आदर्शवादी फॉरेस्ट गम्पचं भारतात स्वागत होणार का?

१० जून २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


रॉबर्ट झेमेकिस दिग्दर्शित ‘फॉरेस्ट गम्प’ हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी गाजला. आता अठ्ठावीस वर्षांनी तो हिंदीत ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने परत येतोय. अमेरिकेतल्या साठ-सत्तरच्या दशकातल्या अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींना वेगळ्या पद्धतीने पडद्यावर आणणाऱ्या या सिनेमाचं ‘भारतीयीकरण’ हा चर्चेचा नवा विषय ठरू शकतो.

यावर्षीच्या आयपीएल फायनलचा मुहूर्त साधून बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने आपल्या आगामी ‘लाल सिंग चढ्ढा’चा ट्रेलर रिलीज केला. हा सिनेमा १९९४च्या फॉरेस्ट गम्प या सिनेमाचा ऑफिशियल रिमेक आहे. या सिनेमाने अमेरिकन जनमानसावर टाकलेला प्रभावाबद्दल आजही चर्चा होत असते. आता याचं भारतीय रुपडं कसं असेल हा प्रश्न इथल्या सिनेवर्तुळात चर्चिला जातोय.

आमीरला रिमेकची गरज काय

‘बाहुबली’नंतर दक्षिणेकडून विशेषतः तेलुगू सिनेसृष्टीतून उसळणाऱ्या सिनेमांच्या त्सुनामीचा तडाखा बॉलीवूड गेली सात वर्षं सहन करतंय. त्यात कोरोनाने मोडलेल्या कंबरड्याचं दुखणं आहेच. एकट्याच्या जीवावर थियेटर हाऊसफुल करणारी सलमान-शाहरुख-आमीर ही बॉलीवूडची सुपरहिट खानत्रयी आता पुन्हा एकदा आपलं स्टारडम सिद्ध करणार का हाही प्रश्न प्रेक्षकांसमोर आहेच. 

‘एका वर्षात एकच सिनेमा’ हा यशाचा मूलमंत्र जपणाऱ्या आमीरला २०१७च्या ‘सिक्रेट सुपरस्टार’नंतर अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. याआधी २०१८ला आलेला त्याचा बहुचर्चित ‘ठग्ज इन हिंदोस्तान’ही बॉक्स ऑफिसवर आपली चमक दाखवू शकला नव्हता. अशावेळी ‘बुडत्याला काठीचा आधार’ या म्हणीप्रमाणे ‘बॉलीवूडला रिमेकचा आधार’ ही म्हण सार्थ ठरवत आमीरने ‘फॉरेस्ट गम्प’च्या रिमेकमधे काम करण्याचा निर्णय घेतलाय.

खरं तर हा सिनेमा आमीर नेहमीच्या प्रथेप्रमाणे २०२०च्या ख्रिसमसलाच रिलीज करणार होता. पण कोरोनामुळे हे काम लांबत गेलं. त्यादरम्यान या सिनेमात कतरिना कैफ, विजय सेतुपती काम करणार असल्याच्या अफवा ज्या वेगाने आल्या, त्याच वेगाने खोट्याही ठरल्या. अभिनेता अतुल कुलकर्णीची पटकथा, तेलुगू अभिनेता नागा चैतन्याचा पहिला हिंदी सिनेमा आणि तीन वर्षांनी आमीरचं मोठ्या पडद्यावर झळकणं या ‘लाल सिंग चढ्ढा’च्या जमेच्या बाजू आहेत.

आमीर यात एका पंजाबी माणसाची भूमिका साकारत असल्याने हा सिनेमा बैसाखीचा मुहूर्त साधत १४ एप्रिलला रिलीज करायच्याही घडामोडींना जोर आला होता. पण त्याचदिवशी बहुप्रतीक्षित कन्नड सिनेमा ‘केजीएफ चाप्टर २’ही भारतात सर्वत्र प्रदर्शित होणार होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘लाल सिंग चढ्ढा’ला मिळणारा संकुचित प्रतिसाद पाहता आमीरने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलून बॉलीवूडवर इतर प्रादेशिक सिनेमांचा असलेला दबाव पुन्हा एकदा अधोरेखित केलाय.

हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

काय आहे फॉरेस्ट गम्प?

येत्या ११ ऑगस्टला ‘लाल सिंग चढ्ढा’ रिलीज होतोय. गेली अकरा वर्षं आमीर या सिनेमासाठी ‘फॉरेस्ट गम्प’च्या अधिकृत रिमेकचे राईट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. इतकं काय वेगळं असावं या सिनेमात की बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टला याचा रिमेक करण्याचा मोह आवरला नाही? तर याचं उत्तर या सिनेमाच्या कथेत आणि त्याने अमेरिकन जनमानसावर टाकलेल्या प्रभावात दडलंय. विन्स्टन ग्रूम यांच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे.

ही कथा फॉरेस्ट गम्प नावाच्या एका मध्यवर्ती पात्राभोवती फिरते. पाठीच्या कण्यात बाक असल्यामुळे फॉरेस्टला लहानपणापासूनच चालण्यासाठी ब्रेसेस वापरावे लागतात. त्याने स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजू नये यासाठी त्याची आई त्याला कायमच प्रोत्साहन देत असते. एके दिवशी, फॉरेस्टला तो इतरांपेक्षा वेगाने धावू शकतो, याचा प्रत्यय येतो. इथून त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते.

पुढे तो प्रतिष्ठीत फुटबॉल टीमसाठी खेळतो. सैन्यात भरती होतो. आपल्या जखमी सवंगड्यांना वाचवून शौर्यपदक मिळवतो. राष्ट्रपतींना भेटतो. मासेमारीपासून सुरवात करून देशभर रेस्टॉरंटची साखळी उभी करतो. त्यातून आलेलं उत्पन्न ‘अॅपल’मधे गुंतवून आणखी श्रीमंत बनतो. निव्वळ धावत राहण्यामुळे कित्येकांसाठी तो एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वही बनतो. इतकंच नव्हे, तर शेवटी आपल्या प्रेयसीशी लग्न करून संसारही थाटतो.

बघायला गेलं तर, वरवर ही कथा म्हणजे एका अपंग व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारिक घटनांची बांधणी आहे. पण प्रत्यक्षात हा सिनेमा त्याहीपलीकडे खूप काही सांगून जातो. साठ-सत्तरच्या दशकात अमेरिकेत घडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचा पदर या कथेला आहे. आज महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेच्या पन्नास वर्षांपूर्वीच्या संघर्षाची ही चित्रकथा आहे.

सिनेमांच्या सदाबहार चर्चेतला सिनेमा 

१९९४ हे वर्ष हॉलीवूडसाठी तसं खासच ठरलं. या वर्षी रिलीज झालेले सिनेमे हे फक्त हॉलीवूडच्याच नाही तर जागतिक सिनेमाच्या इतिहासात नोंदवले गेलेत. पल्प फिक्शन, द मास्क, स्पीड, द लायन किंग, लिटल वूमन, द शॉशँक रिडेम्प्शन अशी किती नावं घ्यावीत? फॉरेस्ट गम्पही याच वर्षी आला. हा सिनेमा फारसा चालणार नाही म्हणणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून थियेटरमधे तगही धरून राहिला. त्यावर्षी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या ‘द लायन किंग’पाठोपाठ तो दुसरा सिनेमा होता.

त्यावर्षी सगळ्यात जास्त ऑस्कर नामांकने मिळवणारा सिनेमा ‘फॉरेस्ट गम्प’च होता आणि सगळ्यात जास्त ऑस्कर पुरस्कारांवर नावही याच सिनेमाने कोरलं होतं. गेली २८ वर्षं या सिनेमावर सातत्याने बोललं जातं. जितकं या सिनेमाचं कौतुक केलं जातं, तितकीच भरभरून टीकाही या सिनेमावर केली जाते. प्रामुख्याने, सिनेमाची कथा आणि कथेचा कालखंड एकमेकांशी सुसंगत नसल्याचा आरोप यावर ठेवला जातो.

हेही वाचा: ऑस्करच्या आयचा घो!

