सुदानमधे प्रचंड हिंसाचार चाललाय. खरं तर, सुदानचा इतिहास हा कायमच रक्तरंजित राहिलाय. फाळणीनंतर दोन देश होऊनही, तिथल्या जमिनीतल्या सोन्यासाठी, इंधनासाठी आणि निसर्गसंपदेवरच्या ताब्यासाठी नाईलमधून प्रचंड रक्त वाहिलंय. या गदारोळात अनेक भारतीय तिथं अडकलेत. त्यांना सोडवून आणलं जात असलं, तरी ते तिकडं काय करत होते? सुदानमधे काय घडतंय? हे समजून घ्यायला हवं.
सुदान हा उत्तर आफ्रिकेतला एक महत्त्वाचा देश. संपूर्ण मानवजातीची सुरवात ज्या सुपीक नाईल नदीच्या खोऱ्यात झाली ती नाईल सुदानमधून वाहते. अशा सुदानचाच नाही तर आफ्रिकन खंडाचा इतिहास हा जगाच्या इतिहासाचा पाया आहे.
युरोपीय व्यापाऱ्यांनी आफ्रिकेतली संपत्ती लुटण्यासाठी आणि इथल्या लोकांना गुलाम करण्यासाठी केलेल्या रक्तरंजित वसाहतवादाचे परिणाम त्यांना आजही भोगावे लागतायत. सुदानचा इतिहासही असाच आहे. आधी इजिप्त आणि इंग्रजांनी सुदानमधल्या प्रचंड साधनसंपत्तीची लूट केलीय.
या सगळ्याने गरीब देशांमधे एक असलेल्या सुदानमधे आजही सोन्याच्या मोठमोठ्या खाणी आहेत. तिथल्या जमीनीत तेलाचे साठे आहेत. या सगळ्यावर आजही अनेकांचा डोळा आहे. एकीकडे वाळवंट आणि दुसरीकडे नाईल अशी परिस्थिती असलेल्या या सुदानी संघर्षात अनेक गुंतागुंतीचे पदर आहेत. त्यात भारतासह अनेक देशातले लोक अडकलेत.
सुदानच्या राजकारणात जे घडतंय ते फक्त राजकीय नाट्य नाही. म्हणायला तिथल्या लष्कर आणि निमलष्कर यांच्यात संघर्ष सुरु आहे. पण यामागे तिथल्या सोन्याच्या खाणींवर, खनिज तेलावर आणि साधनसंपत्तीवर ताबा मिळवण्यासाठीची ही लढाई आहे. तिथल्या जमिनीवर, नाईलच्या पाण्यावर ज्याची सत्ता त्याच्या हातात खजिना, अशी तिथली रचना आहे.
ही सत्ता राखण्यासाठी गेली कितीतरी वर्षं संघर्ष सुरु आहे. १९५६ला ब्रिटिश आणि इजिप्तच्या नियंत्रणाखालून सुदान मुक्त झाला. पण तेव्हापासून सतत तिथं सत्तेवरून गटातटांच्या लढाया सुरु आहेत. १९७२ला उत्तर आणि दक्षिण सुदानमधे करार होऊन हे नागरी युद्ध थांबलं. जवळपास सोळा-सतरा वर्षाच्या संघर्षात पाच लाखाहून अधिक माणसं मारली गेली.
पुढे १९७३मधे सुदानमधे तेलाचे साठे सापडले आणि अमेरिकेसह जगाची गुंतवणूक सुदानमधे येऊ लागली. त्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि जनतेच्या वाट्याला महागाईचे आणि गरीबीचे भोगच आले. त्यात मुस्लिम ब्रदरहूडचा प्रभाव वाढू लागला. पुन्हा गृहयुद्ध पेटलं. १९८३ला सुरु झालेेलं हे युद्ध २००५पर्यंत म्हणजे २२ वर्षं चाललं. त्यात २५ लाखाहून अधिक जण मृत्युमुखी पडले.
