कादर खान: झीरोतून हीरो बनलेला लाखमोलाचा माणूस

०१ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


कितीतरी लल्लूपंजू सिनेमावाल्यांना पद्मभूषण देणाऱ्या आपल्या देशाने कादर खानना साधं पद्मश्रीही दिलं नाही. आपण कादर खान यांची कदर कधीच केली नाही. आता त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजल्या वाहायला मात्र गर्दी होईल. तरीही त्यांनी आपल्याला भरभरून दिलं. त्यांच्या स्टोऱ्या, डायलॉग, अभिनय आणि टायमिंगच नाही तर त्यांच्या आयुष्याची स्टोरीही खूप समृद्ध करणारी आहे.

आज कादर खान गेले. खरंच गेले. गेल्या चार वर्षांत बऱ्याचदा त्यांच्या निधनाच्या वायरल अफवा उठल्या. ब्रेकिंग न्यूजच्या हव्यासापायी गेल्या दोन तीन दिवसांतही पुन्हा तेच घडलं. पण आज ते खरंच गेले. सिनेमातल्या कारकीर्दीच्या शेवटी शेवटीपर्यंत आपल्या विनोदी भूमिकांनी लोकांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याच्या मृत्यूचंही असं अनेकदा हसं झालं. हे दुर्दैवच म्हणावं लागेल.

स्ट्रगल कुणाला चुकला नाही

कादर खान यांच्या निधनानंतर अनेकांनी एक हरहुन्नरी अभिनेता, लेखक हरपल्याची प्रतिक्रिया दिली. पण या पलिकडेही आयुष्याला थेट भिडणारा कादर खान हा माणूस म्हणून अधिक भावतो. अधिक समजून घ्यावासा वाटतो. त्याच्याकडून संघर्षाची प्रेरणा घ्यावीशी वाटते.

स्ट्रगल कुणाला चुकला नाही. प्रत्येक जण स्ट्रगल करतोच. किंबहुना आपण करतोय, तो स्ट्रगलच आहे, असं अनेकांना वाटत राहतं. समुद्रकिनारी मोकळ्या आकाशात स्वप्न रंगवणाऱ्या, आवाज नाकारल्याने हताश झालेल्या, रस्त्यावर झोपलेल्या, सुलभ शौचालयात आंघोळ केलेल्या, वडापाव खाल्लेल्या सेलब्रिटींच्या 'स्ट्रगल स्टोऱ्या' आपण आजवर ऐकलेल्या आहेत. पण कादर खान या माणसाच्या आयुष्याची गोष्टच पार वेगळी आहे. या माणसाचा स्ट्रगल सुरु झाला तो अगदी त्याच्या जन्मापासूनच. हा स्ट्रगल होता, जगण्यासाठीचा.

खानच पण कामाठीपुऱ्यात घडलेला

कादर खान यांचे आई, वडील अफगाणिस्तानात काबूलजवळ राहायचे. कादर यांच्या आधीची तीनही मुलं एकापाठोपाठ एक वयाच्या आठव्या वर्षीच वारली. त्यामुळे कादर खान यांच्या जन्मानंतर त्यांच्या आईला मुलाची विलक्षण काळजी वाटू लागली. तेव्हा त्यांच्या आईने छोट्या कादरला मुंबईत घेऊन येण्याचा निर्णय घेतला.

कामाठीपुरातील वस्तीत संसार थाटला. मात्र, गरिबी इतकी होती की जगण्याच्या संघर्षाने कादर यांच्या आई वडिलांमध्ये तलाक झाला. या संघर्षपुत्राच्या आयुष्यात बसलेला हा पहिला धक्का. आईचं बळजबरी दुसरं लग्न लावून देण्यात आलं. एक आई आणि दोन बाप अशा त्रिकोणी पालकत्वाच्या छायेत हा लहानगा जीव अक्षरशः घुसमटला.

