आपण कवी प्रदीपना विसरून चालणार नाही

०७ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


ऐ मेरे वतन के लोगो, दूर हटो ये दुनियांवालो हिंदुस्तान हमारा हैं, दे दी हमें आजादी बिना खङ्ग बिना ढाल, या गाण्यांशिवाय ना १५ ऑगस्ट साजरा होत, ना २६ जानेवारी. ही गाणी लिहिणारे कवी प्रदीप यांचा आज जन्मदिन. ते स्वतः स्वातंत्र्यसैनिक असल्याने त्यांनी देशभक्तीची गाणी लिहिलीच. पण तितक्याच ताकदीने प्रेमगीत, भजनंही लिहित राहिले.

विलेपार्ले स्टेशनच्या पश्चिमेला आलं की जवळच एसव्ही रोड लागतो. हा भाग तसा वर्दळीचाच. कवी प्रदीप यांचा बंगला कुठंय असं विचारलं की माणसं प्रश्नार्थक नजरेने पाहतात. ६ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने काही कार्यक्रम असेल, असं शोधत जाताना हिरमोड होतो. नव्या पिढीला तर त्यांची माहितीही नाही. आपल्याला एखाद्या वयस्कर माणसाला पकडावं लागतं.

सोनीमोनी दुकानाच्या समोर कवी प्रदीप यांच्या नावाचा चौक लागतो. तिथं आसपास विचारावं लागतं. ऐ मेरे वतन के लोगो गाणं लिहिणाऱ्या कवी प्रदीप यांचा बंगला कुठंय असं विचारलं की, मग माणसं थेट बंगल्याकडे बोट दाखवतात. पंचामृत नावाचा हा छोटेखानी बंगला खरंतर एका काळाचा वारसा आहे.

त्यांच्या आठवणी तिथं छान जपून ठेवल्यात. पण प्रदीप यांच्या जन्मदिनाची कोणतीही लगबग नसते. घरात फक्त नोकरमाणसं असतात. त्यांना त्याविषयी काहीच माहीत नसतं. ती सांगतात, प्रदीप यांची मुलगी दुपारहून येईल. तेव्हा या. खरंतर अशा कोणत्या बंगल्यात प्रदीप यांच्या स्मृती शोधणं फारसं कामाचं नसतंच. कारण त्या त्यांच्या गाण्यांत शोधायला हव्यात. आजही त्यांची गाणी भारतीयांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला त्यांच्या कवितांनी स्फूर्ती दिलीय. लोकांना बांधून ठेवलंय. या योगदानाने त्यांना राष्ट्रकवी लोककवी बनवलंय.

कवी घडवणारं अलाहाबादचं दारागंज

कवी प्रदीप यांनी देशप्रेम आणि देशभक्तीला आपल्या शब्दांमधे कैद केलं. त्यांनी लिहिलेली गाणी ही तमाम भारतीयांच्या मनाला कायम रुंजी घालणारी ठरली. अनेक गाणी तर अजरामर झाली. ए मेरे वतन के लोगो सारख्या गाण्यांनी तर हेलावून सोडलं. देशभक्तीपर गीतांचा बेताज बादशहा अशी ओळख त्यांनी अल्पावधीतच मिळवली. फिल्मी जगतात एक अढळ स्थान निर्माण केलं. सिनेमासारखं व्यावसायिक क्षेत्र असूनही त्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे गाणी लिहिली. तडजोडी केल्या नाहीत.

कवी प्रदीप यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ मधे मध्यप्रदेशातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच मूळ नाव हे रामचंद नारायण द्विवेदी होतं. त्यांचं सातवीपर्यंतचं शिक्षण हे इंदूरच्या शिवाजीराव हायस्कूलमधे झालं. त्यानंतर अलाहाबादच्या दारागंज इथं ते पुढच्या शिक्षणासाठी गेले आणि तिथंच घडले.

त्या काळात दारागंज हा हिंदी साहित्याचा गड म्हणून ओळखला जायचा. १९३४-१९३५ हा अलाहाबादमधला त्यांचा काळ त्यांना साहित्यिक दृष्टीकोनातून विचार करायला लावणारा होता. त्यातून हिंदी साहित्याविषयी त्यांना अधिक गोडी निर्माण झाली. लखनौ विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यावर त्यांनी शिक्षक बनण्यासाठीचा कोर्स केला. त्याच काळात त्यांना हिंदी काव्य वाचन आणि लेखनाची आवड निर्माण झाली.

फिल्म इंडस्ट्रीत संधी कशी मिळाली

शिक्षक बनण्याचा विचार करत असताना मुंबईत आयोजित एका कवी संमेलनात भाग घेण्याचं निमंत्रण त्यांना मिळालं. हाच त्यांच्या आय़ुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. त्यांच्या कविता ऐकून त्या वेळच्या बॉम्बे टॉकीज स्टूडिओचे मालक आणि दिग्दर्शक हिमांशू रॉय प्रभावित झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात राय आणि देविका राणी यांच्या बाँबे टॉकीजची सुत्रं शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपना बोलावलं. त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गाणी लिहून घेतली.

बॉम्बे टॉकीजचा ‘कंगन’ सिनेमा गीतकार ही ओळख देणारा त्यांच्या कारकीर्दीतला पहिला सिनेमा. या सिनेमात अशोक कुमार आणि देविका रानी यांच्या प्रमुख भुमिका होत्या. १९३९ मधे प्रदर्शित झालेल्या या सिमेमातल्या गाण्यांमुळे गीतकार कवी प्रदीप अशी त्यांची ओळख फिल्म इंडस्ट्रीला झाली.

कवी प्रदीप नावाची गोष्ट

त्या काळात अभिनेता प्रदीप कुमार प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यामुळे फिल्म जगतात या दोघांच्या नावाची चलती होती. असं म्हटलं जात की, या दोघांच्याही नावात प्रदीप असल्यानं कधीकधी त्यांच्या पत्रांची अदलाबदल व्हायची. रामचंद नारायण द्विवेदी हे त्यांच लांबलचक नाव हिमांशू रॉय यांनाही रुचलं नव्हतं. शेवटी त्यांनी कवी प्रदीप असं आपलं नामकरणं केलं. तिथपासून त्यांना अख्खी फिल्म इंडस्ट्री कवी प्रदीप या नावाने ओळखू लागली.

१९४० मधे स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी आपल्या कवितांमधून देशवासीयांमधे राष्ट्रभक्ती आणि साहस जागृत केलं. १९४० मधे आलेल्या फिल्म ‘बंधन’ मधे त्यांनी लिहिलेलं चल रे नौजवान हे गाणं अगदी गल्ली-गल्लीत म्हटलं जायचं. या गाण्याचा इतका प्रभाव झाला की त्यावेळच्या सिंध आणि पंजाब विधानसभांनी या गाण्याला राष्ट्रीय गाणं म्हणून मान्यता दिली.

कवी प्रदीप यांना त्यांच्या देशभक्तीपर गीतांमुळे खूप लोकप्रियता मिळाली. १९४३ च्या ‘किस्मत’ या सिनेमाला पहिल गोल्डन ज्युबलीचं अवार्ड मिळालं. ब्रिटिशांच्या सेन्सॉरच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचं दूर हटो ऐ दुनियावालो हिंदुस्तान हमारा है, किस्मत चित्रपटातल गाणं तुफान गाजलं. हे गाणं सरळसरळ ब्रिटिशांना आव्हान देणारं होतं. पण त्यात प्रदीपजींनी जपान आणि जर्मनीच्या विरोधात एक ओळ टाकली. तेव्हा ब्रिटिश दुसऱ्या महायुद्धात जर्मनिविरोधात लढत होते. त्यामुळे ते फसले.  ते त्यांच्या लक्षात येऊन प्रदीप यांच्या अटकेचं वॉरंट निघणार, त्याआधीच ते गाणं लोकप्रिय झालं. अनेकांडून गायलं गेलं. शेवटी त्यांना अटक होता होता टळली.

१९५४ मधल्या ‘जागृती’ या सिनेमामधली त्यांची गाणी विशेष गाजली. आओ बच्चो तुम्हे दिखाए झाकी हिंदुस्थान की, इस देश को रखना है मेरे बच्चों संभाल के, दे दी हमने आजादी बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल ही गाणीही तितकीच गाजली.

ऐ मेरे वतन के लोगोने हेलावला देश

१९६२ मधे भारत-चीन युद्धादरम्यान आपले वीर जवान शहीद झाले. त्यांच्या सन्मानाखातर कवी प्रदीप यांनी ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं लिहिलं. हे गाणं प्रदीप यांना सुचलं तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथे एक सिगारेटचं रिकामं पाकीट उचलून त्याच्या पाठकोऱ्या भागावर त्यांनी हे गाणं लिहिलं. गाणं मुळात आशा भोसले गाणार होत्या पण प्रदीप यांच्या सल्ल्यायानुसार संगीतकार सी. रामचंद्रन यांनी ते लता मंगेशकरांकडून गाऊन घेतलं.

१९६३मधे लता मंगेशकरांनी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर हे गाणं गायलं. तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसह अनेकजणं या गाण्यानं अक्षरश: हेलावले. कवी प्रदीप यांच्या शब्दांची ही ताकद होती. या गाण्यातून जमा झालेली रक्कम ही युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना देण्यात आली.

भजन, आरती आणि प्रेमगीतही

कवी प्रदीप यांची ओळख प्रामुख्याने त्यांच्या देशभक्तीपर गीतांसाठी होती. मात्र अन्य रचनासुद्धा त्यांनी तितक्याच समर्थपणे केल्यात. ‘नास्तिक’ या सिनेमातलं देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान सारखं गाणं असो की मग ‘नागमणी’ सिनेमातलं पिंजरे के पंछी रे, ‘चंडीपूजा’तलं कोई लाख करे चतुराई किंवा मग ‘पैगाम’ सिनेमातलं ऐसेही ढेरो नगमे हैं या सगळ्या गीतांमधून त्यांनी समाजाला संदेशही दिला. ‘संबंध’ सिनेमातलं चल अकेला चल अकेला तेरा मेरा पिछा छुटे, किंवा मग भारत के लिये एक वरदान है गंगा हे ‘हर हर गंगे’ मधलं गाणं असो.

१९७५ मधल्या जय मां संतोषी या सिनेमातल्या मै आरती ऊतारु रे, मदत करो संतोषी माता ही त्यांची गाणी त्या काळात उत्सवांचा अविभाज्य भाग असायची. त्यांची भक्तीगीतंही लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो ही सगळी गाणी वाजल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण झाल्यासारखा वाटत नसे. या अशा अनेक रचना त्यांनी लिहील्या.

पाकिस्तान्यांनी केली गाण्यांची कॉपी

त्याचबरोबर लोकांच्या मनात एकता आणि अखंडतेची भावना मजबूत करण्याचं श्रेय त्यांच्या ‘पैगाम’ सिनेमातल्या  इन्सान का इन्सान से हो भाईचारा यही पैगाम हमारा अशा अनेक गीतांना जातं.

‘दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ हे गीत पाकिस्तान्यांना इतके आवडले की पाकिस्तानी चित्रपटात ते, ‘यूं दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ए कायदे आज़म तेरा एहसान है एहसान’ असे रूपांतरित होऊन आलं. त्याच प्रकारे, ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदोस्तान की’चे पाकिस्तानात ‘ आओ बच्चो सैर कराएं तुमको पाकिस्तान की’  असं झालं.

१९६१ मधे त्यांचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर १९९७ मधे त्यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सिनेसृष्टीतला सर्वोचच मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. २०११ मधे त्यांच्या ए मेरे वतन के लोगो हे गीत त्यांच्या फोटोसहीत पोस्टाचं तिकीट म्हणून छापलं.

आपल्या पाच दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी ८० सिनेमांसाठी जवळपास १७०० च्या आसपास गाणी लिहिली. १९५८ मधे एचएमव्हीने त्यांच्या १३ कवितांचा अल्बम काढला. ज्याला ‘राष्ट्रकवी’ असं नाव देण्यात आलं.

११ डिसेंबर १९९८ मधे वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.