२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय.
गेल्या ४० वर्षांपासून मी महिलांशी संबंधित विषयांवर आणि गेल्या १५-२० वर्षांपासून शेती आणि पाण्यावर काम करेतय. हे काम करताना माझा सतत सामान्य माणसांशी संबंध येतो. सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे प्रश्न स्वत: समजून घेते. तसंच खूप काही त्यांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय. शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्याची खूपच मारामार आहे. पाण्याचा प्रश्न सर्वच शहरांमधे, घरांमधे आ वासून उभा आहे. तरीही आमचा समाज जलनिरक्षरच आहे.
पाणी हा लहानसा शब्द जग व्यापून टाकणारा, जगातल्या प्रत्येक घटकाशी बांधून ठेवणारा. पण गावातल्याच नाही तर शहरातल्या बाईलाही पाण्यासाठी तीन-तीन, चार-चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. तरी पाण्याचं महत्त्व अद्यापही सामान्यच काय, सुशिक्षितांच्या लक्षात येत नाही. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना घसा फोडून पाण्याविषयी मार्गदर्शन करण्यापेक्षा लेखक म्हणून माध्यमांमधून जर पाण्याचं महत्त्व पटवून दिलं तर ते त्यांच्या पटकन लक्षात येतं. कवितेतून, पथनाट्यातून हा प्रश्न त्यांच्या हृदयाला जाऊन भिडतो.
दिवसेंदवस गंभीर होत असलेली पाण्याची समस्या कशी सोडवता येईल, यावर जगभरात विचारमंथन सुरूय. त्यासाठी जगभरातील पाणीतज्ज्ञांकडे 'जागतिक जलपरिषद' ही पाण्यासंबंधीची विचारव्यवस्था आणि त्यावर कार्य करणारी जागतिक जलसहभाग या दोन एकाच वेळी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आहेत. या दोन्हींच्या उभारणीत भारतातील जलतज्ज्ञ स्टॉकहोम जलपुरस्काराने सन्मानित माधवराव चितळे यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांच्या सोबत महाराष्ट्रात अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये नागपूरची महिला पाणी मंच ही आमची संस्थादेखील आहे.
'महिला पाणी मंच'कडून अनेक वर्षांपासून जलप्रबोधनाचं काम सुरूय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिला पाणी मंचच्या शाखा आहेत. पाण्यासंदर्भात काम करताना मला वारंवार हा प्रश्न छळत होता की कार्यकर्ते आणि सरकारी अधिकारी यांच्याशिवाय या विषयाला कुणाला जोडून घ्यावं?
नेपाळला 'साउथ वॉटर एशिया कॉन्फरन्स'मध्ये एक पेपर सादर करायला गेले होते. डोक्यात केवळ पाणी आणि पाणीच होतं. अचानक काहीतरी क्लिक झालं आणि त्याच पंचतारांकित हॉटेलच्या लॉनवर उभ्यानं लंच घेता घेता माझ्या डोक्यात आलं की आपण जलसाहित्य संमेलन घ्यायचं. झालं. ठरलं. मी जे शोधत होते ते मला सापडलं. या प्रश्नाशी आपण साहित्यिकांना जोडावं. मी स्वत: लेखिका. मला प्रश्न दिसतात म्हणून मी लिहते. मग आपण साहित्यिकांचाच यासाठी उपयोग का करून घेऊ नये?
मी लगेच माधवराव चितळे सरांना माझी कल्पना बोलून दाखविली. त्यांनी ती उचलून धरली आणि मी नागपुरात येताच कामाला लागले. या कामात सगळ्यात आधी मला पाठिंबा दिला मिळाला तो माझे मित्र पाटबंधारे विभागाचे सचिव अशोक जाधव यांचा. दुर्दैवानं आज ते आपल्यात नाहीत. जलसाहित्य संमेलन घेतेय हा विचार मी ज्यांच्या ज्यांच्याजवळ बोलून दाखविला, त्या प्रत्येकानं मला विचारलं, म्हणजे काय? सर्वजण माझ्याकडं प्रश्नांकित नजरेनं बघत होते.
काही लोक मला विचारायचे, 'अरुणाताई, तुमची संकल्पना स्पष्ट आहे ना?' दुसरीकडं काहींनी माझं मनापासून अभिनंदन केलं. कौतुक केलं. त्यांच्या कौतुकाच्या थापेमुळेच मी साऱ्यांना उत्तरं देऊ शकत होते. जलसाहित्य संमेलनाद्वारे मला पाणीप्रश्न घराघरात पोचवायचा होता; पण तो प्रश्न म्हणून नाही, तर लालित्यपूर्णपणे. माध्यमांद्वारे कोणतीही नवीन गोष्ट आपण करू म्हणताच, माध्यमांचं लक्ष आपल्याकडे जातंच.
दूरदर्शन, आकाशवाणी, वर्तमानपत्र साऱ्यांनी पहिल्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाची दखल घेतली. त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला घराघरात पोचवलं. माध्यमांद्वारे जलसाहित्य माणसाच्या काळजापर्यंत पोचलं. आम्ही भारतातल्या साऱ्या जलदूतांनी ८-९ ऑगस्ट २००२ ला नागपुरात पाण्यासंदर्भात नवीन कल्पना, नवीन विचार सांगितला. त्यामुळे सामान्य माणूस साहित्यिक दृष्ट्या जागरूक झाला. याचाच अर्थ जलसाहित्य संमेलनानं सामान्य माणसाची सृजनशक्ती जागी करण्याचं काम केलं.
ज्यांनी ज्यांनी मला वेड्यात काढलं होतं, त्या साऱ्यांना आम्ही ८-९ ऑगस्ट २००२ ला कृतीनं उत्तर दिलं. नानासाहेब म्हणजे राम शेवाळकरांसारख्या लेखकानं भरसंमेलनात जाहीरपणे सांगितलं होतं, 'अरुणानं सामाजिक कार्य करताना अनेकांना सांभाळलं. आता तिच्या हातून असंच कार्य सतत घडत राहावं म्हणून आपण तिला सांभाळण्याची गरज आहे.' एखाद्या कार्यकर्त्याला आणखी काय हवं असतं.
आज सृजनशक्ती लोप पावली आहे. 'यूज ॲण्ड थ्रो'चा जमाना आहे. तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे दुरुस्ती नाहीच. म्हणूनच पाण्यासारख्या गोष्टींकडेही आपण तांत्रिकदृष्ट्याच पाहतो. ही केवळ तांत्रिकता नष्ट व्हावी आणि मंगेश पाडगावकर, ना. धों. महानोर, बा. भ. बोरकर, ग. दि. माडगुळकर, तर थेट आजच्या सदानंद देशमुखांपर्यंत या साऱ्या कवी-लेखकांच्या काव्यदृष्टीनं लोकांनी पाण्याकडे बघावं. ते समजून घ्यावं. त्याचा गरजेपुरता वापर करावा,पाण्याची बचत प्रत्येकानं करावी, आपली जबाबदारी प्रत्येकानं समजून घ्यावी म्हणून ही आमची धडपड.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतालाच माणूस आज कुरतडू पाहत आहे. ही पंचमहाभूतं माणसाच्या शक्तीपेक्षा फारच मोठी आहेत; पण माणसानं यालाच चॅलेंज करायचं ठरवलं. त्याचा परिणाम आज आपण भोगतो आहोत. आजही आपण काहीच केलं नाही तर पुढील पिढी आपल्याला नक्कीच माफ करणार नाही. आपण आपल्या नातवंडांसाठी बंगले, पैसा, गाड्या, सोनं सारं घेऊन ठेवू; पण पाणीच नसेल तर ते जगणार कसं? म्हणूनच आज तरी आपण जागं होण्याची गरज आहे. म्हणूनच आपल्याला क्रांती करायची आहे. आणि या क्रांतीचे अग्रदूत साहित्यिक असणार आहेत. असायला हवे आहेत.
जलसाहित्यातून जलजागृती करणं हाच 'महिला पाणी मंच'चा हेतू आहे. जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचे दर्शन घडवणारे साहित्य म्हणजे जलसाहित्य. साऱ्यांनाच नवी असलेली ही संकल्पना आता हळूहळू रुजू पाहते आहे. नवीन संकल्पना घेऊन आमची पंढरीची वारी मोजक्याच मावळ्यांनिशी अनवाणी पायांनी २००२ मध्ये निघाली होती. पुढे ती नागपुरातून पुणेमार्गे कोकण, नाशिक, नंतर जळगाव, नांदेड अशी फिरत फिरत पुन्हा नागपुरात दाखल झालीय. आणि पुढल्या वर्षी तर चक्क तिला दुबईचं निमंत्रण येऊन पोचलंय, यातच काय ते समजायचं.
मी सुरू केलेलं माझं हे छोटंसं काम; पण त्याची एवढी दखल घेतली जाईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण माध्यमांमधून हे काम एवढं पसरलं की, २००३ च्या तिसऱ्या जागतिक पाणी परिषदेसाठी जपाननं मला खास निमंत्रण देऊन बोलावलं आणि मला २५ मिनिटं त्या स्टेजवरून बोलण्याची संधी दिली. पुढं मी स्वीडन, सिंगापूरच्याही कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. महिला पाणी मंच फक्त संमेलनं घेत नाहीत, तर पाणी बचतीचे अनेक उपक्रम राबवतो.
आम्ही घरकाम करणाऱ्या महिलांची कार्यशाळा घेतो. रोज सकाळी उठून तासतास भटकतो. पाणी वाया घालवणाऱ्या लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न करतो. पाण्याची नासाडी करणाऱ्यांचं शूटिंग करतो. या आमच्या स्टिंग ऑपरेशनच्या कचाट्यात तर एकदा एरिगेशन डिपार्टमेंटचे कार्यकारी अभियंताच सापडले होते. त्यांचं शूटिंग करून त्यांच्या वरिष्ठांकडे पाठवले. त्यांना जो दणका बसायचा तो बसलाच असेल; पण त्या साहेबांनी आमचा राग न करता पुढं ते आमचे सहकारी झाले.
काम करताना अनेक अडचणी येतातच. कुणी म्हणतं, 'तुमच्या काय बापाचं जातं, आमच्याकडे भरपूर पाणी आहे.' कुणी म्हणतं, 'तुम्हाला काय कामधंदे नाहीत काय? चालल्या सकाळी सकाळी आम्हाला शहाणपण शिकवायला. घरात पोरंबाळं नाहीत काय?' हे तर चालणारच. म्हणून आपण काही आपलं काम थांबवायचं नाही. एक मात्र निश्चित. जलसाहित्य संमेलनानं एक वातावरण निर्माण झालं. या चळवळीसोबतच खूप लोक जुळल्या गेलेत आणि आमची ही वारी आता अशीच पुढं जात राहणार आहे, लोकसहभागही वाढणार आहे, आम्ही आमचं काम अधिकाधिक लोकांपर्यंत साहित्यिकांमार्फत पोचवणार आहोत.