आईने दिला गरिबी दूर करण्याचा मंत्र

आईच्या दुसऱ्या लग्नानंतरही घरातून गरिबी आणि दारिद्र्य काही गेलं नाही. आजूबाजूची पोरं पत्र्याच्या कारखान्यात तीन रुपये रोजंदारीवर काम करायला जायची. छोट्या कादरपुढेही त्यावेळी हाच पर्याय होता. नोकरी करुन घर खर्चाला हातभार लावायचा निर्धार त्यांनी केला. पण नियतीचा डाव काही वेगळा होता. कादर तीन मजली इमारतीच्या जिन्यावरून सरसर जिने उतरु लागले, तोच एक हात त्यांच्या खांद्यावर पडला. हा हात होता, त्यांच्या वालिदाचा म्हणजेच आईचा.

आई म्हणाली, मला माहितेय तू कुठे चाललायस. या पोरांसोबत आज तूही अडीच तीन रुपयांच्या मागे चाललायस. पण लक्षात ठेव ही कमाई आयुष्यभर तितकीच राहील. या घराची गरिबी तुला कायमची घालवायची असेल, तर त्यासाठी एकच मार्ग आहे. शिक. पढ. आईने 'पढ' हा इवलासा शब्द इतका काही जीव ओतून उच्चारला, की तो छोट्या कादरच्या डोक्यापासून पायापर्यंत भिनला. आणि तेव्हापासून कादर यांनी शिक्षणाची कास धरली.

जोगेश्वरीच्या इस्माईल युसूफ कॉलेजमधे शिकले. पुढे इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. प्रोफेसरही झाले. हा प्रसंग कादर यांनी त्यांच्या बऱ्याच मुलाखतींमधून अगदी रडत रडत सांगितलाय. आजही अनेकजण या प्रसंगात स्वतःची स्टोरी शोधताना दिसतात. 

नाटकातली एंट्रीही तितकीच संघर्षाची

कादर खान यांच्या रंगभूमीवरील पदार्पणाची गोष्टही मोठी रंजक आहे. आईच्या नकळत ते घराजवळच्या एका कब्रस्तानात जाऊन नकला करत बसायचे. एकदा एका नाटक कंपनीच्या माणसाने त्यांना बघितलं. आणि त्याने कादर खान यांना आपल्या नाटकात घेतलं. कुठलाही अनुभव गाठीशी नसताना कादर खान रंगभूमीवर आले.

घरात भयंकर दारिद्र्य अनुभवणाऱ्या या मुलाने 'मामक अजरा' नावाच्या या नाटकात राजपुत्राची भूमिका साकारली. आपल्या पहिल्या-वहिल्या नाटकात कादर खान यांनी अशी काही छाप पाडली, की नाटक बघायला आलेल्या एका माणसाने तर कादर यांना शंभराच्या दोन नोटा दिल्या. या नोटा खर्च करु नकोस. याच नोटा भविष्यात कितीतरी पटीने वाढणार आहेत, असंही बजावले. कादर यांनीही अनेक महिने त्या नोटा जीवापाड जपून ठेवल्या. मात्र, गरिबीचे फास काही केल्या सैल्य होत नव्हते. त्यामुळे बक्षिसाचे दोनशे रुपयेही ते फार काळ सांभाळून ठेऊ शकले नाहीत.

आईच्या जाण्याची चटका लावणारी कहाणी

कादर खान यांच्या आयुष्यात आईचं स्थान मोठं होतं. त्यांनी सिनेमाच्या अनेक पटकथांमधून आई विषयीचं दु:ख मांडलं. या दु:खालाही स्वतःच्या आयुष्यात आलेल्या कटू अनुभवाची जोड होती. ज्या दिवशी, आई गेली हे सांगायला त्यांनी नातलगांना फोन केला, तेव्हाही त्यांच्या पदरी निराशाच आली.

फोनवर नातलगांनी सांगितलं, ‘हवं त्या गोष्टीची मजामस्करी कर पण आईच्या मृत्यूची मस्करी करु नकोस.’ आईच्या निधनाची तारीख १ एप्रिल असल्याने कुणीच विनोदी स्वभावाच्या कादरवर विश्वासच ठेवेना. पण याच्याआधी या पोराने काय पाहिलं होतं, याची पुसटशी कल्पनाही फोनच्या पलिकडच्या माणसाला नसावी.

