देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!

२४ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ९ मिनिटं


आपला गणपती बप्पा हे आदर्श नेत्याचं प्रतीक आहे. फक्त राजकारणातल्याच नाही तर प्रत्येक क्षेत्रातल्या नेत्यांला आदर्श ठरू शकेल असं त्याचं रुप आहे. कॉर्पोरेट मॅनेजमेण्टमधेही ‘लीडरशिप’च्या गुणावगुणांवर अभ्यास होतो. तिथंही गणराजाला आदर्श म्हणून ठेवता येतं. अर्थात त्यासाठी आपण फक्त आपल्या या लाडक्या विश्वविनायकाकडे डोळे उघडे ठेवून बघायला मात्र हवं.

निवडणुका जवळ आल्या की लोकशाहीचे नगारे वाजू लागतात. पुन्हा प्रश्न उभा राहतो, ‘देश का नेता कैसा हो?’ म्हणजेच राज्याचा नेता कसा हवा? प्रत्येकजण आपआपल्या परीने त्याचं उत्तर देतं. निवडणुकीआधी त्यावरून वाद होतात. निकाल आल्यावर तर आणखी धुमारे फुटतात. आम्हा मीडियावाल्यांना गरमागरम बातम्या मिळतात. टीवीवर चर्चा झडते. सगळीकडे गप्पा रंगतात. पण सगळ्यांचं समाधान होईल असं उत्तर मात्र सापडत नाही.

भारतीय परंपरेने ‘देश का नेता कैसा हो?’ या प्रश्नाचं उत्तर देऊन ठेवलंय. ते उत्तर आहे ‘गणपती बाप्पा जैसा हो’. आश्चर्य वाटलं? पण आपला गणपती बाप्पा हे आदर्श नेत्याचं प्रतीक आहे. फक्त राजकारणातच नाही तर आधुनिक कॉर्पोरेट मॅनेजमेण्टमधेही ‘लीडरशिप’च्या फंड्यांतही तो आदर्श ठरतो. त्यासाठी आपण मात्र विश्वविनायकाकडे डोळे उघडे ठेवून बघायला हवं.

धर्मात डोकं वापरा!

देवधर्म म्हणणारे श्रद्धेने डोळे मिटून घेतात. नको म्हणणारे तिरस्काराने. डोळे मिटले की वाटोळ होतंच. डोळे आणि डोकं उघडं ठेवून देवाकडे, धर्माकडे बघायला हवं. धर्मात डोकं वापरा असं सगळे संत, सुधारक वर्षानुवर्ष सांगताहेत. त्यांचं ऐकून निदान बुद्धीची देवता गणरायांचं रुप तरी समजून घ्यायला हवं.

कसलाही धार्मिक विधी असो सर्वात आधी गणपतीची पूजा करावीच लागते. त्याला पर्याय नाही. ते पूजन होतं बुद्धीची देवता म्हणून. योग्य अयोग्याचा निर्णय घेते ती बुद्धी. तुम्ही पुढे जे काही करणार आहात, ते निर्बुद्धपणे करू नका, पोट भरण्यासाठी बुद्दी वापरता, मग जगणं शिकवणाऱ्या गोष्टीत ती का नको, असंच गणराज आपल्याला अग्रपुजेत सांगत असतो. कुणीतरी सांगतंय, बापजादे करत होते. म्हणूनच आपण काही करु नये. प्रश्न विचारणं, उत्तरं शोधणं हीच बुद्धीच्या देवाची खरी पूजा आहे. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ हा तुकाराम महाराजांनी सांगितलेला त्या पूजेचा बीजमंत्र आहे.

हेही वाचा : स्वतःशी संवाद साधण्यासाठी करावं हरतालिकेचं व्रत

पुराणातली कथा काय सांगते?

तशी पुराणात एक कथाही आहे. गणपती यज्ञात अडथळे आणत होते. ऋषीमुनींनी वैतागून देवाधीदेव महादेवाकडे तक्रार केली. महादेवांनी उपाय सुचवला, गणपतीची पूजा करा आणि ही पूजा सुरू झाली. यज्ञ म्हणजे काय? यज्ञ हा शब्द आलाय यज् या धातूमधून. यज् या धातूचे तीन अर्थ आहेत, देवपूजा, संगतीकरण आणि दान.

संगतीकरण म्हणजे लोक जोडणं. कुणी यज्ञात फक्त असल्यानसल्या स्वर्गासाठी देवपूजा आणि दानातच अडकून बसत असेल तर बुध्दीची देवता त्याला त्रास देणारच. सगळ्यात महत्वाचं आहे जमिनीवरच्या लोकांशी मैत्री करणं त्यांना उभं करणं. ऋषिमुनींनी गणपतीची ही पूजा सुरू केली. गणपती प्रसन्न झाले.

गणपतीच्या कथांमधला अर्थ समजून घेणं म्हणूनच महत्वाचं आहे. भारतीय तत्वज्ञानाचे एक आधुनिक भाष्यकार पांडुरंगशास्त्री आठवले आपल्या ‘संस्कृती पूजन’ पुस्तकात म्हणतात, `पौराणिक कथा आहे, की अजाणता गणपतीचे शिर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकराने आपल्या पार्षदाला शिर शोधून आणण्यासाठी पाठवले. पार्षद जवळच जाऊन हत्तीचे मस्तक घेऊन येतो आणि धडावर ते मस्तक ठेवून गणपतीला सजीव केलं जातं. गणपती गजानन बनतो.

पुराणांची भाषा भावगर्भित अशीच लक्षणा आणि रुपकं यांनी भरलेली असते. बुद्धिशाली माणसाने स्वत:ची बुद्धी कसाला लावून भावगर्भित अर्थ शोधून काढून आनंद प्राप्त करुन घ्यायचा असतो. तर भगवान शंकराच्या हाताने हत्तीचं मस्तक धडावर बसवलं जातं. मग गणेशाचं स्वत:चंच मस्तक पुन्हा का जोडलं नाही?  परंतु पुराणं आपल्याला समजावतात की गणपती हा तत्वज्ञानाची देवता आणि समाजाचा नेता आहे. तत्ववेत्ता आणि नेता याच्याजवळ हत्तीचंच मस्तक असलं पाहिजे.`

आदर्श नेत्याचे गुण कोणते?

गणपतीच्या नावातच नेतृत्व आहे. गण म्हणजे लोकांचा समूह आणि पती म्हणजे नेता. गणपती शब्दाचा शब्दश: अर्थ लोकनेता. गणराज, गणराय, विनायक, विश्वनायक या नावांतही नेतृत्व आहेच. गणपती हा गुणपतीही आहे. आदर्श नेत्याचे गुण कोणते ते गणपती सांगतो. कुंडलिनीत गणपतीचं स्थान हे मुलाधार मानलं आहे. समाजाच्या सगळ्या रचनेत नेत्याचं स्थानही तसंच मुलाधार असतं. नेता हा समाजाचा मूळ आधार असतो. जसा राजा तशी प्रजा. सार्वजनिक गणेशोत्सव हा राजकारणाचा भाग होता. लोकमान्यांनीही लोकांसमोर आदर्श नेता म्हणून गणपतीला ठेवण्याचा प्रयत्न केला.

हत्ती हा सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. नेता हा बुद्धिमानच असायला हवा, हे गजमुख आपल्याला सांगत असतं. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटलने ‘फिलॉसॉफर किंग’ची संकल्पना मांडलीय. फिलॉसॉफर जगण्याचा बारकाईने विचार करतो. जगायचं कशासाठी ते त्याला स्पष्ट माहीत असतं. त्यामुळे तो स्वार्थाच्या पलिकडे पाहू शकतो. तो कार्यकर्त्यांना नीट मार्गदर्शन करी शकतो. तत्ववेत्ता स्वत:ही विचार करतो आणि इतरांनाही करायला लावतो.

हेही वाचा : रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा

झापडबंद मेंढर तयार करतो तो नेता कसला?

आपल्याकडली ‘राजर्षी’ ही संकल्पना अशीच आहे. सत्तेत राहूनही ऋषीपेक्षा विरक्त असणारे राजा जनक हे त्याचं उदाहरण मानले जातात. आधुनिक काळात याच अर्थाने ‘राजर्षी’ म्हणून शाहू महाराजांचा गौरव होतो. संत रामदासांनी छत्रपती शिवरायांचं ‘श्रीमंत योगी’ असं केलेलं वर्णनही याची आठवण करून देणारं आहे. खरे “फिलॉसॉफर किंग” एकच, शिवछत्रपती.

आपण नेत्यांसमोर ना शिवाजी महाराजांचा आदर्श प्रस्थापित करू शकलो, ना गणपती बाप्पांचा. त्यामुळे मतांच्या, पैशाच्या पलिकडे न पाहू शकणाऱ्या उथळ नेत्यांची पैदास आपण करत आहोत. नेता कसा असायला हवा?  गणपतीसारखा शूर्पकर्ण. त्याचे कान हवेत सुपासारखे. सूप साल टाकून देतं आणि चांगलं धान्य स्वत:कडे ठेवतं. कितीही धान्य पाखडा, सूप थकत नाही. नेत्याला सगळ्यांचंच सतत ऐकावं लागतं. त्यानं त्यातलं सत्व तेवढंच घ्यावं. तो हलक्या कानाचा असून कसं चालेल?  हलक्या कानाने कित्येक राज्यं संपली, पक्ष संपले.

बाप्पा लंबोदरही आहे. त्याचं पोटं मोठ आहे. लोकांचे अपराध पोटात घेण्यासाठी आणि विश्वासाने सांगितलेलं पोटात ठेवण्यासाठी. माफी हे वीराचं लक्षणं आहे. दीर्घद्वेष असणारा चांगला नेता बनू शकत नाही. तसचं कुणी विश्वासानं सांगितलेल्या गोष्टी इतरांकडे बोलूनही चालतं नाही. मोठं पोट म्हणजे तो विश्वास आहे.

वाकड्यात जाणाऱ्याला धडा शिकवणारा

बाप्पांचे डोळे बारीक आहेत, हे प्रतीक सुक्ष्म दृष्टीचं आणि दीर्घ दृष्टीचं. सुक्ष्म दृष्टी दोष दाखवते. दोष आपल्याकडे येऊ नयेत यासाठी नेत्याला सावधान असावं लागतं. दीर्घ दृष्टी म्हणजे भविष्य पाहणारी नजर. लोकांच्या दीर्घकालीन भल्याचा विचार त्याला करावा लागतो.

तो वक्रतुंडही आहे. रिद्धी म्हणजे संपत्ती आणि सिद्धी म्हणजे आध्यात्मिक शक्ती. त्या दोघींपासून या वक्रतुंडानं तोंड फिरवलं आहे. म्हणूनच त्या त्याच्या जवळ आहेत. सुखाच्या मागे लागणाऱ्यांना कधीच सुख मिळत नाही. आव्हानांच्या दिशेने तोंड असणाऱ्याकडे सगळं येतं. अशांना वाकडेपणा आवडत नाही. पारदर्शक मोकळेपणा हे उत्तम नेत्याचं लक्षण आहे.

वाकड्यात जाणाऱ्याला धडा शिकवणारा तो वक्रतुंड त्याचा एक दात पूर्ण आहे आणि दुसरा अर्धा. पूर्ण दात आहे श्रद्धेचा आणि अर्धा बुद्धिचा. तो सांगतो स्वतःवर श्रद्धा म्हणजे आत्मविश्वास असेल तर थोडी बुद्धी कमी असली तरीही चालेल. याच बुद्धी आणि श्रद्धेच्या जोरावर मनाला नियंत्रणात ठेवा, असंही गणपती सांगतो.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं?

चंद्र आणि मन हे आपल्या परंपरेत जवळपास समानार्थीच शब्द आहेत. उपवास म्हणजे संयम राखताना चंद्राकडे म्हणजे मनाच्या चंचलतेकडे ढुंकून बघायची गरज नाही. उपवास सोडताना मात्र मनाला त्याचा मान द्यावा. चतुर्थीचं सांगणं हेच आहे.

गणपतीला चार हात आहेत. नेत्याला दोन हात पुरत नाहीत. त्यांना अनेक हात हवे असतात. ते हात कार्यकर्त्यांचे असतात. गणपतीचे हात कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं ते सांगतात. एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्यात मोदक आणि चौथ्यानं आशिर्वाद. या रुपाला ‘देता घेता’ म्हणतात. नेत्याने कार्यकर्त्यांकडून काम करून घ्यावं, पण त्याला भरभरून द्यावंदेखील. तेव्हाच कार्यकर्ता टिकतो. कार्यकर्त्याची ताकद मोठी होत असते.

कार्यकर्त्यांच्या ताकदीवर अंकुश ठेवून तिला विध्वंसाकडून विधायकतेकडे नेण्याची जबाबदारी नेत्याची असते. त्यासाठी कधी पाशाने शिक्षा करावी लागते तर कधी मोकळ्या हाताने आशिर्वाद द्यावे लागतात. ही कसरत करताना मदतीला असतो तो मोदक. मोद म्हणजे आनंद तत्वज्ञानातून मिळतो. कुणी ते वरवर चाखलं तर त्याला ते फिकं लागतं. मात्र थोडी आत बुडी मारली तर गोडच गोड. ज्ञान नेत्याजवळ हवं आणि कार्यकर्त्या जवळही. दोघांमधे विचारांच्या चर्चा सतत झडायला हव्यात. त्यातुनच उभा राहतो विचारांवर निष्ठा असलेला कार्यकर्ता.

बुद्धीएवढाच श्रमालाही गौरव हवा

बाप्पाचे पाय मात्र तोकडे आहेत. नेत्याने उगाच सगळीकडे धावाधाव करणं योग्य नाही. प्रत्येक ठिकाणी त्यानेच डोकं घालू नये. त्याने इतरांकडून कामं करून घ्यावीत. त्यांच्या पायांना दिशा द्यावी. छोटे पाय हे अंमलबजावणीचं प्रतीक आहे. मोठ मोठे परिवर्तनाचे आराखडे तयार करणं ही आपली प्राचीन खोड आहे. पण ते सगळं प्लॅनिंग कागदावरचं राहत आलंय. त्या महान आराखड्यांची अंमलबजावणी आपल्या इतिहासात क्वचितच झाली.

कारण आपल्याकडे योजना करणारे थोर आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे हीन अशी सामाजिक उतरंडच शतकानुशतके होती. ती मानसिकता संपवा असं बाप्पाचे पाय सांगत असतात. ते योजना आखण्यातच स्वत:ला मोठं समजणाऱ्यांचा थिटेपणा दखवून देतात. कामं व्हायची असतील तर बुद्धिएवढाच श्रमालाही गौरव हवा.

कार्यकर्त्यांचा आदर्श उंदीरमामा

कार्यकर्त्यांचा आदर्श म्हणजे उंदीर. इतर देवांची मोठमोठी वाहनं घरात जाऊ शकत नाही आणि उंदीरमामा तर थेट स्वयंपाक घरापर्यंत जाऊ शकतो. कार्यकर्ते छोटे, नम्र हवेत. नेत्याचा विचार त्यांनी प्रत्येकापर्यंत पोचवायला पाहिजे. नेता घराघरांत पोचतो तेव्हा आणि तेव्हाच खरं परिवर्तन घडतं. उंदराची आणखी एक खासियत असते. तो म्हणे चावला तर कुणाला कळतही नाही. चावायचं असेल तर आधी तो फुंकर मारतो. 

नेत्याच्या आसपास असणाऱ्या कार्यकर्त्यांनी गर्दीतल्या काही जणांना दुखवावं लागतंच. कडू सांगावं. पण गोड शब्दातच. गणपतीने उंदराचा सन्मान करण्यासाठी दिवस निवडला तोही ऋषिपंचमीचा. विचार देणाऱ्या ऋषींसोबत कष्टकरी कार्यकर्त्यांची जोड दिली. याच दिवशी उंदराला प्रसाद ठेवण्याचा प्रघात आहे.

हे झालं उंदरासारख्या उपयुक्त कार्यकर्त्यांचं. दुर्वांचं तसं नाही. आज गणपतीने दुर्वांना आपलं मानलं म्हणून त्याचे औषधी गुणधर्म शोधले जातात. एरवी ते गवतच. ना त्याला रंग ना सुगंध. तीच गोष्ट माटोळ्यांची. तो तर रानचा पाला. बाप्पाने त्याला मोठेपण दिलं. इतरांनी दुर्लक्षिलेल्या दीनदलितांना मोठं करतो तो खरा नेता. स्वत:च्या मोठेपणाचं वलय रंजल्या गांजल्यांसाठी वापरतो तो खरा नेता. नेता अशा सर्वसामान्यांना थोरामोठ्यांसमोरही झुकतं माप देतो.

दुर्व्याचं एक कांडं हजारो फुलांपेक्षा मोठ असल्याचं तो सांगतो. ते ऊब देणं असतं. जगाने नालायक ठरलेल्यांना विश्वास देऊन त्यांच्याकडून चांगल घडवणं, हे नेत्यांचं काम आहे. राजकारणाचं हे विधायक रूप आहे. त्यामुळे राजकारणाला शिव्या देत नाकं मुरडणं हे खऱ्या गणेशभक्ताला शोभत नाही. चांगल्या लोकांनी राजकारणात येऊन त्यातला चांगुलपाणा वाढवावा, अशी प्रेरणा गणपती देतो.

गणपतीला लाल फुलं का आवडतात?

लाल हा क्रांतीचा रंग. नेत्याला क्रांती हवी असते. विधायक बदलांना विरोध करतो तो नेता नाही, हे खुशाल समजावं. हा क्रांतीचा लाल रंग बाप्पाने घेतला आहे मंगळाकडून. मंगळ हा पृथ्वीचा पुत्र. गणपतीही पार्वतीचा म्हणजे पृथ्वीचाच मुलगा. म्हणूनच गणेशभक्तीत मंगळवार आणि अंगारिकेचं महत्व आहे. अंगारक हे मंगळाचंच नाव. क्रांतीही पृथ्वीशी म्हणजे मातीशी जोडली असली पाहिजे. फक्त राजे बदलणं म्हणजे क्रांती नाही. लोकांच्या जगण्यात बदल घडवते ती क्रांती.

गणपती हा आई पार्वतीचाच लाडका लेक. त्याचीही आईवरती प्रचंड माया आहे. पार्वतीनेही स्वत:च एकटीने त्याची निर्मीती केलीय. त्याच्या निर्मितीत शिवशंकराचा सहभाग नाही. उलट त्यांनी सुरवातीला श्री गणेशाला मारलचं आहे. पार्वती मातृसत्ताक पद्धतीचं प्रतीक आहे. मातृसत्ता ही प्रेम आणि आदराच्या आधारे उभी असलेली लोकशाही समाजपद्धत होती. त्यातून निर्माण झालेलं नेतृत्व म्हणजे गणपती.

साहित्यिकांची कदर करणारा नेता

पुरुषसत्ताक पद्धत ही हिंसा आणि भीतीच्या आधारावरची राजेशाही समाज पद्धत आहे. मातृसत्ताक ते पुरूषसत्ताक या स्थित्यंतरात आईची बाजू घेऊन लढणारा गणपतीच होता. नव्या पद्धतीला त्याला आदर्श म्हणून स्वीकारावं लागलं. त्यामुळे आजही देवीपूजनाचा प्रभाव जिथे आहे तिथे गणपतीचाही प्रभाव आहे. एका अवतारात तर त्याने महिलांचं सैन्यदेखील उभं केलंय. महिलांच्या पाठिंब्याशिवाय कोणतंही नेतृत्व टिकू शकत नाही. त्यामुळे त्यांचं संघटन महत्वाचं आहे. अशी टीप गणपती आजच्या नेत्यांना देतो.

गणपती हा व्यासरचित महाभारताचा लेखनिकही आहे. गंगातीरावरचे व्यासच नाहीत तर अकराव्या शतकातले तमिळ संतकवी नांबियंदर नांबी यांची गाथाही गणपतींनीच लिहिलीय. ही नेत्याने साहित्यिकांना केलेली सर्वतोपरी मदत आहे. चांगल्या समाजासाठी उत्तम साहित्यही घडवावं लागतं. पण त्याहीपुढे जाऊन केलेलं हे डॉक्युमेंटेशन आहे. आपला भूतकाळ कसा होता हे वर्तमानपुढे मांडणं आणि वर्तमानाला भविष्यासाठी टिपून ठेवणं हे नेत्याचं कामं आहे.

विसर्जन म्हणजे अंत नव्हे, तर नवी निर्मिती

गणपती ओमकार आहे. ओमकार हा सगुणाकडून निर्गुणाकडे होणारा प्रवास आहे. मुर्ताकडून अमूर्ताच्या दिशेने होणारी ही वाटचालं आहे. भक्तीत मूर्ती हवीच. फक्त मूर्तीत अडकून बसता कामा नये. भगवंताचं खरं रुप आकाराच्या पुढे आहे. विसर्जनामागचा अर्थ तोच आहे. खरा देव गाठायचं असेल तर मुर्तीच विसर्जन करावंच लागेल. हा साधनेतील अटळ असा संघर्ष आहे, असं अध्यात्म मानतं.

मोठ्या नेत्यांच्या प्रतिमापुजनाचं विसर्जनही असंच अपेक्षित असतं. व्यक्तिपूजेत नेत्याचं स्थान आणि क्रांती संपून जाते. म्हणून व्यक्तिपूजेपासून व्यक्तिगुणपूजेपर्यंत जायला हवं. व्यक्तीपेक्षा विचार मोठा हे समजून घ्यायला हवं. नेत्याला देव करणं सोपं असतं. मतांचा जोगवा मागण्यासाठी ते सगळ्याना हवं असतं. नेत्यांवर त्या लादलेल्या देवपणाचं विसर्जनच व्हायला हवं. नेता कितीही मोठा असला तरीही त्यांचं माणूसपणच इतरांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी प्रेरणा देतं, हे गणपतीचं विसर्जन आपल्याला सांगत असतं. नेत्यांवर त्या लादलेल्या देवपणाचं विसर्जनच व्हायला हवं.

विसर्जन हे अंत नाही. हे विशेष सर्जन आहे. नवी निर्मिती आहे. एकातून अनेक नेते उभे राहायलाच हवेत. आमच्या चितेतून हजारो भगतसिंग उभे राहतील, असं सांगणाऱ्या शहिदांची प्रेरणा विसर्जनात असली पाहिजे. मशालीने मशाली पेटल्या पाहिजेत. क्रांतीची ज्योत कधीच विझता कामा नये. 

हेही वाचा : 

आता या मंटोचं करायचं काय?

वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे 

रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा

पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला