपने आठपैकी सहा आमदार आपल्यासोबत घेतले.

हेही वाचा : झारखंडच्या निवडणुकीत काय सुरू आहे?

अपक्षाला मुख्यमंत्री बनवणारं राज्य

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचा तसा झारखंडच्या राजकारणावर प्रभाव नाही. तरीही पक्षाने जवळपास ५० जागांवर आपले उमेदवार उभे केलेत. लोकजनशक्ती पार्टीनेही पंधराएक उमेदवार दिलेत.

याशिवाय, अपक्ष मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या सरकारमधे मंत्री राहिलेले अनोस एक्का, कधीकाळी शिबू सोरेन यांना हरवणारे राजा पीटर यांच्यासारखे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. झारखंड हे एक छोटं राज्य आहे. इथे जागांमधली थोडीफार अदलाबदलही सत्तेचं गणित बनण्याबिघडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

भाजप आणि झामुमो हे सत्तेचे प्रबळ दावेदार आहेत, ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. पण सत्ता बनवण्यासाठी चारपाच जागा कमी पडल्यास किंग बनण्यापेक्षा किंग बनवणाऱ्याची भूमिका महत्त्वाची बनते. कारण मधू कोडा सरकारमधे तर अपक्ष आमदारही किंग मेकर होते. त्यामुळेच झारखंडमधे सध्या किंग कोण बनणार यापेक्षा किंगमेकर कोण बनणार याचीच चर्चा सुरू आहे.

नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, निव्वळ छोटे छोटे पक्षच नाही तर काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष सुद्धा इथे किंगमेकरच्या भूमिकेत दिसू शकतो. लोकसभेमधे अधिक जागांवर आपले उमेदवार देणाऱ्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत पडती भूमिका घेतलीय. झारखंड मुक्ती मोर्चाला झुकतं माप दिलंय. काँग्रेसच्या या पडत्या भूमिकेमागंही किंगमेकरची महत्त्वकांक्षा दडल्याचं झारखंडमधले राजकीय जाणकार सांगतात.

हेही वाचा :

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील उणे-अधिक

ज्येष्ठांसाठी आरोग्य विमा घेताना काय काळजी घ्यावी?

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला का विरोध केला पाहिजे?

महाराष्ट्रातल्या अपयशानंतर भाजपला झारखंड जिंकावंच लागणार!

कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारसाठी धडा काय?