आदर्शवादी फॉरेस्टची वादग्रस्त भूमिका

टॉम हँक्सचा ‘बॉक्स ऑफ चॉकलेट’वाला डायलॉग वरवर आदर्शवादी वाटत असेलही, पण सध्याच्या परिस्थितीत तो फारसा कामाचा नाही. व्यवस्थेविरुद्ध कसलंही बंड न करता ‘आलीया भोगासी असावे सादर’ या वृत्तीला हा सिनेमा बढावा देत असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. कोणतीही क्रांती, बंड किंवा बदलाला फॉरेस्टच्या दृष्टीकोनातून अगम्य, असंबद्ध कार्टूनचा, जादुई रहस्याचा दर्जा या सिनेमात दिलेला दिसतो.

फॉरेस्टची प्रेयसी जेनी ही साठच्या दशकातल्या विएतनाम युद्धाने व्यथित झालेल्या आणि समताधारित समाजाची मागणी करणाऱ्या अमेरिकन तरुणाईचं प्रतिनिधित्व करताना दिसते. जेनीचा हा आदर्शवाद कितीही रम्य असला तरी तो सहजशक्य नसल्याने ती जबाबदाऱ्यांपासून पळताना दिसते. याउलट फॉरेस्टचा चाकोरीबद्ध आदर्शवाद हा त्याला ते सगळं मिळवून देतो, जे एका सामान्य अमेरिकन व्यक्तीचं स्वप्न आहे.

या व्यक्तीला देशसेवा करायची असते, प्रसिद्धी मिळवायची असते, श्रीमंत व्हायचं असतं, महत्त्वाच्या व्यक्तींना भेटायचं असतं. फॉरेस्टकडे सामान्य अमेरिकन व्यक्तीसारखा अहंभाव, इच्छाशक्ती, स्वार्थीपणा नाही पण तरीही तो हे सगळं करतो. त्याला डब्यातून तूप काढण्यासाठी कधीच ‘उंगली टेढी’ करावी लागत नाही. आसपास घडणाऱ्या सामजिक-राजकीय घटनांना तो गंभीरपणे पाहत नाही. 

आयुष्यभर फॉरेस्ट हा इतरांनी दाखवलेल्या वाटेवरून चालताना दिसतो. इतरांनीही तसंच करावं ही त्याची अपेक्षा असते. अर्थात तो कुणावर प्रत्यक्षपणे कसलीही जबरदस्ती करत नाही पण त्याच्या अश्या वागण्याचा परिणाम त्याच्या अवतीभोवतीच्या लोकांवर होताना दिसतो. कधी त्याने नेहमीची वाट सोडून एखादी कृती जरी केलीच तरी त्याच्या आदर्शवादामुळे ती इतरांसाठी कशी त्रासदायक ठरते, हे लेफ्टनंट डॅन आणि फॉरेस्टवर चित्रित झालेल्या हॉस्पिटलमधल्या प्रसंगातून कळतं. 

तुलना तर होणारच!

जगात काहीतरी वेगळं घडवू पाहणाऱ्यांना फॉरेस्टचं पात्र कळत नकळत बेदखल करताना दिसतं. याउलट, अनेकांना फॉरेस्टचं पात्र प्रेरणादायी वाटतं. सततच्या परिश्रमातून, मन एकाग्र ठेवून निश्चित ध्येय गाठता येतं, असाही संदेश फॉरेस्टच्या निरंतर धावण्यातून घेतला जातो. फॉरेस्ट गम्प बघताना बऱ्याचदा ‘मी मोर्चा नेला नाही’ या संदीप खरेंच्या ओळी आठवत राहतात. भारतातल्या कित्येक पांढरपेशा, मध्यमवर्गीय फॉरेस्ट गम्पचं प्रतिनिधीत्व करणारी ही कविता.

आता या कलाकृतीला पुन्हा चंदेरी पडद्यावर आणणं आणि तिला योग्य न्याय देणं हे सर्वस्वी आमीरच्या हातात आहे. आमीरसाठी ‘लाल सिंग चढ्ढा’चं बॉक्स ऑफिसवरचं यश महत्त्वाचं आहे. पण या सिनेमाचं खरं यश भविष्यात बॉक्स ऑफिस कमाईच्या फूटपट्टीने मोजलं जाणार नाही तर त्याने भारतीय समाजव्यवस्थेवर टाकलेल्या प्रभावाच्या फूटपट्टीने मोजलं जाईल, हे नक्की!

हेही वाचा: 

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका