हिंदूराष्ट्राची मागणी चूक नाही, तर खलिस्तानची मागणी चूक कशी? खलिस्तान चळवळ उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नका, इंदिरा गांधींनी केलेली चूक पुन्हा करू नका, असा धमकीवजा इशारा पंजाबात पुन्हा डोकं वर काढणाऱ्या खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या अमृतपाल सिंहने गृहमंत्री अमित शहा यांना दिलाय. पंजाबमधल्या एका पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा पंजाब पेटलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुसरी टर्म आता संपत आलीय. २०२४ मधे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या राजकीय घटनांना वेग आलाय. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, अदानी प्रकरण, बीबीसीची डॉक्युमेंटरी, देशातली महागाई, अर्थव्यवस्थेवर होणारी चौफेर टीका या सगळ्या पार्श्वभूमीवर पंजाबमधे पुन्हा एकदा खलिस्तानवादी चळवळीनं डोकं वर काढलंय.
१९८४ मधल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातलं ब्ल्यु स्टार ऑपरेशन, दिल्लीत झालेल्या दंगली, इंदिरा गांधींची हत्या हे सगळं इतिहासाचा भाग होत असताना, पुन्हा एकदा अमृतपाल सिंह नावाचा माणूस भिंद्रनवालेच्या आठवणी जागवतोय. पंजाबमधे असलेल्या आम आदमी पक्षाचं सरकार आणि दिल्लीतलं मोदी-शहा यांचं सरकार यांना न जुमानता, थेट पोलिसांवर हात उगारला गेलाय. या घटनांकडे गांभीर्याने पाहायला हवं. कारण प्रश्न देशाच्या सार्वभौमत्वाचा आहे.
अमृतसरपासून साधारणतः ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या अजनाला येथील पोलीस स्टेशनवर गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी शस्त्रधारी जमावाने हल्लाबोल केला. हातात नंग्या तलवारी घेतलेल्या या जमावाला अडवण्याचा पोलीसांचा प्रयत्न लुटूपुटूचा ठरला आणि पोलीस ठाण्यावर तुफान हल्ला झाला. यात सहा पोलीस जखमी झाला. हा हल्ला अमृतसरमधील 'वारीस पंजाब दे' या संघटनेने केला होता.
लवप्रीत तुफान नावाच्या सहकाऱ्याला झालेली अटक ही चुकीची असून, त्याला सोडून देण्यात यावे यासाठी हा हल्ला केला गेला. या हल्ल्यानंतर अजनाळा कोर्टाने लवप्रीत तुफानला सोडण्याचे आदेश दिले आहेत. लवप्रीत तुरुंगातून सुटल्यानंतरही गाडीत बसताना, खलिस्तानवादी चळवळीचं समर्थन करणारी भाषा बोलला आहे.
हे सगळं घडवून आणण्यामागे आहे, तो म्हणजे 'वारीस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंह. १९८४ च्या शीख दंग्यामागचा मास्टरमाइंड असलेल्या भिंद्रनवालेसारखी वेशभूषा करणारा ३० वर्षाचा अमृतपाल सिंह पंजाबच्या भूमीवर पुन्हा एकदा खलिस्तानची मागणी उचलून धरतोय. दिल्लीतील दंगे आणि इंदिरा गांधींच्या हत्येनंतर भारताबाहेर किरकोळ सुरू असलेलं हे आंदोलन आता पुन्हा भारताच्या मातीवर पुन्हा जोर धरतंय.
हेही वाचाः तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?
अमृतपाल सिंह हा अमृतसरजवळील जल्लूपूर इथं राहणारा अवघ्या ३० वर्षाचा कट्टरतावादी युवक आहे. त्याचं शिक्षण बारावीपर्यंत झालं असून खलिस्तान, भिंद्रनवाले यासंदर्भातला इंटरनेटवरचा भडकवाकवीचा तो एक बळी आहे, असं काहींचं म्हणणं आहे. तो दुबईत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता, गेल्या वर्षी सप्टेंबरमधे तो भारतात परतलाय.
पंजाबमधे 'वारीस पंजाब दे' ही संघटना दीप सिद्धू यांनी स्थापन केली होती. २६ जानेवारी २०२१ला लाल किल्ल्यावर झेंडा फडकवल्याबद्दल झालेल्या गोंधळात दीप सिद्धू हा मुख्य आरोपी होता. १५ फेब्रुवारी २०२२ ला दीप सिद्धूचं अपघाती निधन झालं. त्यानंतर दुबईतून परतलेल्या अमृतपालनं या संघटनेची सुत्रं हातात घेतली आहेत.
अमृतपाल हा जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा समर्थक आहे. खलिस्तानी विचारसरणीचा कडवा समर्थक अशी त्याची ओळख आहे. तो अनेकदा आपल्या सशस्त्र समर्थकांसह पंजाबमधे सक्रिय दिसतो. हा अमृतपाल गेल्या वर्षी प्रकाशझोतात आला, जेव्हा त्याच्या समर्थकांनी जालंधरमधल्या मॉडेल टाऊन गुरुद्वारामधे सोफे आणि खुर्च्या जाळल्या. गुरू ग्रंथसाहेबसमोर कुणी खुर्च्यांवर बसू नये, हा गुरूचा अपमान आहे, अशी त्याची विचारसरणी आहे.
स्वतःला भिंद्रनवाले यांचा वारस मानणाऱ्या आणि तशाच थाटात वावरणाऱ्या अमृतपाल याला सध्या भिंद्रनवाले २.० अशी ओळख मिळाली आहे. पंजाबमधले शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्या प्रकरणातही अमृतपालचं नाव पुढे आलं होतं. सुधीर सुरी यांच्या कुटुंबीयांनीही या हत्या प्रकरणात अमृतपाल सिंगचं नाव समाविष्ट करण्याची मागणी केली होती. पण काही दिवस नजरकैदेत ठेवल्यानंतर त्याची सुटका झाली होती.
भिंद्रनवाले यांच्यासारखा निळा फेटा घालणारा अमृतपाल सध्या तरुणांमधे लोकप्रिय ठरतो आहे. त्याच्या भडकाऊ भाषणांमुळे तरुण पिढी त्याच्या आहारी जात आहे. युकेस्थित एनआरआय मुलगी असलेल्या किरणदीप कौर हिच्याशी त्यानं लग्न केलं असून सोशल मीडिया आणि टेक्नोलॉजीच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत आपले प्रक्षोभक विचार पोचवतोय.
गुरुवारी अजनाळा इथं झालेल्या हल्ल्यानंतर अमृतपाल सिंह यांची भाषा थेट गृहमंत्री अमित शहा यांच्यावर घसरली आहे. तो म्हणाला की, 'अमित शहा हे खलिस्तान चळवळ उध्वस्त करण्याची भाषा बोलतायंत. इंदिरा गांधी यांनी खलिस्तानला विरोध करून किती मोठी चूक केली ती त्यांनी लक्षात ठेवायला हवी.’ त्याच्या या विधानावर पंजाबमधलं आम आदमी पक्षाचं सरकार मावळ भूमिका घेतंय, असं भाजपचं म्हणणं आहे.
हेही वाचाः शहीद हेमराजच्या बायकोला न्याय मिळाला?
आप सरकार सत्तेवर आल्यापासून पंजाबमधे खलिस्तान समर्थक गटांच्या कारवाया वाढल्या आहेत, असा आरोप होऊ लागला आहे. २०१७ मधे ‘आप’नं पंजाबमधे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली, तेव्हापासून त्यांच्यावर हे आरोप होत आहेत. त्यामुळे आप आणि खलिस्तान चळवळ असं समीकरण घट्ट करून, राजकीय डाव साधण्याचा हेतू या सगळ्यामागे आहे का? अशी शंका काही राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत.
दुसरीकडे पंजामधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, अमली पदार्थांचा वाढता वापर यामुळे तरुण पिढीवर होणारे भयंकर परिणाम या सगळ्यामुळेही पंजाबमधे एकंदरित मोठी अस्वस्थता आहे. 'वारीस पंजाब दे' सारख्या संघटना या सगळ्या प्रश्नांना आपल्या भाषणामधे वापरत लोकांच्यात जात आहेत. त्यांचे छुपे हेतू वेगळे असून, या सगळ्यामागून खलिस्तानची मागणी पुढे रेटत असल्याचं स्पष्टपणे जाणवतंय.
एका मुलाखतीत अमृतपाल सिंह म्हणतो, की जर या देशात शांततापूर्ण पद्धतीने कोणतीही मागणी करणं गैर नाही. जर हिंदुराष्ट्र व्हावं असं बोललं जातं, काही जण साम्यवादी राष्ट्र व्हावं असं म्हणतात तर आम्ही खलिस्तानची मागणी करण्यात चूक काय? असं तो जाहीरपणे सांगतोय. त्यामुळे एकंदरित हा कट्टरतावाद असाच वाढत राहिला आणि राजकीय स्वार्थासाठी एकमेकांवर खापर फोडत राहिले, तर देशांतर्गत परिस्थिती सांभाळणं अवघड होऊ शकतं.
अदानी घोटाळा, महागाई, आंतरराष्ट्रीय टीका यामुळे एकंदरितच देशातलं भाजप सरकार सध्या अस्वस्थ आहे. त्यात पुन्हा खलिस्तानच्या या मागणीनं भाजप सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पंजाबमधे असलेलं आप सरकार खलिस्तान चळवळ नीट हाताळत नसल्याची टीका भाजप करत असलं, तरी जगभरात ही चळवळ गेली काही वर्ष डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतेय.
इंग्लंडमधे लंडनच्या ट्राफलगार चौकात २०१८ मधे ‘खलिस्तान’वादी शिखांचा मेळावा झाला होता. तसंच अमेरिकेतल्या ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेनंही पंजाबात शिखांचं सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्याची मोहीम सुरू केलीय. १९८४ नंतर भारतात जरी ही मोहीम थंडावली असली तरी जगभर तिचे पडसाद अनेकदा उमटत राहिले होते. आता पुन्हा ही चळवळ देशात कशी शिरली, याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
आज शीख समाज जगभर पसरला असून, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक क्षमता आहेत. आपल्या मेहनतीच्या आणि सेवेच्या ताकदीवर त्यांनी जगातल्या प्रत्येक देशात गुरुद्वारा आणि मोठमोठ्या संस्था उभारल्या आहेत. अनेक देशातल्या सरकारमधेही शीख नेते असून, जगाच्या राजकारणावरचा त्याचा प्रभाव वादातीत मोठा आहे.
त्यामुळेच खलिस्तानची चळवळ भारतात पुन्हा डोकं वर काढत असताना, फक्त देशांतर्गतच नाही, तर आंतरराष्ट्रीय घटकांचाही विचार गांभीर्याने करणं गरजेचं आहे. देशातली आर्थिक स्थिती फारशी सकारात्मक नसताना, बेकारी आणि आर्थिक विषमता वाढत असताना देशात अशी फुटिरतावादी चळवळ फोफावली तर, त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात, याचं भान प्रत्येकानेच ठेवायला हवं.
हेही वाचाः
खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!