जगातलं सगळ्यात मोठं यंत्र पुन्हा सुरु होतंय!

२७ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ३ मिनिटं


स्वित्झर्लंडमधलं ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ म्हणजेच एलएचसी हे मानवनिर्मित यंत्र डिसेंबर २०१८नंतर पुन्हा एकदा सुरु केलं जातंय. गेल्या तीन वर्षांत या यंत्रात बऱ्याच दुरुस्त्या झाल्या आहेत आणि आता हे यंत्र पुन्हा एकदा नव्या चाचण्यांसाठी सज्ज झालंय.

स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या सीमेवर असलेल्या ज्युरा पर्वतरांगांच्या खाली खणलेल्या २७ किलोमीटर लांब बोगद्यात जगातलं सगळ्यात मोठं मानवनिर्मित यंत्र बसवलं गेलंय. ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ म्हणजेच एलएचसी नावाने ओळखलं जाणारं हे यंत्र २०१८मधे तांत्रिक सुधारणेसाठी बंद करण्यात आलं होतं. आता ते यंत्र पुन्हा एकदा सुरु होणार असल्याने, जगभरातल्या भौतिकशास्त्रज्ञांमधे कमालीची उत्सुकता वाढलीय.

काय आहे ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’

‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ म्हणजेच एलएचसी हा एक पार्टिकल कोलायडर आहे. हा कोलायडर युरोपियन आण्विक संशोधन परिषद म्हणजेच ‘सर्न’च्या देखरेखीखाली नियंत्रित केला जातो.

हा कोलायडर मुख्यतः मूलकण भौतिकशास्त्राशी संबंधित प्रयोगांसाठी वापरला जातो. या कोलायडरमधे दोन वेगवगळ्या पार्टिकल म्हणजेच मूलकणांचा प्रकाशाच्या वेगात प्रवास घडवला जातो आणि त्यांची टक्कर घडवून आणली जाते. त्या दोन कणांच्या एकमेकांवर आदळण्यातून निर्माण होणाऱ्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी एलएचसीचा वापर केला जातो.

हे असे कोलायडर बनवणं खरं तर प्रचंड जिकिरीचं काम आहे. पण मूलकण भौतिकशास्त्रात दडलेल्या कित्येक रहस्यांचा वेध घेण्यासाठी असेच कोलायडर गरजेचे असतात. फक्त समग्र मूलकण भौतिकशास्त्रच नाही तर संपूर्ण भौतिकशास्त्रातही असे बरेच अनुत्तरीत प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची क्षमता सध्यातरी फक्त एलएचसीमधे असल्याने जगभरातले भौतिकशास्त्रज्ञ या यंत्राच्या पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्याची वाट बघतायत. 

हेही वाचा: चांद्रयान २: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान

एलएचसीने काय शोधलं?

एलएचसीच्या निर्मितीमागे मूळ कारण होतं हिग्ज बोसॉन या कणाचा आणि हिग्ज फिल्ड या जागेचा शोध. या कणाला सामान्य भाषेत देवकण असंही म्हणलं जातं. देवकण म्हणजे ज्या सगळ्यात छोट्या सूक्ष्मकणापासून सृष्टीची निर्मिती झाली असं मानलं जातं तो काल्पनिक कण. हा देवकन जिथं सापडतो किंवा निर्माण होतो ती जागा म्हणजे हिग्ज फिल्ड. या संकल्पनेमागे पीटर हिग्ज या भौतिकशास्त्रज्ञाचा सिंहाचा वाटा असल्याने त्याचंच नाव या कण आणि जागेला देण्यात आलं.

पीटर हिग्ज आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी हिग्ज यंत्रणेचा शोध लावला, ज्यानुसार मुलभूत कणांनाही वस्तुमान असू शकते, असा सिद्धांत मांडला गेला होता. हा सिद्धांत मूलकण भौतिकशास्त्रातल्या स्टँडर्ड मॉडेल म्हणजेच प्रमाण प्रतिकृतीचा महत्त्वाचा आधार होता. ठोस प्रात्यक्षिकाच्या आधाराशिवाय केलेल्या या सैद्धांतिक मांडणीला प्रत्यक्षात सिद्ध करणं अवघड होतं पण २०१२ मधे एचएलसीमुळे हे प्रात्यक्षिक सुरळीतपणे पार पडलं.

शास्त्रज्ञांनी ४० वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर या कणाची निर्मिती करण्यात यश मिळवलं आणि विश्वनिर्मितीमागच्या अनेक अवघड प्रश्नांचा रहस्यभेद आणखीनच सोपा झाला. भौतिकशास्त्राची उकल करताना नाचवल्या गेलेल्या कल्पनेच्या कागदी घोड्यांना प्रत्यक्षात नाचवण्यासाठी एलएचसीने मोकळं रान मिळवून दिलं.

आता नवी सुधारणा

३ डिसेंबर २०१८ला एलएचसीमधल्या सर्व चाचण्या थांबवण्यात आल्या. १० डिसेंबर २०१८पासून एलएस २ म्हणजेच दुसरं लाँग शटडाऊन सुरु झालं. याआधी १३ फेब्रुवारी २०१३ ते ५ एप्रिल २०१५ या कालावधीसाठी शटडाऊन केलं गेलं होतं. या दोन वर्षांत एलएचसीमधे मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या गेल्या.

२०१८मधे एलएचसीला दहापट अधिक प्रकाशमान करण्याच्या उद्देशाने दुसऱ्यांदा शटडाऊन केलं गेलं. २२ एप्रिल २०२२ला हे शटडाऊन उठवलं गेलं. या कालावधीत विस्तृत मजबुतीकरण प्रक्रियेमुळे अधिक मजबूत झालेला कोलायडर आणि इतर मोठ्या अंतर्गत सुधारणांमुळे अधिक अचूक माहिती मिळणार असल्याचा अंदाज 'सर्न'च्या प्रवेगक आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक माईक लॅमंट यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा: 

ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन

चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता

स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