कादर खान कुठल्याशा राज्यस्तरीय नाटकाच्या स्पर्धेहून घरी परतले होते. घरी येऊन बघतात, तर घर रक्ताच्या उलट्यांनी भरलं होतं. आई त्यातच पडलेली होती. कादर खान यांनी धावत जाऊन डॉक्टरांना गाठलं. घरी येण्याची विनंती केली. डॉक्टरांनी घरी येण्यास नकार दिला. तेव्हा सिनेमातल्या अँग्री यंग मॅन सारखं त्यांनी डॉक्टरला स्वतःच्या खांद्यावर टाकून घरी आणलं आणि निपचित पडलेल्या आईसमोर ठेवलं. तोवर आईचा मृत्यू झाला होता. हा एखाद्या सिनेमाचा सीन आहे, असं कुणालाही वाटेल. पण पडद्यावर अशा अनेक प्रसंगांना लिलया साकारणाऱ्या या अभिनेत्याने खऱ्या आयुष्यात हे सगळं भोगलं होतं.

हातात पहिल्यांदाच आले पंधराशे रुपये

कादर खान यांनी पुष्कळ 'स्टारडम' अनुभवलं. अगदी बॉलिवूडमध्ये येण्याआधीपासून त्यांनी ते स्टारडम जगलं. कॉलेजात शिकताना आणि शिकवतानादेखील त्यांची लोकप्रियता अफाट होती. जोगेश्वरीच्या इस्माईल युसूफ कॉलेजात ते शिकले. तर भायखळाच्या साबू सिद्दीकी कॉलेजात त्यांनी शिकवलं. नाटकातल्या दमदार कामगिरीमुळे ते दोन्ही भूमिकांमध्ये लोकप्रियच राहिले.

कादर खान यांनी लिहिलेली अनेक नाटकं मुंबईतील कॉलेजांत गाजली. त्या काळात कादर खान यांची प्रसिद्धी इतकी होती, की पोरं कॉलेजबाहेर केवळ कादर खान यांना बघायला गर्दी करायचे. त्यांची सही मागायचे. याच काळातला एक प्रसंग आहे.

एका राष्ट्रीय स्तरावरच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत कादर खान यांचं 'लोकल ट्रेन' नावाचं नाटक सादर झालं. त्या स्पर्धेतली जवळपास सगळी बक्षिसं कादर खान यांच्या झोळीत गेली. लेखकापासून अभिनेत्यापर्यंत सगळीच. यामुळे एका दिवसात कादर खान यांनी रोख रक्कम म्हणून १५०० रुपये कमावले. कामाठीपुरातल्या दारिद्र्याने वेढलेल्या चाळीतल्या त्या पोराने त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा पंधराशे रुपये बघितले.

आणि सुरू झालं कादर खान पर्व

त्यावेळी प्राध्यापकी करुन त्यांना दरमहा ३०० रुपये पगार मिळायचा. म्हणजेच पाच महिन्यांचा पगार एकाचवेळी हातात आल्याचा तो आनंद. इथूनच कादर खान यांची गाडी सिनेमाकडे वळली. नरेंद्र बेदी यांनी कादर खान यांना सिनेमासाठी संवाद लेखनाची ऑफर दिली. कादर खान यांनी या संधीचं सोनं केलं आणि बॉलिवूडमध्ये एक नवं पर्व सुरु झालं. कादर खान पर्व.

मनमोहन देसाई 'रोटी' सिनेमावर काम करत होते. मात्र संवाद लेखकाचा शोध काही संपत नव्हता. निर्माते हबीब नाडियाडवाला कादर खान यांना मनमोहन देसाईंकडे घेऊन गेले. मात्र आधीच वैतागलेल्या मनमोहन देसाईंनी, कादर यांचं काम न पाहताच आम्हाला दुसरा लेखक सापडलाय, असं सांगून त्यांना टाळलं.

