गंगेच्या काठावर वसलेल्या गोऱ्या रंगाच्या आर्यांनी मांडलेला धर्म तेवढाच हिंदू धर्म नाही. तसंच संस्कृतमधून लिहिल्या गेलेल्या वेद-पुराणासारख्या ब्राह्मणांच्या ग्रंथात मांडलेला धर्म म्हणजेच हिंदू धर्म नाही. हिंदू धर्म हा त्यापलिकडं असून, त्याचं नितांतसुंदर दर्शन 'कांतारा' या सिनेमामधून होतं, असं मत पुराणकथांचे अभ्यासक आणि मॅनेजमेंट गुरू देवदत्त पट्टनाईक यांनी मांडलंय.
ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' सुपरडुपर हिट ठरलाय. ३० सप्टेंबरला पडद्यावर आलेल्या या सिनेमानं ४० दिवसात, 'उरी'चाही रेकॉर्ड मोडलाय. एकीकडे बॉलीवूडचे सिनेमे एकापाठोपाठ फ्लॉप जात असताना, कांताराच्या सर्वच भाषातल्या वर्जननी चांगली कमाई केलीय. हिंदीतल्या कांताराने जवळपास ६३ कोटींच्यावर गल्ला जमवलाय. एवढं यश मिळालेल्या 'कांतारा'चं खरं कौतुक होतंय, ते भन्नाट कथानकांबद्दल.
जंगलावर राज्य कोणाचं? या प्रश्नाचं उत्तर शोधताना शहरीकरण, धर्म, तत्वज्ञान, हिंसा, माणूस आणि निसर्ग यातलं नातं अशा विविध विषयांवर या सिनेमानं थेट बोट ठेवलंय. दक्षिण कर्नाटकातल्या तुळू भाषक भागातल्या लोककथेचा आधार घेत हा संपूर्ण सिनेमा उभा राहतो. वेद-पुराणांपासून कैक योजने दूर असलेल्या या संस्कृतीचं, निसर्गाबद्दलच्या त्यांच्या धारणांचं चित्तवेधक दर्शन या सिनेमानं घडवलंय.
भारतीय लोकसंस्कृतीचा हा पैलू हिंदू धर्मातल्या संकल्पनांचा परीघ किती विस्तृत आहे, हे ठामपणे सांगतो. या साऱ्याबद्दल पुराणकथांचे अभ्यासक देवदत्त पट्टनाइक यांनी १२ ट्विट्सची मालिका लिहिलीय. आज चुकीच्या पद्धतीने शिकवली जाणारी धर्म ही संकल्पना समजून घेण्यासाठी ही ट्विटर थ्रेड प्रत्येकानं अभ्यासावी अशीच आहे. या ट्विट्सचं मराठीतलं भाषांतर देत आहोत.
१. कांतारा म्हणजे पवित्र जंगल. या जंगलाची गोष्ट सांगणाऱ्या 'कांतारा' या सिनेमाबद्दल माझ्या ट्विट्सची ही मालिका.
२. मी मुंबईत २००८ मधे स्वतःचं घर घेतलं. तेव्हापासूनच माझ्या घराच्या रक्षणार्थ दक्षिण कर्नाटकातल्या देवाची अष्टधातूची मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. तुम्हाला ही मूर्ती ओळखता येईल, कारण आज सुपरहिट ठरलेल्या 'कांतारा' सिनेमातल्या देवाची ती मूर्ती आहे.
३. कांतारा या सिनेमामुळे अनेकांना पहिल्यांदाच तुळूनाडूमधल्या निसर्गाची प्रतीकं असलेल्या देवांबद्दल कळलं. आमच्या शेजारी असलेल्या शेट्टी काकांच्या यक्षगानावरच्या प्रेमामुळं मला ते आधीपासून माहिती होतं.
४. मी हे कायमच मांडायचा प्रयत्न केलाय की, हिंदू पुराणकधा या फक्त रामायण, महाभारत आणि संस्कृत ग्रथांमधे नाहीत. त्या अनेक गावागावात, खेड्यात असलेल्या लोकदेवतांमधेही आहेत. भूत कोला या प्रथेबद्दल मी २०१७मधे लिहिलेल्या लेखाची ही लिंक https://devdutt.com/articles/tulu-nadus-bhootas/
५. कांतारा हा सिनेमा दक्षिण कर्नाटकातला, विशेषतः तुळुनाडूमधलं त्यांचं सांस्कृतिक सत्य सांगतो, मिथक मांडतो. या सिनेमामुळे हिंदू धर्माबद्दलच्या आपल्या आकलनाच्या कक्षा रुंदावतात. राजकीय स्वार्थासाठी गळा घोटलेल्या लोककथांमधल्या वास्तवाला या सिनेमाने जगापुढं आणलं आहे.
हेही वाचा: आपली भूमिका इतिहासाची दिशा ठरवणार आहे
६. आजवर हेच लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे की, हिंदू असणं म्हणजे गंगेच्या काठावर वससेल्या गोऱ्या रंगाच्या आर्यांनी सांगितल्याप्रमाणे जगणं होय. तसंच हेही सांगितलं गेलंय की, वेद-पुराणांसारख्या संस्कृत ग्रंथातले ब्राह्मण जे सांगतात तोच हिंदू धर्म. पण, 'कांतारा' त्यापलिकडचं सत्य सांगतो.
७. राजेमहाराजांनी बांधलेल्या भव्यदिव्य देवळांमधे देव राहतो आणि या देवळात 'अपवित्र' मानलं गेलेल्यांनी येऊ नये, असंच कायम सांगण्यात आलंय. पण, 'कांतारा' त्यापलिकडचं सत्य सांगतो.
८. खालच्या जातीतल्या लोकांमुळे अपवित्र झालेलं घर शुद्ध करण्यासाठी गोमूत्र वापरावं असं हिंदू धर्म शिकवतो, हे जगाला सांगण्यात आलंय. पण, 'कांतारा' त्यापलिकडचं सत्य सांगतो.
९. हिंदू धर्म हा शाकाहारी असणाऱ्यांचा धर्म आहे, मासे आणि मांस खाणारे धार्मिक नाहीत, असा जगभर प्रचार होतोय. पण, 'कांतारा' त्यापलिकडचं सत्य सांगतो.
१०. मुस्लिमांना हिंदूंच्या सणांमधे स्थान नाही. तसंच फटाके फोडणंही हिंदू धर्माला मान्य नाही, असं कायम सांगितलं गेलंय. पण, 'कांतारा' त्यापलिकडचं सत्य सांगतो.
११. जंगलातल्या साध्याभोळ्या माणसांकडून जमिनी हिसकावून घेण्याची 'चाणक्यनिती' हिंदुधर्माचा भाग आहे, असं जगाला ओरडून सांगितलं गेलंय. पण, 'कांतारा' त्यापलिकडचं सत्य सांगतो.
१२. या सिनेमाचा सर्वात भारी भाग हा आहे की, हा सिनेमा स्वतःला 'लेजंड' असं म्हणवून घेतो. जी एक राजकीय धारणा आहे, जी सांस्कृतिक आणि अध्यात्मिक भाष्य करणाऱ्या मिथकाच्या पलिकडची आहे. पण ही धारणाही मिथकाप्रमाणेच तर्क, पुरावा यांची चिंता करत नाही. तसंच इतिहास लिहिण्याचाही त्यात कोणताही हेतू नसतो.
हेही वाचा:
ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?