कुणा एकाच्याच मालकीची आहे का ही भाषिक संस्कृती?

२७ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज मराठी भाषा गौरव दिन. जर्मन आणि मराठीतले कित्येक शब्द एकसारखे. अरबी, पर्शिअन, पश्तू, अफगाणी, उर्दू, हिंदी, खडीबोली. शब्द काय भाषाही संक्रमित झाल्यात. अगदी प्राचीन काळापासून लोक आणि त्यासोबत त्यांच्या संस्कृती इकडून तिकडं गेल्या. कोण कशावर मालकी दाखवणार? म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून लंडनमधे राहणाऱ्या शबाना वारणे यांचे हे अनुभव वाचायलाच हवेत.

आज मराठी भाषा गौरव दिन. पण मराठीचा अभिमान, प्रेम तर आपल्या मनात वर्षभर असतं. आपली मराठी भाषा खरोखर सुंदरच आहे. कारण, ती वाहती आहे. जगभरातल्या अनेक भाषांतून तिनं अनेक शब्द घेतलेत. अनेकदा त्याचं आपल्या आपल्या प्रकारात रुपांतरणही केलंय. अनेकांना हे रुपांतरण झालेले शब्द दिलेतही. 

गेल्या १५ वर्षांपासून लंडनमधे राहणाऱ्या शबाना वारणे यांचा भाषेचा अनुभव हेच सांगतो. लंडनमधे त्या सरकारसोबत चाईल्ड प्रोटेक्शन पॉलिसीवर काम करतात. १९९५ ला मुंबईच्या टाटा समाज विज्ञान संस्थेतून त्यांचं मास्टर्स इन सोशल वर्क झालं होतं. त्यानंतर १० वर्ष महाराष्ट्रात सामाजिक चळवळींशी जोडून घेत त्यांनी अनेक प्रकल्पांवर काम केलं. त्यानंतर त्या लंडनला गेल्या. १५ वर्षांत लंडनमधे भाषेविषयी काय काय अनुभवलं ते त्यांनी फेसबुकवर टाकलं होतं. त्या पोस्टचा हा संपादित अंश.

माझी इथली टर्किश शेजारीण तिच्या नातवांशी बोलते तेव्हा कितीतरी 'मराठी' शब्द येतात. ‘भगन’ हा त्यातलाच एक. ‘चा’ म्हणजे चहा आणि ‘बाबा’ म्हणजे बाबा. जेवायला गेलो की भरीत हा त्यांचा आवडीचा पदार्थ. मोठी भाकरी करतात मधे काही काही भरुन. ते भरीत. 

दुसरी शेजारीण बांग्लादेशी सिलेटी. पूर्व पाकिस्तानच्या प्रभावात आणि नंतर आता इस्लाम टीवीमुळे खूप उर्दू शब्द आले त्यांच्याकडे. पण कुणी आजारी पडलं की आधी 'औषध' शोधतात! मला तर ते बोर्गी म्हणतात. कारण मराठ्यांच्या त्या प्रांतातल्या स्वाऱ्या आणि त्यांची किल्लेबांधणी. आता बर्ग हा मुळात 'जर्मन प्रशियन' भाषेतला. त्यातून त्याचं बोर्ग झालं. शिवाजीचं तिकडचं नाव ‘बोर्गी’. मी मराठ्यांच्या प्रांतातली म्हणून बोर्गी.

हेही वाचा : मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे

जर्मन आणि मराठीतले कित्येक शब्द एकसारखे. अरबी, पर्शिअन, पश्तू, अफगाणी, उर्दू, हिंदी, खडीबोली. शब्द काय भाषाच संक्रमित झाल्यात. आज देश आणि राज्यांच्या सीमा आपण बघतो. पण अगदी प्राचीन काळापासून लोकांचे, संस्कृतीचे एकप्रकारे मुक्त प्रवाह लोकांबरोबर इकडे तिकडे गेले. कोण कशावर मालकी दाखवणार?

जेत्यांची संस्कृती लादली जाते हे खरं. पण त्यात त्या काळाच्या राजकीय आणि आर्थिक हीतसंबंधांचा जास्त भाग असतो. आपण मात्र इतिहासाच्या एका तुकड्याला धरून अस्मितेचं राजकारण करत असतो. माझ्या लहानपणी गावात जी भाषा शिकले तीच आजही मला जवळची वाटते.

पुण्यात आल्यावर अजूनही कुणी ‘न’ आणि ‘ण’ याच्या अगणित चुका काढल्या तर त्यांची मला तेवढीच कीव येते जेवढी माझ्या लहानपणी भेटायला येणाऱ्या माझ्या भेंडीबाजारातल्या भावंडांची. त्यांना आम्ही मराठी बोलायचो म्हणून गावठी, मागासलेले, अधार्मिक वाटायचो! असो ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार, जगाच्या अनुसार लोक भाषेची तुलना आणि उतरंड लावतात.

भाषा एक माध्यम आहे. संवाद महत्त्वाचा! जिथं संवादच थांबतो आणि शिव्या सुरु होतात त्या मात्र सगळ्या भाषांमधे सारख्याच. सगळा आशय स्त्रियांना कमी लेखणारा! 

आमच्याकडे तर सगळेजण वेगळी भाषा बोलतात. माझे आई आणि बाबा दोघं महाबळेश्वरच्या धावडी घरात जन्मले, वाढले. आईचं शिक्षण चौथीपर्यंत उर्दू शाळेत. पुढं मुलींसाठी शाळा नाही. तिचा एक मावसभाऊ मराठी शाळेत तिच्या पुढच्या इयत्तेत. त्याच्याकडून मधल्या कुडाच्या भिंतीआडून ही मराठी शिकली. हट्टाने सातवीची परीक्षा दिली आणि मास्तरीण झाली. तिला उर्दू आणि मराठी भाषा उत्तम येतात. तिच्यामुळेच मराठीची आवड आम्हा बहिणींमधे!

हेही वाचा : गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ

गुरुजी आणि बाईंची मुलं म्हणून शाळेत, गावात लहानपणी वेगळा भाव होता. त्यांचं मार्गदर्शन, घरातलं वातावरण म्हणून आम्ही प्राथमिक मराठी शाळांमधून चमकलोही! पुण्यात पुढच्या शिक्षणासाठी आल्यावर तीच भाषा बऱ्याच लोकांना अशुद्ध वाटली. अजूनही च, न, ण असे शुद्धीकरणाचे प्रयत्न चालू असतात. असो बापडे! माझीच लाल असं जेव्हा सिद्ध करायला कुणी जीव तोशीस लावून उठतं तेव्हा ‘उनको उनके हाल पे छोडना’ हाच उत्तम मार्ग असतो.

लहानपणापासून आम्ही सातत्याने ऐकलेला कौतुक आणि अविश्वासदर्शक वाक्प्रचार  म्हणजे ‘तुम्ही मुस्लिम असून मराठी एवढं चांगलं बोलता?’ त्यात आडनाव पण आमचं शेख किंवा खान नाही. त्यामुळे काहीजण तर वडील नक्कीच मुस्लिम नसणार असा निष्कर्ष काढून मोकळे! त्यात इकडे येऊन आता वारणेचे 'वॉर्न' झालो. त्यामुळे नक्कीच कोणा गोऱ्याबरोबर संसार मांडला असेल, असं सगळेच समजतात. आता कुणाकुणाचे उच्चार आणि समज बदलत बसणार!
 
माझी मुलगी मुंबईत जन्मली. आईच्या घरी पाचगणीला लहानपणी राहिली. नंतर आम्ही भोपाळ, लंडन करत ती तळेगावला हॉस्टेलवर अनेक गुजराती मुलांबरोबर तीन वर्षं राहिली. तिच्या एका वाक्यात या सगळ्या ठिकाणाचं शब्द, हेल, वाक्प्रचार यांचं मिश्रण आहे. जिथं तिला ही भाषा कमी पडते तिथं तिला बॉलीवूड नेमका हात देतं. गेल्यावर्षी पंधरा वर्षांची असताना ती एकटी लंडन, दिल्ली, भोपाळ, मुंबई, पुणे, पांचगणी, सांगली अशी फिरून आली. मस्त लोक आणि भाषा यांच्या असंख्य आठवणी घेऊन. 

मुलाचा जन्म इथलाच. मुलांना वयाच्या पाच वर्षांपर्यंत भाषा आत्मसात करण्याची जास्त कुवत असते. त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास चांगला होतो. मला स्वतःला कुठलीही भावना व्यक्त करताना हमखास मराठी शब्द आधी तोंडात येतो. असं असूनही मुलाच्या वयाच्या पाच वर्षांपर्यंत त्याला काही मराठी शिकवण्यात मी सफल झाले नाही.

त्याचं इंग्रजीही आमच्यापेक्षा वेगळंच ऐकू येतं. त्याच्या मते तर आम्ही इंडियन इंग्लिश बोलतो. इथल्या शाळांमधे मूकबधीरांसाठीची भाषा अगदी नर्सरीपासून शिकवतात. चिन्ह भाषा हा शब्द मला तितकासा पटत नाही. ती घरात फक्त त्यालाच येते. मी खूप वेळा त्याच्याकडून शिकायचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारात त्यानंही माझ्यासारखा त्याला मराठी, हिंदी शिकवण्यातला निष्फळपणा तेवढ्याच उद्विगतेनं अनुभवलाय! 

भारतभेटी आणि हिंदी सिनेमा यामुळे आता त्याला मराठी, हिंदी शिकायची इच्छा मात्र निर्माण झालीय. तो तसा प्रयत्न स्वतःहून करायला लागलाय. त्याच्या वयानुसार त्याला आता आपण इथल्या मुलांपेक्षा वेगळं आहोत, आपल्या घरचं वातावरण वेगळं आहे आणि भाषाही वेगळी आहे हे कळू लागलंय. त्याला हे समजून घेण्यात आणि शिकण्यात रस निर्माण झालाय.

अगदी आपली चड्डी सांभाळायचं ज्ञान नसतं अशा दोन तीन वर्षांच्या मुलांना हीच आपली भाषा, संस्कृती आणि आपण असंच वागायला पाहिजे हे थोपवणं मला खरं अन्यायकारक वाटतं. यात 'आपली' म्हणजे कुणाची भाषा, कुणाची संस्कृती हाही प्रश्न आहेच.

हेही वाचा : मराठी भाषेच्या अभिजातपणाची कूळकथा

आंतरजातीय, आंतरधर्मीय कुटुंबं आता सगळीकडेच दिसतात. अगदी परदेशी नाही गेलात तरी सातारा, सांगली, पुणं, विदर्भ, खानदेश इथली बोली वेगळी. मग आईच्या घरी बोलतात ती मराठी का बाबाची पुण्याची अलंकारिक मराठी? का तिकडच्या आजीच्या घरची गुजराती? या सगळ्या वावटळीत मला मुलांवर असं जबरदस्तीचं संस्करण कधीच पटलं नाही.

त्यामुळे त्यांच्या दोन्हीकडच्या संबंधावर, संवादावर काही फरक पडलाय असंही वाटलं नाही. आपल्या घरी, ज्या परिसरात आपण वाढतो त्याच्याशी आपली नाळ जुळणं, जातो तिथं आत्मविश्वासानं वागता येणं, चार माणसं जोडणं आणि कुठलाही गंड न बाळगता मानसिक दृष्ट्या सक्षम आणि संवेदनशील असणं याला माझ्या मते जास्त महत्त्व आहे.

जन्म, विकास, मरण हा तर सृष्टीचा नियम आहे. त्याचबरोबर परस्परावलंबी विकास हे उत्क्रांतीचं तत्त्व आहे. भाषा कशी याला अपवाद असणार? माझ्या आजोबांना मोडी यायची. माझे बाबा बोरू वापरून खूप सुंदर लिहायचे. माझी आई गरज आणि शाळेची उपलब्धता म्हणून मराठी शिकली, शिक्षिका झाली. आमच्या वेळेनुसार आम्ही अगदी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मराठीतच शिकलो. गरज म्हणून इंग्रजी आत्मसात केली. आमची मुलं आज इथल्या वातावरणात नवीन भाषा, नवीन संस्कृती शिकतायंत.

काय चांगलं आणि काय कमस्सल हे कसं ठरवणार? माझ्यासारख्या टायपिंग शिकून, कीबोर्ड संगणक शिकणाऱ्या पिढीला माझ्या मुलांची टच स्क्रीन वापरणारी पिढी मागास समजणार की हा तंत्रज्ञानाचा विकसित अविष्कार समजणार हे आपण काय दृष्टिकोन त्यांना देतो यावर अवलंबून आहे. बोरूच्या लिखाणातली सुंदरता आणि आजच्या टच स्क्रीनमधून रेखाटलेली, संपादित केलेली कलाकृती यांची तुलना होऊ शकत नाही. पण आपापल्या परीने दोन्ही सुंदर आहेतच ना!

हेही वाचा : 

फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई

‘नमस्ते वहाला’: भारतीय तरुण आणि कृष्णवर्णीय तरुणीची प्रेमकथा

एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट