केरळमधल्या जेंडर पार्कमधे फुलतायत स्त्री पुरूष समानतेची फुलं

०५ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


लिंग समानतेच्या बाबतीत केरळ राज्य नेहमीच पुढं राहिलंय. इथल्या स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीच्या नाहीत तर पुरुष स्त्रियांच्या बरोबरीचे आहेत. या लैंगिक समतेला रूप देणारं केरळमधलं संशोधन केंद्र असलेलं सांस्कृतिक भवन म्हणजे जेंडर पार्क. येत्या ११ फेब्रुवारीला इथं यूएनसोबत लिंग समानतेवर आंतरराष्ट्रीय परिषद भरवली जातेय. त्यानिमित्ताने अनेक नवे उपक्रमही जेंडर पार्कमधे सुरू करतंय.

बाग किंवा उद्यान हे लहान मुलांचं आवडतं ठिकाण. मनसोक्त खेळण्याची, हुंदडण्याची, खाण्यापिण्याची ही जागा. त्यातही आधुनिक खेळणी असणारं अम्युझमेंट पार्कसारखं काहीतरी असेल मग तर लहान मुलं एकदम खुषच होऊन जातात. बाग हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो.

केरळमधेही एक वेगळीच बाग आहे. पण या बागेत छोट्यांना नाही तर मोठ्या माणसांना रस असणार आहे. कारण, या बागेत लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे नाहीत, घसरगुंडी नाही की सीसॉ नाही. इथं आहे संग्रहालय, आपले विचार घसरून पडतील अशी पुस्तकं ठेवणारी लायब्ररी आणि स्त्री-पुरूष आणि जगातल्या इतर सगळ्या लिंगांना एकाच मापात मोजता येईल असा सीसॉसारखा तराजू. केरळमधल्या कोझिकोड जिल्ह्यात उभ्या राहिलेल्या या बागेचं नाव आहे ‘जेंडर पार्क.’

११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान या जेंडर पार्कमधे लिंग समानतेवर आंतरराष्ट्रीय परिषद भरवली जाणार आहे. युनायटेड नेशन्स म्हणजेच यूएनच्या सोबतीनं या परिषदेचं आयोजन केलं जातंय. केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजनय यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल. त्यासोबतच जेंडर म्युझियम, जेंडर लायब्ररी, कन्वेशन सेंटर आणि एम्फीथेटरचंही उद्घाटन केलं जाईल.

पुरुष स्त्रियांच्या बरोबरीचे

लिंग समानतेच्या बाबतीत केरळ नेहमीच पुढं राहिलंय. केरळचा एकंदर साक्षरतेचा दरही जास्त म्हणजे ९४ टक्के इतका आहे. केरळमधल्या महिलांचा साक्षरता दर ९५.२ टक्के हा देशात सर्वात जास्त आहे. देशातलं सगळ्यात जास्त लिंगगुणोत्तरही केरळमधेच आहे. ‘सेन्सस२०११’ या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक १००० मुलांमागे केरळात १०८४ मुली आहेत. देशात इतर कुठेही मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त नाही. पण केरळने हा विक्रम करून दाखवला.

लिंग समानतेच्या बाबतीत केरळने भारतातल्या इतर देशांना आदर्शच घालून दिलाय, असं कोचीमधे झालेल्या महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती कार्यक्रमात गांधींचे नातू गोपालकृष्ण गांधी म्हणाले होते. केरळात स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीच्या नाहीत. तर पुरूष स्त्रियांच्या बरोबरीचे झालेत, असंही त्यांचं म्हणणं होतं. जेंडर पार्कच्या निमित्ताने हे पुन्हा दिसून येतंय.

हेही वाचा : बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?

काय आहे जेंडर पार्क?

केरळच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत २०१३ ला जेंडर पार्कची स्थापना झाली. आता महिला आणि बाल कल्याण विभागाअंतर्गत एक स्वतंत्र संस्था म्हणून जेंडर पार्क काम करतं.

लिंग समानतेवर काम करणारं संशोधन केंद्र कम सांस्कृतिक भवन म्हणून याकडे पाहता येईल. जेंडर पार्कच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, लिंगभेदामुळे निर्माण झालेले प्रश्न समाजासमोर आणण्यासाठी हे पार्क काम करत राहील. यात कॅम्पसमधे होणारी संशोधनं, परिषदा, चर्चा तर असतीलच. पण प्रत्यक्ष कामात उतरून महिला आणि इतर लिंगाच्या लोकांना सन्मान मिळवून देण्यासाठी अनेक प्रकल्प सादर केले जातील.

समान समाजाच्या शोधात

सरकारी योजनेत, कामांमधे लिंग समानता आणण्यासाठी काय बदल करावे लागतील यासाठीचे अहवाल आणि सूचनाही पार्कमधून दिल्या जातील. शिवाय, आपण दिलेल्या सूचना पाळल्या जातायत की नाही हेही पाहण्याचा अधिकार महिला आणि बाल कल्याण विभागाने पार्कला दिलाय. 

या सगळ्यातून एक न्याय समाज निर्माण करायचा असं जेंडर पार्कचं ध्येय आहे. समाजात सगळ्या प्रकारच्या लिंगांना समान वागणूक मिळेल, संधी आणि साधनसामुग्रीवर समान अधिकार असेल. राज्यातल्या लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत त्यांना त्यांचा आवाज उठवण्याही मोकळीक असेल. अशा समाजाची स्वप्न जेंडर पार्क पाहतंय.

तिची टॅक्सी सगळ्यांसाठी!

शी टॅक्सी हा त्यांचा पहिला ऑफ कॅम्पस प्रकल्प. महिलांच्या अर्थिक स्वावलंबनासाठी केलेला हा पहिला प्रयत्न होता. ११ मे २०२० ला हा प्रकल्प सुरू झाला. महिलांकडून महिलांसाठी सुरू केलेली ही टॅक्सी सेवा केरळमधल्या १४ जिल्ह्यांपर्यंत पोचलीय.

विशेष म्हणजे, टॅक्सी चालवणाऱ्या या महिला टॅक्सीच्या मालकही आहेत. या सगळ्या महिला एकत्र येऊन शी टॅक्सी फेडरेशन चालवतात. टॅक्सी चालवणं हे काही बाईचं काम नाही, असा समज रूढ असतानाही केरळनं महिला सशक्तीकरणाचा पहिला प्रकल्प लोणची पापडाचा केला नाही. टॅक्सी चालवण्याचाच केला.

लॉकडाऊनच्या काळात शी टॅक्सीच्या महिलांनी अनेकांना मदत केली. म्हाताऱ्या माणसांना हॉस्पिटलमधे नेण्यासाठी त्यांच्या टॅक्सी त्यांच्यासोबतीनं नेहमी सज्ज असायच्या. वेळप्रसंगी त्यांना औषधपाणीही घरपोच द्यायच्या. तेही कोणतेही पैसे न घेता! दारिद्र्य रेषेखालचं जीवन जगणाऱ्यांसाठी लॉकडाऊन काळात टॅक्सी मोफत होती. तर बाकीच्यांसाठी निम्मे पैसे घेऊन महिला टॅक्सी सेवा देत होत्या.

हेही वाचा : नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?

थांटेडोमचं साहस 

खरंतर, २०१३ लाच या पार्कची निर्मिती झालीय. २०११ ला केरळ सरकारने पहिल्यांदा जेंडर बजेट मांडलं. तेव्हाच केरळमधे जेंडर पार्क उभं करायचं ठरलं. सुरवातीला या पार्कचं नाव ठेवलं होतं थांटेडोम. मल्याळम भाषेत थांटेडोमचा अर्थ होतो ‘साहस’. महिलांना साहसी, आत्मविश्वासू बनवण्यासाठी निर्माण केलेली जागा.

या थांटेडोमसाठी २०१०-११ च्या बजेटमधे १० कोटी रूपये राखीव ठेवण्यात आलेले. शिवाय थिसूर शहराजवळच्या कलामंडलम या प्रसिद्ध कला विद्यापीठात सहा एकरची जागाही देण्यात आली. पण जागा कमी पडत होती. शेवटी ही थांटेडोमची जागा बदलली आणि कोझिकोडे जिल्ह्यातल्या सिल्वर हिल्स कॅम्पसमधे जागा दिली गेली.

जेंडर लायब्ररीची संकल्पना

आज २४ एकरात हा प्रकल्प उभा आहे. सध्या तीन मोठ्या टॉवर सारख्या इमारती इथं आहेत. त्यातली एक तर जुन्या काळातल्या वाड्याचं रिनोवेशन करून उभी राहिलीय. या रिनोवेशनवरही सरकारनं ३० कोटी रूपये खर्च केलेत. प्रकल्पाचा एकूण खर्चच ३०० कोटींपर्यंत गेलाय.

कॅम्पसमधे आता जेंडर लायब्ररी उभारली जातेय. लैंगिक हक्क, स्त्रीवादी साहित्य, ट्रान्सजेंडर लोकांचे अनुभव आणि लैंगिक समानतेवरची सगळी पुस्तकं, मासिकं, जर्नरल इथं उपलब्ध असतील. अगदी सगळ्या भाषांमधलीही. त्यातही दिसू न शकणाऱ्या किंवा ऐकू न येणाऱ्या लोकांसाठी ऑनलाईन लायब्ररी सुरू केली जाईल. त्यात पुस्तकं वाचून दाखवण्याची वगैरेही सोय असेल.

व्यवसाय करणाऱ्या बायकांसाठी

याशिवाय, स्त्रियांचा इतिहास दाखवणारं एक संग्रहालयही इथं असेल. केरळमधल्या गौरवशाली महिलांची गोष्ट, त्यांचा संघर्षाचा इतिहास या संग्रहालयात जतन केला जाईल. जेंडर लायब्ररी आणि म्युझियम या दोन्ही वास्तू गांधी ब्लॉकवर उभारल्या जातील. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी महात्मा गांधीं इथं यायचे.

याशिवाय, एम्फिथेटर, ५०० लोकं बसू शकतील असा कन्वेशन सेंटर, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी जगातलं पहिलं वुमन ट्रेड सेंटरही ११ फेब्रुवारीला लॉन्च होईल. महिलांना व्यवसाय करण्यासाठी गरज पडेल ती मदत करण्याचं काम या सेंटरमधून केलं जाईल. पुरुषांच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यवसायात महिला उतरत असतील तर त्याला  आंतरराष्ट्रीय दर्जावर नेऊन ठेवण्याचं कामही सेंटरमधून केलं जाईल.

हेही वाचा : #NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?

ग्रीन कॅम्पसची खरी हिरवाई

फक्त महिलाच नाही तर ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठीही जेंडर पार्क कार्यरत राहिल. २०१५ मधे इथं पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय लिंग समानता परिषद भरवण्यात आली होती. त्यावेळी केरळ सरकारने ट्रान्सजेंडर पॉलिसी लागू केलं होतं. ट्रान्सजेंडर लोकांसाठी विशेष योजना आणि काही जागांवर विशेष आरक्षणाची तरतूद या पॉलिसीत करण्यात आली. 

संपूर्ण कॅम्पस हिरवाईनं नटलाय. झाडं, पक्षी, फुलं यांचे वेगवेगळे नमुने तर आहेतच. पण कॅम्पसमधल्या गोष्टींमधून कमीत कमी कार्बन उत्सर्जन होईल याची काळजी घेण्यात येतेय. यासोबतच, कॅम्पसचं सगळं बांधकाम जेंडर न्यूट्रल असेल याचीही व्यवस्था केली जाईल. खऱ्या अर्थाने हा कॅम्पस ‘ग्रीन’ आहे.

निधीअभावी रखडला प्रकल्प

२०१३ ला अस्तित्वात आलेल्या या पार्कला जिवंतपणा यायला जवळपास ८ वर्ष उलटली. नाही म्हटलं तरी शी टॅक्सीसारखे छोटे मोठे कार्यक्रम इथं चालू होतेच. २०१६ ला तत्कालिन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या पार्कचं उद्घाटनही करण्यात आलं होतं. पण त्यानंतर निधीअभावी हा प्रकल्प रखडला गेला.

‘आर्थिक कोंडी झाल्यामुळे जेंडर पार्ककडे सरकारला पुरेसं लक्ष देता आलं नाही. पण आता हे चित्रं बदलणार आहे,’ असं जेंडर पार्कचे सीईओ पीटीएम सुनीश द हिंदूशी बोलताना म्हणाले. येत्या काही वर्षात जेंडर पार्कमधे अनेक सुधारणा होतील असं आश्वासन त्यांनी दिलंय. म्हणूनच ११ फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या परिषदेत अनेक नवे उपक्रमही लॉन्च केले जातायत. यापुढे इथं महिला अभ्यास केंद्राची स्थापना करण्याचाही केरळ सरकारचा मानस आहे.

नवा सूर्योदय होईल?

'लिंग समानतेवर काम करणारं ही जगातलं पहिलं केंद्र असणार आहे. त्यातच दक्षिण आशियातलं हब तयार करण्यासाठी यूएन वुमनने जेंडर पार्कची निवड केलीय हीसुद्धा अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे,’ असं केरळच्या आरोग्य, सामाजिक न्याय आणि महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री के.के. शैलजा यांनी सांगितलं.

यूएन सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्था जेंडर पार्कला आपलं म्हणतायत. आता अनेक नव्या सुधारणा इथं होतील. इथल्या रिसर्च सेंटरमधे अनेक महत्त्वाची संशोधनं होतील. इतकी वर्ष हा प्रकल्प रखडला असला तरी आता जेंडर पार्कच्या कॅम्पसमधे नवा सूर्योदय होतोय. त्याच्या प्रकाशात लिंग समानतेची वाट स्वच्छ दिसू लागेल, असा विश्वास बाळगायला हरकत नाही.

हेही वाचा : 

फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!

लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा

निवडणुका हरलेले राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचा चेहरा कसा बनले?

डॉ. नरेंद्रसिंग कपानी: फायबर ऑप्टिक्सचा हा जनक आपल्याला माहीत नाही