'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट.
शिकागो आणि पुणे यात किती मैलांचं अंतर आहे, ते 'गुगल'वर सहज मिळेल. घड्याळाच्या काट्यांवर अमेरिका किती मागे आहे, हेही 'गुगल' सर सांगतीलच. पण, त्या शिकागोमधे कोण्या बराक ओबामानं 'धिस इज अवर टाइम' अशी ऐतिहासिक घोषणा २००८ मधे करावी आणि माझ्यासारख्या पुण्यात राहणाऱ्या तरूणानं आपल्या कारच्या मागे काचेवर ती अक्षरं गोंदवावीत! हे सगळं काय होतं? वेडेपणाच असावा बहुधा.
पण 'ऑडॅसिटी ऑफ होप' किती शक्तिमान असते, याची तीच खात्री आज पुन्हा पटली. त्या ऐतिहासिक विजयी सभेत ओबामा बारा वर्षांपूर्वी म्हणाले होते, ‘बी द चेंज, वी बिलिव्ह इन.’ तेव्हा काळे-गोरे, स्त्री-पुरूष-गे, सर्वधर्मीय तरूण ज्येष्ठ असे सगळेच शिकागोतल्या विशाल मैदानावर शब्दशः नाचत होते. आनंदाने बेहोष होत होते. अश्रूंना वाट करून देत होते.
अमेरिकेनं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात आल्याची खात्री त्यांना वाटत होती. आणि, ओबामा त्यांना आश्वस्त करत होते : येस, वी कॅन! आणि हजारो जिव्हांनी जनसागर पुरावा देत होता : येस वी कॅन!
बारा वर्षांनंतर कमला हॅरिस यांच्या तोंडी आता तीच आशा आहे. तेच स्वप्न आहे. विजयानंतर बोलतानाचं त्यांचं उत्फुल्ल 'स्माइल'ही अगदी ओबामांशी नातं सांगणारं आहे. इतिहास पुन्हा घडतो आहे, याची खात्री पटावी, असा हा अमेरिकेचा ताजा निकाल आहे.
आशा संपावी, अशा या जगात, जो बायडन निवडून येणं आणि अमेरिकेचे अध्यक्ष होणं हा एका देशाच्या निवडणुकीपुरता मुद्दा नाही. बदलणाऱ्या जगाची ती चाहूल आहे. संकुचित राष्ट्रवादावर उभ्या राहिलेल्या जगात, सर्वसमावेशकता आणि सहिष्णुता या आश्वासनांवर कुणी निवडून येणं, हा खरोखरच बदल आहे.
ओबामांच्या पहिल्या विजयाची आठवण यावी, असा हा क्षण आहे. ओबामांनी ज्याप्रकारे 'युनायटेड' अमेरिकेचं स्वप्न दिलं, तशी अमेरिका या निकालाच्या निमित्ताने दिसली नाही, हे खरं आहे. ती 'डिवायडेड' दिसत आहेच. पण तरीही ती प्रामुख्याने बायडन यांच्यासोबत उभी आहे. हे कमी महत्त्वाचं नाही.
हेही वाचा : बायडन आघाडीवर असतानाही ट्रम्प जिंकू शकतील का अमेरिकेची निवडणूक?
जागतिकीकरणाचं हे तिसरं पर्व आता सुरू झालंय. ओबामा ते बायडन व्हाया ट्रम्प या प्रवासाला हा संदर्भ आहे. ओबामांच्या विजयाची आणखी आठवण येण्यासाठी अन्य कारणंही आहेतच.
म्हणजे, ओबामांच्या बारा वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक विजयाचे बायडन हेच पार्टनर होते. ज्यो बायडन हे ओबामांसोबत अमेरिकेचे उपाध्यक्ष झाले. बायडन हे तसे 'लो प्रोफाइल' असल्यान ते फारसं कधी 'जाणवलं' नाहीत. शिवाय, ओबामा यांच्यासारखा वलयांकित अध्यक्ष असल्यावर आणखी कोणाची कोण कशाला नोंद घेईल? पण, ओबामा आणि बायडन ही जोडी असल्यानेच ओबामांचा विजय तेव्हा खात्रीचा झाला होता.
त्यामुळे काळे गोरे, सर्ववंशीय नागरिक डेमोक्रॅटिक पक्षाच्या सोबत त्या लढाईत उतरले. या वेळच्या निवडणुकीत जो आणि कमला या जोडीने तेच केलं. शिवाय कमला हॅरिस या महिला असल्यानं अमेरिकेने आणखी नवा इतिहास घडवला, तो वेगळाच. ओबामांनी सांगितलेला 'धिस इज अवर टाइम' हा अमेरिकेचा चेहरा म्हणून ओबामांची ही मैत्रीण, कमला हॅरिस जगभर दिसणार आहे. अवघ्या जगाला, जगातल्या उदारमतवादाला, खुलेपणाला त्या बळ देणार आहेत.
अर्थात, म्हणून बायडन कमी महत्त्वाचे नाहीत. बायडन हे स्टेट्समन आहेत. ओबामांच्या सोबत आठ वर्षे उपाध्यक्ष असलेले बायडन ७७ व्या वर्षी अमेरिकेसारख्या देशाचे अध्यक्ष होणं म्हणूनही महत्त्वाचं आहे.
वयाच्या २९ व्या वर्षी सिनेटर झालेल्या बायडन यांनी त्याचवेळी एका अपघातात पत्नी गमावली. मुलगीही जिवाला मुकली. नंतर पुढे पोटचा मुलगा असाध्य आजाराला बळी पडला. अशा अनेक दुःखांनी तावून-सुलाखून निघालेला असा हा जाणता राजकीय नेता आहे. ओबामांसोबत उपाध्यक्ष झाले, तेव्हाच त्यांचं वय ५५ होतं. तर, ओबामा ४७ वर्षांचे.
ओबामांना पुढची टर्म मिळणार, हे निश्चित असल्याने आपल्याला अध्यक्षपदाची संधी नाही, हे बायडन यांच्या लक्षात आलं होतं. तरीही, ओबामांच्या नंतर असा एक क्षीण प्रयत्न त्यांनी करून पाहिला. मात्र, ते अपयशी ठरले. यावेळी पुन्हा ते उत्सुक आहेत, असं समजल्यावर मित्रांनीही त्यांना समजावून सांगितलं होतं - यू हॅव मिस्ड द बस. इट्स टू लेट! पण, ओबामांच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी अमेरिकेनं निवड केली ती बायडन यांचीच.
त्या अर्थाने, 'जो - कमला' ही 'टीम ओबामा' आहे! बायडन यांच्या जोडीला कमला असल्याने अपेक्षा आणखी उंचावल्यात. त्या भारतीय वंशाच्या आहेत. आणि, भारतातल्या त्यांच्या सख्ख्या मामांनी 'भाचीच्या गावाला जाऊ या' असा प्लान नुकताच जाहीरही केलाय. अर्थात, एवढाच तो मुद्दा नाही.
हेही वाचा : समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!
कमलादेवी हॅरिस यांचे वडील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते नाहीत किंवा त्यांना कोणताही राजकीय वारसा नाही. तरीही, याच कमलादेवी अमेरिकेच्या उपाध्यक्ष झाल्यात. कमलादेवींनी त्यांचं आत्मचरित्र आईला अर्पण केलंय.
श्यामला गोपालन या त्यांच्या आई. विसाव्या वर्षी चेन्नईहून ही श्यामला कॅलिफोर्नियाला जाते. तिथल्या विद्यापीठात कर्करोगावर संशोधन करू लागते. दरम्यान, जमैकातल्या अर्थशास्त्रज्ञ डोनाल्ड हॅरिस यांच्या प्रेमात पडते. लग्न होतं. दोन मुली पदरात असताना घटस्फोट होतो. ही एकटी बाई पोरींना वाढवते. त्याचवेळी स्वतःलाही संशोधक, कार्यकर्ती म्हणून सिद्ध करते.
भारतातली ही बाई, जमैकाच्या कृष्णवर्णीय नवऱ्यापासून झालेल्या मुली आणि काम करत असते अमेरिकेत. परमुलुखात असं उभं राहाणं, मुलींना उभं करणं सोपं नव्हतं. पण, तिच्यासोबत तिच्या मुलीही धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या. आईचा आत्मविश्वास आणि माणुसकी वर्धिष्णू करणारी मूल्यं घेऊन कमलादेवी राजकारणाच्या रिंगणात उतरल्या. सिनेटवर निवडून आल्या. आणि, आता तर त्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष होताहेत.
हिलरी क्लिंटन अध्यक्षपदाच्या रिंगणात पोहोचल्या होत्या. त्यापूर्वी बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. ट्रम्प भलेही निवडून आले असतील अपघाताने, पण खरी अमेरिका ती नव्हे. ओबामांना अध्यक्ष करणारी, कमलादेवींना उपाध्यक्षपदाच्या रिंगणात उभी करणारी अमेरिका त्याहून खरी आहे.
'गोऱ्या' अमेरिकेतल्या मतदारांचा विचार करता, आशियाई - अमेरिकी मतदार तिथे अवघे पाच टक्के आहेत, तर कृष्णवर्णीय तेरा टक्के. मतांच्या गणिताच्या अनुषंगाने कमलादेवींची निवड 'पोलिटिकली करेक्ट' आहेच, पण त्यापेक्षाही ती मोठी आहे. एकट्या श्यामलनं वाढवलेली ही पोर एवढ्या मोठ्या पदावर जात असताना, अमेरिकेच्या राजकारणाचा खुला अवकाश लक्षात घेतला पाहिजे.
ट्रम्प यांच्यापूर्वीच्या तिन्ही अमेरिकी अध्यक्षांना, म्हणजे, बिल क्लिंटन, धाकटे जॉर्ज बुश आणि बराक ओबामा या तिघांना मुलगा नाही. तिघांनाही मुलीच. आणि, या सर्व मुली आपापल्या आवडीच्या क्षेत्रात, खासगी फर्ममधे वगैरे काम करताहेत. त्यापैकी कोणीही 'सो कॉल्ड' राजकीय वारसा वगैरे चालवत नाही. आणि, मीडियाही तिकडे मालिया ओबामांचं राजकारणात स्थान काय असणार किंवा 'चेल्सी क्लिंटन की साशा ओबामा' असल्या फालतू चर्चा करू शकत नाही.
हेही वाचा : अर्णब घाबरू नकोस, जेएनयू तुझ्या सोबत आहे!
मोदींनी चहा विकला की नाही, ते माहीत नाही. पण 'कॉमन मॅन' ही ओळख त्यांनी विकली आणि म्हणून त्यांना हे यश मिळालं, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण, 'फॅमिली फर्म'प्रमाणे राजकारणाची परिभाषा विकसित करणाऱ्यांना अद्यापही हे पुरेसे समजलेलं दिसत नाही.
कमलादेवींचा प्रवास म्हणून महत्त्वाचा आहे. त्या भारतात असत्या, तर जात-धर्म-वंश-लिंगभेदाच्या पल्याडचा हा अवकाश राजकीय प्रक्रियेत त्यांना मिळाला असता का? हा प्रश्न विचारला म्हणजे अमेरिकेचं वेगळेपण लक्षात येतं.
पन्नाशीला पोहोचल्यावर एका घटस्फोटित मित्राशी लग्न करणारी, स्वतःचं मूलबाळ नसलेली, आई वडिलांच्या नात्याची अशी गोष्ट असलेली, एकच एक अशी 'ओळख' नसलेली, बहुसंख्याकवादाला न जुमानणारी करिअरिस्ट आणि बंडखोर बाई, भारताच्या राजकारणात तर सोडाच, आपल्या एकूण व्यवस्थेतच कुठं असली असती? दूर कशाला, एका घटस्फोटित महिलेला, एका अर्थाने, लग्नापूर्वीच झालेला, बराक ओबामासारखा पोरगा आपल्या देशात नक्की काय होऊ शकला असता?
ही खरी अमेरिका आहे. 'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभर जे सुरू आहे, त्याचं हे सारे पुरावे आहेत. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे, हे आता मी नव्याने मांडत नाही.
थोडा भावच खायचा तर, आमचा ज्ञानेश्वर 'आता विश्वात्मके देवे' सांगत होता, तेव्हा वैश्विकीकरणाचाच काय, खुद्द अमेरिकेचाही जन्म झालेला नव्हता. त्यामुळं, नव्या भारताची गोष्ट तर आणखी बहारदार असणार आहे! असो. त्याविषयी तर नेहमीच बोलतो आपण. बिहारच्या निकालानंतर आणखी बोलू या.
‘आम्ही अमेरिकेचे लोक एक सशक्त देश उभा करू शकतो, हा तुमचा आत्मविश्वास आता जगभर निर्माण होणार आहे!’ हे कमला हॅरिस यांचं विजयी सभेतलं भाषण मला त्या दिशेनं आश्वासक वाटतं. मुख्य म्हणजे, 'बराक ओबामा' नावाचा हरवलेला 'पासवर्ड' जगाला पुन्हा सापडतोय, हीच नवी आशा आहे! 'ऑडॅसिटी ऑफ होप' आहे.
हेही वाचा :
३२ हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा अजेंडा!
अमेरिकन राजकारणाचा किस पाडणारी निवडणूक
हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?
बेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं!
जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी