कैफी आझमींचं कवितेतलं स्वप्न साकारणारी शबाना

१४ जानेवारी २०२०

वाचन वेळ : १८ मिनिटं


महान शायर कैफी आझमी यांची आज १०१ वी जयंती. आज गुगलनेही डूडल बनवून अख्तर हुसैन रिजवी म्हणजेच कैफी आझमींना अभिवादन केलंय. उत्तर प्रदेशातल्या आझमगढ इथे जन्मलेल्या कैफींनी ‘कर चले हम फिदा, जान-ओ-तन साथियों’ सारखी देशभक्तीपर गाणी लिहिली. तसचं ‘मकान’ सारख्या कवितेतून आपली मुलगी शबाना आझमी यांच्या कामाची प्रेरणा बनले. सोशल एक्टिविस्ट मुलीला घडवणाऱ्या कलंदर बापाची ही गोष्ट.

आज १४ जानेवारी २०२० रोजी उर्दूचे महान शायर कैफी आझमी यांची जयंती आहे. यंदा त्यांच्या जन्मशताब्दीची सांगताही होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा ‘कैफी आझमीः जीवन आणि शायरी’ हा चरित्र ग्रंथ लोकवाङ्मय गृहतर्फे आज प्रकाशित होतोय. यानिमित्त या चरित्रग्रंथातल्या एका प्रकरणाचा हा संपादित अंश.


एकदा शबाना कैफींच्या डोळ्यांत आयड्रॉप्स घालत होती, तेव्हाचा हा किस्सा आहे.

कैफींचे डोळे बारीक होते आणि औषधांचे थेंब टाकण्यासाठी शबाना डोळ्यांच्या पापण्या मोठ्या करण्यासाठी बोट डोळ्याजवळ न्यायची, तेव्हा ते त्याची उघडझाप करायचे आणि तिला त्यामुळे किती वेळ तरी त्यांच्या डोळ्यांत औषध घालता येत नव्हतं. ते घालायच्या प्रयत्नात कधी गालावर तर कधी नाकावर पडायचं. तेव्हा शबानाचा हात कैफींनी हातात धरत म्हटलं, ‘एक गोष्ट आठवली ती सांगतो.’ आणि त्यांनी तिला एक कथा सांगितली.

तात्पर्य लक्षात आलं नाही का बेटी?

एक राजकुमार होता. त्याचा बाप राजा राजकुमार काहीच काम करत नसल्यामुळे परेशान होता. तेव्हा राजाजवळ एक गुरू आले आणि म्हणाले, ‘मी राजकुमाराला उत्तम तिरंदाजी शिकवेन.’ आणि राजानं त्यांना संमती दिली. सहा महिन्यानंतर राजकुमार तिरंदाजीत प्रवीण झाला का, हे पाहण्याची राजाची इच्छा झाली.

गुरूने तयारी केली आणि समोर एक तख्त ठेवून त्याचा भेद बाणांनी करावा अशी राजकुमाराला आज्ञा केली. राजकुमारानं बाण मारायला सुरवात केली. ते चारी दिशेनं - जिथं राजा आणि गुरू उभे होते, तिथेही जाऊ लागले. फक्त तख्ताच्या दिशेनं एकही बाण जात नव्हता. राजा आणि गुरूला प्रश्न पडला, राजकुमाराच्या बाणांपासून स्वत:चा बचाव कसा करायचा?

तेव्हा गुरू म्हणाले, ‘महाराज, आपण तख्ताच्या बाजूला जाऊन थांबलं तर बचाव होईल. केवळ तिथंच बाण येत नाहीत.’

शबाना भोळेपणानं म्हणाली, ‘पुढे काय झालं?’

‘काही नाही. संपली कहाणी.’ कैफी मिश्कीलपणे म्हणाले, ‘त्याचं तात्पर्य नाही का लक्षात आलं बेटी? अगं, तू माझ्या कानात आयड्रॉप्स घालायचा प्रयत्न कर, ते नक्कीच माझ्या डोळ्यांत जातील.’

क्षणभर शबाना फुरंगटली. मग हसत त्यांच्या गळ्यात पडत कृतक कोपानं म्हणाली, ‘अब्बा, आप भी!’

हेही वाचाः जावेद अख्तरनी कैफी आझमींवर कविता लिहिलीय

हर फादर्स प्राऊड डॉटर

कैफी हे शबानासाठी आणि बाबा (अहमद) ची बायको आणि त्यांची सून तन्वीसाठी केवळ अब्बा-पिता नव्हते, तर मित्र होते. त्यांच्या करियरच्या प्रगतीमधे रस घेणारे होते. त्यासाठी प्रोत्साहन देणारे होते. शबानानं त्यांच्याबद्दल भरभरून लिहिलंय आणि वेळोवेळी मुलाखत, व्याख्यानातून खूप काही त्यांच्याबद्दल अभिमानानं सांगितलंय. तिच्या विचारांवर आणि कृतीवर त्यांचा खूप प्रभाव आहे, हे तिनं स्वच्छपणे अनेकदा सांगून टाकलंय.

आज शबाना आंतरराष्ट्रीय कीर्तीची अभिनेत्री आहे. सामाजिक कार्यकर्ती आहे. अॅक्टिविस्ट आहे. तिच्या जडणघडणीत शौकतचं योगदान मोठं आहे, पण आपल्या बोलण्या-चालण्यातून आणि कृती-विचारातून कैफींनी शबानाला जी सम्यक जीवनदृष्टी दिली, ज्यामुळे ती ‘थिंकिंग अॅक्ट्रेस’ बनलीय आणि तिचं समाजिक भान, तशीच राजकीय समज तिला कैफीच्या प्रगतिशील शायरीनं आलीय. त्यामुळे ती नि:संशय ‘हर फादर्स प्राऊड डॉटर’ आहे.

तिचं आणि कैफीचं बाप लेकीचं मनोज्ञ नातं समजून घेताना कौटुंबिक कैफी जसं समजतात, तसंच ते जे विचार समाजात आपल्या शायरीतून मांडायचे, त्याची सुरवात घरापासून करायचे कारण ‘चॅरिटी बिगिन्स अॅट होम!’

पहिला धडा, आपलं ते साऱ्यांचं!

शबानाची बालपणीची पहिली आठवण आहे ती ‘रेड फ्लॅग हॉल’ या कम्युनची. जिथं विविध धर्म, प्रांत आणि भाषांचे आठ कॉम्रेड एकत्र राहात होते. तिथे शबाना सुरवातीची आठ वर्ष अब्बाअम्मी आणि भाऊ बाबासोबत होती. पण खरं तर ‘रेड फ्लॅग हॉल’ हे एक विशाल कुटुंब होतं. एका अर्थानं ‘मिनी इंडिया’ होतं. कारण तिथं भारताच्या भिन्न भिन्न प्रांतातले लोक जसं की उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि शौकतमुळे हैदराबाद तेलंगणा आणि हिंदू-मुस्लिम धर्मीय एकत्र राहात होते.

दिवाळी आणि ईद, पोंगल आणि संक्रांत, गर्बा आणि गणोशोत्सव एकत्रित साजरे व्हायचे. त्यामुळे शबाना आणि बाबावर सर्वधर्मसमभावाचे आणि शांततामय सहअस्तित्वाचे संस्कार एकत्र, प्रेमाने, मिळून मिसळून जगताना होत गेले. सर्वच कॉम्रेडला पार्टीकडून पंचेचाळीस रुपये मानधन मिळायचं. जे पुढे वाढत ७५ झालं. त्यात टुकीनं संसार खर्च भागवावा लागयचा. म्हणून चैन नव्हती, शानशौकी नव्हती, पण आनंदी आणि समृद्ध सहजीवन होतं.

आपलं जे आहे ते साऱ्यांचं आहे आणि साऱ्यांनी ते वाटून खायचं असतं, हा समतेचा पाठही इथंच शबाना आणि बाबानं गिरवला असणारा आणि मन:पूर्वक स्वीकारला असणार. त्या साऱ्यां कार्यकर्त्यांचं कम्युनिस्ट पक्षाचं फुलटायमर असणं, कॉम्रेड असणं आणि त्याचा सार्थ अभिमान बाळगणं, यामुळे त्या काळात काय पण आजही भारतात दुर्मिळ असलेली स्त्री-पुरुष समता त्या ‘रेड फ्लॅग हॉल’ मधे होती. त्यानं स्त्री पुरुष नातेसंबंधाला नवे आयाम दिले. त्यातही कैफीचा वाटा मोठा होता.

कारण शौकत त्या काळी पृथ्वी थिएटरमधे काम करत होती आणि तिला आठआठ, पंधरापंधरा दिवस नाटकांसाठी दौरा करावे लागायचे. त्या काळात तिचे अब्बा तिला आंघोळ घालायचे, केसांना कोंब करून रिबीन बांधायचे, खाऊ-पिऊ घालायचे. तेही सहजतेनं. अगदी मातेच्या ममतेनं कोवळ्या वयात दोन्ही भावंडांना अम्मी शौकतपेक्षा अब्बा कैफींचा सहवास अधिक लाभला आणि त्यांनीही शौकत इतक्याच त्यांना वाढवताना खस्ता खाल्ल्या. कदाचित त्यामुळे शबाना मनानं त्यांच्या अधिक निकट होती!

हेही वाचाः मोदी सरकारने इतिहासजमा केलेला लोकसभेतला अँग्लो इंडियन कोटा काय आहे?

कामयाबी नकल नही, आत्मविश्वास में हैं

शबाना कैफींना आपले मार्गदर्शक गुरू मानते, ते उगी नाही. तिच्या विचारांना ते विवेकी आणि पुरोगामी वळण सहजतेनं द्यायचे, तेही योग्य वेळी मोजकं हितोपदेश म्हणण्यापेक्षा ममतेनं समजावून सांगत. त्या संदर्भात शबानानं काही छोट्या आठवणी सांगितल्या आहेत, त्या मार्मिक आहेत.

तिच्या बालपणी कैफींकडे शबानानं बाहुलीसाठी हट्ट धरला असता, त्यांनी एक काळ्या रंगाची बाहुली आणली. ती पाहून शबाना चांगलीच खट्टू झाली. कारण तिच्या शाळेतल्या मैत्रिणीकडे सोनेरी केसांचा आणि निळ्या डोळ्यांच्या दिसायला सुंदर असणाऱ्या बाहुल्या होत्या. त्यांच्या पुढेही काळ्या रंगाची बाहुली घेऊन खेळायला जायचं? छट्. तिनं आपली नाराजी बोलून दाखवली. तेव्हा त्यांनी तिला समजावून सांगताना म्हटलं होतं, ‘बेटी, सारेच रंग सुंदर असतात. काळा रंगही सुंदर आहे. ब्लॅक इज ब्युटिफूल आणि रंगभेद हा चुकीचा आहे.’ पण तरीही तिची समजूत पटली नव्हती. 

याच काळात कैफींचे गीत असलेले काही सिनेमे आले होते, त्यांचे जाहिरातीत नाव गीतकार म्हणून ठळकपणे छापलं जात होतं. तसंच मुशायऱ्याच्या बातम्या आणि फोटोपण यायचे. त्यामुळे साऱ्या वर्गात तिची कॉलर टाईट झाली. कारण बाकीच्या ३९ विद्यार्थ्यांचे वडील पैसेवाले, श्रीमंत असतील, पण कलावंत कुठे होते? त्यांची नाव रोजरोज वर्तमानपत्रात कुठं प्रसिद्ध होत होती? त्यामुळे आता तिला आपली काळी बाहुली आवडू लागली.

मग ती बाहुली घेऊन शबाना वर्गात गेली आणि आपली बाहुली सर्वांपेक्षा वेगळी तर आहेच पण सुंदरसुद्धा आहे हे पटवून दिलं. त्यामुळे तिच्या मैत्रिणींना आपल्या निळ्या-सोनेरी रंगांच्या बाहुल्या आवडेनाशा झाल्या. शबाना हे सांगून ‘अब्बा’ नामक स्मृतिलेखात म्हणते, ‘ये सबसे पहला सबक था, जो अब्बाने मुझे सिखाया कि कामयाबी दुसरों की नकल से नही, आत्मविश्वास में हैं।’

आपले अब्बा इतरांपेक्षा वेगळे कसे?

शबानाला कैफींनी मुंबईच्या उत्तम दर्जाच्या आणि भारी फी असणाऱ्या इंग्रजी शाळेत घातलं होतं आणि तिच्या फीसाठी, कपडेलत्ते, सहली आणि गॅदरिंगच्या खर्चाची तरतुद व्हावी म्हणून त्यांनी सिनेमात गीतलेखन आणि प्रसंगी पटकथा लेखन सुरू केलं होतं. शबानाच्या इंग्रजी शाळेतलं वातावरण तिच्या घरच्या वातावरणापेक्षा किती तरी वेगळं होतं. तिला आपले अब्बा प्रिय होते, पण ते इतरांपेक्षा वेगळे कसे, असा प्रश्न तिच्या अबोध बालमनाला पडायचा.

त्या संभ्रमाबद्दल शबानानं लिहिलंय, ‘वो कभी दुसरों जैसे थे ही नहीं, लेकिन बचपन में ये बात मेरे नन्हें से दिमाग में समाती नहीं थी। न तो वे आफिस जाते थे, न अंग्रेजी बोलते थे और न दुसरों के डॅडी और पापा की तरह पैन्ट और शर्ट पहनते थे। सिर्फ सफेद कुर्ता -पजामा। वो ‘डॅडी’ या ‘पापा’ के बजया ‘अब्बा’ थे। ये नाम भी सबसे अलग ही था। मैं स्कूल में अपने दोस्तों से उनके बारे में बात करते हुए कतराती ही थी। झूठ मूठ कह देती थी। वो कुछ ‘बिजनेस’ करते है। वर्ना सोचिए, क्या यह कहती कि मेरे अब्बा शायर है? शायर होने का क्या मतलब? यही न कि कुछ काम नहीं करते।’

‘अब्बा को छुपाकर रखना ज्यादा दिन मुमकीन न रहा। उन्होंने फिल्मों में गीत लिखना शुरू कर दिया था, और एक दिन मेरी एक दोस्त ने क्लास में आकर बताया कि उसने मेरे अब्बा का नाम अखबार में पढ़ा है। बस, उस पल के बाद बाज़ी पलट गई। जहाँ शर्मिन्दगी थी, वहाँ गौरव आ गया। चालीस बच्चे थे क्लास में मगर किसी और के डैडी या पापा का नहीं, मेरे अब्बा का नाम छपा था अखबार में। अब मुझे उनका सबसे अलग तरह का होना भी अच्छा लगने लगा। वो सबकी तरह पैन्ट-शर्ट नहीं, सफेद कुर्ता-पाजामा पहनते थे- जी!’

कैफी तसं गंभीर प्रकृतीचे, कमी बोलणारे पण जास्त ऐकणारे. मुलांसाठी मात्र ते थट्टा मस्करी करणारे, गोष्टी सांगणारे, दिलखुलास पिताजी होते. ते दरवर्षी शबानाला हमखास एप्रिल फूल करायचे. त्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवायचे. शबानानं लिहिलंय की, फार कमी लोकांना त्यांच्या ‘सेन्स ऑफ ह्युमर’ किती जबरदस्त आहे हे माहीत आहे. ते घरी मूडमधे असले की विविध कारणास्तव येऊन गेलेल्या लोकांच्या छान नकला करून दाखवायचे आणि स्वत: बरोबर घरच्या साऱ्या सदस्यांना मनमुराद हसवायचे. हसताना कैफींच्या डोळ्यांत पाणी यायचं, तरीही त्यांचे जोक्स, किस्से आणि नकला थांबायच्या नाहीत.