हेही वाचा: ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका
२००५मधे शांती करार होऊन युद्ध थांबलं पण शांती प्रस्थापित झाली नाही. आर्थिक बोंब, बेरोजगारी, कुपोषण या सगळ्याच्या सोबतीला धार्मिक आणि वांशिक संघर्ष सुरुच राहिला. अखेर दक्षिण सुदानमधे सार्वमत घेतलं गेलं आणि २०११ साली दक्षिण सुदान फाळणी होऊन स्वतंत्र देश झाला. तरीही सुदानमधल्या अरब आणि अरब नसलेल्या समुदायांमधे संघर्ष सुरु असून डारफूर हा भाग त्याच्या केंद्रस्थानी आहे.
सुदान लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्स हे निमलष्कर यांच्यात हा संघर्ष सुरु आहे. या संघर्षात गेल्या काही दिवसांमधे आतापर्यंत ४००हून अधिक जण मरण पावलेत. लष्करप्रमुख अब्देल बुऱ्हाण आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेसचे प्रमुख मोहम्मद दगालो यांच्यात हा संघर्ष सुरु असला, तरीही यात सुदानच्या नैसर्गिक संपत्तीववर वर्चस्व मिळवण्यासाठीचा संघर्षच ठळक आहे.
तेल हा पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेतल्या अनेक देशांमधला तणावाचा मुद्दा कायमच राहिलाय. पण सुदानची सुदान आणि दक्षिण सुदान अशी फाळणी झाल्यापासून तेलाच्या खाणी दक्षिण सुदानमधे गेल्या. पण तेलविक्रीचा मार्ग आणि बंदरे सुदानमधेच आहेत. त्या व्यापारावरच्या नियंत्रणातून हा संघर्ष आता इरेला पेटलाय.
अशा या सुदानमधे जगभरातले अनेक जण कामासाठी आलेे आहेत. सुदानची राजधानी खार्तूम आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात भारतीय आहेत. त्यांची संख्या तीन ते चार हजारच्या आसपास असावी, असा एक अंदाज आहे.
कर्नाटकातल्या हक्कीपिक्की या आदिवासी जमातीेचे सर्वाधिक लोक सुदानमधे अडकले आहेत. हक्की म्हणजे पक्षी आणि पक्की म्हणजे पकडणारे. पक्षी पकडणारी ही आदिवासी जमात ही जडीबुटीच्या औषध निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. १९७०नंतर भारतात शिकारीवर आलेल्या बंदीमुळे ही आदिवासी जमात जंगलातून बाहेर पडली. जंगली सामग्रीवर प्रक्रिया करून औषधे बनवण्याचं पारंपरिक ज्ञान त्यांच्याकडे होतं.
त्याचा वापर करून ते औषधे बनवायचे. त्यांच्या या औषधांना मागणीही असायची. त्यांच्या या औषधांना आणि मसाज ऑईलना गेल्या दोन दशकात दुबई आणि आफ्रिकन देशात मागणी वाढली. त्यामुळे हा मोठा समाज सुदानमधेही आहे. यांच्यासोबत सुदानमधे ओएनजीसी, भेल, टीसीआयएल, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, बजाज ऑटो यांसारख्या कंपन्या कार्यरत आहेत.
तसंच भारतातल्या अपोलो, एमआयओटी, नारायण हृदयालयासारखी वैद्यकीय सुविधा देणाऱ्या संस्थाही सुदानमधे आहेत. तसंच भारतातले काही विद्यार्थी आणि एनजीओचे कार्यकर्तेही सुदानमधे आहेत. या सगळ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन कावेरी सुरु केलंय.
हेही वाचा: ट्रम्प हरलेत, ट्रम्पवाद अमेरिकेत बोकाळलेला आहेच
सुदानमधे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भारताने आखलेल्या मोहिमेला नाव देण्यात आलंय, ऑपरेशन कावेरी. नद्या या विविध अडथळ्यातून वाट काढत समुद्रापर्यंत पोहचतात, तसंच देशाबाहेरच्या नागरिकांच्या सुटकेसाठी आखलेल्या मोहिमांना बऱ्याचदा संबंधित नदीचं नाव दिलं जातं. कावेरी नदीशी कर्नाटक आणि तमिळनाडूतल्या लोकांशी भावनिक नातं आहे. म्हणून या ऑपरेशनला कावेरी असं नाव देण्यात आलंय.
या मोहिमेसाठी भारताला सर्वात मोठी मदत होतेय ती सौदी अरेबियाची. सौदी अरब आणि भारत यांच्यातल्या चांगल्या संबंधांमुळे सौदीने सुदानमधून येणाऱ्या भारतीयांसाठी आपलं विमानतळ खुलं केलं आणि शेकडो जीव वाचवता आले. भारतीय परराष्ट्र खात्याच्या मुत्सद्देगिरीला मिळालेलं हे मोठं यश असल्याचं सांगितलं जातंय.
सुदानमधून लाल समुद्र ओलांडल्यानंतर सौदीतलं प्रसिद्ध जेद्दा शहर लागतं. याच जेद्दा पोर्टवर सुदानमधून भारतीयांना आणलं जातंय. सुदानमधल्या भारतीय दुतावासात आणि सौदीतल्या दुतावासात समन्वय साधून हे ऑपरेशन पार पाडलं जातंय. खरं तर अशा आपत्कालीन परिस्थितीत जगभर असलेल्या भारतीयांसाठी भविष्यात काय व्यवस्था असावी लागेल, याचा पुन्हा एक अनुभव या निमित्तानं भारताला मिळालाय.
१९८९मधे ओमर अल-बशीर याच्या हातात सत्ता जाऊन तिथे हुकमशाहीचा नवा अध्याय लिहिला गेला. याच बशीरला मानवी हक्कांची पायमल्ली आणि नरसंहाराबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दोषी ठरवल्याने २०१९मधे सत्ता सोडावी लागली. त्यापाठी लोकशाही नांदावी म्हणून पाश्चिमात्य देशांनीही बळ देण्याचा प्रयत्न केला. पण तिथल्या गटातटांमुळे अजूनही लोकशाही काही रुजलीच नाही.
पुढे लष्करप्रमुख अब्देल बुऱ्हाण याच्या नेतृत्वाखाली लष्करी परिषद नेमून सत्ता स्थापन करण्यात आली. पण त्याचाच भाग असलेल्या रॅपिड ऍक्शन फोर्सचा प्रमुख मोहम्मद दागालो यांच्यात अंतर्गत सत्तासंघर्ष पुन्हा पेटला असून, दोघांनाही आपापलं वर्चस्व सिद्ध करायचंय. वाट्टेल त्या मार्गाने त्यांना सुदानवर सत्ता हवीय.
सुदानमधल्या सोन्यासह खनिजाच्या खाणी, नाईलच्या समृद्ध पाण्यावर होणारी शेती आणि इतर साधनसंपत्तीचा लाभ सगळ्यांना हवाय. पण देशातल्या लोकांचे प्रश्न आणि त्यांच्या होणाऱ्या भीषण हालअपेष्टांकडे कुणाचंच लक्ष नाही. हुकुमशहा आणि लष्कराच्या संगनमताने, लोकशाहीचं कसं भजं होऊ शकतं याचं उदाहरण आज सुदाननं घालून दिलंय.
राज्यघटना आणि लोकशाही यांच्या ताकदीवर उभं असलेल्या स्वातंत्र्याची किंमत प्रत्येक लोकशाहीवादी देशानं समजून घ्यायला हवी. आज लोकशाहीच्या ताकदीवरच भारतानं ऑपरेशन कावेरी यशस्वी करून, सुदानमधे अडकलेल्या देशवासियांना पुन्हा मायदेशी आणलंय. त्यामुळे हुकुमशहा आणि लष्करी सत्तेच्या प्रेमात असणाऱ्या सर्वांनीच सुदानची परिस्थिती नीट समजून घ्यायला हवी.
हेही वाचा:
कुणालाही न उलगडलेले मिखाईल गोर्बाचेव
हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?