मगर कम्बख्त पेट मत दे

अखेर त्यांनी कादर खान यांना थेट तोंडावर सांगितलं, ‘हे बघ मला जर तू लिहिलेले संवाद आवडले, तरच मी ते घेईन, नाहीतर फाडून फेकून देईन.’ इतकं ऐकल्यानंतरही, कादर खान यांनी प्रतिप्रश्न केला. ‘तुम्ही आवडलं नाही, तर फाडून फेकून द्याल हे ठीक आहे, पण आवडलं तर काय कराल?’ यावर देसाई म्हणाले, ‘तुला डोक्यावर घेऊन नाचेन.’

देसाईंनी कादर खान यांना 'रोटी' सिनेमाच्या अखेरच्या सीनचे डायलॉग लिहिण्यास सांगितले आणि पुढे जे काही कादर खान यांनी लिहिलं, तो इतिहास झाला. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या मंगलच्या म्हणजेच राजेश खन्नाच्या तोंडून आलेल्या, ‘इन्सान को दिल दे, दिमाग दे, जिस्म दे, मगर कम्बख्त पेट मत दे. उसे पेट देता है. तो उसे भूख मत दे. उसे भूख देता है, तो दो वख्त के रोटी का इंतजाम कर के भेज. वरना तुझे इंसान को पैदा करने का कोई हक नही है.' या डायलॉगने प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला.

आजही बॉलिवूडच्या सर्वोत्तम डायलॉग्सची यादी काढण्यासाठी तुम्ही गुगल बाबाकडे गेलात तर तो तुमचा शोध या डायलॉगपाशी आणून ठेवेल. ही ताकद कादर खान यांच्यातल्या लेखकाची आहे. जी केवळ पुस्तकी नाही, तिला वास्तवातल्या अनुभवाची जोड आहे.

कादर यांच्या आईचं बळजबरीने दुसरं लग्न लावून दिलं गेलं. मात्र सावत्र वडील काही कमवत नव्हते. ते छोट्या कादरला आपल्या सख्ख्या बापाकडे पैसे आणायला पाठवत. कामाठीपुरापासून खडकपर्यंत पायपीठ करत कादर वडिलांकडे पैसे मागायला जायचे. दोन रुपये घेऊन पुन्हा घरी येत. त्या दोन रुपयांत अख्खं कुटुंब जेवत असे. आठवड्याला केवळ तीन दिवस जेऊ शकणारा हा पोरगा पुढे लेखक झाला, तेव्हा भूक विसरला नाही. विसरु शकला नाही. म्हणूनच त्याच्या संवादांमध्ये ती जिवंत राहिली आणि कामातही.

मरता मरता जगलेला माणूस

आठव्या वर्षी जो पोरगा मरेल अशी भीती वाटत होती, तो ८१ वर्ष जगला. नुसता जगला नाही, जगण्याचं सोनं केलं. आपल्या जाण्याने अनेकांच्या मनात हळहळ राहील, असं आनंददायी काम केलं. पोकळी निर्माण होईल, असं भरीव योगदान दिलं. ३०० हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका, अडीचशेहून अधिक सिनेमांसाठी त्यांनी केलेलं संवाद लेखन, हे सगळं खरंतर कादर खान किती मोठे होते, हे सांगायला पुरेसं आहे.

कुणाला कुठल्या भूमिकेसाठी ते आठवतील, हे सांगणंही कठीण आहे. कारण एकाहून एक सरस भूमिका त्यांनी पाडद्यावर साकारल्या. त्यांची प्रतिभा इतकी विशाल आहे, की जगण्यातला हा स्ट्रगल त्यातून वजा केला तरीही ती किंचितही कमी होणार नाही. पण, कादर खान या माणसाने ज्या शून्यातून हे सगळं उभं केलं. तो शून्य त्यांच्या पश्चात महत्वाचा आहे. त्या शून्याला लाख मोलाची किंमत आहे. ती समजून घ्यायला हवी.