फक्त एका महागड्या गोष्टीचा शौक

कैफींनी पक्षकार्यासाठी फकिरी पत्करली होती आणि पार्टी देईल त्या तुटपुंज्या मानधनावर १९४३ ते १९६० पर्यंतर तरी किमान अभावाचं जगणं जगत होते. त्यामुळे साधं राहाणं,  कुडता पायजमा हा त्यांचा आयुष्यभराचा पोशाख, कम्युनमधे सामुदायिक जीवन जगणं त्यांनी आनंदानं पत्करलं होतं. त्यांच्या गरजा त्यामुळे मर्यादित होत्या, पण एक महागडा शौक त्यांना जरूर होता, तो म्हणजे ‘माँट ब्लॅक’ या महागड्या ब्रँडेड पेनचा.

ते केवळ याच पेननं लिहायचे. त्यांनी ‘माँट ब्लॅक’ पेनचा किती तरी मोठा संग्रह जमा केला होता. ही त्यांची कम्युनिस्ट असूनही मोठी महागडी पुंजी-कॅपिटल होतं हा गुन्हा त्यांनी कलावंतांच्या लेखणीच्या स्वातंत्र्याच्या नावाने घेतला असणार. एकदा शबानाला तिच्या एका मित्रानं ‘माँट ब्लॅक’ पेन भेट दिला. त्यावर कैफींनी डल्ला मारला आणि आपल्या खजिन्यात जमा केला.

आणि त्यावर कडी म्हणजे त्यांनी तिच्या त्या मित्राला पत्र लिहून कळवलं की, त्यानं दिलेली भेट त्यांच्या जवळ शबानापेक्षा अधिक सुरक्षित राहील आणि तिचा उपयोगही अधिक होईल. ही आठवण सांगताना शबानाचं मन वडलांच्या आठवणीनं अभिमानानं भरून येतं. ते रास्तच आहे. ‘माँट ब्लॅक’ या पेनद्वारेच तर त्यांनी त्यांच्या अजरामर काव्यरचना कागदावर उतरवल्या होत्या. ज्या नंतर कैफींच्या भरदार मर्दाना आवाजात मुशायऱ्यात ऐकून रसिकांच्या मनात कायमस्वरूपी बसून गेल्या होत्या.

हेही वाचाः बदललेल्या वास्तवात समकाळाशी जोडून घेणं दिवसेंदिवस अशक्य होतंय!

‘सोशल अॅक्टीविजम’ची प्रेरणा

शबाना कैफींचं विचार, बोलणं, तसंच आचरण बघत मोठी झाली, त्याचा तिच्या मनावर खोल प्रभाव पडलाय. तसंच त्यांची शायरी, त्यातल्या पुरोगामी आणि प्रगतिशील आशयानं तिची वैचारिक बैठक घडलीय. त्यामुळे तिनं अभिनेत्रीच्या वलय आणि लोकप्रियतेचा वापर करून काही ठोस सामाजिक कामं केलीत. तिच्या ‘सोशल अॅक्टीविजम’ची चांगलीच दखल पुरस्कार आणि सन्मानाने घेण्यात आलीय. आपल्या या सामाजिक कार्याचं प्रेरणास्रोत अब्बा कैफी आझमीच आहेत, हे तिनं सांगताना लिहिलंय,

‘बाप होने के नाते तो अब्बा मुझे ऐसे लगते है जैसे एक अच्छा बाप अपनी बेटी को लगेगा. मगर जब उन्हें एक शायर के रूप में सोचती हूँ तो आज भी उनकी महानता का समन्दर अपरम्पार ही लगता है। मैं ये तो नहीं कहती की मैं उनकी शायरी को पूरी तरह समझती हूँ, और उसके बारे में सब कुछ जानती हूँ, मगर फिर भी उनके शब्दों से जो तस्वीरें बनती हैं, उनके शेरों में जो ताकद छुपी होती है, उनकी सोच का जो विस्तार है, वो मुझे हैरान-सा कर देता है।वो अपने दुख और अपने गम को भी दुनिया के दुख-दर्द से मिलाकर देखते है।’

‘उनके सपने सिर्फ अपने लिए नहीं, दुनिया के इन्सानों के लिए हैं। चाहे वह झोपड़पट्टी वालों के लिए हो या नारी अधिकार की बात या साम्प्रदायिकता के विरुद्ध मेरी कोशिश, उन सब रास्तों में अब्बा की कोई न कोई नज्म मेरी हमसफर है । वो ‘मकान’ हो, ‘औरत’ हो या ‘बहुरूपनी’ - ये वो मशाले हैं जिन्हें मै लेकर अपने रास्तों पर चलती हूँ। दुनिया में कम ऐसे लोग होते हैं, जिनकी कथनी और करनी एक होती है । अब्बा ऐसे इन्सान हैं - उनके कहने और करने में कोई अन्तर नहीं है मैंने उनसे यही सिखा है कि सिर्फ सही सोचना और सही कहनाही काफी नही है, सही कर्म भी होने चाहिए।’

गरिबांना पक्क्या घरांसाठीचा संघर्ष

१९४३ मधे मुंबईला आल्यावर कैफी हे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, गरीब श्रमकरी कामगार संघटनेचं काम करत होते. घर बांधकामाचं नवं तंत्रज्ञान नसलेल्या त्याकाळात कामगार आपल्या जीवतोड मेहनतीनं श्रीमंताची घरं, बंगले बांधायचे. पण नंतर या कामगारांना तिथं साधा प्रवेशही दिला जात नाही, हे कैफींनी जवळून पाहिलं होतं.

त्या अनुभवावर आधारित ‘आवारा सजदे’मधे समाविष्ट केलेली ‘मकान’ कविता मदनपुरा-डोंगरीपाडा इथे कामगार वस्तीत आणि झोपडपट्टीत राहून फिरून त्यांची कामं करताना लिहिली होती. ती कविता शबानाला ‘निवारा हक्क समिती’तर्फे गरिबांना पक्की घरे पुर्नवसन म्हणून मिळावीत यासाठी प्राणांतिक उपोषण करण्यासाठी मार्गदर्शक ठरली.

मकान

आज की रात बहुत गर्म हवा चलती है
आज की रात न फुटपाथ पे नींद आएगी
सब उठो, मैं भी उठू, तुम भी उठो, तुम भी उठो
कोई खिड़की इसी दीवार में खुल जाएगी
ये ज़मीं तब भी निगल लेने पे आमादा थी
पाँव जब टूटती शाखों से उतारे हमने
इन मकनों को खबर है न मकीनों को खबर
उन दिनों की गुंफाओं में जो गुज़ारे हमने
हाथ ढलते गए सांचे में तो थकते कैसे
नक्श के बाद नए नक्श निखारे हमने
की वह दीवार बुलंद, और बुलंद, और बुलंद
बामो-दर और, ज़रा और सँवारे हमने
आँधियाँ तोड लिया करती थीं शम्ओं की लवें
जड़ दिए इसलिए बिजली के सितारे हमने
बन गया कस्त्र तो पहरे पे कोई बैठ गया
सो रहे खाक पे हम शोरिशे-तामीर लिए
अपनी नस-नस में लिए मेहनते-पैहम की थकन
बंद आँखों में उसी कस्त्र की तस्वीर लिए
दिन पिघलता है उसी तरह सरों पद अब तक
रात आँखों में खटकती है सियह तीर लिए
आज की रात बहुत गर्म हवा चलती है
आज की रात न फुटपाथ पें नींद आएगी
सब उठो, मैं भी उठू, तुम भी उठो, तुम भी उठो
कोई खिड़की इसी दीवार में खुल जाएगी

या कवितेपासून प्रेरणा घेऊन हक्काचं घर नाही, अशा झोपडपट्टीवासियांसाठी लढा देण्यास शबाना कशी प्रवृत्त झाली आणि प्राणांतिक उपोषणाचं महात्मा गांधी प्रणित शस्त्र उपसून तिनं हजारो झोपडपट्टीधारकांना हक्काचं पक्क घर कसं मिळवून दिलं, त्याची हकिकत शौकत आझमींनी आपल्या ‘कैफी आणि मी’ या आत्मकथनात सांगितलीय.

हेही वाचाः अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींच्या मृत्यूने तिसरं महायुद्ध होणार?

कवितेने साकारला आशियातला सर्वांत मोठा पुनर्वसन प्रकल्प

‘१९८५ साली गौतम घोष या बंगालमधल्या प्रख्यात दिग्दर्शकाच्या ‘पार’ सिनेमाच्या शूटिंगसाठी शबाना कलकत्त्याला गेली होती. ‘पार’ची कहाणी बंगाल आणि बिहारमधल्या खेडेगावांतल्या, रोजगाराच्या आशेने शहरात येऊन गलिच्छ झोपडपट्ट्या आणि पदपथांवर राहणार्या बेरोजगार आणि गरीब लोकांबाबतची होती. शबाना ज्या गेस्टहाऊसवर उतरली होती तिथे झाडलोट करणारी मुलगीही अशाच एका वस्तीतली होती.

शबानाला जी भूमिका साकारायची होती, ती अशाच वर्गातल्या बाईची असल्याने ती भूमिका जिवंत करण्याच्या दृष्टीने, शबानाने त्या मुलीशी जरा मैत्री केली. एक दिवस ती मुलगी शबानाला आपल्या घरी घेऊन गेली. तिची गरिबी पाहून शबाना अंतर्बाह्य हादरली. ती मुलगी आणि तिच्या घरचे ज्या परिस्थितीत राहात होते, ते बघितल्यावर शबानाचा जीव चरकला. मात्र ते लोक गरीब असले तरी अतिशय अतिथ्यशील होते.

शुटिंग संपल्यावर शबानाच्या मनात विचार आला, ‘मी या मुलीला भेटून, तिच्याशी बोलून माझी भूमिका समजावून घेतली. उद्या हा सिनेमा प्रदर्शित होईल. माझं कौतुक होईल. मला पुरस्कार मिळतील. पण या मुलीला काय मिळेल? माझ्या कामासाठी, करियरसाठी, प्रसिद्धीसाठी मी तिचा वापर केला, ही वस्तुस्थिती नाही? उद्या मी मुंबईला परत जाईन. माझ्या विश्वात रममाण होईन आणि विसरूनही जाईन, की ती मुलगी मला ‘आपली’ समजून स्वत:च्या घरी घेऊन गेली होती. पण ती आजही त्याच स्थितीत आहे आणि कदाचित कायमच त्याच स्थितीत राहील. तिला विसरणं माझा स्वार्थीपणा होणार नाही? नाही. मी तिला विसरू इच्छित नाही. मला तिच्यासाठी आणि तिच्यासारखंच जगणार्या असंख्यांसाठी काही ना काही करायलाच हवं’ - तिचा निर्णय पक्का झाला.

मुंबईत परत आल्यावर तिने आनंद पटवर्धनांची झोपडपट्ट्यांबाबतची फिल्म ‘हमारा शहर’ बघितली. जो निर्णय तिने कलकत्त्याला शूटिंगच्या दरम्यान घेतला होता, तो अधिकच पक्का झाला. ‘निवारा हक्क सुरक्षा समिती’च्या कामात तिने स्वत:ला झोकून दिलं. मुंबईतल्या पदपथांवर आणि झोपडपट्ट्यांत राहाणार्यांसाठी काम करणारी ही संघटना आहे.

योगायोग असा की त्याच सुमारास, कुलाब्यातील ‘संजय गांधी नगर’ ही २५ वर्षं जुनी झोपडपट्टी महापालिकेच्या निर्दय लोकांनी रातोरात बुलडोझर फिरवून उद्ध्वस्त करून टाकली. ‘निवारा हक्क’चे कार्यकर्ते तळमळले. त्यांचं म्हणणं होतं, की २५ वर्षांपासून हे लोक जिथे राहातात तिथून त्यांना तुम्ही उठवताय. मग त्यांना त्या जागेच्या बदल्यात पर्यायी जागा मिळायला हवी. सरकारने हे मान्य केलं नाही. मग त्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा निर्णय ‘निवारा हक्क’च्या लोकांनी घेतला. ठरलं असं की आनंद पटवर्धन आणि झोपडपट्टीचे तीन रहिवासी मिळून उपोषणाला बसतील.

शबानाला वाटलं, की यावेळी आपण त्यांना साथ द्यायला हवी. खरं तर त्याच्या दुसर्याच दिवशी तिला ‘जेनेसिस’ या मृणाल सेन यांच्या चित्रपटासाठी फ्रान्सच्या ‘कान्स फेस्टिव्हल’ला जायचं होतं. पण या लोकांना या अवस्थेत सोडून ‘फिल्म फेस्टिव्हल’ला जायला तिचं मन तयार होईना. तिने हा विषय जावेदकडे काढला. (तोपर्यंत त्या दोघांचं लग्न झालं होतं.) जावेदने अतिशय गंभीर्याने विचार करून तिला सांगितलं, ‘तू एक अतिशय प्रख्यात अशी अभिनेत्री आहेस. जिथे ते लोक उपोषण करतायत ती जागा अतिशय त्रासदायक आहे. तुला खूप त्रास होईल. पण तो त्रास जर तू सहन करू शकलीस, तर लोकांना त्याचा खूप फायदा होईल.’

मी जेव्हा हे ऐकलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी बेमुदत उपोषणाच्या बाजूने अजिबात नव्हते. पण मी गप्प राहिले. कैफी तेव्हा पाटण्याला होते. शबानाने फोनवर त्यांना हे सांगितलं, तर ते म्हणाले, ‘बेस्ट ऑफ लक, कॉम्रेड.’

सकाळची वेळ होती. सगळ्यांची गळाभेट घेऊन ती बेमुदत उपोषणासाठी निघून गेली. ही मे १९८६ची घटना आहे. संध्याकाळी मी जेव्हा माझ्या बाळीला बघायला गेले, तेव्हा ती जागा बघून माझं अवसानच गळालं. रस्त्याच्या बाजूला काही फाटक्या चादरी लावून एक छप्पर बनवण्यात आलं होतं. ऊन अतिशय कडक होतं. खाली लाकडी बाकांवर एक मोठी सतरंजी अंथरली गेली होती. ना गादी, ना लोड. अंगावर ओढून घ्यायला काही जुन्या चादरी. त्या छोट्याशा जागेत पाच जण पहुडले होते. त्यात एक, माझी शबाना होती. माझं हृदय पिळवटून आलं. पण मी काहीच बोलले नाही. डोळे पाण्याने भरून येत होते, पण मी ते अश्रू पिऊन टाकले. चेहऱ्यावर खोटं हसू धरून मीही खूप घोषणाबाजी केली.

माझ्या मुलीचा धीर मला खचायला नको होता. मात्र चौथ्या दिवशी माझं अवसान साफ गळालं. घरी परतता परतता माझे डोळे अनिर्बंध वाहू लागले. या लोकांसाठी माझ्या खुदाकडे प्रार्थना करण्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हते. मी प्रार्थना करत होते, की ‘खुदा, यांच्या उद्दिष्टांत यांना सफलता दे.’

उपोषणाचा पाचवा दिवस होता. शशी कपूर शबानाला भेटायला आले. तोपर्यंत शबाना खूपच अशक्त झाली होती. तिचा रक्तदाब अतिशय खाली आला होता. तिला बघून ते तात्काळ मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांना भेटले आणि त्यांना म्हणाले, ‘गरज पडल्यास तुम्ही आम्हा कलाकारांना ‘चॅरिटी शो’ वगैरे करून पैसे जमवायला सांगता, पण यावेळी आमचीच एक सहकारी जीवनमरणाशी झुंज देते आहे, त्याचं तुम्हाला काहीच नाही?’ मग पुढे शशी कपूरनी त्यांना सारी परिस्थिती सांगितली. शबानाच्या तब्येतीविषयीही सांगितलं. 

मुख्यमंत्र्यांनी तत्क्षणी उपोषणकर्त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करायचा आदेश दिला. मग लगेच, तोपर्यंत ‘या झोपडपट्टीवासियांना कुठेच पर्यायी जागा देणार नाही’ अशी ताठर भूमिका घेणारे अन्यायी अधिकारी संत्र्याचा रस घेऊन उपोषणकर्त्यांकडे गेले आणि त्यांनी या झोपडपट्टीवासियांना पर्यायी जागा देण्याचं आश्वासन दिलं. ते उपोषण असं संपलं आणि माझ्या मुलीचा जीव वाचला. माझ्या जिवात जीव आला. काही वर्षांनंतर सरकारने त्यांना दुसरी जमीन दिली. तिथे त्यांनी त्यांची घरं बांधली. एक सामाजिक कार्यकर्ता या भूमिकेतलं शबानाचं ते पहिलं पाऊल होतं.

शबाना ज्याची अध्यक्ष आहे, त्या निवारा हक्क समितीने २००७ मधे नॅशनल पार्कमधून विस्थापित झालेल्या १२ हजार झोपडपट्टीवासियांना पक्की घरं मोफत बांधून दिली. हा केवळ भारतातलाच नाही तर संपूर्ण आशिया खंडातला सर्वांत मोठा पुनर्वसन प्रकल्प आहे. मला असं वाटतं, की  इथे मुलीच्या जीवनाची नाळ, ४५ वर्षांपूर्वी बेघर मजुरांच्या व्यथेवर ‘मकान’ ही कविता लिहिणार्या पित्याच्या जीवनाशी अचूकपणे जोडली गेली.’

एक कवी कल्पना अशा रीतीने साकार होण्याचं भाग्य किती कवींना लाभतं? ते शबानामुळे कैफींना लाभलं. त्या बारा हजार घरात कैफी कदाचित आठवणार नाहीत, पण त्या घरात वारे नक्कीच ‘मकान’ कविता गुणगुणत प्रवेश करीत असणार.

कौमी एकतेचा वारसा

हिंदू-मुस्लिम सौहार्द आणि बंधुता म्हणजेच कौमी एकता हा कैफींचा ध्यास होता, कलावंत म्हणून स्वप्न होतं. पण होणाऱ्या दंगलीमुळे व्यथित होऊन त्यांनी ‘साप’, ‘बहुरूपनी’ आणि ‘दुसरा वनवास’ सारखा कालजयी नज्म लिहिल्या, त्यातील व्यथा आणि स्वप्न शबानाच्या धमन्यात उतरलं होतं.

शबानानं १९८३ मधे स्वामी अग्निवेश आणि असगर अली इंजिनियरनी कौमी एकता आणि हिंदू-मुस्लिम भ्रातभावासाठी नियोजित पदयात्रेत, जी दिल्ली ते मीरत अशी चार दिवसांची होती, त्यात भाग घेण्याचा निर्णय शबानाने घेतला. ती जेव्हा शबाना मुंबईहून दिल्लीला पदयात्रेसाठी जाणार होती, तेव्हा घरच्यांच्या काळजीमुळे काहीशी बेचैन झाली होती.

तिला अनेक चाहते आणि हितचिंतकांकडून सांगण्यात आलं की, अभिनेत्रीनं आणि तेही हिंदी सिनेअभिनेत्रीनं पदयात्रेत भाग घेणं खूप धोकादायक आहे. उत्तर प्रदेशचे रस्ते धोकादायक आहेत. प्रसंगी तिचे कपडे फाडले जातील वगैरे वगैरे. त्यामुळे पूर्ण घर आणि कुटुंब - जावेद, शौकत, बाबा आणि तन्वी सारे चिंताग्रस्त होते.

तेव्हा शबाना कैफींच्या खोलीत गेली आणि त्यांना पाठीमागून बिलगली. तिच्या थरथरत्या स्पर्शातून त्यांना सारं कळलं होतं. त्यांनी तिला समोर बसवत तिच्याकडे पाहात एवढंच म्हटलं, ‘अरे मेरी बहादूर बेटी, डर रही हो? जाओ, तुम्हे कुछ नही होगा।’ त्यांचे डोळे भयमुक्त होते, तिच्या निर्णयाच्या वाटणाऱ्या अभिमानानं चमकत होते. कारण कौमी एकता हे त्यांचं जन्मभरीचं स्वप्न आणि ध्यास होता. त्यासाठी त्यांची बेटी पदयात्रा काढणार होती. त्यांच्या त्या धीरयुक्त बोलानं आणि भयमुक्त आणि अभिमानयुक्त नजरेनं तिच्यात नवा जोम संचारला. जणू तिच्या रक्तात ताजं ऑक्सिजनरूपी चैतन्य ओतलं गेलं होतं.

ती, स्वामी अग्निवेश आणि असगरअली इंजिनिअरच्या खांद्याला खांदा लावून पदयात्रेत निर्भयपणे सामील झाली, आणि पदयात्रेत सामील झालेल्यांना आणि ठिकठिकाणच्या सभेत बोलताना ती कैफीच्या शायरीचे संदर्भ देत धार्मिक शांततेचं आवाहन आम नागरिकांना करत होती. धर्मद्रोह म्हणजे ‘साप’ अशी प्रतिमा वापरून कैफींनी त्याचा कडाडून निषेध केला. ‘साप’ नावाची एक नज्म लिहिली होती, त्यात त्यांनी कौमी एकता कशी भारतात साकार होईल हे सांगताना कवितेच्या शेवटी लिहिलं होतं,

‘ये (साँप) हिंदू नही है मुसलमाँ नही
ये दोनो के मग्ज (मेंदू) और खूँ चाटता है
बने जब ये हिंदू मुसलमाँ इन्साँ
उसी दिन ये कंबख्त मर जायेगा!’

हेही वाचाः न्या. लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी अमित शाहांचं टेन्शन वाढवणार?

‘उन्मादी वेडेपणा काही काळानं विरून जाईल’

कैफी शबानाबाबत बाप म्हणून प्रेमळ तसंच कमालीचे हळवे होते. १९७३ मधे अर्धांगवायूमुळे त्यांच्या शरीराचा डावा भाग- हात आणि पायासह अपंग-लुळा झाला. त्यांना पी. सी. जोशींनी प्रयत्न करून अधिकच्या प्रगत उपचार आणि आरामासाठी रशियाला पाठवलं होतं. त्या काळात शबानाचा वाढदिवस आला होता. त्या प्रसंगी आपल्या अपंगत्वामुळे ते हळूवार झाले होते आणि मुलांची काळजी करीत होते. त्या दिवशी त्यांनी ‘एक दुवा’ नामक ‘शबाना के जन्मदिन पर’ असं उपशीर्षक असलेली चार ओळींची एक हृद्य कविता लिहिली,

एक दुवा - शबाना के जन्मदिन पर

‘अब और क्या तिरा बीमार बाप देगा तुझे
बस इक दुआ कि खुदा तुझ को कामयाब करे
वह टाँक दे तिरे आँचल में चाँद और तारे
तू अपने वास्ते जिसको भी इन्तिखाब करे।’

खरं तर आजारी पडण्यापूर्वी २००२ च्या गुजरात दंगलीनं आणि निर्घृण नरसंहारानं ते मूक झाले होते. टीवीवर त्या जिनोसाईडच्या बातम्या बेडवर पडून पाहाताना डोळ्यांतून नकळत अश्रू अविरतपणे झरायचे. अशाच एका क्षणी शबानानं त्यांना विचारलं होतं, ‘तुम्हाला निरर्थकतेची भावना नाही वाटतं या दंगली पाहून, ज्या धर्माच्या नावाने असाह्य बायका-मुलांचे खून पडतात?’

कैफी आपल्या डोळ्यांतील वाहणाऱ्या आसवांकडे लक्ष न देता शबानाचे डोळे पुसत म्हणाले, ‘या दंगली उस्फूर्त नाहीत. क्षूद्र राजकीय फायद्यांसाठी त्या घडवून आणलेल्या आहेत.’ आणि मग थोडं थांबून खोल विचार करत पुढे म्हणाले, ‘सामान्य माणसाला आज रोटी, कपडा आणि मकान हवंय - मग ते कोणत्याही धर्म-पंथाचे असू देत. माझा विश्वास आहे की, हा उन्मादी वेडेपणा काही काळानं विरून जाईल.’

ते कायम आशावादी होते. सामान्य माणसांच्या मूलभूत चांगूलपणावर त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणूनच ते म्हणत,

‘प्यार का जश्न नई तरह मनाना होगा
गम किसी दिल में सही, गम को मिटाना होगा।’

देशातील प्रत्येक दु:खी माणसाचा अश्रू पुसायचा असेल तर क्रांती झाली पाहिजे, पण शांततामय, ही त्यांची भावना होती. म्हणूनच नव्या पिढीकडून त्यांनी अशी अपेक्षा ठेवली होती.

‘कुछ तो सूद चुकाये कोई तो जिम्मा ले
उस इन्किलाब का जो आज तक उधार सा है।’
(कुणी तरी व्याज भरावे, कुणी तरी जिम्मेदारी घ्यावी
त्या क्रांतीची, जी आजपर्यंत आपल्यावर उधार आहे.)

कैफींनी ऐन तारुण्यात जी क्रांतीची, गरिबी-श्रीमंतीचा भेद मिटवणाऱ्या समाजवादाची स्त्री-पुरुष समता आणि कामगार- शेतकऱ्यांच्या खुशहालीची स्वप्नं पाहिली होती, ती त्यांच्या अंत्यसमयीपण दूर दूर कुठे दृष्टिक्षेपात दिसत नव्हती. शबानानंच वैतागून असं म्हणलं एकदा, तेव्हा त्यांनी कायम आशावादाचा सूर लावत जे तत्तज्ञानपर विधान केलं, ते समाजजीवनात सामाजिक कार्य करणार्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी भिंतीवर फ्रेम करून लावावं आणि तसं अंतरंगी मुरवावं असं आहे.

‘जेव्हा तुम्ही समाजजीवनात परिवर्तन व्हावं म्हणून काम करता, तेव्हा नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, जे परिवर्तन तुम्हाला अपेक्षित आहे, ते कदाचित तुमचा जीवन काळात घडून येणार नाही. पण तुमचा काम करताना हा दृढ विश्वास असला पाहिजे की, जर तुम्ही विशिष्ट ध्येयाने समाजपरिवर्तनाचं काम करीत राहिलात तर, ते परिर्वतन तुम्ही जगाच्या पटलावरून गेल्यानंतर कधी तरी नक्कीच येणार आहे.’

 

पुस्तकाचं नावः कैफी आझमी : जीवन आणि शायरी
लेखक: लक्ष्मीकांत देशमुख
किंमतः ३५० रुपये
फोन नंबर: 022-24362474

हेही वाचाः 

मुस्लिमांना औदार्याची एक संधी चालून आलीय

बाबरी मशीद निकालानंतर मुस्लिमांनी काय करावं?

र धों. कर्वेंचा बुद्धिवाद अस्सल आणि आरपार होता

अश्लीलता ही काय भानगड आहे: र. धों. कर्वेंचं न झालेलं भाषण

संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो